नर्मदा परिक्रमा;एक विलक्षण अनुभूती👇भाग👇४०.👇
नर्मदे हर…
मागच्या अनुभवात मी फारसा सुखकारक नसलेला अनुभव आला असं सांगितलं होतं, तो अनुभव काय ते आता सांगते. आम्ही किना-याची वाट धरली होती. बरच उन होतं.आज बद्रिकाश्रम पर्यंत जाऊन मुक्काम करावा असं आम्हाला वाटत होतं. तहान देखील बरीच लागली होती. रस्त्यांनी चालत चालत आम्ही बद्रिकाश्रमा पर्यंत येऊन पोहचलो देखील, पण इथे आमचा भ्रम निरास झाला. आमच्या अपेक्षे प्रमाणे इथे आम्हाला विश्रांती ला जागा, आसन लावायला जागा आणि भोजन प्रसादी मिळायला हवी होती. ते काही होऊ शकलं नाही.
अपेक्षा केली ते चुकलच होतं आमचं खरं, पण माणूसच ना शेवटी.. केली अपेक्षा..तसंही एका परीक्रमावासियाला काय अजून हवं असणार? निवांत झोप शरीरासाठी आवश्यक म्हणून ती हवी, आणि भोजन, ते ही जे असेल, जसं असेल तसं. अहो देहाचे चोचले जरी नाही तरी अजून आम्ही इतके का पक्के झालोत की याशिवाय राहता येईल आम्हाला? बाकी काही आम्हाला नको ही होतं. हो, एक स्त्री म्हणून स्वसुरक्षे ची आणिक एक अपेक्षा. बस बाकी नाही. बरं अपेक्षा पूर्ण नाही झाली एकवेळ तरी चालेल पण प्रसन्न सकारात्मक वातावरण असलं की ते ही पुरेसं असतं. इथेच खरा अपेक्षा भंग झाला.
बरकाल ला आम्ही उघड्या वर देखील झोपायला तयार होतो कारण तिथल्या साकारात्माकतेनी आम्हाला मोहित केलंच होतं, आणि बहुधा तीच सकारात्मकता आम्ही इथे शोधली. झालं असं की आधी मंदार आश्रमाच्या कार्यालयात जाऊन आला. बाहेर येऊन “ इथे काही शक्य वाटत नाही , कारण इथला कार्याकर्ता नीट माहिती देत नाही, उलट चिडून बोलतोय” असं त्यांनी सांगितलं. कुठला तरी एक अस्वच्छ खोलीचा कोपरा आहे असं तो म्हणाला म्हणे पण तिथे न पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न आम्हा बायकांसाठी इतर व्यवस्था.. तरी हरकत नाही, आम्ही किल्ली मागितली तर म्हणे किल्ली नाहीये, ज्याच्याजवळ आहे तो कधी येईल ते माहित नाही… म्हंटल ते ही मान्य, तोवर कुठे आसन लावू ते तरी सांगा. तिथे आसन लावायला जागा विचारली असता आश्रमात जागाच नाही असं समजलं. मग आम्ही भोजन प्रसादीचं विचारलं असता जेव्हा ते ही नाही हे समजलं तेव्हा मन जरा खट्टू झालं, कारण भूक लागली होती. इथपर्यंत काही हा अनुभव वाईट नव्हताच. मात्र तिथल्या कर्मचा-याची वागणूक ही अतिशय रूक्ष आणि उद्धट होती. सर्वसाधारण व्यक्तींचं असं वागणं स्वीकारता येत होतं आम्हाला पण आश्रमधारी व्यक्ती चं असं वागणं जरा वेगळं च वाटलं. तिथे थांबण्याची इच्छाच झाली नाही. थकल्या भागल्या परिक्रमावासी ना निदान पाणी तरी विचारावं.. बरं बाबा नको विचारूस तू, पण मागितल्यावर निदान नाही तरी म्हणू नये…त्या कर्मचा-यांनी दूर वर असलेल्या नळाकडे बोट दाखवलं… “ वाहा जा के पी लो” .. वाटलं आपण तर आपल्या घरी असं कधीच कुणाशीच वागत नाही, आणि हे आश्रम धारी, परिक्रमावासी लोकांसाठी आश्रम उघडतात आणि साधं पाणी पण पाजत नाहीत? राग तर आलाच..
आश्रमाच्या नावाखाली नुसता पैसा जमा करून स्वत:ची घर भरताहेत असही वाटलं. वाटलं मला की म्हणावं त्याला जाऊन “नही कुछ कर सकते तो कम से कम ठीक से बात तो करो”.. पण दुस-या क्षणी वाटलं राहू दे.. त्याचं त्याच्यापाशी… तर असा अनुभव.
नंतर. ज्या वेळी शांततेनी या अनुभवावर विचार केला तेव्हा वाटलं, ठीक आहे नं. नसेल त्याला आपल्याला मदत करायची. आपण आश्रम आहे म्हणून गेलो तिथे, तिथे आपलं दाणा पाणी लिहिलेलं नसेल, म्हणून नाही मिळालं. मग लक्षात आलं क्रिया- प्रतिक्रिया चे सूत्र. तिथे जाताना आपली अपेक्षा इतकी तीव्र होती की त्याच्या मागे येणारी प्रतिक्रिया ही देखील तीव्र च असणार नं. बरकाल अगदीच उलट होतं अपेक्षाच नव्हती, त्यामुळे जे समोर येईल त्याचा स्वीकार करायचा होता आणि इथे मी माझ्या अपेक्षा कुणावर तरी लादणार होते, ज्याची कंपन कदाचित आधीच त्या व्यक्तीवर जाऊन आदळली आणि त्या व्यक्तीची मुळातली नकारात्मकता म्हणा किंवा त्याची चिडचिड म्हणा किंवा जी काही त्याची मानसिकता असेल, त्या वेळची परिस्थिती असेल त्यात या माझ्या अपेक्षांच्या ओझ्याची भर पडून ती नकारात्मकता अजूनच तीव्र झाली. आम्ही सगळेच तहानलेले देखील होतो, पण तरीसुद्धा त्या आश्रमातल्या त्या नळावर जाऊन पाणी प्यायची पण इच्छा झाली नाही. आम्ही तसेच भुकेले तहानलेले पुढे निघालो.
बद्रिकाश्रमातून आम्ही नाराज होऊनच निघालो. मात्र पुढे नंदेरीया ला नंदिकेश्वाराचं दर्शन घेतलं. तिथे राहण्याची व्यवस्था नव्हती मात्र तिथे काही लोक कसली तरी पूजा करत होते. तिथे मंदिरातले मुख्य पुजारी बाहेर गेले होते मात्र एक व्यवस्थापक तिथे होते. आता आम्हाला खूपच भूक लागली होती. इथे आम्ही “ चहा मिळेल का असं विचारलं” आणि इथल्या माणसाने आम्हाला भरपूर आणि चवदार चहा करून दिला. आमचं पोटाच भरलं.इथे नं ,मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते..
एका खूप म्हाता-या आजी बाईंची. इथे आम्हाला चहाबरोबर काहीतरी दिलं होतं खायला, काय ते आठवत नाहीये पण वाटीत होतं काहीसं, कारण चाहाचे पेले आणि वाटी घासायला जेव्हा मी मंदिरा मागच्या टाकी जवळ गेले तेव्हा तिथे एक आजीबाई भजन म्हणत आणि भांडी घासत बसल्या होत्या. खूप भांडी होती त्यांच्या पुढ्यात आणि त्या शांतपणे घासत होत्या. “ दे दे बेटा, मी साफ कर देती हु” असं म्हणत त्यांनी मला वाटी पेला मागितला. खरं तर मी इतकी थकले होते न की एरवी मी दिला ही नसते माझे भांडे घासायला पण या आजींकडे आणि त्यांच्या पुढ्यात असलेल्या भांड्यांकडे पाहून मला माझी लाज वाटली… आणि त्या क्षणी वाटलं बसावं इथे हिच्या जवळ आणि भांडी घासायला मदत करावी हिला. वंदाना ताई ही आली तिथे, त्या आजी कडे पाहून तिलाही वाईट वाटलं, आणि न राहवून मी त्या आजी ला विचारलं” आपकी मदद कर दु मैया जी”? तिनी जे उत्तर दिलं नं ते ऐकून आम्ही फक्त तिला नमस्कार केला आणि आम्ही आमच्या मार्गाला पुढे निघालो. ती म्हणाली “बेटा अब यही मेरा काम है.. और यही मेरा भाग भी है.. भगवान की झुटन साफ करना तेरे भाग में नही और परिक्रमा करना मेरे भाग में नही” तू जा बेटा, जा के आराम कर.” किती सहज साधे पणाने तिने तिच्या भाग्याला न्याय दिला होता, आणि माझ्याही भाग्याची ओंजळ त्याच न्यायानी तिनी भरून काढली होती. इतक्या म्हाता-या वयात मदत घेणं तिला काही गैर नव्हतं खरं तर पण मदत नको हे म्हणण्याची तिची पद्धत किती वेगळी होती नाही? आणि किती सहज आणि तितकीच सत्य!.. सत्य हे असं असत असेल.. अगदी स्फटिका सारखं पारदर्शक..अरे हो, स्फटिकावरून आठवलं पुढचं चंद्रीकेश्वराचं मंदिर..
पुढे जाऊन चंद्रीकेश्वराचं मंदिर होतं तिथे गेलो. हे मंदिर थोडं आडवाटेला आहे, खुपसे परिक्रमावासी इथे जातच नाही. आम्हाला कुणीतरी सांगितलं आणि आम्ही गेलो. इथे स्फ़टिकाचं शिवलिंग आहे आणि यातून सतत थेंब थेंब पाणी गळत असतं. या शिवलिंगामधे एका विशिष्ट कोनातून पाहीलं तर चंद्राकार चमकदार आकृती दिसते म्हणून याला चंद्रकांत म्हणतात आणि या जागेला चंद्रिकेश्वर असं म्हणतात. तिथे देखील छानसा चहा प्यायला मिळाला. आता मघाचा तो बद्रीका आश्रमातला राग वगैरे काही शिल्लक राहिलं नव्हतं. आम्ही आता इथून पुढे चांदोद च्या दिशेने पुढे जाऊ लागलो. वाटेत ऋणमुक्तेश्वाराच मंदिर होतं. ते बरच उंच होतं, भरपूर पाया-या होत्या. बाबा थकला होता. वंदना ताईचं आधी ही दर्शन झालेलं होतं. मग मी आणि मंदार आम्ही जाऊन दर्शन घेऊन आलो. परिक्रमा पहिल्यांदाच करत होतो आम्ही दोघं ही आणि इथे मिळत असलेल्या सेवा भावी लोकांच्या सेवेचं ऋण आमच्या वर होतच.. शिवाय अजूनही काही ऋण असतील तर ते लवकर फितू दे बाबा अशी प्राथना केली आणि पुढे संगमाच्या दिशेने निघालो. कारानाली च्या आधी आणि चांदोद च्या नंतर आम्ही मुक्काम केला. पण ते नंतर सांगते..आधी सांगते एक गम्मत.
इथे ओर नदीचा आणि नर्मदा मैयाचा संगम लागतो. संगम स्नान पवित्रच असतं आणि ते करायाचं असं आम्ही ठरवलं. इथे उतरण्यासाठी एक जिना तयार केला होता. त्याच्या अरुंद पाया-या होत्या. काही ठिकाणी पोती लावून पाया-या केल्या होत्या. खोल आणि अगदिच अरुंद पाया-या पाहून बाबा ला जरा भीती वाटली. मंदार उतरून खाली गेला मग मी आणि वंदना ताई देखील खाली येऊ लागलो. बाबा मात्र येईना. “मी बसतो थोडा वेळ इथेच”, असं म्हणून बसून राहिला. आधी वाटलं बरं वाटत असेल कारण वरून संगमाचा नजारा खूपच सुरेख दिसत होता, म्हणून म्हणत असेल पण तसं नव्हतं. आम्ही सगळ्यांनी त्याला मदत करून, हात धरून खाली आणण्या चा प्रयत्न केला पण बाबा काही यायला तयार नाही. शेवटी मी पुन्हा वर गेले, आणि मी आणि बाबा फिरून येतो असं सांगितलं. पण मंदार ला राहवलं नाही.
पूर्ण खाली उतरलेला मंदार पण वर आला. वंदना ताई अर्ध अंतर उतरली होती, ती पण वर आली आम्ही सगळेच फिरून म्हणजे ३ किमी चक्कर मारून संगमावर गेलो. आहे की नाही मजा, इतकं थकलेलो असताना देखील आमच्या पैकी एकानेही ३ किमी फिरून जायला मागे पुढे पाहिलं नाही… कुठून येते ही शक्ती? कुठून येतात हे विचार?
संगमावर पाउल ठेवणं च खूप आनंद दायक होतं. पायाखाली मऊ सुत वाळू तळपायाला गुदगुल्या करत होती. पाणी तसं फार नव्हतं ओर नदीलापण नर्मदा मैला भरपूर पाणी होतं. एकीकडे अगदीच पाणी नाही आणि थोडं दूर नर्मदा मैयाकडे बघावं तर नावा चालताहेत! कमाल आहे की नाही? पण आहेच.. संगमाचं स्थान असच असतंय, विलक्षण. आम्ही आंघोळ करणार होतो पण उशीर होत होता. अंधाराच्या आत मुक्कामाला जायचं होतं आणि अजून कर्नाली तसं दूर होतं. आम्ही पुन्हा एकदा चहा घेतला आणि पुढे निघालो.
आम्ही कुबेर भंडारी बद्दल ऐकून होतो. कुबेराला इथेच धन प्राप्ती झाली होती असं म्हणतात. इथलं मंदिर खूप छान आणि श्रीमंत आहे असं समजलं होतं. संपत्तीची देवता ती, तिचा थाट काय साधासुधा असणारे? आम्हाला आता ते ऐश्वर्य बघायचं होतं. पण त्या आधी आमचा मुक्काम कर्नाली ला कुठेसा असणार होता. आम्ही रस्त्याने जात असता गुजरात च्या कर्नाली चे जुने दगडी वाडे बघत बघत जात होतो. आम्ही २०१७ मध्ये नसून १६०० च्या आसपास असू असं वाटावं इतके जुने वाडे आणि मंदिर तिथे होते, आणि मग एक मंदिर पाहीलं.. बाहेर छोटंसं…काय वाटलं देव जाणे, दर्शन घ्यावस वाटलं आणि पूजा-याला बोलावून दार उघडून दर्शन घ्यावं म्हणून त्या पूजा-यांना बोलवायला त्यांच्या घरी गेलो, तिथेच अगदी, मागेच मंदिराच्या… नंतर काय झालं ते म्हणजे चमत्कारा पेक्षा कमी नाहीच. आम्ही नंतर अक्षरश: हरवून गेलो… खूप आनंद ही झाला… थोडी भीती ही वाटली.. खूप गप्पा ही केल्या.. आणि खूप काही अनुभवलं देखील.. पण काय? ते सांगते पुढच्या म्हणजे ४१ व्या भागात.
©सुरूची नाईक-विदर्भ गट+91 98236 53511


Leave a Reply