अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या सभेत “बडगुजर समाज विशेषांका”चे प्रकाशन करण्याचा अध्यक्ष श्री. सुरेश महाले यांचा मनोदय जाहीर ! – प्रा. एच. आर. बडगुजर

यावल – येथील पद्मावती लॉन्स येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या सभेत “बडगुजर समाज विशेषांका”चे प्रकाशन करण्याचा मनोदय महासमितीचे अध्यक्ष श्री सुरेश शिवराम महाले यांनी जाहीर केला. यावेळी महासमितीचे सचिव प्रा. एच. आर. बडगुजर, उपाध्यक्ष श्री दिलीप राघो बडगुजर, खजिनदार श्री पी. डी. बडगुजर व संघटक श्री सुधीर तुळशीराम बडगुजर या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सभास्थळी वृक्षारोपण, चामुंडा मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी श्री माधवराव जानकीराम बडगुजर, श्री भगवान लक्ष्मण बडगुजर, श्री राजेंद्र भालचंद्र बडगुजर, श्री श्रीराम जानकीराम बडगुजर हे व्यासपीठावर उपस्थित होते.

महासमितीच्या सभेत सुरुवातीला सचिव प्रा.एच.आर. बडगुजर यांनी विषय पत्रिकेनुसार 30 जून 2024 अखेर झालेला जमाखर्च तसेच सन 2023 – 2024 या आर्थिक वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल सभेपुढे सादर केला. विविध समित्या व उपसमित्या यांच्या माध्यमातून होणाऱ्या उपक्रमाचा आर्थिक व्यवहार हा महासमितीच्या बँक खात्यातूनच व्हावा, याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले.

समाज बांधवांसाठी सांस्कृतिक मूल्ये अधोरेखित करणारा व संग्रहित ठेवण्यायोग्य अशा अत्यंत माहितीपूर्ण “बडगुजर समाज विशेषांका”चे प्रकाशन करण्याबाबत सभेत निर्णय घेण्यात आला. हा विशेषांक म्हणजे समाजाचा आरसा असेल, असे नियोजन करण्यात येईल व प्रकाशन सोहळा दिवाळीच्या आनंददायी पर्वात आयोजित केला जाणार आहे.

दरवर्षी प्रभावीपणे राबविला जाणारा शिक्षण क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ऑगस्टमध्ये होणार आहे. यासंदर्भातील सूचना पत्र लवकरच प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच बडगुजर समाज हा विविध समस्यांना तोंड देत असून त्याबाबत विचार मंथन करण्यात येऊन “जाऊया समस्यांच्या मुळाशी” हा उपक्रम सप्टेंबरमध्ये राबविण्यात येणार आहे.

सप्टेंबर महिन्यात महासमितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभेत विविध महत्त्वाच्या धोरणात्मक विषयाबरोबरच बडगुजर समाजाला भाषेवर आधारित अल्पसंख्यांकाचा दर्जा असल्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सामाजिक स्थित्यंतरांना आयाम देऊ शकेल व संक्रमण अवस्थेतील या कालखंडात समाजाची दिशा निश्चित करू शकेल, अशी अध्यक्षीय परिषद 1 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येईल.

युवक समितीच्या वतीने युवकांसाठी प्रेरणादायी चर्चासत्र, संमेलन, करिअर गाईडन्स व रोजगाराभिमुख मिशन याबाबत चर्चा करण्यात येऊन त्याचे नियोजन नोव्हेंबर महिन्यात करण्यात येणार आहे.

तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा “पुरस्कार वितरण सोहळा” हा दिवाळी ते रथसप्तमी यादरम्यान घेतला जाणार आहे. सदर सभेचे आयोजन व स्नेह भोजन महासमितीचे विश्वस्त श्री श्रीराम जानकीराम बडगुजर यांनी स्पॉन्सर केले. तसेच यावल परिसरातून सर्वाधिक 32 समाज बांधवांना महासमितीचे आजीवन सभासद करून संघटनात्मक आघाडी घेतली. त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.

महासमितीच्या या विश्वस्त सभेला सर्व पदाधिकारी, विश्वस्त आणि निमंत्रित सदस्य आणि यावल समाज मंडळाचे संचालक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यांचे स्वागत तसेच सभेसाठी विनामूल्य वस्तुरुप देणगी देणाऱ्या यावल येथील समाज बांधवांचे, मंडळातील पदाधिकारी व सदस्यांचे आभार श्री श्रीराम बडगुजर यांनी मानले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*