नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇३८👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇३८👇
भाग↕️३८.
नर्मदे हर……
*एकतर दीपिका च्या मनमोहक व्यक्तीमत्वाने आम्ही भारावून गेलो होतो. त्यात तिची अतिशय विनम्र विनंती आणि अतुलनीय तेज आम्हाला तिच्या आश्रमात जायला भाग पाडत होतो “भोजन प्रसादी तो कर लीजीये, फ़िर चले जाना अगर आपको रहना नही है तो” असं म्हणत ती आम्हाला घेऊन गेली. भोजन प्रसादी करून निघूयात असं म्हणत आम्ही तिथे गेलो खरे पण आत पाऊल ठेवताच चौघांनीही एकमताने आज मुक्काम करायचं ठरवलं. अतिशय प्रसन्न वातावरण. कमालीची शांतता आणि विलक्षण कंपन तिथे जाणवत होते. शिवाय सुबत्ता ही होतीच. आम्ही एका हॉल मधे आसन लावलं. भला मोठा हॉल आणि आम्ही चौघंच.

*गंमंत म्हणजे इतके जास्त चार्जिंग पॉईंट्स होते की सगळ्यांचे सगळे मोबाईल आणि पोवर बॅंक एकाच वेळी चार्जिंग ला लावता आले. परिक्रमेत अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसतं आणि चार्ज करण्याची पण सुविधा ब-याच ठिकाणी मिळत नाही. आम्हा चौघांनाही जाम आनंद झाला होता. खरं तर तुम्ही म्हणाल यात काय आहे असा खूप आनंद होण्या सारखं? पण हीच मजा आहे माहितिये का. एखादी छोटी जरी गोष्ट झाली नं तरी त्याचा इतका मोठा आनंद होतो की काय सांगावं! कदाचित छोट्या छोट्या गोष्टींमधे मोठा मोठा आनंद मानायला शिकतं मन, आणि मग आपण सतत आनंदीच राहतो. इथे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला मोठे मोठे आनंद देत होत्या. त्यातली एक म्हणजे टेबल खूर्चीवर बसून जेवण. जेवण चारही ठाव, अगदी लोणचं पापड कोशींबीर आणि गूळ सुद्धा. त्यात तव्यावरच्या गरमा गरम पोळ्या, आणि स्वयंपाक करणा-यांच्या आणि तो वाढणा-या कर्मचारी मंडळीच्या चेहे-यावरचं समाधान ह्या सगळ्यांनी मन खूप तृप्त झालं होतं. आम्ही जेवून विश्रांती घेतली आणि संध्याकाळी मी बाबा आणि मंदार बाहेर जाऊन आलो.माझी टाच थोडी दुखत होती, हे समजल्यावर एक म्हातार-या श्या बाई, आश्रमाच्या सेवीका तेल घेवून आल्यात. अगदी नको नको म्हणताना देखिल स्वत:च्या हाताने माझी टाच चोळून दिली. येवढी मोठी बाई आपली सेवा करतेय असं काय केलं होत् हो मी?

“ही सेवा माझी नाहीये हे मला समजत होतं कारण ही सेवा होती मैयाची”

*आणि मैयाच ती करत होती. मी माध्यम होते, आणि हा विचार मनात येईस्तोवरच काय तो दु:खाचा खेळ चालतो. मग काय होतं समजत नाही. आजी मला एक्यूप्रेशर देत होत्या. मी बेंबीच्या देठापासून ओरडत होते, मात्र मला बरच आराम पडला होता. इतका की संध्याकाळी मी बाहेर जाऊन मंदिरं बघून आले होते.डोंगरे महारजांची समाधी, ६०० वर्ष जुनं गणेश मंदिर, अंगारेश्वर मंदिर असं सगळं बघून आलो.

*ह्या अंगारेश्वर मंदिराची एक अख्यायिका आहे. हे मंदिर अतिअप्राचीन आहे. याची निर्मिती नक्की केव्हा झाली हे काही माहित नाही मात्र हे मंदिर मुस्लीम राज्यकर्त्यांनी ते सत्ते मधे असताना जमीन दोस्त करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. इंग्रज राजवटी मधे ही असे प्रयत्न झाले आणि त्या आधीही जेव्हा जेव्हा ह्या मंदिराकडे कुणी वक्रदृष्टी केली त्या त्यावेळी या मंदिरावर निखारे पडत आणि ह्या मंदिराला कुणी हात लावू शकलं नाही असं इथल्या पुजा-यांनी सांगितलं.. निखा-याला हिंदी मधे अंगारे म्हणतात आणि या मंदिराचं नाव अंगारेश्वर पडलं. अशी ही कथा.

*अरे हो मालसर च्या आधी राणापूर चा एक अनुभव सांगायचाच राहिला. मी मंदार बाबा आणि वंदना ताई असे आम्ही सोबत होतो. बाबाचा पाय दुखत होता. शेतातली सगळी वाट होती. जिथे पोहोचणे होते तिथवर आम्ही पोहोचू शकलो नाही. आता कुठे थांबायचं? बरच अंतर काही दिसलं नाही. मग मंदार जरा पुढे झाला आणि जागा बघू लागला तो त्याला एक मंदिर दिसलं पण मंदिरात झोपायला परवानगी नव्हती. समोर पोर्च होता आणि उजव्या बाजूला एक खोली पण होती. तिथे राहता येईल असं वाटलं. आम्ही आत गेलो. पोर्च मधे झोपण्याची परवानगी मिळाली. आता भोजन व्यवस्थेचं काय ते बघायचं.

*मंदिराच्या वर तिथेल्या व्यवस्थापक बाई राहात होत्या, त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांचं माहेर प्रकाशा चं असल्याचं समजलं. त्या बाई मराठी होत्या मूळच्या, त्यामुळे त्यांना ही आमच्या बद्दल आपुलकी वाटली आणि कढी खिचडीच्या भोजन प्रसादीची व्यवस्था बाईंनी करून दिली. आता आम्ही निवांत झालो आणि काही मदत हवी असेल तर म्हणून त्या बाजूच्या खोलीत गेलो. गप्पा करता करता तिथेच आसन लावावं का असा विचार आला आणि लगेच गेला ही.. त्या खोलीत एक भला मोठा नाग बरेचदा येतो असं समजलं. अन्न धान्य साठवून ठेवलेली ती खोली असल्यामुळे उंदिर असतात तिथे, त्यांना खायला येतो ..असं सहज म्हणून तिथला पुजारी बोलला पण आमचा विचार मात्र बदलाच.

*आम्ही पोर्च मधेच आसन लावलं. संध्याकाळ पर्यंत सगळं ठिक होतं पण संध्याकाळी त्याआश्रमातल्या झाडावर माकडांनी गर्दी केली. इथवर ठिक आहे हो, पण ह्या माकडांची पिल्लं फ़ारच धिटुकली आणि चिकित्सक. “आज ही चार कोण आलीयेत राहायला इथे? यांच्याजवळ बरच सामान दिसतय?, त्यातलं काही आपल्या कामाचं आहे का?” असे अनेक प्रश्न त्यांना पडले असावेत. जरा आम्ही इकडे तिकडे गेलो की एखादं पिलू यायचंच आमच्या सामानाची झडती घ्यायला. ही पिलं हुशार हं अगदी, मंदिरातल्या आवारातला नळ उघडून पाणी प्यायचीत ती. त्यांची मर्कट लीला थोडा वेळ बरी वाटली पण ही मंडळी रात्रभर जागणार झाडावर, आणि येणार अधून मधून, आम्ही झोपलो की हे नक्की माहित होतं. आम्ही सगळं सामान बांधून झोपलो खरं, पण धाकधुक होतीच… अणि एक पिलू बराच वेळ येत राहिलं.. मी सगळ्यात कडेला झोपली होती, ते पिलू येत गेलं वारंवार आणि हळू हळू मात्र त्याची माझी मैत्री झाली… मग मात्र त्याने त्रास दिला नाही. तिथेल्या बेंच वर ते बसायचं आणि तिथूनच खाणाखुणा करायचं. त्याला बहुतेक समजलं असावं, हे लोक आणि आपण, सगळेच कसल्यातरी शोधात आहोत आणि एकमेकांना इजा पोहचवून काही होणार नाहीये. त्याला समजलं की नाही माहित नाही, पण मला खरच जाणीव झाली, ती अशी की खरोखर माणूस, किंवा कोणताही प्राणी किंवा या सृष्टी मधील काहीही असू देत, प्रत्येकामधे एक नैसर्गिक समजूतदार पणा असतो, किंवा एक असं काहीतरी टॅलेंन्ट असतं ज्या मार्फ़त समोरच्या प्राण्यामधील आणि स्वत:मधील एक कॉमन तत्त्व समजून घेता येतं. समोरचा धोकादायक नाही ही खात्री पटली की दोघांच्याही मनातील भिती जाते. तसच काहीतरी या पिलाच्या आणि माझ्या बाबतीत झालं आणि हळू हळू आम्ही दोघांनी एकमेकांकडे दूर्लक्ष केलं. मग मात्र मला शांत झोप लागली. खरंतर हा अनुभव नाहीये, पण या तत्वाचा फ़ायदा मला पुढे बरेचदा झाला.

मालसर हून पुढे शिनोर ला मिलिंदजींच्या आश्रमात बालभोग केला आणि पुढे निघालो. मिलिंद हिंगणे आणि सौ हिंगणे यांनी नवीनच आश्रम प्रस्थापित केला होता. इथून पुढे आम्ही किनारा मार्ग धरला. वाट खरोखर कठीण होती, पण खूप मजा येत होती. आमच्यात अलिखित वाटणी झाली होती कामाची. मंदार आमच्यातला सगळ्यात लहान आणि सगळ्यात फ़िट मुलगा. मग तो पुढे जाऊन वाट आहे की नाही ते सांगायचा, आणि मग आम्ही त्याच्या मागे जायचो. करत करत आम्ही बरच अंतर चालून गेलो आणि अचानक आमच्या सगळ्यांचं लक्ष मैयावर वेधल्या गेलं. मी आणि बाबा आराम करत बसलो होतो. मंदार पुढे होता आणि वंदना ताई मागे. मंदार मागे चालत आला आणि आम्ही दोघांनी एकाच ठिकाणी इशारा केला.. मैयाच्या पाण्यावर संथ पणे हालचाल होत होती. काही तरी पुढे सरकत होतं, पाण्याखाली जात होतं आणि वर येत होतं… नीट बघितलं तेव्हा समजलं..ती मगर मैया होती. या अचानक दर्शनाने आम्ही सगळेच आनंदलो होतो. आणि आता समोर येणारी कठीण वाट अचानक सहज सोपी वाटू लागली होती.दुपारच्या भोजन प्रसादिची वेळ होत आली होती.

आम्हाला भुका लागल्या होत्या. जवळ एक आश्रम आहे असं समजलं. ब्राम्हणगाव बहुधा या गावाचं नाव.. नक्की आठवत नाही पण इथे पूर्वी ब्राम्हण लोकच राहात असत आणि पूर आल्यानंतर हे गाव ओसाड झालं असं समजलं. इथे एक खूप सुंदर आश्रम दिसला. सुंदर बांधकाम, बगीचा, पाण्याच्या टाक्या अगदी सगळी व्यवस्था असेल असं वाटलं. अगदी मैयाच्या काठावर. वाटलं इथे भोजन प्रसादी होईल, पण हा आश्रम बंदच होता. खूप हळहळ वाटली. या मार्गावर परिक्रमावासी फ़ार कमी येतात त्यामुळे आश्रम बंद च असतो असं समजलं. आम्ही पुढे निघालो. पुढे एका छोट्याश्या डोंगर वजा जागेवर ज्याला टीला असं म्हणता येईल, एक बंगाली बाबाची झोपडी होती, तिथे चहा घेतला, फ़रसाण खाल्लं. हेच झालं आजचं जेवण.

लोक मला अनेकदा विचारतात की काही वाईट किंवा अनैसर्गिक अनुभव येत नाहीत का? तर येत नाहीत असं नाही पण त्यांचं प्रमाण चांगल्या अनुभवांपेक्षा खूप कमी असतं आणि त्यांचा प्रभाव पण नगण्य असतो त्यामुळे अशा अनुभवांकडे आपसूकच दूर्लक्ष केल्या जातं. ते लक्षात पण राहात नाही, पण एक लक्षात आहे, तो सांगते. अर्थात याला मी वाईट नक्कीच म्हणणार नाही मात्र किंचित वेगळा किंवा अनपेक्षीत म्हणेन. यातूनही काही तरी धडा घेणे असेलच. पण त्या आधी एका अतिशय प्रसन्न जागेबद्दल सांगते जिथले कंपनं खूपच प्रभावी आणि सकारात्मक होते.

इथला आश्रम धारी बैरागी खूप प्रेमळ होता आणि कधी परिक्रमेची संधी मिळाली तर ही जागा सोडूच नये अशी ही जागा होती. चातुर्मास करण्याची इच्छा असेल तर मी तरी पहिलं प्राधान्य या जागेला देईल अशी ही जागा.

बरकाल असं या जागेचं नाव. आम्ही मैया किनारी चालत होतो. ऊन झालं होतं. इथे वाळू चा किनारा आहे. वाळूतून चालण तसं कठीण असतं कारण प्रत्येक वेळेला पाय उचालायला लागाणारी ताकत ही साध्या रस्त्यापेक्षा जास्त लागते वाळूमधे. त्यामूळे कमी वेळातही थकवा जास्त येत होता. या किना-याला मोठाली झाडं किंवा सावलीची ठिकाणं नाहीत. त्यामुळे चालत राहाणं हा मार्ग. मधे मधे इथे बरेच दगड पण आहेत. पात्रातले मऊ झालेले दगड बघण्यात, त्यातले काही वेचण्यात पण इथे माझा बराच वेळ गेला मात्र नंतर वजन झाल्यामुळे ते फ़ेकून दिले.. संचय नको.. परत एकदा समजलं.. असो, तर रस्त्याने जात असताना डावीकडे वर एक मंदिर दिसलं. खालून हे मंदिर अगदी सामान्य आणि लहानसं असं वाटलं. तिथे जाऊ, थोडा आराम करू आणि पुढे निघू असा विचार करून आम्ही मंदिराच्या पायथ्याशी पोचलो.मंदिराच्या पाय-या मोठ्या आणि दगडी होत्या. उंच पाय-यांच्या दोन्ही बाजूला झाडं होती. साधारण २० -२५ पाय-या नंतर एक लाकडी बंद दरवाजा होता. इथवर सगळंच सामान्य होतं. मात्र त्या पायरीवर पाय ठेवला आणि मला जोडे काढण्याची तीव्र इच्छा झाली.

कदाचित मंदिराच्या पाय-या आहेत म्हणून असेल. मी जोडे काढले आणि पायरीवर पाय देते तो त्या पायरीचा थंड स्पर्ष माझ्यात अचानक चेतना भरून गेला. दारापर्यंत पोहचेस्तोवर माझा थकवा जवळ जवळ नाहीसा झाला होता. मंदार माझ्या पुढे होता, तो दार उघडून आत गेला होता आणि मी आणि वंदना ताई आता दारात येत होतो. मी दारातून आत पाहिलं आणि त्या जागेकडे, त्या मंदिराकडे, तिथल्या प्रसन्नतेकडे मी इतकी आकर्षित झाले, किंवा त्याचा प्रभाव इतका पडला की दारातून पाऊल आतमधे घालता घालता माझ्या तोंडून उदगार निघाले “ आज आपण इथेच राहूयात का?”..आणि गंमत माहितिये का, मी हे शब्द एकटीने बोलले नव्हते. मी आणि वंदना ताई दोघी सोबतच दारात पोहचलो होतो आणि अगदी हेच शब्द, एकाच वेळी आम्ही दोघीही बोललो होतो…. अगदी एकाच वेळी.. इतकच नाही तर समोर असलेला मंदार पण त्याच क्षणी म्हणाला “ मी ही हाच विचार करत होतो की आज इथे राहावं का?” म्हणजे आम्ही तिघंही एकाच वेळी एकच विचार करत होतो आणि याला मी तरी केवळ योगायोग म्हणू शकत नाही. तिथे असलेल्या प्रचंड सकारात्मक शक्तीचा आमच्या सगळ्यांवरच प्रभाव पडला होता हे निश्चित.इथे राहता येईल की नाही हे बघणं आवश्यक होतं. जागा आहे की नाही, कुणाची परवानगी घ्यायची हे अजून काहीच माहित नाही पण इथे मंदिराच्या अंगणात सुद्धा झोपायची तयारी आम्हा सगळ्यांचीच होती. इथेच राहायचं हे मनानी पक्कं केलं होतं. आम्ही आलेलं पाहून इथला आश्रमधारी बाहेर आला. सडसडीत बांध्याचा, पांढरी वस्त्र म्हणजे न शिवता गाठी मारून घातलेली कफ़नी त्यानी धारण केली होती. तरूण, तेजस्वी आणि खरोखरीच रूबाबदार म्हणतात नं तसा होता. मंदार नी लगेच सांगीतलं, “ताई हे बुआ एका हिंदी नटा सारखे दिसतात, रणदीप हूडा सारखे” खरं सांगते, मंदार नी सांगितल्या नंतर मला रणदीप हूडा हे नाव समजलं. मंदार नी मला फ़ोटो पण दाखवला रणदीप हूडा चा. म्हणजे बघितलं असेल मी ह्या नटाला आधी, पण मला काही नाव वगैरे माहित नाही.. असो तर ते बुआ कसे होते हे सांगण्यासाठी ह्या नटाचा उल्लेख.. बाकी त्याचा काही संबध नाही.. आपण बरकाल मध्येच आहोत, या बैरागी बाबा पुढे बरं का! प्रसन्न मुद्रेनी त्यांनी आमचं स्वागत केलं, पाणी दिलं आणि नंतर “बालभोग तो करलो” म्हणून तो आत गेला.. त्या नंतर त्यानी बालभोगासाठी जे काही आणलं त्यावर आम्ही चौघं ही अक्षरश: तुटून पडलो. अगदी लहान मुलं आवडत्या खाऊ वर कशी तुटून पडतात नं तसं झालं… किती खाऊ अन किती नको असं व्हायला लागलं. ती अनुभूतीच वेगळी होती..

खरं तर जे मिळेल ते जेवणं हा नियमच आहे परिक्रमेत पण आज जे मिळालं होतं ते खाताना “खाण्यात देखील इतका आनंद असतो” हे समजलं होतं. इतकच नाही तर आमच्या सगळ्यांच्या चेह-यावर चा आनंद आम्ही सगळेच वाचत होतो, त्यामुळे अजूनच आनंद मिळत होता. आमचा हा आनंद पाहून तो बैरागी बाबा पण सुखावला होता, आनंदला होता. त्याच्या चेह-यावरचा आनंद ही आमचा आनंद द्विगुणित करत होता आणि दुसरं म्हणजे त्यानी आणलेली थाळी ही अक्षयपात्र च होतं… कितीही खा, संपण्याचं नावच नाही! आमच पोट भरत आलं होतं पण मन भरत नव्हतं… आम्ही खात असलेला पदार्थ देखिल नेहमीचाच… पण आनंद मात्र वेगळा… तो दिवसच मंतरलेला… ते स्थान च अगळं वेगळं.. आणि तो बैरागी पण अनोखा… बरच सांगायचय अजून.. पण मोठा होतोय हा लेख, तेव्हा बरकाल च्या या दिवसाचं वर्णन आता पुढ्च्या भागात सांगते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*