नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇४४👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇४४.👇
नर्मदे हर हर….
मागच्या भागात मी तुम्हाला चेलेंज बद्दल बोलले होते, पिवळ्या साडी वाल्या त्या बाई बद्दल बोलले होते, आठवतंय नं? तर आज तेच सांगणार आहे. तर आम्ही साकडी हून निघालो. आता धार जिल्ह्यातून आम्ही जात होतो. आजचा मुक्काम आम्ही कवाडा ला हनुमान मंदिरात करणार होतो. आम्ही तिथे गेलो. आजही अंतर बरंच झालं होतं. हा भाग सगळा भकास आहे.. नितळ रस्ता च काय तो दिसतो, बाकी आजूबाजूला रुक्ष आहे सगळं. एक प्रकारची भयाणता आहे या भागात. तर आम्ही या हनुमान मंदिरात गेलो. हातपाय धुतले. तिथे असलेल्या साधू नी खुणेनीच आम्हाला झाडाखाली टाकलेली चटई दाखवली. आम्ही आपलं तिथे बसून राहिलो. कुणी पाणी विचारलं नाही की कुणी चहा विचारला नाही. तास झाला, दोन तास झाले, हे साधू महाराज आपले गांजा पीत बसलेले. फक्त कुणी चप्पल घालून पाण्याच्या टाकी जवळ गेलं की ते मोठ्यांदा ओरडायचे. आमच्या पैकी प्रत्येकानी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते हुं नाही की चू नाही. आजची रात्र इथेच उघड्यावर आणि उपाश्या पोटी काढावी लागणार असं वाटत होतं. तिथे खूप डास होते. बसणं पण अशक्य झालं होतं. शिवाय नं बाथरूम न काही! अहो बाहेर जावं लागणार ते ठीक आहे पण बाहेर सुद्धा आडोसा म्हणून साधं एक झाड पण नाही. आंघोळीला टाकी, मैया पासून दुरून जातो इथून रस्ता, त्यामुळे मैया ही जवळ नाही. मी कसं काय करावं? प्रश्नच होता…रात्री अंधार झाल्याशिवाय फ्रेश होता येणार नव्हतं आणि प्रात: विधी सकाळी लवकर उठून उघड्यावरच आटोपावे लागणार होते. झोप होईल की नाही ही गाढ शंका होती आणि हे साधू महाराज अतिशय निवांत पणे खाटेवर लोळून गांजा पीत होते, ते ही कसे माहितीये का? नागाच्या फण्याखाली, कमलासनावर विष्णू जसे एक हात डोक्या खाली घेऊन आरामात पहुडलेले असतात नं अगदी तसे.

आम्ही समोरच्या दुकानात जाऊन आलो. तिथे चहा विचारला, नाही मिळाला. काही खायला आहे का विचारलं, विकत घेऊ, असं वाटलं पण फक्त पारले जी. आता पारले जी खाऊन खाऊन वीट आला होता. इतका की परिक्रमा झाल्या नंतर मी अजूनही पारले जी खात नाही, हो फक्त दुस-या परिक्रमेत मात्र नाईलाज म्हणून खाते आहे. तर आज नक्कीच उपाशी राहावं लागणार असं दिसत होतं. भूक पण लागलेली होती आणि हे बाबाजी काहीही बोलायला तयार नाही. इलाज नाही.

आता अंधार पडू लागला तशी थंडी वाढू लागली. खरं तर तिथे एक खोली होती, रिकामीच होती पण कुणाला नं विचारता कसं काय जायचं तिथे? काही वेळाने मंदिराच्या मागच्या बाजूला जरा हालचाल दिसली. तिथे एक छोटसं स्वयंपाकघर होतं, वाटलं चला आपल्यासाठी काहीतरी तयार होतंय. पण फारसं काही वाटलं नाही. ब-याच वेळाने एक माणूस बाहेर आला, म्हणाला “सुबह का खाना बचा है चाहो तो खा सकते हो” खरं सांगते भूक लागली की सगळं पोटात जातं. आपल्या घरी चालतात जिभेचे चोचले. जेव्हा काहीच मिळत नाही तेव्हा अन्नाची किंमत कळते आपल्याला. त्या माणसांनी आम्हाला ११ पोळ्या, एका मोठ्या पातेल्यात वरण आणि एका भांड्यात भात दिला. आमच्या जवळ ताटल्या नव्हत्या. तसं परिक्रमेला निघताना आम्ही ताट वाटी पेला घेतलं होतं, पण माझं ताट तुटल्यामुळे मी ते टाकून दिलं. बाबा कुठेतरी त्याचं ताट विसरला होता. मंदार नी एक ताटली काढली, त्यात पोळ्या घेतल्या आणि त्यावर थोड थोडं वरण घेऊन खायचं असं करत आम्हा पाचांमध्ये त्या अकरा पोळ्या आणि भात असं एकत्र जेवण झालं. वरण मला फार तिखट झालं होतं, पण इथे दुसरा उपाय नव्हता. पाण्याच्या घोटा बरोबर गीळणे हाच उपाय. तसंही चव ही फक्त जीभे पुरती असते, एकदा का अन्न पोटात गेलं की त्याचं काम शरीराला उर्जा देणं, ती मिळाली की झालं. आणि आम्हाला चवी पेक्षा ती भूक भागवण जास्त महत्त्वाचं होतं. अश्या प्रकारचं जेवण मिळणं हे एका अर्थी आम्हाला शिकवण च होती, जे मिळेल ते स्वीकारण्याची आणि हे असं जेवण ही पहिली पायरी, जिभेवर ताबा मिळवण्याची. जेव्हा एक एक करून सर्व अवयवांवर आणि इंद्रियांवर ताबा मिळवता येईल तेव्हा कुठे परम सुखाचे दरवाजे उघडले जातील, आम्ही इथे फक्त एका जेवणाने पाणी पाणी झालेलो… असो..

*जेवण तर आटोपलं, आता परीक्षा नं दोन. अत्यंत थंडी, डास, वटवाघूळ, माकडं, जमिनीवरचे प्राणी या सगळ्यांमध्ये रात्र काढायची. तशी थोडीफार सवय झाली होती प्राण्यांची एव्हाना पण थंडी जरा जास्तच. आम्ही आसन लावायची तयारी केली तेव्हा पहिल्यांदा हे साधू महाराज बोलले… “वो खोली खोल लो, अंदर आसन लागा लो”.. काय म्हणून आनंद झाला…सगळा स्वर्ग मिळावा असं वाटलं. एक शिकवण आणिक मिळाली, खरतर नेहमीच मिळत आली या परिक्रमेत पण अमलांत उतरायला वेळा लागतो. ती अशी की *आपण ज्या गोष्टी च्या मागे धावतो नं ती गोष्ट आपल्या पुढे धावत असते,* अगदी नेहमीच, आपण धावायचं थांबलो की ती गोष्ट ही धावायची थांबते, आणि जर ती आपल्या प्रारब्धात असेल तर आपण तिच्या मागे धावायची गरज नसते, तीच आपल्याकडे धावत येते.

आपण जर याकडे नीट लक्ष दिलं तर समजतं आपल्याला, आपण कायम धावतच असतो. जेव्हा थांबतो तेव्हाच खरं काय ते साध्य होतं. धावण्यावर ताबा तर मिळवता आला पाहिजे … याचं एक कारण आहे. आपलं मन.. खरं म्हणजे या मनाची एक गंमत आहे बघा. आपण कायम या मनाचे चोचले पुरवत असतो.
जिभेच्या चोचल्यांना पाण्याच्या घोटाबरोबर उडवून लावता येतं तसं मनाचं का करता येत नाही?
जिभेची व्याप्ती ही मुखा पर्यंत आहे मात्र मनाची व्याप्ती सगळीकडे आहे, आपण च दिलीये ती, आपल्या ही नकळत. आपण बोलताना माझं मन असं म्हणतो, म्हणजे मी मालक आणि हे मन माझं…खरं तर मी मालक असल्यामुळे या मनाने माझ्या हुकुमा प्रमाणे वागायला हवं,होतंय उलट..मी या मनाच्या हुकुमाची गुलाम झालीये. मी याच्यावर ताबा मिळवायच्या आधीच याने माझ्यावर ताबा मिळवून झालेला आहे. इथे लढाई मोठी आहे,आधी मला या मनाच्या ताब्यातून मुक्त व्हायचय आणि मग त्यावर शिरजोर होऊन त्याच्यावर ताबा मिळवायचा आहे…

कठीण आहे, पण हे केलं तरच जे साध्य करण्यासाठी हा जन्म झाला आहे ते साध्य होऊ शकेल. अन्यथा व्यर्थ. हे कसं करायचं हे मला विचारू नका हं…ते मला जमलं असतं तर मी इथे तुमच्या आमच्यात राहूनही तुमच्या आमच्यात राहिले नसते. पण निदान हे असं असतंय याची थोडी कल्पना तरी आली हे काय कमी आहे का? शिवाय माझी माय माझ्या प्रारब्धा नुसार मला काय द्यायचं ते देणार आहेच, हा विश्वास असताना हे नक्की सांगते की तिने मला जे जे दाखवलं आहे, जी जी प्रश्न आणि त्याची उत्तर तिने मला जशी जशी दिली आहेत त्यांच्या मागे काही कारणं नक्की असणारेत, आणि नेहमी प्रमाणे मला ती नंतर कळतील… त्या पिवळ्या साडी वाल्या बाई सारखी…

हो हो सांगते त्या पिवळ्या साडी वाल्या बाई बद्दल, पण आधी इथे काय झालं ते तर सांगू देत. तर आम्ही खोलीत आसन लावलं, आमचं जेवणं ही झालं होतं. थंडी पासून बचाव ही झाला होता. आणि आता आम्ही दुस-या दिवशी सकाळी लवकर उठलो. अंधारातच प्रात:विधी आटोपून घेतले. इथे चहा पाणी काहीही होणार नाही हे आम्हाला माहित होतं. माझी तर आज अंघोळ ही होणार नव्हती कारण इथे टाकी शिवाय काही सोय ही नव्हती. आम्ही निघालो. मंदार आणि मंडळी पुढे होती आणि आम्ही मागे होतो. भकास रस्ता, एखाद दुसरं घर, खूप वारा, अश्या अवस्थेत आम्ही आपलं चालतोय, पोटात काहीही नाहीये, अगदी चहा पण नाहीये सकाळपासून पोटात.. नऊ-साडे नऊ होऊन गेले, आम्ही सकाळी ६ वाजता चं निघालेलो, माझ्यातले त्राण आता संपले होते. रात्री चं जेवण झालं होतं पण नीट असं नव्हतं झालं, थंडी चा निदान चहा तरी हवा होता. आम्ही चालतच होतो, वाटेत एका घरासमोर एक ओटा दिसला, त्या ओट्यावर मी बसले, आणि बाबाला म्हणाले, “काहीतरी कर न बाबा, मला खूप भूक लागलीये” बाबा नी त्याच्या जवळ असलेले दोन पार्ले जी चे बिस्कीटं काढले.. एक मला दिलं आणि एक स्वत: घेतलं. ते कोरडं बिस्कीट घशा खाली जाणार नाही म्हणून पाण्यासोबत मी खात होते, आणि अचानक माझ्या मनात विचार आला. मी बाबाला म्हणाले, “बाबा, इथे मागे जे घर आहे नं त्यांनी दार उघडून जर आता आपल्याला चहा दिला तर किती मजा येईल नाही? काळा पण चालेल, पण आता हवाय रे जरा” बाबा जोरात हसला, म्हणाला, “ अगं मागे तरी बघ, त्या घराला केवढं मोठं कुलूप आहे?, तुला काय वाटलं, तुझी नर्मदा माई येईल, दोन तळहातावर दोन चहाचे मोठाले पेले घेऊन आपल्या समोर उभी राहील, आणि म्हणेल, बाबांनो, माझ्या दाराशी आले आहात, चहा पिऊन जा?, अगं मागण्या आधी एकदा मागे वळून बघायचं तरी, चल आता, मुकाट्याने बिस्कीट खा, हवं तर ५ मीनीट आराम कर, आणि चला मग, पुढे बघू चहाचं काय होतंय ते” त्याचं काही चूक नव्हतं म्हणा, मी मागे वळून तरी बघायला हवं होतं बोलायच्या आधी.. मी विचार करत बसले तसा मला भास झाला, ती पिवळी साडी वाली बाई बहुधा मी पुन्हा एकदा बघितली…पण मी इतकी भुकेली झाले होते की बहुधा त्या पिवळ्या साडी वाल्या बाईकडे मी लक्ष दिलच नाही. आता आम्ही निघणार तोच एक मोटारसायकल येऊन थांबली. नवरा बायको होती ती दोघं, बाई खाली उतरली, तिने कुलूप उघडलं, आणि नवरा म्हणाला “बाबाजी, मेरे चौकट पे आये हो, चाय तो पिते जाओ” इतकच नाही, तर जेव्हा घरातून ती बाई चहा घेऊन आली तेव्हा तिने दोन मोठे पेले भरून आणले होते, तळहातावर.. आमच्या समोर येऊन ती उभी राहिली, म्हणाली, काली चाय है माताजी, पर मेरे घर आये हो, चाय तो पीनी पडेगी”…. बाबा नी नर्मदा माई ला चेलेंज केलं होतं नं, तुझी नर्मदा माई, तळहातावर चहाचे कप घेऊन येईल आणि म्हणेल की माझ्या घरी आलेय, चहा पिऊन जा..? नर्मदा माईनी ते स्वीकारलं आणि पूर्ण करून दाखवलं.. त्याच कुलूप बंद घरातून मैया नी मला काळा चहा पाजला, अगदी जसा मला हवा होता तसा, आणि बाबा बोलला होता तेच शब्द तो माणूस ही बोलला, आणि बाबानी सांगितलं होतं तसंच ती बाई तळहातावर चहाचे मोठे पेले घेऊन आली….काय म्हणावं याला? योगायोग? छे.. माझी माई माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करते… आणि ती आहे हे ती दाखवून ही देते..

तुमच्या एक लक्षात आले का? जेव्हा जेव्हा माझी सोय होत नाही असं मला जाणवलं तेव्हा तेव्हा ही पिवळी साडी वाली बाई मला दिसली, आणि ती दिसल्यावर माझी सोय झाली, पण जोवर मला हे समजत नव्हतं तोवरच ती मला दिसत होती. जेव्हा माझ्या हे लक्षात आलं त्यानंतर तिचं दिसणं बंद झालं. मग ती बाई नक्की कोण असावी बरं? हे काय मी वेगळं सांगायला हवय? पण हे असच असतं, जेव्हा ती आपल्याला दर्शन देते नं तेव्हा आपल्याला समजतच नाही. तिच्या त्या रुपात म्हणा किंवा असं काहीतरी होतं की आपली मतीच काम करत नाही. असं मारुती रायांनी दर्शन दिलेलं मी तुम्हाला २७ व्या भागात सांगितलं होतं, तेव्हाही माझी अशीच मती निकामी झाली होती. आता पुन्हा एकदा सांगते हा अनुभव, कारण हा याच भागात घडलेला आहे.

आम्ही चहा पिऊन पुढे निघालो त्यावेळी बाबा अतिशय दु:खी झाला होता. आपण माई ला चेलेंज केलं याचं त्याला फार वाईट वाटत होतं. रामदास स्वामी आणि हनुमान हे त्याचं आद्य दैवत. बाबा मारुतीरायाची करुणा भाकू लागला. आज बाबाचा पाय पण फ़ार दुखत होता. अगदी २ किमी चाललो ना की तो बसून जात, इतका त्रास होत होता. मग मी बाबाला म्हंटलं “एखादा रिदम धरून चाललास तर कदाचित पाय कमी दुखेल” त्यालाही ते पटलं, आणि दोघांनी हनुमान चालिसा चा रिदम ठरवला. हनुमान चालिसा एकदा म्हणायला साधारण ४ मिनिट लागतात. आम्ही ठरवलं, ११ वेळा अहुमान चालीसा होईस्तोवर थांबायचं नाही. म्हणजे साधारण ४५ मिनिटे सलग चालायचं. असं केलंलं हे तंत्र बरच उपयोगी पडलं. मग आम्ही तेच वारंवार करू लागलो. या वेळी अधुन मधून आम्हाला एक परिक्रमावासी दिसत असे. त्यांच्या जटा होत्या, काळी सावळी पण सुढृढ शरीरयष्टी, श६ फ़ूट उंची, कमरेला पांढरा पंचा, हाती कमंडलू, असे बाबा होते ते. ते आम्हाला अधुन मधूनच दिसत. शक्यतो आम्ही जेव्हा ४५ मिनिटाचा टप्पा पार करून आराम करत असू तेव्हा ते आमच्या पुढे जात असत. मात्र आम्ही त्यांच्या पुढे गेलेलं मला आठवत नाही.

तर धरमाराय नावाच्या गावा जवळ ची ही गोष्ट. एका ठिकाणी आम्ही आराम करत असताना ते पण तिथे आले आणि आमच्या समोरच्या खडकावर बसले. नर्मदे हर झालं. मी त्यांना विचारलं “महारज जी, परिक्रमा मे हो?, कहासे उठायी आपने परिक्रमा?” ते म्हणाले “हा. वैसे तो मै परिक्रमा मे ही हू, कई सालों से परिक्रमा कर रहा हू”. माझे प्रश्न पुन्हा सुरु झाले, मी विचारलं “कोई और भी रास्ता है क्या? आगे पिछे तो आप दिखते नही हो, बस बीच बीच मे दिखते हो?” आम्ही रस्ता मार्गाने जात होतो. मला वाटलं हे महाराज किना-यावरून जात असतील आणि अधून मधून रस्त्यावर येत असतील, म्हणून मी त्यांना हा प्रश्न विचारला होता. ते म्हणाले “रास्ते तो बहोत होते है, तुम बुलाते हो तो मै आ जाता हू यहा, अब इतनी बार बुलाया तो आना तो पडेगा ना! नही बुलाओगे तो नही आउंगा”, मला काही कळेना, मी कधी या बाबांना बोलावलं? म्हंटलं जाऊ दे, हा कुणी ब्रम्हचारी बैरागी बाबा दिसतोय, बोलला असेल असच काहीबाही. ते साधू महाराज निघून गेले. मी आणि बाबा पण थोड्या वेळाने निघालो, मात्र मनात विचार येतच राहिला.. मी या बाबांशी तर बोलले पण नाही आधी, मग मी बोलावलं असं ते बाबा का म्हणाले? उत्तर सापडे ना.. म्हंटलं जाऊ दे, आपण आपला हनुमान चालिसा सुरू करू…. अहो काय सांगू, असा विचार मनात येतो न येतो तोच समजलं, आता पर्यंत किमान ५५ वेळा तरी हनुमान चालिसा म्हणून झाला असेल आमचा! इतका धावा तर आपण त्या मारुती रायांचाच करतोय…अगदी निरपेक्ष भावनेनी! “हा. वैसे तो मै परिक्रमा मे ही हू, कई सालों से परिक्रमा कर रहा हू”. रास्ते तो बहोत होते है, तुम बुलाते हो तो मै आ जाता हू यहा, अब इतनी बार बुलाया तो आना तो पडेगा ना! नही बुलाओगे तो नही आउंगा”.. बाबांचे शब्द माझ्या कानात घुमू लागले आणि समजलं…हे तर खुद्द मारुती राया! पण ते त्या वेळी काही लक्षात आलं नाही.

आम्ही डही ला नं जाता कुआ वरून धरमाराय ला गेलो. तिथे छान जेवण झालं दाल बाटी चं, मात्र सवय नसल्याने माझं पोट बिघडलं.. खूप दुखू लागलं. दोन दिवस पोट काही थांबे ना. आता डॉक्टर ला दाखवल्या शिवाय काही खरं नाही म्हणून कोटेश्वर ला गेल्यावर डॉक्टर चा शोध घेऊ लागलो, मात्र इथे मला एक अनमोल ठेवाच मिळाला, आयुष्यभराचा…आजही मी तो जपून आहे,कसा ते भाग-४५मधे सांगते .
©सुरूची नाईक–विदर्भ गट 98236 53511
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*