नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇३९👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇३९👇
नर्मदे हर…..
बरकालच्या त्या दिवसाचं वर्णन मला आज सांगायचं आहे.तुम्ही वाट बघताय त्या पदार्थाची ज्यावर आम्ही लहान मुलासारखे तुटून पडलो होतो, अगदी चौघही. आम्ही असं काहीच वेगळं खात नव्हतो.बरकाल च्या साधू महारांजानी आम्हाला पाणी दिलं आणि “बाल भोग तो करलो “ असं म्हणत एका ताटा मधे एक पपई चिरून आणली.पपई सारखी पपई,त्यात काय वेगळं, असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे, अहो पण गंमत सांगते, इतकी रसाळ,गोड आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारी पपई मी पहिल्यांदाच खाल्ली. इतका अलवार घास, की ओठाला लागला की घसा ओला होऊन जाई. ओठानीच खावी अशी पपई.. आता सांगा पपई वर का उगाच तुटून पडणारे आम्ही? जेव्हा त्या साधू महारांजांनी पपई आणली तेव्हा वाटलं, “बालभोगासाठी पपई?” आम्ही कहीतरी चिवडा फ़रसाण याची अपेक्षा करत होतो,त्यामुळे ही पपई पूर्ण संपेल असं ही आम्हाला वाटलं नाही, मात्र एक फ़ोड, अहो एक घास खाताक्षणीच त्या पपईचा फ़डशा पडला, आणि मग त्या साधू ची अक्षय थाली सुरू झाली. ते ताट आमच्या पुढ्यात ठेवून तो आत गेला, त्यानी अजून एक ताट भरून पपई चिरून आणली..आम्ही ते दुसरं ताट देखिल संपवलं. खरं सांगते, हावरटासारखं केलं आम्ही… दुस-या नंतर तिसरंही खाल्लं… पोट भरलं होतं खरं, पण मन च भरत नव्हतं.त्या ठिकाणी राहण्याबद्दल आम्ही अजून त्या साधू महाराजांशी बोललो नव्हतो, पण आता तर इथेच राहायचं होतं. आम्ही ओळख करून घेण्यासाठी त्यांचा परिचय विचारला, “माताजी साधू का आगा पिछा नही पूछा करते, आप बस सेवा बताईये” त्यांनी परिचय दिलाच नाही. मग आम्ही परिसर फ़िरलो. अरे हो, इथे जे मंदिर आम्ही खालून बघत होतो ते कुणाचं माहितीये? सूर्यप्रभेचं! मी सूर्यप्रभेचं मंदिर पहिल्यांदाच पाहिलं. सूर्यप्रभा म्हणजे सूर्याची पत्नी. मंदीर प्राचीन होतं. मंदिराचं कोरीव काम खूपच रेखीव होतं. मंदीराच्या मागे फ़ुलांचा फ़ळाचा सुंदर बगीचा होता. अंगणात बाक, आणि दगडी फ़रशी लावली होती आणि उजव्या बाजूला एक छोटासा ओटा,आणि ओट्यालगत खोली. त्या परिसराच्या कुठल्याही कोप-यातून समोर वाहणारी नर्मदा माई दिसते. कुठलाच अडसर नाही.असं पूर्ण च्या पूर्ण पात्र या तीरापासून तर त्या तीरापर्यंत बघत बसावं. मग कधी त्यात “कोटी रतन ज्योती” चं दर्शन होतं तर कधी पोर्णीमेचं चांदणं उलटून तरंगू लागतं. आम्ही गेलो तेव्हा तिथी काय होती ते आता नक्की आठवत नाही पण पोर्णीमेच्या जवळपासची असावी.कारण त्या रात्री अम्ही अंगणात बसून जो नजारा पाहिला तो अवर्णनीय आहे. पण त्या आधी बाकी राहिलेल्या दिवसाचं वर्णन सांगते.

तर आता आम्ही साधू महाराजांना राहण्याबद्दल विचारलं. ते म्हणाले “ वैसे तो कोई यहा ज्यादा रहता नही है पर एक रूम है, देख लीजीये, ठिक लगा तो साफ़ करवा देता हू” आम्हाला फ़क्त तिथे राहण्याची परवानगी हवी होती. आम्ही अंगणात सुद्धा राहयला तयार होतो आणि महाराज रूम बद्दल बोलत होते.

इथे आल्यापासून आनंदाची उधळण काय ती आमच्यावर होत होती. आनंद जेव्हा अनपेक्षीत पणे समोर येतो नं तेव्हा त्याचं रूपच वेगळं असतं बहुधा. बघा नं, एखाद्या गोष्टीची आपण खूप वाट बघतो आणि मग ती गोष्ट पूर्ण होते, यातला अनंद मोठा असतोच, पण कुठेतरी तो आनंद त्या अपेक्षेसाठी असतो, त्या फ़ळासाठी नाही. म्हणजे ती फ़लप्राप्ती तर झालेली असते मात्र “इतके दिवसांची इच्छा पूर्ण झाली” यातच माणूस जास्त समाधानी असतो, नाही का? आमचं मात्र उलटंच होत होतं. फ़राळासाठी सर्वसाधरण पणे चिवडा मिळतो, बिस्कीट मिळतात.. तशीच आमची अपेक्षा, आणि आम्हाला मिळाली रसाळ मधूर गोड पपई, अगदी अनपेक्षीतपणे ती ही भरपूर, अगदी आम्ही नको नको म्हणेस्तोवर. मग आम्ही विचार केला होता इथे राहाण्याचा, अंगणात सुद्धा चालणार होतं आम्हाला आणि आम्हाला मिळाली छान ऐसपैस खोली. अंघोळीला बाथरूम… खरं सांगते, या सगळ्या सुखसोई आहेत. यांची आपल्याला इतकी सवय लागलीये की याला आपण प्राथमिक गरजा म्हणतो. या परिक्रमेत कमितकमी गरजा ठेवून कसं जगता येतं किंबहुना किती आनंदानी जगता येतं हे शिकायला मिळालं.

हो एक कबुल नक्की करेन. मी मोबाईल मात्र वापरला, पण खरं सांगते “त्या शिवाय जमत नाही” हे कारण नाही हं मोबाईल वापरण्याचं. माझा मुलगा आणि इतर घरच्या मंडळीना माझ्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती आणि मला ही त्यांच्या संपर्कात राहायचं होतं म्हणून तो मोबाईल. पहिल्यांदाच मुलाला इतके दिवसांसाठी सोडून आले होते, तेवढ्या पुरता मोबाईल…परिक्रमेत अनेक ठिकाणी नेटवर्क नसायचं त्यामुळे रोज फ़ोन झाला असं फ़ारसं झालं नाही. पण जेव्हा नेटवर्क असायचं तेव्हा बोलणं व्हायचं…अर्थात ही लक्झरी च आहे, आणि याशिवाय ही आपण जगू शकतो हे नक्की..तर आमची राहण्याची व्ययस्था झाली. साधू महाराजांनी आम्हाला खोली साफ़ करून दिली. दुपारचा आराम झाला आणि संध्याकाळ चा सोनेरी लाल प्रकाश पडू लागला. त्या दिवशीचा सूर्यास्त मी विसरूच शकत नाही. पश्चिम वाहिनी मैया त्या बिंबाला आपल्या कुशीत घेत होती जणू, आणि त्याच्या तेजानी पाण्याच्या लहरीवर उतरलेलं ते सोनेरी लाल जांभळं नक्षीकाम म्हणजे मैयात सोडलेल्या असंख्य दिव्यांसारखं वाटत होतं.. “कोटी रतन ज्योती” या मैयाच्या आरती मध्ये असलेल्या ओळींप्रमाणेच!

आमची संध्याकाळची आरती आणि श्लोक म्हणून झालेत. आता भोजनाची तयारी.

सकाळपासून हे साधू आमच्या सेवेत होते, म्हंटलं त्यांना मदत करावी. आम्ही विचारलं “ महाराज जी भोजन बनाने मे आपकी मदत करे?” ते म्हणाले, “ माताजी आराम किजिये, सब हो जायेगा. ते स्वत: स्वयंपाक करू लागले. वरण, भात, भेंडीची भाजी असा बेत होता. वरण भात आणि भाजी तयार झाली होती, ती घेऊन ते अंगणात आले. तिथेच उघड्या आभाळाखाली आणि मैयाच्या समोर आजची अंगत पंगत होती. कणकेचा गोळा घेऊन ते साधू महाराज अंगणात आलेत आणि सोबत निखा-याची शेगडी ही आणली. तिथे बसून त्यांनी आम्हाला गरम गरम पोळ्या वाढल्यात. खरं सांगते, एखादी बाई काय स्वयंपाक करेल इतका सुंदर स्वयंपाक होता. कुरकुरीत उभे काप केलेली भेंडीची भाजी, अतिशय चविष्ट सांबार वजा वरण, सुवासिक तांदळाचा भात आणि मऊसूत घडीच्या पातळ पोळ्या. त्या पोळ्या खाल्ल्या तेव्हा खूप लाज वाटली, वाटलं “ बरं झालं आपण स्वयंपाक केला नाही, इतका सुंदर स्वयंपाक, इतक्या तलम पोळ्या मला करताच येत नाही” आग्रह करून करून महाराज आम्हाला वाढत होते. इतका आग्रह की “माताजी ये सब खतम करना है” असं म्हणत जायचे आणि वाढत जायचे.

“महाराज जी आप भोजन नही करेंगे” मी विचारलं, आणि ते उत्तर ऐकून डोळ्यात पाणीच आलं..ते म्हणाले, “मै तो फ़रियाली हू, ये सब नही खाता” हा साधू, जो इतका चविष्ट स्वयंपाक करतो, इतक्या आग्रहानी आम्हाला खाऊ घालतो तो या सगळ्याची चव देखील घेत नाही? सेवा भाव किती काठोकाठ भरला असेल त्याच्या मनात? त्याच्या हातच्या स्वयंपाकाला त्याच्या हातची चव नव्हतीच म्हणजे, चव होती ती त्याच्या आतल्या सद्भावनेची, त्याच्या विचार प्रक्रीयेची, त्याच्या सेवा भावनेची, आणि म्हणूनच तिथलं वातावरण देखिल तितकच शुचिर्मय होतं, आल्हाददायक होतं. हा साधू खरच कुणी पुण्यात्मा होता जो काही कारणास्तव या देहात राहात होता असच वाटून गेलं.

रात्रीची पहिली झोप खूप छान लागली आणि सकाळी ३ वाजता जाग आली, खूप फ़्रेश वाटत होतं. मी बाहेर गेली तसा बाबाही बाहेर आला. मग आम्ही दोघं बाप लेक पाण्यात पडलेलं चांदणं मूक होऊन वेचत बसलो. मी मनातल्या मनात माझा जप करत होती आणि गुरुमंत्राचा प्रत्येक शब्द जणू आसमंतातून उतरून येत होता. मला पुन्हा एकदा प्रत्यय आला, “मन हे स्थीर करुनि पहा, रेवा तीरी सद्गुरूला” .. मोठ्या महाराजांच्या आरतीमधल्या या ओळी खरच किती ख-या आहेत! तासाभरानी आम्ही पुन्हा आंग टाकलं, पण झोप लागली नाही.

सकाळी उठून पूजापाठ आटोपून बालभोगाची तयारी करायला गेलो तर कालच्या पोळ्या शिल्लक असल्याचं समजलं. वंदना ताईनी त्याचे चुरम्याचे लाडू बनवून दिले आणि त्या साधू महाराजांचा निरोप घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पण ही जागा काही मनातून जात नाही.. अजूनही हे प्रसंग तितकेच ताजे आहेत! मंदार, बाबा आणि वंदना ताई, तुम्ही जेव्हा हे वाचाल तेव्हा तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा बरकाल च्या या मंदिराच्या आणि या मंतरलेल्या दिवसाच्या दुनियेत हरवून जाल हे नक्की, आणि वाचक हो, पुन्हा एकदा सांगते, एकदा संधी मिळाली न तर इथे नक्की नक्की जाऊन या. तुम्ही जाल तेव्हा हेच महाराज इथे असतील की नाही माहीत नाही, आम्ही मात्र भाग्यवान ठरलो आहोत त्या महाराजांना भेटून!

आम्ही किनारा वाटच धरली आणि पुढे जाऊ लागलो. गावं किना-यापासून जरा दूर असतात त्यामुळे आम्ही गावांमधे गेलो नाही. इथून पुढे आता बद्रिकाश्रमात थांबायचं असा विचार केला. “तुम्हाला काही वाईट अनुभव आलेत का?” असं मला अनेक जण विचारतात, त्याचं उत्तर देते. वाईट अनुभव अगदीच येत नाही असं नाही, पण ते खूप कमी असतात आणि मुळात आपल्या अपेक्षा कमी असल्यामुळे आणि या वाईट अनुभवांचा प्रभाव पण कमी असल्यामुळे ते फ़ारसे जाणवत नाही. म्हणजे परिक्रमेत जर तुमच्या मनाला फ़क्त चांगलं तेच धरायची सवय लागली तर हे वाईट देखील वाईट आहेत हे जाणवत नाहीत मात्र एरवी चा विचार केला तर वेगळा अनुभव म्हणता येतील नक्कीच, असे अनुभव देखिल येतात. त्यातलाच एक सांगते. अर्थात हा अनुभव वाईट नाहिये, पण आनंददायक नाहीयेच मुळी, सांगते.. पण बरेच दा काय असतं नं हे असे अनुभव येणं ही गरजेचं असतं. नाहीतर चांगल्या अनुभवांची चव समजेल कशी नाही का?

बरच अंतर चालून गेल्यावर आम्ही बद्रिका आश्रमात गेलो. बद्रिकाश्रमा बद्दल जरा ऐकून होतो. जागा छान आहे, सोय़ी छान आहेत हे ही माहित होतं. आणि आता आमचं मन सोयींपेक्षा ही आनंदाच्या अनुभूतीच्या शोधात होतं. एकवेळ सोय कमी जस्त झाली तर चालेल, पण प्रसन्नता हवी, अशी मनाची अपेक्षा झालेली.. हो अपेक्षाच.. आणि जिथे अपेक्षा येते तिथे ती भंग ही होणारच नाही का? त्याचाच परिणाम म्हणजे हा पुढचा अनुभव, असं म्हंटलं तरी चालेल.बरकाल च्या मिळालेल्या आनंदा नंतर पुढेही तसाच आनंद मिळावा ही झाली इच्छा आणि बरकाल च्या आनंदा नंतर तसाच आनंद मिळाला पाहिजे, ही झाली अपेक्षा. या पाहीजे वर जेव्हा जोर येतो तेव्हा मग बाकी कुठल्या परिस्थिती ला सामोरं जायला हे मन तयार होत नाही, आणि मग या “पाहीजे” या अपेक्षेचा भंग झाला की आपण त्याला अनैसर्गिक किंवा दु:खद अनुभवाचं शीर्षक देऊन मोकळं होतो. थोडक्यात काय तर तो अनुभव जसा आहे तसाच असतो, तो वाईट का चांगला हे ठरवणं आपल्या मना वर असतं… असो, म्हणून म्हणतेय, त्या वेळी अनैसर्गिक, विचित्र वाटलेल्या त्या अनुभवावार जेव्हा मी नंतर विचार केला तेव्हा तो तितकासा विचित्र नाही वाटला मला…तरीही सांगते पण पुढच्या भागात.. म्हणजे 40 व्या भागात.
©सुरूची नाईक-विदर्भ गट:देवा तुझा मी सोनार 9309926559
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*