नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग 👇११.👇 – बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग 👇११.👇

 शालिवाहन आश्रमातून दुस-या दिवशी सकाळी सात वाजता पुढचा प्रवास सुरु केला. इथे आम्हाला सौ रेखा कुलकर्णी आणि सौ अनघा पूर्णपात्रे भेटल्यात. सौ मंत्री यांना देखील मांगीलाल भाई नी गाडीवर इथपर्यंत सोडून दिलं होतं. तसा गृप आता मोठा झाला होता पण सगळ्यांच्या चालण्याची स्पीड वेगवेगळी असल्याने आम्ही मागे पुढेच झालो होतो. आम्ही मौनी बाबा आश्रमात पोचलो तेव्हा दीड वाजला होता. आमच्यातील काहिंना तब्येतीची तक्रार असल्यामुळे त्यांनी त्यांच्या बॅग मोटर सायकल वाल्याला देऊन पुढे पाठवून दिल्या होत्या. माझ्या मनात मात्र मैया कृपेने तशी इच्छा कधीच झाली नाही आणि तशी वेळही माझ्यावर मैय्याने कधीही येऊ दिली नाही. माझ्या पाठीवरच ओझं हे माझ्या कर्मांच ओझं आहे तेवढ तरी वाहून न्यायलाच हवं हाच विचार मनात कायम असायचा, अर्थात तो टिकवून ठेवण्याची शक्ती ही मैयाचीच होती.

तर आम्ही आज २० किमी चाललो होतो. इथे आश्रमात आल्यावर ज्यांनी सामान पुढे पाठवून दिलं होतं ती मंडळी आपापलं सामान शोधू लागली. सामान काही सापडेना. प्रत्येकाच्या मनात आलं की मोटरसायकल वाला नक्की सामान घेऊन पळून गेला. आम्ही पायी येणार, तो गाडीवर..आम्ही शेतातून, तो रस्त्यांनी.

म्हणजे तो तर आमच्या तास दोन तास आधी पोहोचायलाच हवा होता. पण इथे तो आलाच नव्हता. आता काय करायचं? या मंडळी कडे काहीच सामान नव्हतं.अंगावरचे कपडेच फक्त काय ते होते.कुणी तरी म्हणालं भोजन प्रसादी लागलीये. निदान ती तरी घेऊयात, मग बघू काय करायचं.

माणसाचं मन खूप निगेटिव्ह असतं. हे असं का असतं ते माहित नाही. पण असतं हे मात्र खरं. काहीही झालं तरी पहिला विचार मनात येणारा हा वाईटच असतो. खर तर बरेच वेळा ह्या वाईट विचारा सारखं वाईट सभोवताली काहीच नसतं. आपणच त्याला वाईट पणाची किनार लावून त्या परिस्थितीचं रूप अधिकच ओंगळवाणं करून ठेवतो आणि नसेल त्या विचारांच्या मागे धावून दु:खी होत जातो. हा जो मानवी स्वभाव आहे तो बदलता आला तर? कदाचित सुखाचा शोध थोडा सहज होईल…पण ते काही घडवण आपल्या हातात नाही, आणि मग आपले भोग कसे भोगता यायचेत?……असो…!

तेव्हाही आम्ही अशाच नकारात्मक भावनेतून त्या बिचा-या मोटारसायकल वाल्याला काहीबाही बोलत होतो, अर्थात मनातल्या मनात. आणि ज्यांचं सामान आलेलं नव्हतं त्यांच्या मनातील ती काळजी त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसून येणं ही स्वाभाविक होतं. साधारण तीन वाजत आले होते. आता सामान असलेले लोक पुढे निघणार आणि नसलेले इथेच थांबणार हे न सांगताच स्पष्ट झालं होतं. मी निघायची तयारी केली. एक दोन परिक्रमावासी सोबत होते पण मी त्यांना ओळखत नव्हते.आम्ही थोडं अंतर चालून गेलो असता समोरून एका सायकल वर एक माणूस या मागे राहिलेल्या मंडळीचं सामान घेऊन येताना दिसला. त्याला विचारलं असता त्यांनी जे सांगितलं ते ऐकून आपल्या मनाचा फार फार राग आला.

त्या मोटरसायकल वाल्याची गाडी पंक्चर झाली होती. ते सामान आणि ती गाडी त्यानी बरच अंतर ओढत नेली आणि पुढे तो मोटरसायकल वाला एकटा गेला. तिथे त्यानी लोकांना गळ घातली आणि एका सायकल वाल्या माणसाला परिक्रमावासिंचं सामान नेऊन देण्याला तयार केलं. मग हे सामान त्याच्या सायकल वर लादलं आणि त्याला मौनी बाबा अश्रमात पाठवलं. इतकं सगळं करे पर्यंत त्याला निश्चितच बराच वेळ लागला असणार.. पुढे जवळ जवळ ६ लोकांचं ओझं सायकल वर वाहून आणणा-या माणसाच्या शारीरिक त्रासाचा विचार करता त्याने फार मोठे कष्ट घेतले होते. आणि आम्ही काय काय विचार करत होतो बघा! मनाचे खेळ सगळे… त्या वेळी समजलं.. रिऍक्ट व्हायचं नाही, अगदी जमेल असं नाही, पण प्रयत्न करायचा…. कारण आपण जसं व्यक्तं होतं तसं आजूबाजूला काहीच नसतं बहुतांश वेळी… हा एक धडा घेऊन मी पुढे निघाले.

पुढे कठोराला जाताना मी आणि सुरेखा ताई सोबत होतो. शेतातून जाणारा हा रस्ता होता. इथे आम्हाला रस्त्यात एका ने चहा आणि बिस्कीट पुडे दिले. कठो-याला अविनाश चं एक अन्न छत्र आहे, तिथेच थांबायचं असा आदेश होता. मात्र आम्ही कठो-यापर्यंत पोहचू शकलो नाही. ज्या दिवशी आम्ही अमुक ठिकाणी जायचं असं ठरवायचो त्यादिवशी आम्ही तिथवर पोहचूच शकायचो नाही. काही ना काही कारण व्हायचं आणि आम्हाला आधीच कुठेतरी मुक्काम करावा लागायचा. पुढे राजघाट नंतर आम्ही ठरवणं च सोडून दिलं. या वेळी इथे आम्ही खलघाट ला मुकाम केला. इथली राम मूर्ती इतकी बोलकी आहे की समोरून उठायची इच्छा होत नाही. रात्री १२ वाजेस्तोवर मी या मूर्तीसमोर बांधून ठेवल्यासारखी बसली होती. त्यावेळी मनात काय विचार होते ते आठवत नाही. काही विचार नव्हतेच बहुधा. इथेही थंडी फार जास्त होती पण मैया कृपेने आम्हाला एक खोली मिळाली. पुरुष मंडळी मात्र कुडकुडत बाहेर झोपली होती.

इथे येताना एक तरुण, देखणा राजबिंडा सन्यासी रस्त्यात भेटला होता. अस्खलित मराठी बोलत होता तो. झपाझप पावलं टाकत होता. त्याची भेट झाली त्या वेळी मी आणि पसारकर काकू अशा दोघी सोबत होतो. ” अभी कितना दूर है खल घाट” असं विचारल्यावर तो थांबला, म्हणाला, ” माई आपण फक्त चालत राहायचं असतं, बाकी विचार करायचा नसतो”, मग मझ्याकडे पाहून म्हणाला, प्रश्न पडतात तुम्हाला, पण विचारत नाही तुम्ही..चांगलय, आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्यालाच शोधायला लागतात….आता तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ते सुटतील लवकर…फ़क्त एक करा, राम सोडू नका.” आणि झपाझप पावलं ताकत तो पुढे निघून गेला.

पुढे खलघाट आश्रमात तो सगळ्या परिक्रमावासिंना जेवायला वाढत होता. खिचडी आणि कढी ची भोजन प्रसादी होती. मला वाढता वाढता तो मधेच माझ्याकडे बघून स्मीतहास्य करायचा, आणि जणू काही मी काय विचार करते आहे ते त्याला समजतय असे भाव मला त्याच्या चेह-यावर दिसत होते. भोजन प्रसादी झाल्यावर मी राम मंदिरा समोरा बसली होती तेव्हा तो सन्यासी तिथे आला, त्या राम मूर्ती कडे बोट दाखवलं आणि म्हणला…. “राम…….राम राम मैया जी…”असं म्हणत तो सन्यासी निघून गेला, आणि मी त्या पाठमो-या सन्याशाकडे बघत राहीले… तो आपल्या खोलीत निघून गेला आणि मग माझी नजर त्या सन्याशाने दाखवलेल्या रामाच्या मुर्तीवर स्थीर झाली. भान आलं तेव्हा १२ वाजले होते.

मला काहीही समजत नव्हतं…पण तो राम मला पुढेही अधून मधून आठवण करून देत होता स्वतःची..मात्र प्रत्येक वेळी एक वेगळा सन्यासी माझ्यापुढे येत आणि रामाची आठवण करून देत.. तीन वेगवेगळे सन्यासी, तीन वेगवेगळ्या प्रदेशात मला भेटलेत, मात्र ते जे वाक्य बोललेत ते शब्दश: सारखं होतं..खलघाट चा हा तेजस्वी सन्यासी म्हणाला, रामाला सोडू नका, आणि नंतर भेटलेले सन्यासी म्हणाले “बेटा राम को दूर मत करना कभी” आहे न आश्चर्य? इतकं सारखं वाक्य कसं काय बोललेत हे तिघं ही?

मैया किती करते आपल्यासाठी, आपल्याला जे काही आवश्यक आहे असे संदेश सुद्धा ती देते.. मात्र आपण कमी पडतो तिचे संकेत समजायला… ती आई आहे. ती प्रेमळ आहेच. पण बाळाला वळण लावायला आईला कधी कधी तिचा राग दाखवावाच पलागतो… असा राग आईने मला पण दाखवला आहे… त्या दिवशी जे झालं त्यावरून समजलं, तिच्या योजना खूप वेगळ्या असतात… त्या समजून घेण्याचा प्रयत्न ही करू नये.. ती म्हणते तसं करत रहावं, नाहीतर फ़टका दिल्याशिवाय राहयची ती..कसा फ़ट्का पडला त्या दिवशी… नेमकं काय घडलं की ती रगावली? पुढच्या अनुभवात सांगते नक्की.
©®नाईकसुरूची नाईक:देवा तुझा मी सोनार:9309926559
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*