नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती-👇भाग👇 ३👇 – बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती-👇भाग👇 ३👇.

परिक्रमेच्या पहिल्याच दिवशी लागोपाठ अनुभव, एक शुभ संकेत, आणि एक कोडं पडतं तेव्हा…

नर्मदे हर.

पहिल्या दिवशी ओंकारेश्वर ते मोरटक्का, साधारण ११ कि.मी चं अंतर होतं. मी मागे सांगितलं तसं संकल्प करण्याआधी सराव म्हणून आम्ही मोरटक्का ते ओंकारेश्व पायी गेलो होतो.. आता गम्मत बघा…अंतर सारखच, पण संकल्पामधे बळ असतं याची प्रचिती अगदी पहिल्याच दिवशी आम्हाला आली. ११ कि.मी अंतर चालायला आम्हाला आधी जवळ जवळ साडे चार तास लागले. चालण्याची सवय नाही, त्यामुळे २ ते ३ कि.मी अंतरावर आम्ही थांबायचो…मात्र संकल्प केल्यावर, म्हणजे तसं पाहता २ दिवसांनी लगेच हेच अंतर ३.३० तासात पार पडले..आणि त्यातही १ तास वेळ हा जेवण्यात गेला..मधे एक रोटी आश्रम लागतो तिथे दुपारच्या जेवणाची…(आता आपण भोजन प्रसादी हा शब्द जेवणासाठी वापरू) ची व्यवस्था असते. यापुढे आपण जेवणाला भोजन प्रसादी म्हणू याचं कारण आहे. ते असं की परिक्रमेमधे आपल्याला जे काही मिळतं तो नर्मदा माईचा प्रसाद असतो. बालभोग हा ही तसाच एक शब्द, सकाळच्या न्यहारी ला बालभोग म्हणतात, तसच पूर्ण जेवण असलं की त्याला म्हणायचं राजभोग! बरं तर आता पुन्हा संकल्पाकडे वळू.

ओंकारेश्वर ते मोरटक्का, परिक्रमेचा पहिला दिवस आणि मनात खूप उत्साह होताच पण आपण इतकं मोठं ध्येय समोर ठेवलं ते पूर्ण होईल की नाही ही भीती होती. रस्त्याने चालताना त्या दिवशी आम्ही २० -२२ लोक असू. भाग्य बघा कसं असतं… थोडं ऊन होतच..ऑक्टोबर हीट संपली नव्हती मी आणि सौ डोंगरे सोबत होतो, सौ मंत्री जरा पुढे होत्या. रस्त्यात आमच्या जवळचं पाणी संपलं…अगदी आम्ही नवीन परिक्रमावासी असल्याने अजून “नर्मदे हर” ही सगळ्या प्रश्नांची आणि सगळ्या कुलुपांची किल्ली असते हे आम्हाला समजलं नव्हतं. पण स्थानीय लोकांना ते माहित असतं. तर पाणी संपलं होतं आणि आम्ही पाणी कुठे मिळेल का याचा थोडा शोध घेत होतो. इतक्यात एक सायकल वाला येऊन थांबला…. म्हणाला “ नर्मदे हर माताजी, छाछ पाओगे?” आम्ही पाणी शोधतोय, हा ताक विचारतोय….मनापासून आनंद झाला…. आम्ही म्हणालो कैसा दिया, तर म्हणे “पाप करवाओगे क्या मैया जी, पैसा नही लुंगा, आपकी पानी की बोतल खाली है न, उसमे भर लो….” खूप आग्रह करून जवळ जवळ ३ लिटर ताक त्यानी जबरदस्ती नी आम्हाला दिलच..मी आणि सौ डोंगरे भरपूर ताक पिऊन तृप्त झालो आणि वाटेत भेटणा-या परिक्रमावासियांना देऊन ते संपवलं. पण तेव्हा खूप आश्चर्य वाटलं….आणि जे भाव ताक पिऊन तृप्त झालेल्या आमच्या चेह-यावर बघून तो ताक वाला आनंदित झाला होता तोच आनंद ते ताक पुढे भेटलेल्या परिक्रमावासियांना देऊन आम्हाला झाला…त्या ताकवल्यानी आम्हाला २ गोष्टी शिकवल्या.. एक, नर्मदे हर म्हंटलं की मग कुठलाही प्रश्न शिल्लक उरत नाही, आणि दुसरं म्हण्जे सेवा घेण्यापेक्षाही सेवा देण्यात जो आनंद आहे तो जास्त रसाळ असतो. ताक तेच, ते परिक्रमावासी ही आमच्या सारखेच..पण आनंद दुहेरी.

हाच विचार करत आम्ही एक रोटी आश्रमात पोचलो…कुणीतरी म्हणालं ऊन खूप आहे, काही तरी गोड खायला हवं..त्यावर एक परिक्रमावासी म्हणाला, “रास्ते मे रबडी का दुकान था…सोचा था ले लू..भूल गया”, आणि काय आश्चर्य? जेवायला बसलो तो पनात घट्ट रबडी! एका अनुभवाच्या धक्यातून निघत नाही तर लगेच दुसरा…तिसरा देखिल…जसं काही ती मैया सांगतेय की हा केवळ संयोग नाहीये.. मी आहे आणि मी तुमच्या सोबत आहे.

एक रोटी आश्रमात जेवण झाल्यावर मी आणि सौ मंत्री थोडं मागे थांबलो… एक रोटी आश्रम हे नाव जरा वेगळं वाटत होतं म्हणून चौकशी केली. त्या साधू महाराजांनी जे सांगीतलं तो परिक्रमेतला आणखी एक मोलाचा ठेवा… ते म्हणाले “रोटी कौन खाता है?…जिसे भूक लगती है वो…. अब सोचिये, भूक क्या होती है? जिसके पूरे होने से आपको समाधान मिले वो…. फ़िर आप इच्छाओं को भूक कह सकते हो! किन्तू एक रोटी का मतलब ये है की ऐसी इच्छा जो पूरी होने पर आपको तृप्ती मिले. वही आपकी रोटी है… आप सुबह पेटभर खाना खाओगे और शामको आपको फ़िर भूक लगेगी….तो एक रोटी मे काम नही चलेगा.. फ़िर ये भूक कौनसी है जो एक रोटी मे पूरी हो जाये?तो ये भूक है इश्वर प्राप्ती की..एक बार आपको ईश्वर प्राप्ती हो जाये तो ना कोई भूक बाकी बचती है और ना ही कोई इच्छा…बेटा जी आप हमारे पुत्री समान हो, और आप हमारे माता समान भी हो.. क्युंकी आप हमारे पुत्री हो हम आपको सलाह देंगे की इस एक रोटी की खोज करो, और उसे पाने की कोशिश करो…और आप हमारे माता समान है इसलिये आपको विनंती करेंगे की आप जगत माता बनो…. इसके लिये आपको कुछ करने की जरूरत नही है, आप जैसे अपने बच्चे के गुनाह गलतीयो को प्रेम से सवारते हो इसी प्रकार जगत की आपके प्रती होने वाली वो हर गलती, मा की तरह भूला दो…इससे जगत का नही आपके मातृत्व का विकास होगा, आपकी रोटी की तरफ़ आपका ध्यान बना रहेगा.” असं म्हणून त्यांनी रुद्राक्षाची एक छोटीशी माळ माझ्या हाती दिली….

आजचा हा तिसरा अनुभव होता… आजच्या आज अजून किती अनुभव आणि अजून काय काय मैया कडून मिळणार होतं याचा अंदाजही नव्हता. असच झालं …परिक्रमेच्या अगदी पहिल्या दिवशी नर्मदा मैयांनी एका वेगळ्याच अनुभवातून मला एक शुभ संकेतही दिला आणि एक कोडं ही घातलं… कोड्याचं उत्तर शोधायचं तेवढ माझ्या साठी शिल्लक ठेवलं. तसं पहाता ते ही तिनंच सोडवून दिलं, आणि कधी माहितिये का? माझी परिक्रमा शेवटच्या टप्प्यात होती त्या वेळी… म्हणजे जवळ जवळ साडे चार महिन्यांनंतर!

या एक रोटी आश्रमाच्या किंचित आधी मला एक आजोबा दिसलेत. वय सधारण ८० च्या आसपास. मला त्यांचं कौतुक वाटलं आणि या वयात हे आजोबा पायी परिक्रमा करताहेत म्हणून आश्चर्य ही वाटलं. मीच त्यांची चौकशी करायला सुरवात केली. हे आजोबा म्ह्णजे जरा वेगळच रसायन आहे हे मला आमच्या गप्पांमधे जाणवू लागलं… आजोबा चालताना मधेच थांबायचेत, कुठेतरी शून्यात बघून नमस्कार करायचे, आणि मलाही नमस्कार करायला लावायचे…”बघ बघ, इथे इश्वराचं अस्तित्व जाणवलं तुला?” असं विचारायचे…मी पामर, मला काय जाणवणार? मी म्हणायचे “मला नाही समजत”! मग असं दोन तिन वेळा थांबून झाल्यावर त्यांनी सांगितलं, वा-याबरोबर मंद सुवास ज्या दिशेनी येतो, तिथे जाणवतो अगं ईश्वराचा वास…पण मला असा मंद सुगध ही आला नव्हता…मी आपलं आजोबांबद्दल आणि त्यांच्या साधने बद्दलच विचार करत राहिले. नक्की ह्यांची खूप साधना असणार आहे…

त्यांचं नाव त्यांनी मला नाईक असं सांगितलं…म्हणाले, मी नाईक, तू पण नाईक…काहीतरी नातं असेल आपलं! पण मला नं लेले काका म्हणतात. तूमच्या नागपूर जवळ कारंजा आहे नं? तिथे खोली आहे माझी! पण तसा मी पुण्याचा…माझे प्रश्न सुरू झाले त्यांना…मग कारंजाला कधी असता? काय करता तिथे? त्यांचं एक एक उत्तर मला अनेक प्रश्न निर्माण करून देणारं आणि नोर्मल उत्तरांपेक्षा वेगळं वाटत होतं… ते म्हणाले, तिथे मी सगळ्यांकडे लक्ष देतो. माझ्या खोलीत जाण्याची परवानगी नाही कुणाला! फ़क्त पुजारीच काय तो जाऊ शकतो…मला काही समजेना…आजोबा या वयात का उचचली परिक्रमा? यावर ते म्हणाले, अनेकांना भेट द्याय्चं मी कबूल केलं आहे…म्हणून उचलली….आणि खरी गम्मत तर शेवटी आली… त्यांनी मला कसा शुभ संकेत दिला माहितिये? मी त्यांच्या त्या बोलण्याने अक्षरश: बुचकळ्यातच पडले…सांगते..हा अनुभव पुढच्या भागात पूर्ण करते.! ….सौ.सुरुची नाईक
🌹〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*