नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇४३👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇४३.👇

नर्मदे हर हर….!

मागच्या भागात मी तुम्हाला नर्मदा कँनाल बद्दल सांगितलं होतं. लांबच्या लांब काढलेला हा कँनाल काही केल्या संपेना.आमचं आधीच ३७ किमी चालून झालं होतं. अगदी रस्त्यावर झोपावं लागलं तरी चालेल पण आता अजून चालायला नको होतं आम्हाला. आम्ही सगळेच थकलो होतो. शेवटी आम्ही खोडीयार नावाच्या एका गावात थांबलो, इथे जागा शोधू लागलो. चालता चालता सुदिन ला एक मंदिर दिसलं. आता भिक्षा मागू आणि इथेच राहू असं ठरलं. पण ते मंदिर कुणाचं तरी खासगी मंदिर होतं. तेव्हा तिथे अनुमती घेणं गरजेचं होतं. सुदिन आणि मंदार पुढे गेले, त्यांनी त्या घरी चौकशी केली. वर वर पाहता हे काही शक्य होणार नाही असं वाटत होतं कारण ह्या घरासमोर बसलेले गृहस्थ आमच्या कडे बराच वेळ पासून बघत तर होते मात्र त्यांनी एकदाही आम्हाला बोलावलं नाही किंवा स्वत:हून ते बोलले देखील नाही. आम्ही जागा शोधतोय हे त्यांना माहित होतं खरं, त्यामुळे ते काही परवानगी देतील असं वाटत नव्हतं. आम्ही भोजन प्रसादीची अपेक्षा तर सोडून च दिली होती. निदान रात्र काढायला डोक्यावर छत मिळावं बस!

सुदिन आणि मंदार त्यांच्याशी काय बोलले माहित नाही पण आम्हा सगळ्यांना चहा प्यायला त्यांनी आत बोलावलं.. व चहा झाला, आता जेवण नसलं तरी चालेल, आता बस अंग टाकलं की झालं… खूप थकवा आला होता आज, पहिल्यांदाच आज ३७ किमी चालण झालं होतं. तिथल्या मंदिरात मी कुणालाही न विचारता सामान ठेवून दिलं. तेव्हा कुणी काही म्हणालं नाही. मग मात्र सरळ सरळ इथे मंदिरात राहू का असा प्रश्नच विचारला आम्ही. “ आपके भोजन का क्या?” त्या काकांनी विचारलं, त्यावर सुदिन म्हणाला “ हमे जो मिलेगा वो खा लेते है, खिचडी भी चलती है”, त्यावर ते काका म्हणाले हम भिल जाती से है… ते ऐकून समजलं की हा माणूस आम्हाला आत का बोलावत नव्हता. आम्हाला जातीपातीचं काही नाही हे समजल्यावर मात्र तो बोलका झाला. ते इथलं मोठं प्रस्थ. कांतिलाल भिल असं त्याचं नाव. पूर्व विधायक होता तो. त्याची मुलं बाळं शिकली सवरलेली होती. ऐसपैस मोठं घर होतं. मग त्यांनी आम्हाला समोरच्या खोलीत बसायला सांगितलं. माझे पाय दुखताहेत म्हटल्यावर एका बादलीत मिठाचं गरम पाणी आणून दिलं मला. गरम पाण्यात पाय शेकून होईस्तोवर घरातल्या माताजींचा स्वयंपाक पण तयार झाला. मिक्स भाजी, कढी, खिचडी, मक्याचे वडे आणि खीर असं चवदार आणि पोटभर जेवण झालं. मंदिरात आसन लावायला एक मोठी सतरंजी देखील त्यांनी दिली आणि अशा प्रकारे काहीही अडचण न येता मैयांनी आमची व्यवस्थित सोय केली. दुस-या दिवशी पोह्यांचा बालभोग करून इथून पुढे निघालो.

आज तरी वगाच ला पोहोचण गरजेचं होतं. अंतरही तसं फार नसलं तरी २५ किमी होतंच. काल आम्हाला निवा-या साठी जागा शोधावी लागली होती, ते तसं आज होऊ नये असं आमच्या मैयाला वाटत असावं. आमची कालची वणवण तिला बघवली नसावी आणि आम्ही त्या बद्दल तिला अवाक्षरानेही तक्रार केली नव्हती म्हणून असेल कदाचित, आज आम्हाला निवा-याला छान जागा मिळाली होती. सकाळ च्या चालाण्या नंतर आम्ही एका शिव मंदिरात आराम केला आणि छान चहा आणि फुटाणे खाल्ले. थोडे खारे दाणे ही होते, ते ही खाल्ले. आमचं सकाळ चं जेवण हेच. लांबच लांब रस्ता होता. वाटेत आम्हाला एका माणसानी गाडी थांबवून नर्मदे हर केलं. तो म्हणाला “ यहा आगे मंदिर है, वाहा आओ आप, मै भी पोहोचता ही हु” त्याला शेतावरून माल पाठवायचा होता पुढच्या गावात, पेरू होते त्याच्या जवळ. आम्हाला ही त्यांनी भरपूर पेरू दिलेत. त्याचं काम करून तो परतला तोवर आम्ही धोबीघाट काढला होता. आज मी सगळ्यांना कामाला लावलं होतं. मी सगळ्यांचे कपडे धुवून दिले होते आणि पिळून वाळत टाकायचं काम ज्याचं त्याचं ज्यांनी त्यांनी करायचं. एका नळावर आम्ही सगळे टीम वर्क नी कपडे धुवत होतो. खरच ते कपडे धुण्याच काम सुद्धा किती एन्जाॅय केलं आम्ही.

असं करत करत आम्ही छापरीया , कवाट करून हाफेश्वर ला जायचं ठरवलं. आज कवाट ला खूप दिवसांनी इथे खानावळीत जेवलो. दुस-या दिवशी हाफेश्वर ला गेलो. तिथे महिलांसाठी कपडे बदलायची काहीही सोय नव्हती. पण स्नान तर करायचं होतं. हाफेश्वाराचा कळसही आता दिसत नाही. हे मंदिर पूर्ण पणे पाण्याखाली गेलं आहे. आपले तीर्थ असे पाण्याखाली जाताना पाहून फार हळहळल वाटते. चीखलद्या च मंदिर, शुलपाणेश्वराच मंदिर, राजघाट चं मंदिर.. कितीतरी क्षेत्र पाण्याखाली जाणार आहे हे खरं तर फार मोठं नुकसान आहे आपल्या संस्कृतीचं. असो
तर हाफेश्वराला स्नान केलं खरं पण आता कपडे बदलायाचे कुठे?,

तिथे न झाडी न खोल्या
न काही. मी तशीच ओल्या कपड्यांनी जागा शोधात असताना मला एक जागा सापडली. एक कार उभी दिसली, त्या कारच्या मागे जाऊन कपडे बदलायचं मी ठरवलं. कार मध्ये कुणीही नव्हतं, मात्र कार च्या मागे अजिबात जागा नव्हती. तिथे खाली मैया पर्यंत फक्त खोल उतार होता. पुरुष मंडळी चं आवरणं सुरु होतं आणि त्यांचं आटोपायाच्या आत मला माझं आवरण गरजेचं होत… हा उतार बराच सरळ उतार होता, म्हणजे टेकडीच्या उतारावर थोडी उभं राहायला जागा, बाकी काही नाही. तिथली माती ही भुसभुशीत, म्हणजे जरा पाय घसरला की मैया मधेच जाणार मी….. पण तिथे एक झाड होतं, त्याची एक फांदी जमिनीवर आडवी आलेली होती. आणि एक दगड होता मोठा, त्यावर मी बसू शकत होते. ती फांदी माझे कपडे ठेवायचा स्टेन्ड झाली आणि तो दगड म्हणजे माझ्या ड्रेसिंग टेबल चा स्टूल. मला सावध असणं गरजेचं होतं. मी माझी लुंगी झाडावर टाकून आडोसा तयार केला आणि अगदी सावकाश तयार झाले. इतकं सावकाश मी या आधी कधी ही तयार झाले नसेन. इथे आरसा नव्हता, सौंदर्य प्रसाधनं नव्हती तरीही स्त्री सुलभ आनंद काही कमी झाला नाही. किंबहुना अगदी सावकाश तयार होण्यात पण मजा असते याची प्रचीती झाली……. हा झाला विनोदाचा भाग, पण खरच सांगते, त्या दगडाचा काय तो आधार होता. माझ्या ओल्या कपड्यांमुळे तिथे जरा पाणी पाणी झालंच होतं आणि अशात तोल जाणं, किंवा पाय घसरणं सहज शक्य होतं. मदतीला कुणीही नाही, मदतीलाच काय तर मी पडले तरीही कुणाला सांगू शकणार नाही इतकी मी दूर होते… मन शांत ठेवून धीराने आणि संयमाने माझं आटोपून मी जेव्हा वर आले तेव्हा एकदा खाली वाकून पाहिलं तर माझं मलाच आश्चर्य वाटलं… अश्या जागेवर ओल्या कपड्यांनी उतरण्याच धाडस माझ्यात आलच कस कोण जाणे! असो.. झालं एकदाचं.

इथून पुढे आम्ही बखतगड मार्गे मध्य प्रदेशात शिरलो. हे क्षेत्र अत्यंत गरीब आहे. पण मनाची श्रीमंती बघाल तर धनाच्या श्रीमंताना लाजवेल अशी. साकडी चा अनुभव असाच आला आम्हाला पण त्या आधी काजळ माता मंदिरा बद्दल सांगते. अनुभव म्हणून नाही पण, वाटतंय सांगावसं. इथे आश्रम तर छान होता. आजूबाजूला काही नाही. आश्रमात एक देऊळ होतं देवीचं. इथले बाबा जरा वेगळेच होते. त्यांचे नियम खूप, आणि ते पाळले जाताहेत की नाही याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असायचं. दिसायला ही हे बाबा जरा विचित्र दिसतात. त्यांचा एक डोळा मधेच बारीक होऊन जातो बोलता बोलता. आणि मुळातच त्यांच्या चेह-यावर अति चाणाक्षतेचे भाव होते. ते सतत काहीतरी प्लॅनिंग करताहेत असं वाटायचं. सुदिन नी तर त्यांना “झोल बाबा” असच नाव दिलं होतं. तिथे असलेल्या स्टाफ ला त्यांची भीती वाटते हे उघड उघड दिसत होतं. तिथे अनेक परिक्रमावासी होते, सगळे पुरुष मी एकटीच माताराम. ते बाबा मला म्हणाले “माताराम आप अंदर रूम मे आसन लगाव, बाकी लोग बाहर सोयेंगे” मी चक्क नाही म्हणून सांगितलं. “मै अकेले अंदर नही आसन लगाउन्गी, जहा मेरे साथवाले है मै वही रहूंगी” इथे त्यांच जरा गाडं अडलं. त्यांना मी बाहेर झोपलेलं नको होतं आणि मी आत एकटी आसन लावायला तयार नाही. जेवणं झाली, भजनं झाली सगळं सगळं झालं ..पण मी अडून राहिले .शेवटी त्या बाबांनी आम्हा पाचही जणांना आता आसन लावू दिलं. मैया आपलं रक्षण करतेच पण एक स्त्री म्हणून आपण जागरूक असलेलं बरं… त्या बाबांना काय वाटलं माहित नाही पण दुस-या दिवशी सकाळी त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं. “ हम किसी के खोली मे नाही जाते बाबाजी, जो बोलना है यही से बोलिये” मी दारातच उभं राहून आवाज दिला. ते बाबाजी उठून बाहेर आले. मला एक टिकली च पाकीट देऊन नमस्कार केला, म्हणाले “मेरे लिये तुम माता समान ही हो, तुम्हारा सम्मान करना था इसीलिये अंदर बुला रहा था”… मला वाईट काही अनुभव आला नाही, मैयांनी मला वेळोवेळी जागरूक राहण्याची बुद्धी दिली. ते साधू नसतील ही वाईट, पण मी सावध असणं गरजेचं आहे अन होतं ही.

उमरी च्या काजल माता मंदिरातून पुढे निघालो. हा भाग जरा जास्त खडकाळ आणि रुक्ष आहे , इथे आराम करावा म्हंटल तर मोठी झाडं पण नाही. सकाळी प्रचंड थंड आणि दुपारी ब-यापैकी गरम असं काहीसं हवामान. अगदी उन्हाळ्या सारखं गरम नसलं तरी पाठीवर ओझं घेऊन चालायचं काही तितकंसं सोपं नाही. आम्ही आपलं चालतोय चालतोय सकाळ पासून काही पोटात नाहीये, जवळचं पाणी पण संपलय आणि इथे दूर दूरवर काही दिसत नाही. एखादी हापशी पण नाहीये इथे. उंच पठारासाराख्या भागावर चढत जायचं, दोन्ही भाजुला खोलगट भाग आणि मधून वरून रस्ता. असलीच एखादी झोपडी तर ती खाली खोलगट भागात.. कधी एकदा हा भाग संपतो असं वाटू लागलं. थोड्या वेळाने रस्त्यात एक बस स्टॉप लागला. आम्ही चक्क २ तास इथे झोपलो होतो. या वेळी आमची म्हणजे माझी-बाबाची आणि मंदार व कंपनीची चुकामुक झाली. त्यांना कुणीतरी जेवायला बोलावलं आणि ते थांबले, आम्हाला ते दिसले नाही म्हणून आम्ही पुढे निघून गेलो. आज आम्ही उपाशीच राहू की काय असं वाटलं, पण असं होत नाही. पुढे एका घरी आम्हाला ही भोजन प्रसादी ला बोलावलं. पण या घरी राहण्याची व्यवस्था होऊ शकणार नव्हती. आणि तसंही अजून जेमतेम दुपार होती. आम्ही जेवून पुढे निघालो आणि चालू लागलो. इथे रस्त्यात आम्हाला एक पिवळी साडी नेसलेली बाई भेटली, म्हणाली “साकडी मे रुकने की व्यवस्था है छकना भगत के घर”. ती बाई माझ्या विशेष लक्षात राहिली कारण तिचं नागाच्या आकाराचं मोठं कुंकू. नाकापासून तर अगदी केसा पर्यंत तिनी ते कुंकू लावलं होतं. तिचे डोळे अगदी गोल आणि मोठे होते आणि तिच्या साडीचा रंग अगदी भडक पिवळा असा होता. हे आता सांगायचं कारण असं की ही बाई आधीही आम्हाला रस्त्यात दिसली होती आणि हसली होती आमच्याकडे पाहून. पण तेव्हा तिची विचित्र वेशभूषा एवढं कारण पुरेसं होतं, आणि आता आम्ही जवळ जवळ १०-१२ किमी पुढे आल्यावर पुन्हा ती बाई कशी काय दिसली आम्हाला? कारण ती बाई पण पाई होती आधीच्या भेटीत आणि आमच्या विरुद्ध दिशेला चालत होती…. हे शक्य नव्हतं पण काही गोष्टी आपल्याला नाही समजत, त्या पुढे समजतात…ह्याचा उलगडा मी पुढे सांगणार आहे.

छकना भगत चं घर शोधत शोधत आम्ही निघालो. बरच अंतर चालून आल्यावर समजलं की आताशा कुठे साकडी आलंय आणि ह्या छकना भगत च घर तर अजूनही ७ किमी दूर आहे. आता पायातली ताकत संपली होती. जरा विश्राम तरी करावा म्हणून आम्ही जागा शोधात होतो तेव्हा एका घराच्या अंगणात एक गोठा दिसला. मी पुढे होऊन विचारलं, “ यहा थोडी देर विश्राम कर सकते है” एक छोटीशी, १०-१२ वर्षाची मैया होती (परिक्रमेत आपण कोणत्याही स्त्री ला मैया, माताराम, माताजी असं च संबोधतो), तिनी आपल्या भावाला बोलावलं, आणि त्यांनी तिथे विश्राम करण्याची परवानगी दिली. चहा पाजला. मला तर इथून उठावसंच वाटत नव्हतं. पराडकर काका , सुदिन आणि मंदार मागे होते, तासाभरात ते ही पोहचले. आज काही इथून पुढे जायची इच्छा होईना. घर तसं गरीब होतं. आम्ही गोठ्यात राहायला ही तयार होतो. सगळ्यांची अवस्था एकसारखी होती. शेवटी मी त्या मुलाला , मैया च्या भावाला विनवलं. आज आम्हाला इथे राहू दे. आम्हाला काही नको, फक्त एक सतरंजी दे खाली घालायला बस….नैकू सास्ते त्याचं नाव, जातीचे पावरा हे लोक. त्यांनी त्याच्या वडिलांना विचारलं, लाल्या सास्ते पावरा, त्याचं उत्तर एकून खूप वाईट वाटलं. ते म्हणाले “ रहने को कुछ नही समस्या, पर हम गरीब है, आपके लिये बोहोत नही कर पायेगे” आम्हाला काही नको होतं, फक्त आता आराम करायचा होता बस. आम्ही म्हटल, कोई बात नही, हमे कूछ नही चाहिऐ.

आम्ही त्या घराची अवस्था बघत होतो. त्यांच्याकडे ८ अपत्य होती. त्यातल्या मोठ्या मुलाला त्यांनी शिकायला नंदुरबार ला ठेवलेलं. आणि घरी फक्त शेती, ती ही अश्या खडकाळ भागात! वडील थोडं फार टेलरिंग चं पण काम करत. मुली होत्या ६, त्यातल्या ५ मुलींची लग्न अजून बाकी होती. मोठी मुलगी पण माहेरी आली होती काही दिवसांसाठी…आणि भरीस भर आता आम्ही ही आलो होतो. दोन वेळच जेवण कठीण आणि त्यात घरी पाहुणे, तेही न ओळखीचे न काही…आम्ही ठरवलं, रात्री फक्त चहा प्यायचा बाकी चं उद्या पाहू… पण आपल्या ठरवल्याने काय होतंय?

आमची आरती आणि श्लोक आटोपले. आम्ही आरती करत असताना घरातील सगळी आणि आजूबाजूची ही काही मंडळी जमा झाली होती. आमच्या घरात समोरच्या खोलीत आरती करा अशी नैकू नी मागणी केली होती. त्याप्रमाणे आम्ही आत आरती आणि रोज चे श्लोक म्हंटले. त्यात नर्मदाअष्टक, रामरक्षा, भीमरूपी, हनुमान चालीसा, संकटोद्धारण स्तोत्र आणि मैयाची आरती असं असायचं. हे सगळं होईस्तोवर सर्व मंडळी बसून राहिली. त्यांच्या चेहे-यावरचं समाधान स्पष्ट दिसत होतं. आता आम्ही आमचं सामान घेऊन पुन्हा बाहेर जाणार तर लाल्या जी आम्हाला म्हणाले, “ अंदर ही आसन लगाव, भोजन मी चावल बनादू?” आत आसन लावायचं ठीक, पण भोजन करायचं नाही असा विचार होता… पण लाल्या आणि लाल्याची बायको ऐकायला तयार नाही, मग फक्त थोडा थोडा भात खाऊ असं सांगितलं.. तरीही जेवणात मक्याची रोटी, शेव भाजी आणि वरण भात इतकं सगळं होतं. आम्हाला खूप लाजीरवाण झालं. त्यांच्या हातावर पैसे घालावे तर घेणार नाही हे माहित होतं, आणि काही तरी त्यांच्या हाती लागावं अशी फार इच्छा होती, म्हणून मग एक उपाय काढला, मी माझे २ ड्रेसेस लाल्या जी कडून लहान करवून घेतले, आणि भैरव नी अंकलेश्वर ला दिलेल्या ३ ड्रेसेस पैकी एक कोरा ठेवलेला होता तो त्यांच्या मुलीला दिला. अर्थात ड्रेसेस मोठे करण्याचे पैसे घ्यावे लागतील या अटीवर च काम सांगितलं. घरून निघताना तिथल्या लहान मुलांच्या हातात आम्ही प्रत्येकानी आपापल्या इच्छेप्रमाणे आणि ऐपती प्रमाणे (जवळ किती पैसे आहे तीच ऐपत) खाऊ साठी पैसे घातले. अर्थात या सर्वांनी त्यांनी केलेल्या मदतीची भरपाई होणार नव्हती, किंबहुना ती कधीच होणे शक्य नव्हते, पण त्यांनी जे प्रेम आणि जिव्हाळा आम्हाला दिला होता त्याची फक्त पावती म्हणू याला. त्या एका रात्रीत आमच्या मध्ये इतकं प्रेम निर्माण झालं की तिथून आमचा पाय निघेना आणि त्या घराच्या मंडळीच्या डोळ्यांच्या धारा थांबेनात…. सुदिन तर अजूनही नैकू च्या सम्पर्कात आहे, आणि त्याची खुशाली तो मला कळवत असतो.

मैया कधी काय दाखवेल तेच समजत नाही. जिथे आपलं दाणापाणी तिनी लिहून ठेवलं असेल ते मिळाल्या शिवाय राहात नाही, जिथे आणि जसं तुमच्या साठी तिथे आणि तसं मिळेल.. मग कुलूप लागलेल्या घरीही कुलूप उघडवून तुमची इच्छा पूर्ण केली जाईल! मैया अनाकलनीय आहे. ती काहीही करू शकते… काय झालं माहितीये का, बाबा च्या नकळत त्याच्याकडून मैया ला चेलेंज दिल्या गेलं.. मुद्दाम नाहीच दिलं त्यानी, पण झालं असं नकळत, आणि मैया नी ते पूर्ण केलं.. तिथल्या तिथे.. दाखवून दिलं आम्हाला की ती अशक्यातली गोष्ट पण शक्य करू शकते.. तसे संकेत पण देते ती… आपण मूर्ख असतो की ते आपल्याला समजत नाही…काय चेलेंज केलं बाबा नी? कसं पूर्ण केलं तिनी ते? आणि हो, त्या पिवळ्या साडीवाल्या बाईचं काय? सांगते पुढच्या भागात.
©®सुरूची नाईक:विदर्भ गट
+91 98236 53511°
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
🪂〰️〰️〰️〰️〰️〰️🪂〰️〰️〰️〰️〰️〰️🪂

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*