नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती:भाग👇४५👇४६.👇
भाग👇४५.
*नर्मदे हर हर…
*मागच्या भागात मी तुम्हाला बाकानेर मधल्या तणाव ग्रस्त स्तिथी बद्दल सांगत होते. तिथूनच आता पुढे जाऊयात.खरं तर आम्ही बाकानेर ला थांबायचं ठरवलं होतं, आम्ही एका मंदिरात पण गेलो होतो, पण तिथल्या पूजा-यांनी आम्हाला तिथून पुढे जायचा सल्ला दिला. ते म्हणाले, इथे तुम्ही सुरक्षित नाही असं नाही पण इथलं वातावरण आज काही ठीक नाहीये. मंदिर तसं शहराच्या मध्यभागी आहे, आणि हा भाग संवेदनशील भाग आहे. एकदा का अंधार पडला की कुणी फारसं बाहेर पडणार नाही आज, मग तुमच्या जेवणा खाण्याचं आणि सुरक्षिततेचं कोण बघणार? त्यापेक्षा तुम्ही पुढे जा. तिथल्या दोन तीन हिंदू दुकानदारांनी ही हाच सल्ला दिला.आम्हाला भरपूर गूळ दाणे, बिस्कीट, शीतपेयाच्या दोन बाटल्या असं बरच सामान दिलं, म्हणजे रात्री आम्हाला भोजन प्रसादी नाही मिळाली तरी त्या सामानावर आमचं भागू शकेल इतकं सामान देऊन आम्हाला अंधाराच्या आत बाकानेर सोडा असं सांगितलं.निदान या संवेदनशील भागाच्या तरी दूरच जा असा सल्ला दिला. आम्ही तो ऐकला आणि पुढे निघालो.पुढे बरच अंतर मुस्लीम वस्तीच होती. आमच्याकडे लोक बघत होती आणि तणाव आहे हे ही आम्हाला दिसत होतं. खरं तर माणसं वाईट नसतात हो, परिस्थिती वाईट असते. माणूस म्हटलं की त्यात माणुसकी चा अंश ही नाही असं कसं होईल? म्हणजे धर्म कोणताही असू देत,माणूस हा कुठेतरी माणूस असतो,मात्र या वेळीची परिस्थितीच वाईट होती अन्यथा काही मुस्लीम बांधवांचा दमगढ च्या आधी मला आलेला अनुभव अंगावर काटा आणणारा आहे.त्यावेळी मला त्यांच्यातली माणुसकीच नाही तर त्यांच्यात असलेली ईश्वरी प्रवृत्ती ही प्रकर्षाने दिसली,त्यांच नर्मदा मैया वरचं प्रेम ही दिसलं,पण तो अनुभव आपण दमगढ ला जाऊ तेव्हा सांगेन, आधी आता बाकानेर. तर लोकांच्या चेह-यावर आम्हाला तणाव स्पष्ट जाणवत होता, आम्ही झपाझप पावलं टाकत २ तासात जवळ जवळ १२-१३ किमी चालून पुढे आलो. इथे दूर एक छोटीशी वस्ती दिसत होती. कल्याणपूरा असं या वस्तीचं नाव. ही वस्ती पूर्ण हिंदू वस्ती आणि बाकानेर पासून तशी लांब. इथे राहायाचं ठरवलं पण ठिकाण सापडेना. एक पन्नाशीच्या बाई दिसल्या, म्हणाल्या “हमारे घरमे रह सकते थे लेकीन काम शुरू है, तो जगह नही है पर भोजन कर ही सकते है.. रहने के लिये आप शिवमंदिर चले जाओ”. आम्ही शिवमंदिरात गेलो.
*तिथे लालपुरी बाबा म्हणून एक साधू महाराज असतात. अगदी म्हातारेसे. त्यांच्याकडे एकच खोली. एक लहानसं हनुमान मंदिर आणि एक शिव मंदिर. आम्ही तिथे गेलो तेव्हा त्या बाबांनी आम्हाला बाहेर आसन लावायला सांगितलं. आपापला स्वयंपाक करून घ्या असं सांगितलं मात्र ते स्वयंपाकाच्या मदतीला आलेच. इथे चूल बाहेरच आहे. एक टाकी आहे आणि भांडे कुंडे ठेवायची जागा ही बाहेरच आहे. टाकी खाली एक मोठा टब ठेवलाय तिथे असतात सगळी भांडी. टाकीलाच लागून खाली दोन कप्पे केले आहेत तिथे किराण्याचं सामान असतं. असं मस्त हवेशीर स्वयंपाक घर होतं यांचं,खूप आवडलं मला. पावसात मात्र ते काय करतात ते काही माहित नाही,मी विचारलं पण नाही. मला इथे एक रात्र काय ती घालवायची होती. असो.
*तर स्वयंपाक पाणी, जेवणं झाली. साधू बाबांनी रामचरित मानस चं बाल कांड वाचून समजावून सांगितलं. रात्री चे साडेबारा झाले होते. रामहृदय म्हणून आम्ही झोपणार होतो आता. आणि काय झालं माहितीये का? हे बाबा खूप अस्वस्थ वाटू लागले अचानक. आम्हाला वाटलं म्हातारे आहेत, थकले असतील, म्हणून त्यांना आराम करू देऊ आणि आपण पण आराम करू असं म्हणत आम्ही बाहेर आलो. त्यानंतरही साधू बाबांच्या खोलीतला लाईट बराच वेळ सुरूच होता. मलाही नीट झोप येत नव्हती. बाबाही तसा जागाच होता. आणि लाल पुरी बाबा खोलीतून बाहेर आले. त्यांनी आमच्याच बाजूला आसन लावलं. मी विचारलं त्यांना “क्या हुआ बाबा? भीतर क्यू नही सोये? बाहर क्यू आ गये इतनी थंडी मे?” तर त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलच नाही.
ते उठून बसले, ते पाहून मी पण उठून बसली. ते उठून माझ्या जवळ आले, माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी खूप प्रेम होतं आणि ते जे काही आता बोलले ते ऐकून माझ्या अंगावर काटाही आला आणि माझ्या आत, खूप खोलात काहीतरी हलतंय असं मला जाणवू लागलं. माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना, पण माझे डोळे मला जे दाखवत होते ते मला जास्त पटत होतं. लाल पुरी बाबांना जे बोलायचं होतं ते बोलून ते पुन्हा आपल्या जागेवर जाऊन झोपले सुद्धा मात्र मी नंतर कितीतरी वेळ तशीच तिथेच बसून राहिले. कारणही तसच होतं.
©सुरूची नाईक–विदर्भ गट
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply