नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती👇भाग ५👇
परिक्रमेच्या सुरवातीला केचूआ चे चांगल्या प्रतीचे जोडे पूर्ण फ़ाटतात तेव्हा…
नर्मदे हर… माझे जोडे फ़ाटले…तो अनुभव आता सांगते..मोरट्क्का ते टोकसर म्हणजे गोमुख घाट असा साधारण १० किमी चा प्रवास. यात मधे परमहंस आश्रम लागतो. इथे आमची भोजन प्रसादी झाली आणि इथून पुढे कसं काय माहित नाही पण अचानक माझा एक जोडा पूर्ण फ़ाटला, त्याचं सोल आणि वरचा जोड्याचा भाग वेगळा होऊ लागला. मी चक्क जोडे हातात घेऊन चालू लागले. पण त्यावेळी मनात जे विचार आले ते एरवी माझ्या मनात आले नसते.
नर्मदा खंड ही तपोभूमी आहे आणि या परिसराचा परिणाम आपल्या मनावर झाल्याशिवाय राहात नाही. मुख्य म्हणजे तो इतका नकळत होतो की आपल्यासाठी सुद्धा तो एक आश्चर्याचाच भाग असतो. एरवी रस्त्यात जोडे फ़ाट्ल्यावर माझी थोडी का होईना चिडचिड झाली असती…निदान आता कसं करायचं ही घालमेल तर झालीच असती, पण या वेळी असं झालं नाही…जोडे फ़ाटले हे वास्तव माझ्या मनानी इतक चटकन स्वीकार केलं की त्याची वाच्यता सुद्धा सह प्रवाश्यांकडे झाली नाही…आपल्या सोबत या पुढे ज्या काही घटना घडणार आहेत त्या मैया ची कृपा असणार आहे असा विचार मनात आला…वाटलं, कदाचित आपण परिक्रमा अनवाणी केली पाहीजे असं काहितरी मैया ला सुचवायचं असेल. पुढच ३..४ किमी अंतर मी अनवाणी चालले. फ़ार फ़ार कठीण असतं ते. तेव्हा जे काय दगड गोटे बोचले असतील त्या प्रत्येक बोचण्यातून मला अनवाणी परिक्रमा करणा-यांचं मनोबल काय असेल याची कल्पनाच आली! नाही…मी तेवढ्या तयारीची नव्हती…मला अजून खूप खूप शिकायचं आहे हे मला तेव्हा ख-या अर्थानी उमगलं…ते फ़ाटकेच जोडे मी पुन्हा पायात घातले आणि जमेल तसं चालू लागले. टोकसर आले की चांभाराकडून शिवून घेऊ असं स्वत:ला धीर देत मी टोकसर पर्यंत तशीच फ़ाटक्या जोड्याने पोचले खरे…पण टोकसर आणि पुढच्या तीन गावात चांभार नाही असं मला तिथे समजलं…..आता काय करायचं?
अनवाणी चालण्याची क्षमता माझ्यात नाही हे मला समजलच होतं.तो विचार तिथेच सोडून मी झोपी गेले आणि मला शांत झोप लागली देखील! सकाळी गोमुख घाटावर मैया स्नानाला गेले होते. तिथे मैयाला विनवणी केली…आई योग्य तो मार्ग दाखव… मला हेच जोडे घालून परिक्रमा करायची होती, आणि याला ही कारण होतं, हे जोडे माझ्या बाबांचे.. त्यांना परिक्रमा करण्याची खूप इच्छा होती, आणि म्हणून त्यांच्या जोड्यांमधून मला या नर्मदा मैयाची प्रदक्षिणा करायची होती. भावनिक कारण हे असं होतं या जोड्यांमागचं. मैयामधे उतरले आणि तिला विनवलं, आई, शक्य असल्यास हेच जोडे सुधरवून शिवून घालता येतील असं काहितरी घडवून आण.
सकाळच्या साधारण सहा वाजताची गोष्ट असेल. मी पुढचा प्रवास थोडा अनवाणी, थोडा फ़ाटक्या जोड्यातून असा करू लागले. कांकरीया गावाच्या आधी एक छोटसं गाव लागतं पीतनगर. तिथे एक किराणा मालाचं दुकान दिसलं..सौ डोंगरेंच्या मनात आलं की फ़ेविक्विक नी जोडे चिकटवून बघावे..निदान चालायला थोडं सोपं जाईल. मी आणि सौ डोंगरे त्या दुकानासमोर बसलो, मी फ़ेविक्विक विकत घेतेलं आणि जोडा चिकटवायला म्हणून पायातून बाहेर काढायला लागले…इतक्यात एक माणूस अगदी धावत माझ्याकडे आला, त्यानी माझ्या पायातला जोडा जवळ जवळ ओढून घेतला आणि तो पळून गेला…’अरे बाबा दुसरा तरी घेऊन जा’ इतकं सुद्धा बोलायची संधी मला मिळाली नाही… आता अनवाणी च चालायचं…जोडाच नाही… मात्र त्या माणसाबद्दल माझ्या मनात राग सुद्धा उत्पन्न झाला नाही…एरवी कदाचित आपल्या जवळची वस्तू कुणी हिसकावून घेतल्यावर क्षणिक का होईना राग येईल..पण कसा काय नाही आला मैयाच जाणे… तो दुकानदार, मी आणि सौ डोंगरे आम्ही सगळेच आश्चर्य चकित झालो होतो…दुकानदारानी आम्हाला चहा पाजला… आणि आम्ही पुढे निघालो..तो उरलेला एक जोडा मी तिथेच सोडून दिला आणि आता अनवाणी चालू लागले….सधारण अर्धा किमि जाऊन झालं असेल नसेल, हा मघाचा जोडा पळवून नेणारा माणूस मैया मैया करत आमच्या मागे आला..त्याच्या हातात माझे दोन्ही जोडे होते, म्हणाला, “वो चामरदा की घरवाली को बाहर जाना था, इसलिये जूता जल्दी जल्दी लेकर गया मै. मै तो केवट हू..मुझसे जैसा बना मैने सिलवा दिया. अब आपको नंगे पैर नही चलन पडेगा”. मी काय विचार करत होते आणि तो बिचारा माझ्यासाठी किती धडपड करत होता..मी पैसे देऊ केले…आणि जबरदस्ती त्याच्या हातात ठेवलेच..तो तयार नव्हता पण पैसा हा पैसा असतो आणि गरीबाला गरज असते.. तसे मी काही फ़ार पैसे दिले नाहीत..आणि तसं करून सुद्धा त्याचे उपकार कमी ही होणार नाहीतच…पण निदान काहीतरी समाधान….तिथून पुढे एका गावात एक चांभार दिसला आणि त्याच्याकडून मग ते जोडे मी पुन्हा व्यवस्थित शिवून घेतले.तिथून पुढे कांकरीया नावाच्या गावाला एका आश्रमात थांबलो. “आसन लगादो” असा आदेश मिळाला. आसन लावणे म्हणजे इथे विश्रांती करा, असा अर्थ होतो…त्यात भोजन प्रसादी घेणार हे येतच. इथला अनुभव मजेशीर होता. तास झाला, दिड तास झाला..पोटात भूकेनी खळ्बळ माजलेली आणि हा साधू काही भोजन प्रसादी चं नाव घेईना… शेवटी आमच्यातल्या एकाने हिम्मत करून भोजन प्रसादी चं विचारलं…तो रागवलाच..म्हणाला आप ही बना लो… आप तो बहोत पैसे वाले हो, आपको भोजन की क्या जरूरत? खरीद के खा लेना कही… “ आम्हाला काही समजेच ना, असं काय झालं एकदम? मग त्यानी सांगीतलं, “आपका सामान देखो…दुनिया भर की चिजे उठाके लाये हो..ऐसे आता है कोई मैया के घर?.. मैया पर भरोसा नही, शहर से पढ लिख कर आते हो, और परिक्रमा परिक्रमा का ढोंग रचाते हो…अरे खाना भी ले लेना था साथ मे…” तो साधू चांगलाच चिडला होता. आमच्या जवळच्या भल्या मोठ्या आणि वजनी बॅग्स पाहून त्याला आमचा वैताग आला…. मग तिथेच आम्ही प्रत्येक बॅग मधून अनावश्यक सामान, जास्तीचे कपडे वगैरे सगळं काढून गरीबांना देऊन टाकलं…आणि खरं सांगू…संचय हा त्रासदायकच…तिथे एक धडा असा मिळाला की संचय कुठला ही असो..तो वाईट..
आपण लोक नुसताच संचय करत असतो..पैशाचा, संपत्ती चा, नात्यांचा, माणसांचा, भावनांचा, आठवणींचा आणि मला वाटतं अगदी अनुभवांचा सुद्धा! ते साठवून ठेवलं की वजन होणारच! त्यापेक्षा येईल त्या प्रसंगी, मिळेल त्या परिस्थित, गाठीशी आलेले क्षण, जगणं आणि विसरून जाणं हे खरं समाधानाचं साधन आहे, आणि असं वागता येण्यासाठीचा प्रयास ही असावी साधना….
आम्ही सामान काढून टाकल्यावर त्या साधू महाराजांनी आम्हाला भोजन प्रसादी वाढली… ओझं उतरवल्याचा शरीराला आनंद झाला होता आणि मनालाही. इथून पुढे आमच्या जवळ दोन जोडी कपडे, एक पांघरूण (स्लिपिंग बॅग) आणि थोडे औषध..इतकच सामान होतं. यातलं काही हरवलं गेलं तरी त्याची तमा असणार नव्हती…मुक्त मनानी आम्ही पुढची वाटचाल सुरू केली.
पुढे रावेरखेडी ला जाताना एका परिक्रमावासी मैयाजींना तब्येती मुळे एका गाडी वाल्याचा आधार घ्यावा लागला…लोकं अनोळखी परिक्रमावासी च्या मदतीला धावून येतात इथे. परिक्रमावासीच्या रूपात नर्मदा मैया ला बघणारी इथली ही स्थानीय मंडळी आणि या अन्न्दाता स्थानीयांच्या रुपात परिक्रमा वासींना भेटणारी नर्मदा मैया, हा खरोखर विलक्षण प्रकार आहे. कोण कधी कुठे कुठल्या रूपात येईल आणि काय देऊन जाईल याचा अंदाजही बांधण कठीण आहे…आणि कधी कधी तर मैया चं अस्तित्व जाणवतं पण ती अदृष्य रुपात आपल्या सोबत असते हे अनुभावाताक येतं, सांगितलं तर विश्वास बसू नये असेही काही अनुभव येतात. असाच एक अनुभव पुढच्या भागात सांगते.
संपर्क: सुरुची नाईक
देवा तुझा मी सोनार
9309926559


Leave a Reply