जळगांव येथील श्री.दिनेश विश्वनाथ बडगुजर यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित

श्री. दिनेश विश्वनाथ बडगुजर यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित

३४ वर्षांच्या उल्लेखनीय पोलीस सेवेला राष्ट्रीय सन्मान; बडगुजर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा

जळगाव | प्रतिनिधी

पोलीस विभागाचे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीदवाक्य प्रत्यक्ष सेवेत जपत, गेल्या ३४ वर्षांपासून प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावणारे श्री. दिनेश विश्वनाथ बडगुजर (रा. शेंदुर्णी, ह.मु. जळगाव) यांना केंद्र शासनाकडून राष्ट्रपती पोलीस पदक घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या प्रदीर्घ, उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण पोलीस सेवेची दखल घेत हा बहुमान जाहीर करण्यात आला आहे.

श्री. दिनेश बडगुजर यांनी दि. १ ऑगस्ट १९९२ रोजी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी हेड कॉन्स्टेबल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि सध्या पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंत पदोन्नती मिळवत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. सध्या ते अमानवीय वाहतूक कक्ष, जळगाव येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एम.कॉम. पर्यंत शिक्षण घेतले आहे.

कर्तव्य बजावताना प्रामाणिकपणा, मेहनत, तत्परता आणि माणुसकी या गुणांमुळे श्री. दिनेश शेट यांची “खाकीतला माणुसकी जपणारा माणूस” म्हणून सर्व समाजात विशेष ओळख आहे. पोलीस सेवेत कार्यरत असताना त्यांनी कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत समाजाच्या सुरक्षिततेसाठी योगदान दिले आहे.

पोलीस सेवेचा कौटुंबिक वारसा

श्री. दिनेश बडगुजर यांना पोलीस सेवेचा समृद्ध कौटुंबिक वारसा लाभला आहे. त्यांचे वडील कै. विश्वनाथ दौलत बडगुजर, तसेच काका, भाऊ आणि चुलत भाऊ पोलीस विभागात कार्यरत होते व आहेत. या पार्श्वभूमीवर दिनेश बडगुजर यांनीही पोलीस सेवेची परंपरा समर्थपणे पुढे नेली आहे.

विशेष म्हणजे, त्यांच्या मोठ्या बंधू श्री. प्रमोद बडगुजर आणि श्री. प्रदीप बडगुजर यांनाही यापूर्वी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील तीन भावांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त होणे ही बडगुजर समाजासाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब ठरली आहे.

१५ ऑगस्ट रोजी होणार सत्कार

राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव येथे मा. रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव आणि मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या हस्ते श्री. दिनेश विश्वनाथ बडगुजर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

श्री. दिनेश बडगुजर यांच्या या यशामागे त्यांचे वडील कै. विश्वनाथ दौलत बडगुजर आणि आई श्रीमती पद्माबाई यांची प्रेरणा व आशीर्वाद असल्याचे ते आवर्जून मानतात.

कुटुंबाचीही उल्लेखनीय वाटचाल

श्री. दिनेश बडगुजर यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून, चि. हर्षल बडगुजर यांनी बी.ई. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे, तर कु. विशाखा बडगुजर यांनी मेकॅनिकल विषयातील डिप्लोमा पूर्ण केला आहे.

श्री. दिनेश विश्वनाथ बडगुजर यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याने महाराष्ट्रासह तिन्ही राज्यांतील बडगुजर समाजबांधवांकडून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या राष्ट्रीय सन्मानामुळे बडगुजर समाजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि सेवाभावाचा समाजबांधवांना सार्थ अभिमान आहे.

बडगुजर.इन परिवारातर्फे श्री. दिनेश विश्वनाथ बडगुजर यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*