नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग ६६👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा व एक विलक्षण अनुभूती भाग क्रमांक ६६

नर्मदे हर

मागच्या भागात मी तुम्हाला अनघोरा आणि तिथल्या वेगवेगळ्या अनुभवांबद्दल सांगितलं होतं. इथून पुढे हिरापूर झिरी गुरसी असं करत करत आम्ही रमपुरा ला पोहोचलो. अनघोरा ते हिरापूर रस्ता अगदी रमणीय आहे. या रस्त्यात वाटेत प्रत्येक विश्रांतीला ताक मिळालं. हिरापूर ला राजराजेश्वरी मंदिर आहे. हे मंदिर अत्यंत सुंदर आहे. इथेच आसन लावायचं ठरवलं. त्याप्रमाणे मंदिरात गेलो. तिथे काही विद्यार्थी वेद पठण करताना दिसले. इथे आसन कुठे लावता येईल असं विचारल्यावर एक अतिशय अस्वच्छ पडवी तिथल्या मुलांनी दाखवली. मंदिरात कार्यक्रम असल्याकारणाने इथे खोल्या किंवा सभामंडपात आसन लावता येणार नाही असं व्यवस्थापकांनी सांगितलं. याशिवाय भोजन प्रसादी ची व्यवस्था देखील आज होऊ शकत नाही शिधा मिळेल असं सांगितलं. लाकडं सुद्धा जमा करून आणावी लागतील हे सांगितल्यावर मात्र येथे भोजन प्रसादी तयार करायला बराच वेळ लागेल हे लक्षात आलं. शिवाय दाखवलेली पडवी स्वच्छ करून घेणे हे काम सुद्धा मोठं होतं. तिथे जेवणाच्या उष्ट्या पत्रावळीं पासून तर कडबा चाऱ्या पर्यंत अनेक वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या. आम्ही तिथे न राहता अजून कुठे व्यवस्था होऊ शकेल का अशी विचारणा केल्यावर, तिथला एक मुलगा आम्हाला एका जुन्या धर्मशाळेत घेऊन गेला. धर्मशाळा म्हटल्यानंतर तिथे निदान आसन लावायला व्यवस्थित जागा असेल असं वाटलं होतं. मात्र तिथे गेल्यावर वेगळेच चित्र नजरेस पडलं. ती धर्मशाळा पडकी आणि बंद होती. धर्मशाळेच्या आजुबाजूला काही अर्धवट बांधलेल्या बिल्डिंग होत्या. त्या भागात एकही विजेचा दिवा नव्हता. जवळपास पाण्याची हापशी किंवा तत्सम सोय नव्हती. धर्मशाळेच्या सगळ्या खोल्या बंद होत्या. आणि समोरची गॅलरी किंवा कॉरिडॉर फक्त उघडा होता. खरं तर एक रात्र फक्त काढायची असल्यामुळे आम्हाला तेही चालू शकणार होतं, मात्र ज्या वेळेला त्या पायर्‍यांवर बसून सहज म्हणुन वर लक्ष गेलं त्यावेळेला त्या कॉरिडॉरच्या छतावर वटवाघळाचे थवे लटकलेले पाहिल्यानंतर तिथे देखील राहू नये असंच आमचं मत झालं.

आता अंधार पडत आला होता. आता गावातल्या एखाद्या झाडाखाली एखाद्या ओट्यावर आसन लावण्या शिवाय पर्याय दिसत नव्हता. किंवा मैया किनारी घाटावर आसन लावावं लागणार होतं. तोपर्यंत स्नानादी आटोपून घाटावरच जाऊन आरती पूजा करून घ्यावी असा विचार केला. भोजन प्रसादीचं बघू काहीतरी. असा विचार करून आम्ही मैया किनारी जाऊन पूजा आरती करू लागलो. आमची शेवटची आरती सुरू असताना तिथे एक आठ दहा वर्षाची मुलगी आली. आणि आम्हाला पैसे मागू लागली. आमच्याजवळ 10 च्या नोटा शिल्लक होत्या त्यातली एक नोट काढून तिच्या हातावर देताच ती चटकन म्हणाली, “तुम्हारा गोत्र कोनसा है?” एवढ्याश्या या मुलीला गोत्र वगैरे कळतात तर, असं वाटून मी तिला विचारलं, “क्यू गोत्र सुनकर क्या करोगी?” ती म्हणाली, “सगोत्री के घर आपकी व्यवस्था हो जायेगी गोत्र तो बताओ”. “भारद्वाज” मी उत्तर दिलं…. माझं उत्तर ऐकून ती लगेच म्हणाली “दुसरे चौराहे मे सीधे हात को जाना पाचवा घर भारद्वाज जी का है उनके घर तुम्हारी व्यवस्था हो जायेगी.”

या छोट्याशा मुलीच्या बोलण्यावर आपली व्यवस्था कशी होईल असाच विचार आम्ही करत होतो तरीही का कोण जाणे आम्ही गावाच्या दिशेने निघालो. ज्या चौकातून आम्हाला उजव्या हाताला जायचं होतं तिथेच दोन-तीन गावकऱ्यांनी आम्हाला अडवलं. त्यातला एक म्हणाला “आप हमारे घर चलो,” मी आणि बाबा एकमेकांकडे बघू लागलो, त्यावर तो म्हणाला “ऐसे क्यू देख रहे हो? हम अच्छे समाज से है, छोटी जाती के नही है, भारद्वाज गोत्र के है, पंडित है….अभी अभी किसी ने बताया के कोई पंडित परिक्रमावासी मैया किनारे पूजा कर रहे है इसलिये आपको धुंडते धुंडते वही आ रहा था.!”

REPORT THIS AD

“किसने बताया आपको?” मी विचारलं.. “गाव के बच्चे बताने आये थे…” भारद्वाज जी म्हणाले… “उन्हे किसने बताया हम पंडित समाज के है?” मी पुन्हा विचारलं… तर “मंदिर के के बच्चों ने आपके बारे मे बताया था बाकी मुझे नही मालूम” असं उत्तर भारद्वाज यांनी दिलं….. त्यांच्या घरी आमची अगत्यपूर्वक व्यवस्था झाली. ती लहान मुलगी मात्र पुन्हा दिसली नाही. भारद्वाज जी शी बोलल्यानंतर ते म्हणाले “येतो देवी राजराजेश्वरी या नर्मदामैया दोनो मे से एक होगी”. तिथून निघून आम्ही बरमान इथे आलो.

हा रस्ता लांबच लांब रस्ता आहे. इथे छान मार्केट आहे. या मार्केटमध्ये आम्हाला एक आजोबा भेटलेत. ते आम्हाला खूप आग्रह करून त्यांच्या घरी घेऊन गेलेत. तिथे गेल्यावर त्यांच्याबद्दल जे त्यांनी सांगितलं ते ऐकून आश्चर्य आणि कमाल दोन्ही वाटलं. या आजोबांना चार मुलं होती. त्यातली तीनही मुलं वयाच्या 39 व्या वर्षी अचानक वारलीत. त्यातल्या दोघांना मूलबाळ नव्हती, आणि एका मुलाला एकच मुलगी आहे. चौथ्या मुलांनी लग्न केलेलं नाही. आता ह्या आजोबांकडे जगण्याचं कारण म्हणून फक्त त्यांची नात आहे, ती नऊ वर्षांची आहे आणि अत्यंत हुशार आहे. ह्या नऊ वर्षांच्या मुलीने ज्याप्रकारे आमच्याशी संवाद साधला त्यावरून हे मुलगी नक्कीच कुठलीतरी पुण्यात्मा किंवा दिव्यशक्ती असलेली आहे असं कुणीही म्हणेल. सांगते….

तिच्या आजोबांनी तिला आम्हाला नमस्कार करायला सांगितला तसा तिने आम्हाला नमस्कार केला मात्र लगेच “अब मेरे पैर पडो, मै तो कन्या हू ना” असं म्हणून आम्हाला नमस्कार करायला लावला. नमस्कार केल्यावर आमच्या डोक्यावर हात ठेवून तिने “आपकी परिक्रमा सफल पूर्ण होगी, वीना विघ्न पूर्ण होगी, और आपको इसके बाद भी परिक्रमा करनेका अवसर मिलेगा असा पूर्ण आशीर्वाद दिला… कोणीही काहीही नं सांगता ती असं बोलली. त्यानंतर तिने आमच्यासाठी काळा चहा करून आणला. आम्ही चहा पीत असताना तिने नर्मदा पुराणातील काही श्लोक आम्हाला म्हणून दाखवले, त्यांचे अर्थ देखील सांगितले. बरमान घाटाचं महत्व स्वतःच्या शब्दात सांगितलं. ब्रम्हाने कशी तपस्या केली इथपासून तर ब्रम्हांड पासून तयार झालेला अपभ्रंश बरमान हा कसा तयार झाला तेही सांगितलं. माझे आजोबा मला नर्मदामैया म्हणतात आणि म्हणून माझी आई माझे काका आणि माझे आजोबा या सगळ्यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असंही ती बोलली. नऊ वर्षाच्या मुलीकडून यातली एकही गोष्ट आम्हाला अपेक्षित नव्हती. अगदीच कहर म्हणजे माझे वडील आणि माझे दोन्ही काका आपलं कार्य संपवून सदगतीला कसे लागले हे हे मी आजोबांना सांगत असते पण तरी त्यांचा जीव गुंतून राहतो असही ती लहान मुलगी बोलत होती. तिचा देह फक्त नऊ वर्षाच्या मुलीचा आहे आणि तिची वाणी, तिची बुद्धी, तिचं भाष्य हे तिच्या आतून कुणीतरी वेगळच करतय असं वारंवार जाणवत होतं

कन्या स्वरूप असल्यामुळे तिच्या हातात दहा रुपयांची नोट घालून त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो त्यावेळेला वरून आवाज देऊन ती म्हणाली “जहा मोका मिलेगा वहा नौ कन्या को भोजन खिला देना मैया”… मीसुद्धा होकारार्थी मान हलवून पुढे निघाले मात्र नऊ कन्या एकावेळी एका ठिकाणी आणि लगेचच म्हणजे दुस-याच दिवशी सापडतील आणि त्यांची भोजन प्रसादी आपल्याकडून होईल तेही अचानक पणे हे आम्हाला अपेक्षितच नव्हतं. किंबहुना आम्हाला नउ कन्या शोधाव्या लागल्या नाही तर त्या कन्यांनी आम्हाला शोधून घेतलं होतं… कसं ते सांगणारे पण त्या आधी धुआधार बदल सांगते.

करत करत आम्ही पुढे निघालो तो छोटी धुवाधार कडे जाऊ लागलो. इथे साडेतीन चार वाजता सुद्धा बरंच पावसाळी वातावरण तयार झालं होतं. बरीच मोठी वालुकामय जमीन होती आणि दूरवर मैया वाहताना दिसत होती. तिथवर पोचतो तो मैया नी एक वळण घेतलेलं होतं. मैया च्या मध्यभागी संगमरवराची मोठी टेकडीच होती. दोन्ही तटावर देखील मोठमोठ्या टेकडीवजा दगडी होत्या. या टेकड्यांवर मैया प्रचंड वेगाने आघात करत होती. इथे मयानी रौद्ररूप घेतलं होतं असंच म्हणा ना! इथे मैयाचं पाणी टेकड्यांच्या वर पर्यंत उडून धुक्यासारखी भिंत तयार झाली होती. मैय्याच्या खळखळ आवाज इतका जास्त होता की आम्हाला दोघांना एकमेकांचे बोलणे देखील ऐकू येत नव्हतं. प्रचंड वारं सुटलेलं होतं आणि आमच्यासारखे जाड जुड, वजनी माणसं सुद्धा उडून जातील की काय असं वाटू लागलेलं होतं. इथून पुढे न जाता आज इथेच थांबावं या आशेने आम्ही जवळपास आश्रम शोधू लागलो.

REPORT THIS AD

इथे चिटपाखरू देखील नव्हतं मात्र एका दगडी टेकड्यावर मध्यभागी एक भगवा झेंडा रोवलेला दिसत होता. तोच आश्रम असावा, निदान तिथे कुणाला तरी काहीतरी विचारता येईल असं वाटून आम्ही ती खडकाळ टेकडी चढू लागलो. त्या भगव्या झेंड्या पर्यंत पोचलो तेव्हा लक्षात आलं तिथे कोणीही नव्हतं तिथे फक्त एक झेंडा आणि एक आडोसा असा तयार केलेला होता तिथे रात्र काढणं अशक्य होतं.मात्र वरच्या बाजूला एक बाण काढलेला दिसत होता त्यावरून परिक्रमावासी मार्ग हा हे टेकाड चढून वर जातो आहे हे लक्षात आलं.

आम्ही उंचावर असल्यामुळे वाऱ्याचा वेग अतिशय वाढला होता. मैया च्या पाण्याचे तुषार आम्हाला भिजवत होते. इथे फक्त खडक असल्यामुळे चढणे कठीण जात होतं. तरीही आम्ही बाण दाखवलेल्या दिशेने चढू लागलो. बराच चढून झाल्यावर एक खूप मोठी रेतीची टेकडी लागली. तिथे रस्ता संपत होता. ही रेतीची टेकडी चढून जाणं अतिशय कठीण होत होतं कारण थोडं वर चढल्या नंतर आम्ही रेतीबरोबर घसरून खाली येत होतो. दुसरा कुठलाही रस्ता दिसत नव्हता.टेकडीच्या गोल फिरायचं म्हटलं तर बरंच अंतर होतं आणि घनदाट करवंदाच्या जाळी सारखी कसलीतरी जाळी होती, त्यातून जाता येईल असं अजिबात वाटत नव्हतं. आम्ही आजूबाजूला नजर फिरवली… खाली नावेत एक नावाडी होता, आम्ही हातवारे करून मोठ्यामोठ्याने नर्मदे हर करून त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र त्याला काही केल्या ऐकू जाईना.

या टेकडीच्या दुसऱ्या बाजूला अगदीच पायथ्याशी मैया होती त्यामुळे इथून खाली उतरणं निश्चितच शक्य नव्हतं. परत जायचं म्हटलं तर बरंच अंतर दूर पर्यंत काहीही नव्हतं हे आम्हाला माहीत होतं कारण आम्ही त्याच रस्त्याने पुढे आलो होतो. आता मात्र हा रेतीचा चढाव एकतर पार करायचा किंवा इथेच बसून कोणाचीतरी वाट बघायची याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. थोडा वेळ वाट पाहिली पण कोणीही येण्याची काहीही शंका दिसत नव्हती आणि आता पावसाला सुरुवात झाली. आता मात्र आजची रात्र इथेच बसून काढावी लागेल, भिजत भिजत काढावी लागेल असं वाटत असताना एक आशेचा किरण अतिशय दुरून आमच्या पर्यंत येऊ शकतो असा भास झाला.

काय असावा तो आशेचा किरण? खूप दूर म्हणजे कुठून तर पलिकड च्या ताटावरून…. काय असेल तो आशेचा किरण, आणि जिथे आम्हाला एकमेकाम्च्म बोलनं आईकू येत नाही अश्या ठिकाणी पलीकडच्या ताटावरून काय मदत मिळणार होती आम्हाला…? की बिरबलाच्या खिचडी सारखं दूरवर आम्हाला काही दिसत राहिलं आणि त्याच्या कडे बघत बघत आम्ही मार्ग काढला? ती रेतीची टेकडी आम्ही कशी पार केली…. सांगणारे पण पुढच्या भागात

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*