नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती👇भाग👇१०👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती👇भाग👇१०👇
..नर्मदे हर.. हर हर नर्मदे.
गळाभर पाण्यातून आम्ही सुखरूप बाहेर आलो. हे श्रेय त्या परीक्रमावासियांना जातं जे एक तास आमच्यासाठी वाट बघत बसले होते.चिखलाने माखलेल्या ओल्या कपड्यांनी, जोडे न घालता, आम्ही पुढचे ३ किमी चालत मांडव्य ऋषींच्या् या आश्रमात पोचलो. आंघोळ केली आणि मगच भोजन प्रसादी वगैरे झालं. तिथे गेल्यावर मांडव्य ऋषी ज्या गुहेत तप करायचेत ती गुहा खाली जाऊन बघितली. इथे रांगत जावे लागते. आत गेल्यावर एका कोप-यात ब-या पैकी ऊबदार,कोमट आणि बाकी गुहेत अगदी थंड असे दोन वेग वेगळे तापमान जाणवते. मांडव्य ऋषी अजूनही तिथे अदृश्य अवस्थेत तप करत आहे असे म्हणतात.

आता मला जो नागराजांचा खुलासा झाला तो सांगते. इथे बाहेर एक महादेवाची पिंड आहे. त्या पिंडीच्या चारही बाजूनी गोल तारेचं कुंपण केलं आहे आणि या कुंपणाच्या जमिनीवर एक भलं मोठं बीळ आहे. असं देवाला तारेच्या कुंपणात का ठेवलय असं विचारल्यावर त्या साधू महाराजांनी तारे खालच्या बिळा कडे बोट दाखवलं.

दिवसातून एकदा केव्हातरी त्या बिळातून ८ ते १० फुटाचा नाग येतो, पिंडीला वळसा घालून साधारण मिनिट दोन मिनिट तसाच थांबतो आणि आल्या पावली, कुणालाही त्रास नं देता नाल्याच्या दिशेला निघून जातो. हे समजल्यावर अंगावर काटाच आला. आम्हाला ज्या नागराजांनी दर्शन दिलं ते त्रास द्यायला नव्हतं, त्यांनी आम्हाला नक्कीच आशीर्वाद दिला असला पाहिजे. हा अनुभव निश्चितच वेगळा होता. ज्या अनुभवात भान शिल्लक राहत नाही त्याला दिव्य अनुभव म्हणतात ना..? मग कारण काहीही असो, त्यावेळी जी विचार शून्य मनस्थिती झाली होती कुठल्या ट्रान्स पेक्षा वेगळी नव्हतीच. काय पण मैयाची कमाल आहे नं? काही न मागता किती देते ती?

आम्ही दुपारची भोजन प्रसादी घेऊन पुढे शालिवाहन आश्रमाला निघालो. शालिवाहन शक गणना जिथून सुरु झाला ती ही जागा. यालाच नावडा टोडी असे ही म्हणतात. इथे पोचताना आम्हाला उशीर झाला होता. कारण असं की सांगितल्याप्रमाणे ही जागा ३ किमी नसून ती जवळ जवळ ८ किमी ची निघाली. जवळ ओले कपडे होते त्यामुळे वजन वाढलेलं होतं. नाल्याच्या पाण्यामुळे सुरेखा ताई च्या पायाचे छाले फार दुखू लागल्याने वेग कमी झाला होता, दूरवर लाल भगवा झेंडा दिसत होता तिथवर जायचं होतं. हा सगळा जंगलाचा भाग. एखाद दुसरं शेत मध्ये. मैयाच्या पलीकडच्या किना-यावर महेश्वर शहर वसलेलं. तिथे मैया किनारी होणारी जी काय हालचाल होती तीच आम्हाला आधारासारखी वाटत होती. अंधार पडू लागला होता..आम्हाला अजून बरच अंतर आणि बराच वेळ पायी चालत राहावं लागणार होतं…पण मध्ये कुठेही थांबण्याची काहीही सोय नव्हती. आम्ही जीवाच्या आकान्तानी पावलं उचलत होतो. अजून किती दूर आहे आश्रम हे विचारायला सुद्धा तिथे कुणीच नव्हतं.

मैयाच्या पाण्यात अंधार मिसळू लागाला होता आणि आम्हाला कोल्हेकुई ऐकू येऊ लागली. आम्ही दोघी मैयाचा जप करत फक्त पावलं पुढे फेकत होतो आणि तितक्यात आम्हाला आवाज आला “ बस थोडी दूर है, इधर से जाना, किनारे तराफ मत जाना” जरा नजर फिरवली तर एक २५ चा तरुण किना-याच्या वरच्या भागावर उभा राहून आम्हाला रस्ता दाखवत होता. त्यांनी दाखवलेला रस्ता जरा वस्तीकडे वळणारा होता त्यामुळे धीर आला, जरा पुढे गेल्यावर आश्रम दिसू लागला आणि हायसं वाटलं. आणि मग समजल की आम्ही किना-याने जाण्याच्या ओघात हळू हळू पात्राकडे जात होतो. जो रस्ता आम्ही धरला होता तो आम्हाला नदी च्या मध्यभागी नेऊन सोडणारा होता. हा माणूस योग्य वेळी दिसला नसता तर आमचं काय झालं असतं देव जाणे! आम्ही कदाचित बराच अंतर चालून नदीच्या मध्यभागी गेलो असतो, तिथून आम्हाला पुन्हा परत यावं लागलं असतं आणि अंधार पूर्ण पडला असता तर कदाचित तिथेच कुठेतरी जंगलात, अन्न आणि निवा-याशिवाय रात्र काढावी लागली असती. त्या किनारी चालताना आम्हाला कुत्र्या कोल्ह्याने खाल्लेले जनावरांचे सांगाडे बर्याच ठिकाणी दिसले होते..कदाचित आम्ही त्या जनावराचे सावज सुद्धा झालो असतो… पण मैया नी तसं होऊच दिलं नाही. ती तसं होऊच देत नाही.

शालिवाहन आश्रमात आल्या नंतर इथे बरेच परिक्रमावासी भेटलेत. आजच्या अनुभवाने खर तर मन धस्स झालं होतं. अशावेळी कुणीतरी आपलं माणूस जवळ असलं की खूप छान वाटत असतं. मैया सोबत होतीच पण ती आम्हाला दिसत नव्हती. मायेनं कुणीतरी डोक्यावरून हात फिरवावा अस वाटत होतं. पण इलाज नव्हता. भोजन प्रसादी ची पानं घेतली होती. आम्ही पानावर बसलो. पानात वैदर्भीय वांग्याची भाजी वैदर्भीय चवीचा कांद्याचा झुणका आणि ज्वारीच्या भाकरी होत्या. हे सगळं बघून माझं मन आपल्या माणसाची आठवण काढत होतं.. आज मला आपुलकीचे दोन शब्द ऐकायचे होते .इथे मध्यप्रदेशात ज्वारी फार मिळत नाही. म्हणजे कुणीतरी महाराष्ट्रीय व्यक्तींनी इथे सेवा दिली आहे हे स्पष्टच होतं. आम्ही जेवून घेतलं.

मी थोडावेळ देवळाबाहेर असलेल्या झाडाखाली बसले होते. माझ्या बाजूला एक म्हाता-री नऊवारी लुगडं नेसलेल्या आजी येऊन बसल्या. त्या आजींनी माझी चौकशी केली. पायी परिक्रमा करतेय याचं त्यांना फार कौतुक वाटत होतं. त्यांनी माझं गाव विचारलं. मी नागपूरची आहे म्हटल्यावर आजींनी मला मिठीच मारली. माझ्या कपाळाचा मुका घेतला….” माह्या गावची लेक हाय व तू” असं म्हणून माझी चक्क दृष्ट काढली…. मी निशब्द झाले होते, मला जे हवं होतं ते मिळालं होतं. ती माउली आपल्या लेकीची एकही इच्छा अपूर्ण ठेवणार नव्हतीच!! फक्त हे समजण्यासाठी आणि अंगवळणी पाडण्यासाठी अजून परिक्रमा पथावर वाटचाल होण गरजेचं होतं आणि अधिक अनुभूती पुढे या वाटेवर माझी वाट बघत होत्याच. पुढच्या भागात त्यांच्याबद्दल लिहेनच! नर्मदे हर.
©सुरूची नाईक
देवा तुझा मी सोनार
9309926559
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*