*नर्मदे हर हर…
_*भाग↕️४६.*_
*तुम्हाला आठवतंय का? अनुभव मालिकेच्या अकराव्या भागात मी तुम्हाला एका संन्यास्याबद्दल सांगितलं होतं ते? खलघाटला मला एक राजबिंडा सन्यासी भेटला होता, आठवतंय का? खलघाट ला झालेला संवाद मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते म्हणजे तुमची लिंक लागेल नीट.
*मी खलघाट ला जातानाची गोष्ट आहे बघा. “अभी कितना दूर है खल घाट” असं विचारल्यावर तो थांबला, म्हणाला,”माई आपण फक्त चालत राहायचं असतं, बाकी विचार करायचा नसतो”, मग मझ्याकडे पाहून म्हणाला, प्रश्न पडतात तुम्हाला, पण विचारत नाही तुम्ही..चांगलय, आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्यालाच शोधायला लागतात….आता तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ते सुटतील लवकर…फ़क्त एक करा, राम सोडू नका.” आणि झपाझप पावलं टाकत तो पुढे निघून गेला.
*पुढे खलघाट आश्रमात भोजन प्रसादी झाल्यावर मी राम मंदिरा समोरा बसली होती तेव्हा तो संन्यासी तिथे आला, त्या राम मूर्ती कडे बोट दाखवलं आणि म्हणला…. “राम…….राम राम मैया जी…”असं म्हणत तो संन्यासी निघून गेला, आणि मी त्या पाठमो-या संन्याशाकडे बघत राहीले… तो आपल्या खोलीत निघून गेला आणि मग माझी नजर त्या संन्याशाने दाखवलेल्या रामाच्या मुर्तीवर स्थीर झाली. भान आलं तेव्हा १२ वाजले होते…आठवतंय हे बोलणं? मला एकदम हाच प्रसंग आठवला, कारण लाल पुरी बाबा माझ्या डोक्यावर हात ठेवून हेच म्हणाले होते.
*“बेटा, राम को कभी मत छोडना, उनको कभी दूर मत रखना”..तेच शब्द, फक्त भाषा वेगळी…
*खलघाट चा तो राजबिंडा संन्यासी मराठीतून बोलला आणि हे लाल पुरी महाराज हिंदीतून.
*असं कसं कुणी दोन संन्यासी वेगवेगळ्या ठिकाणाचे, मला एकच संदेश देतात? आणि शब्दश: सारखाच? आणि सांगू, दोन नाही, तीन संन्यासी.. पुढे मांडू ला ही हाच प्रकार घडला, हाच संदेश मिळाला.. ह्याच शब्दात! असे शब्द अन शब्द कसे एकसारखे राहू शकतात?
*याचा ही उलगडा महेश्वर ला झाला, उलगडा नाही म्हणता येणार, पण संदेश समजवल्या गेला काहीसा, असं म्हणू, पण ते मी आत्ता नाहीच सांगणारे, कारण अजून इथेच म्हणजे कल्याणपुराचा एक अजून अनुभव बाकी आहे. सांगते तर “राम को मत छोडना” असं म्हणून ते बाबा आपल्या जागेवर जाऊन झोपले, आणि मी मात्र बराच वेळ तिथेच, होती तशीच बसून राहिले.
*माझ्या मनात काय सुरु होतं त्यावेळी हे काही आता आठवत नाही. बऱ्याच वेळाने मी आडवी झाले, स्लीपिंग बॅग मध्ये शिरले, पडून राहिले पण झोप काही लागेना. तरी साधारण रात्रीचे अडीच तरी वाजले असतील,माझं सगळं मन त्या लाल पुरी महाराजांकडे होतं, त्यांच्या डोळ्यातलं प्रेम, आस्था आणि आपुलकीचे भाव आणि कळकळ मला आठवत होती. मी लालपुरी बाबांकडे पाहिलं. कृष शरीर यष्टीचा हा म्हातारा साधू अंगावर एक चादर घेऊन होता फक्त, कडाक्याच्या थंडीत! कुडकुडत होता अक्षरशः आणि मी मात्र उबदार स्लीपिंग बॅग मध्ये लोळत पडले होते. मला माझी लाज वाटत होती, पण थंडीमुळे बाहेर पडायची हिम्मत होईना.मात्र एक क्षण असा आला की माझ्या थंडी पेक्षा माझी लाज मोठी होऊन गेली. मी स्लीपिंग बॅग च्या बाहेर आले,स्लीपिंग बॅग घेतेली आणि लाल पुरी महाराजांजवळ गेले, “महाराज जी, आपको बहोत सर्दी लग रही है,आप को ये मेरी स्लीपिंग बॅग दू क्या? ये मेरी ओढी हुई है पर इसके इलावा मेरे पास और कुछ नही है,मै यही आपको दे सकती हू” ते म्हणाले “ दे दो बेटी, अब इस बूढे शरीर को सच मे जरुरत है”. मी त्यांना त्या बॅग मध्ये कसं जायचं ते सांगितलं आणि त्या बॅग मध्ये शिरल्यावर त्यांना झोप पण लागली. उत्तर रात्रीचे काही तास मला थंडीत घाललावे लागले पण त्या म्हाता-या साधू ला शांततेनी झोपलेलं पाहून त्या थंडीला ही मला फार त्रास द्यावासा वाटला नसेल!
*सकाळी बाबा उठल्यावर त्याला रात्रीचा हा प्रकार समजला आणि तो म्हणाला “ तू चांगलंच काम केलं गं पण आता आज आणि पुढच्या रात्री तू काय करणारेस? तुझ्या जवळ काहीही नाहीये, मी तुला एक चादर देईनही पण त्यानी भागणार आहे का?” खरं तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे ही नव्हतं, आणि माझ्या मनाला हा प्रश्न शिवला पण नाही. “बघू”, असं एका शब्दात उत्तर देऊन हा विषय इथेच थांबला. बालाभोग करून, लाल पुरी बाबांचा निरोप घेऊन आणि “राम को मत छोडना” हा संदेश मनाशी पक्का करून मी पुढे निघाले. जेम तेम ३ ते ४ किमी अंतर पार करून झालं असेल नसेल, म्हणजे लाल पुरी महाराजांच्या आश्रमातून निघून जेम तेम तास भर झाला असेल नसेल तोच एक असा काही विलक्षण अनुभव आला की आजही आठवलं की शहारून यायला होतं. मैया आपल्या बरोबर चालत असते आणि ती सर्वज्ञ आहे हे माहित असूनही ती जे अनुभव देते ते त्या वेळी तिच्या कुशीत शिरून समर्पण करायलाच भाग पाडतात. आपण परिक्रमा करत रहावी आणि तिच्या लीला बघत राहाव्या, बस, बाकी काही काही नको असं आणि फक्त असं च वाटू शकतं. मला जो अनुभव आला तेव्हा माझ्या समोर एक व्यक्ती येऊन उभी राहिली, आणि त्या व्यक्ती नी जे केलं, आणि जे बोललं ते पाहून मी उभ्या जागी मटकन खालीच बसले! आनंदाने रडावं की आश्चर्याने रडावं हेच कळेना. मात्र त्यावेळी माझ्या समोर उभी असलेली व्यक्ती अजिबात गोंधळलेली नव्हती आणि मी मात्र अजिबात भानावर नव्हते. कसं? कसं कळतं तिला? अगदी नेमकं? मला मात्र काहीच कळत नव्हतं… पण तुम्हाला जेव्हा हे कळेल तेव्हा तुमची अवस्था माझ्यापेक्षा वेगळी नसणार हे निश्चित! मी जशी मटकन खाली बसले ना, तसाच काहीसं तुम्हालाही होणारे. सांगणार आहे मी तुम्हाला सगळं, अगदी एकूण एक सविस्तर.पण पुढच्या म्हणजे ४७ व्या भागात.
_©सुरूची नाईक–विदर्भ गट_
_संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे._
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply