आज २७ जून:बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचा जन्मदिन.! – बडगुजर. इन

आज २७ जून:बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचा जन्मदिन.!
बंगाली कवी,कादंबरीकार, पत्रकार तसेच…
‘वंदेमातरम्‌’ या राष्ट्रगानचे रचनाकार:बंकिमचंद्र चटोपाध्याय (बंगाली उच्चार-बोंकिमचोंद्रो चोट्टोपाद्धाय) यांची आज जयंती.बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचा जन्म २७जून १८३८ रोजी बंगालच्या उत्तर चोवीस परगण्यातील कंथलपाडा येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना संस्कृतची आवड होती.
बंकिमचंद्र यांचे शिक्षण हुगळी कॉलेज आणि कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झाले. वर्ष 1858 मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून बीए परीक्षेत ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांची उपदंडाधिकारी पदावर नियुक्‍ती झाली. बंगाल सरकारचे सचिवपदही काही काळ त्यांनी सांभाळले,त्यांना ‘रायबहादूर’ ही पदवी सन्मानार्थ दिली होती. ते पदवीच्या शेवटच्या वर्षाला असतानाच १८५७ चा उठाव झाला. त्यामुळे त्याचे पडसाद त्यांच्या मनावर होणे साहजिक होते. त्यांनी आपल्या लेखनातून क्रांतिकार्यास उत्तेजन मिळेल असे लेखन केले. त्यांनी…
‘राजमोहन स्पाऊस’ या त्यांच्या इंग्रजी भाषेतील कादंबरीने लिखाण सुरू केले, परंतु त्यांना असे जाणवले की हिंदी व बंगाली भाषेत लिखाण केल्या शिवाय लोकांपर्यंत पोहोचणार नाही. हे लक्षात घेऊन बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हिंदीमध्ये व बंगालीमध्ये लेखन सुरू केले आणि बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या. वर्ष १८६५ मध्ये त्यांनी…
‘दुर्गेश नंदिनी’ ही पहिली बंगाली कादंबरी लिहिली.त्यानंतर ‘कपालकुंडला’, ‘मृणालिनी’, ‘विश्‍ववृक्ष’, ‘चंद्रशेखर’, ‘कृष्णा कंठ विल’, ‘आनंदमठ’, ‘देवी चौधुरानी’ या कादंबऱ्याही लिहिल्या. त्यांनी वर्ष 1872 मध्ये ‘वंगदर्शन’ हे मासिक सुरू केले. त्यामुळे नवीन बंगाली लेखकांना त्यातून लेखन करण्याची संधी मिळाली.
बंकिमचंद्र यांनी आपल्या लेखनाने बंगाली साहित्य समृद्ध केले.आपल्याकडे जसे आपण म्हणतो, ‘ज्ञानदेवे रचिला पाया कलश चढविला वरी तुकयाने’ त्याचप्रमाणे गुरुदेव टागोर म्हणत, ‘राममोहन यांनी बंग साहित्यास दिशा दिली व बंकिमचंद्रांनी त्याला मूर्तस्वरूप दिले व बंगाली नुसतीच प्रौढ नाही तर सस्यशामल झाली’,ते नोकरीत असताना ‘देवा राणी वाचवा’ हे गाणे ब्रिटिश सरकारने पुरस्कृत केलेले एक गाणे होते व भारतात प्रत्येक कार्यक्रमात म्हणणे अनिवार्य होते. याचा त्यांना खूप मनःस्ताप होई. वर्ष 1876 मध्ये…
‘आनंदमठ’ या कादंबरीत त्यांनी…
वंदेमातरम्‌ हे गीत रचून समाविष्ट केले. या गीताने सर्व भारतात रोमांच उठले. 1896 साली कॉंग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात हे गीत पहिल्यांदा गायले. ‘वंदेमातरम्‌’ हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले. अनेक हुतात्म्यांनी वंदेमातरम्‌ म्हणत फाशीचा दोर गळ्यात बांधला.
२६ जानेवारी १९५०,रोजी राष्ट्रगान म्हणून मान्यता देण्यात आली. आधुनिक बंगाली साहित्याच्या राष्ट्रवादाचे जनक असलेल्या या नायकाचे ८ एप्रिल १८९४ रोजी निधन झाले.

स्वातंत्र्य चळवळीत मनामनात राष्ट्रभक्तीचे स्फुलिंग जागविणारे
भारताला मातेसमान वंदन करणारे…
‘वंदे मातरम्’चे रचयिता ख्यातनाम कवि,लेखक, पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना जयंतीदिनी शत् शत् नमन🙏🌹वंदन.!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*