नर्मदा परिक्रमा- एक विलक्षण अनुभूती👇भाग👇९.👇
नागराज दर्शन,केवळ ८ इंचांवरून!
*नर्मदे•••हर हर नर्मदे*
मी आणि सुरेखा ताई मांगीलाल भाई कडून पुढे निघालो. वाट तशी एकट होती, पण मोठी होती. रस्त्याने अगदी अधून मधून एखादी दुचाकी जाताना दिसायची. मी आणि सुरेखा ताई मनातून तशा शांत होतो पण कालचा बिबट्याचा प्रसंग कुठे तरी मनात होताच. भीती मात्र वाटत नव्हती. पुढे वाटेत वेदा नदी लागते आणि इथे मैया चा आणि वेदा नदीचा संगम आहे म्हणून या जागेला वेदा संगम म्हणतात. लेप्याला मैया किना-याहून वाट नसल्याने जाता येणा शक्य नव्हते म्हणून २ किमी पलीकडचा रस्ता घेऊन आम्ही चालायला सुरवात केली. मात्र नदीवर पूल आल्यावर आम्ही गोंधळलो. कारण पुलावर कुठेही नदीचं नाव लिहिलेलं नव्हतं. ही मैया का वेदा हे समजण्याइतकं मैयाचं रूप अजून आम्हाला अंगवळणी पडलं नव्हतं. रस्ता तर निर्मनुष्य. आता करायचं काय? मैया ओलांडायला नको होती. आम्ही थोडा वेळ वाट पाहिली. कुणी येता जाता दिसलं की विचारू असं म्हणून बराच वेळ होऊन गेला होता. आता तिचा पुकारा करण्याशिवाय हातात काही नव्हतं.
आम्ही दोघींनी मोठमोठ्याने नर्मदे हर च्या आरोळ्या द्यायला सुरवात केली. साधारण ५ मिनिट आमच्या नर्मदे हर ला काही उत्तर आलं नाही. मात्र मग झाडी मागून नर्मदे हर चा आवाज आला आणि एक माणुस पुढे आला. निळ्या रंगाचा शर्ट, तपकिरी रंगाची पॅंट, आणि तपकिरी रंगाचा ओढणीवजा स्कार्फ त्याने घातलेला होता. दाढी मिशा आणि कपाळावर कुंकवाचा टिळा लावलेला हा माणूस आपुलकीनी हसत हसत म्हणाला “जाओ जाओ ये नर्मादाजी नही है” आम्ही त्याला काहीही प्रश्न न विचारताच त्यांनी उत्तर दिलं होतं. “आप यहा क्या कर रहे हो भाई जी” विचारल्या वर दूरवर बोट दाखवत म्हणाला “रेत की खान में काम करता हु” त्याने जिकडे बोट दाखवलं ते अंतर तसं बराच लांब होतं. आमचा आवाज तिथवर जाऊन अवघ्या ५ मिनिटात हा माणूस आला आणि आम्ही न विचारताच आम्हाला जायला सांगितलं यावर आमचा विश्वास तर बसत नव्हता पण किमया असते आणि त्यावर विश्वास आपोआप बसतोच … तसे अनुभवच ती आपल्याला देत असते असा विचार करत आम्ही पुलावर चालू लागलो.
*आम्ही जास्तीत जास्त ५०० मिटर चालून झालं असेल तोच पुला पलीकडून एक ट्रॅक्टर येताना दिसला. येणा जाणा-याला नर्मदे हर करायचं म्हणजे तेवढाच आपला जप होत जातो म्हणून आम्ही नर्मदे हर करण्यासाठी थांबलो मात्र दोघी आश्चर्य चकित होऊन बघत राहिलो होतो. कारणही तसच होतं. *आत्ता पाच मिनिटापूर्वी ज्या माणसाने आम्हाला जा म्हणून सांगितलं तोच माणूस समोरून ट्रॅक्टर घेऊन येत होता. असं कसं शक्य आहे? पण असं झालं आहे. आम्ही दोघीही एकाच वेळी एकमेकींकडे बघत होतो…हा माणूस आता जेमतेम ५ मिनिटापूर्वी अचानक झाडीतून आला आणि आता हाच समोरून येतो आहे? बरं पुलापलीकडे जायला दुसरा कुठलाही रस्ता नाही, हा माणूस आमच्या मागून गेला नव्हता आणि मुख्य म्हणजे हे ट्रॅक्टर येताना आम्ही बघितलं होतं, ते फार दुरून येत होतं….. आम्हाला दोघींनाही भ्रम झाला अस जरी मान्य केलं तरी आम्ही नर्मदे हर म्हणाल्यावर त्या ट्रॅक्टर वरच्या माणसाने “अभी तो नर्मदे हर किया ना?” अशा प्रकारचे भाव प्रदर्शित केले आणि गालातल्या गालात हसून पुढे गेला. आपण एखाद्याची गंमत करतो आणि समोरच्याचा उडालेला गोंधळ बघून “ क्यू कैसी रही” असं विचारतो नं तसे भाव होते त्याच्या चेह-यावर होते. आता आमची खात्री पटली होती. आम्ही दोघी आता केवळ रडायचे बाकी होतो. आमच्या कंठातून शब्दच फुटत नव्हते. तो दृष्टी आड जाई पर्यंत आम्ही त्याच्याकडे बघत राहिलो. आणि मग पुढची वाटचाल सुरु केली. आम्हाला सावरायला तेवढा वेळ हवा होता.*
पुढे निघालो आणि माकडखेर्डा गावाकडून पुढे मांडव्य ऋषींच्या अश्रमाचं आणि त्यांनी जिथे अनेक वर्ष तप केलं त्या गुहे चं दर्शन घ्यायचं होतं. सुरेखा ताईच्या पायाला छाले आले असल्याने आम्ही बरच हळू चालत होतो. गाव संपून आम्ही मैया किना-याने चालू लागलो. एकिकडे मैया, आणि दुसरी कडे जंगल असा हा रस्ता होता. वाटेत काही मध्यप्रदेशी परिक्रमावासी अम्हाला पार करून पुढे निघून गेले…”बहोत धीरे चलते हो मैया आप” असं ही म्हणाले…आणी झपाझप निघून गेले..पुढे एक ओढा येणार आहे हे आम्हाला पुढच्या परिक्रमावासिंनी फ़ोन वर सांगितलं होतं.
गळाभर पाणी आहे, ओढा ओलांडून यायचं नसेल तर घनदाट जंगलातून ४ किमी चा फ़ेरा घेऊन यावं लागेल असं ही सांगितलं होतं. आम्ही खरं तर ती चार किमी दूर् ची वाट घेणार होतो, पण तशी वाट आम्हाला कुठेच दिसली नाही. आम्ही ओढयाजवळ पोहचलो त्यावेळी ते मागे भेटलेले मध्यप्रदेशी परिक्रमा वासी तिथेच बसून होते..” म्हणाले, आपके लिये रुके है एक घंटे से…आप सामान के साथ कैसे पार करोगी?, आओ हम आपकी मदद कर देते है”… ही बुद्धी त्यांना कुणी दिली असेल?
हा अनुभव इथेच संपत नाही… त्या परिक्रमावासींनी आमचं सामान घेतलं, आणि गळ्यापर्यंत पाणी असलेल्या त्या ओढ्यातून…ओढा कसला,…नालाच म्हणावा असा घाण होता तो..दलदल होती, तिथून पार करवून नाल्याच्या त्या बाजूला पोचवलं… आता आम्हाला जायचं होतं. आमच्या जवळचा दंड खाली पाण्यात खोचायचा आणि कुठे जरा ट्णक जमीन आहे याचा शोध घेवून मग तिथे पाऊल ठेवायचं..सगळी दलदल, पाऊल ठेवलं की गुडघ्यापर्यंत आत रुतायचं, आणि असं एक एक पाऊल टाकत हा ८ ते १० फ़ुटाचा नाला आम्हाला पार करायचा होता. मी पुढे आणि सुरेखाताई मागे असं आम्ही नाल्यात एक एक पाऊल चालू लागलो. आम्ही नाल्याच्या अगदी मध्य भागी होतो, पाण्याला खूप जोर होता, उभं राहणं ही कठीण होत होतं आणि अशा वेळी मझ्या समोरून एक १० १२ फ़ुटांचा नाग फ़णा काढून आमच्या दिशेने येताना जेव्हा मी बघितला तेव्हा माझ्यातले त्राण गेले…. विचार करायच्या आत तो माझ्या ४ फ़ुटावर येऊन पोहचला होता… आता फ़क्त शेवटचं नर्मदे हर म्हणायचं आणि त्या नागराजापुढे शरण जायचे, इतकेच बाकी होते…सगळं संपलेलं होतं…तो आता माझ्यापासून जेमतेम १ फ़ुटावर होता…मी फ़क्त स्तब्ध उभी होते, सुरेखाताई माझ्या मागे होती…. आधी प्राण मला सोडायचे होते… आणि माझ्यापासून साधारण ८ इंचावर येऊन या नागराजाने त्याची दिशा बदलली…आणि माझ्या बाजूने निघून गेला…त्याचा मला स्पर्श झाला नाही, मात्र पाण्याच्या हालचाली मुळे त्याच्यामधील ताकतीची कल्पना मला आली होती…तो निघून गेल्यावरही, गळ्याभर पाण्यात मी आणि सुरेखा ताई, साधारण ५ मिनिट स्तब्ध उभ्या होतो….
खरं तर हा अनुभव इथे ही संपत नाहीच……या अनुभवामागे नर्मदा मैयाचं एक प्लानिंग होतं मात्र ते आम्हाला आम्ही मांडव्य आश्रमात पोहचल्या नंतर समजलं आणि मन अक्षरश: भरून आलं. ती नर्मदा माई किती कनवाळू आहे आणि आपल्या लेकरांसाठी आणि त्यांच्या भल्यासाठी ती कसे कसे मार्ग काढते हे जेव्हा जेव्हा जाणवतं आणि आठवतं तेव्हा तेव्हा मी नर्मदामय झालेली असते…असाच तो मांडव्य आश्रमातला नागाच्या अनुभवा नंतर चा खुलासा…पण काय ते पुढच्या भागात सांगते.
©सुरूची नाईक
देवा तुझा मी सोनार
9309926559
➖〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️➖


Leave a Reply