हात उगारता मनामना मध्ये विष पेरती हेच हात
स्मित हास्याने हात जोडता प्रेम भरती हेच हात
गोर गरिबा अबालवृध्दा मदतीसाठी हेच हात
गुणवंतांचे कौतुक करण्या पाठीवर मग हेच हाच
लाचारीने भिक मागण्या पुढे पसरती हेच हात
सढळ हाताने दान देण्या पुढे धावती हेच हात
दोन्ही हाताने टाळी वाजण्या काम करती हे हात
राग संतापात कान शिलावर जाऊन बसती हेच हात
राखी आणि कंकणसाठी शोभून दिसती हेच हात
शुभ प्रसंगी पुजनासाठी सरसावती मग हेच हात
आपला हात जगन्नाथ मग उदर भरण्या हे हात
संसार रूपी भवसागर तरूण जाण्या हेच हात
अन्यायाशी लढता लढता बंदूक धरती हेच हात
वळणदार अक्षर लिहिण्या लेखन करती हेच हात
दोन हात करण्यासाठी वापरती मग हेच हात
अभद्र अश्लील भाष्य टाळण्या कानावर मग हेच हात
आजार संकट अपघातामध्ये सेवा देण्या हे हात
हस्तरेषा अन भविष्य बघण्या ज्योतिषा पुढे हेच हात
संत महात्मे चोर डाकुंचे शिल्पकार ते हे हात
पायगुणापेक्षा हातगुणाने श्रेष्ठ ठरती हेच हात
सत्कर्म तडीस नेण्या सदा अग्रेसर हे हात
सतसंगती सतगुणसाठी धरू हातामध्ये हेच हात
मानव जन्म सार्थक करण्या वापरून घ्या हे हात
मृत्युसमयी रित्या हाताने निघून जातील हेच हात
परिसरूपी बहुगुणी हे दिले देवाने दोन हात
महत्व सांगून नमस्कार हा निंबा जोडतो हेच हात
कवी :-
श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल
भ्रमण ध्वनी – 96370 79688



Leave a Reply