नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇३४👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇३४.👇

नर्मदे हर….

तर भालोद च्या प्रतापे महारांजाकडे मी असतानाची गोष्ट तुम्हाला मागच्या भागात सांगत होते. मी आणि महाराज भाजी घ्यायला निघालो होतो. ते पुढे आणि मी मागे. आता महाराज काय बोलतात आणि काय सांगातात याची मी वाट बघत होते. माझ्या मनात विचार आला, किती साधना असेल न महाराजांची, पण

साधना म्हणजे नक्की काय?

म्हणजे करायचं काय नेमकं? माझ्या मनात विचार आला आणि महाराज बोलू लागले, म्हणाले “तू मांजरीचं पिलू पाहिलयस का?” मी म्हंटलं हो, बघितलय, “आणि माकडाचं?” प्रतापे महाराजांनी मला विचारलं.. हो ते पण पाहिलय मी, पण त्यांचं काय..”बरं मग आता मला सांग कुणाचं पिलू जास्त सुरक्षीत असतं बरं, आणि का?”.. मी थोडा विचार करू लागले तोच प्रतापे महाराजांनी उत्तर दिलं, “मांजरीचं, कारण मांजरीच्या पिलाला आई तोंडात उचलून घेऊन जाते. या ऊलट माकडीणीचं पिलू बघ. त्याने आपल्या आईला घट्ट धरून ठेवलं असतं. म्हणजे समजा एका झाडावरून दुसरी कडे उडी मारताना ह्या पिलाने आईला धरलेला हात सुटला तर पिलू खाली पडेल नाही का, इतक्या उंचीवरून पडल्यामुळे त्याचा कदाचित कपाळमोक्ष ही होईल. पण मांजरीच्या पिलाला आई तोंडात घेऊन जात असते. पिलाला काहिही करावं लागत नाही. ते आपलं आरामात इकडे तिकडे बघत असतं. याऊलट माकडीणीचं पिलू भेदरलेलं असतं, ते जीवाचे हात करून आईला धरत असतं… बेटा, आपण मांजरीचं पिलू बनायचं माकडीणीचं नाही. म्हणजे काय करायचं माहितीये? आपली माऊली, आपली गुरुमाऊली सांगेल तितकच करायचं, काळजी करण्याची गरज नाही. आपण फ़क्त आपल्याला स्वत:ला त्या माऊलीच्या स्वाधीन करायचय. आपण कुठे जातोय, का जातोय, हे बघण्याची आपल्याला गरज नाही. आपल्याला म्हणून काहीही धरून ठेवण्याची गरज नाही. आपण आपल्याला त्या माऊलीच्या स्वाधीन केलं म्हणजे पुढचं सगळं ती बघते, आणि हो, इथे हात सुटायची अजिबात भिती नसते, कारण आपण हात धरलेलाच नसतो. तुझ्या गुरुंनी तुला काय संगितलय ते कर, बाकी साधना काय; कशी याचा विचार करू नकोस…ते सगळं तुझे गुरू तुझ्याकडून करवून घेतीलच” साधना कशी करायची याचं सरळ साधं उत्तर मला प्रतापे महाराजांनी समजवून सांगितलं… मला आता छान समजलय, साधना कशी करायची तर मांजराच्या पिलासारखी!

आम्ही भाजी घेतली, सरस्वती मंदिरात जाऊन आलो.. सकाळी मला ज्या मंदिरात जावसं वाटत होतं तेच हे मंदिर. प्रतापे महाराज म्हणाले, “ खूप छान मंदिर आहे हे.. ही सरस्वती प्रसन्न झाली नं की ज्ञान आपोआप येतच..ते घ्यावं लागत नाही, फ़क्त ते तिनी प्रसन्न होऊन दिलं पाहिजे..” मला अचानक अन्नपूर्णा स्तोत्र आठवलं. ते माझ्या रोजच्या म्हणण्यात असतं म्हणून असेल, त्याची शेवटची ओळ फ़ारच खरी आणि अर्थपूर्ण आहे. अन्न म्हणजे खाद्य, पण कशाचं खाद्य याचा उलगडा या शेवटच्या ओळीत होतो. अन्नपूर्णा म्हणा, पार्वती म्हणा, देवी म्हणा.. सर्व शक्तीचीच रूपं..आणि या स्तोत्रात दान मागितलेलं आहे..

“भिक्षां देही कृपावलंबन करी, मतान्नपूर्णेश्वरी”

असं म्हणत या मातेला कृपेची भिक्षा मागीतली ती नेमकी कशासाठी तर
“अन्नपूर्णे सदापूर्णे, शंकर प्राणवल्लभे
ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देही च पार्वते”

तर ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा या शक्तीरूपानी आपल्याला द्यावी अशीच प्रार्थना त्या सरस्वती रूपी शक्तीला आणि वैराग्याची भिक्षा मोक्षदाईनी, पापनाशीनी, वैराग्यदायीनी नर्मदेला करून आम्ही पुन्हा आश्रमात जाण्यासाठी निघालो.

चालता चालता प्रतापे महाराज पुन्हा बोलू लागले. म्हणाले
“तू लहान मूल आणि आई यांचं नीट निरिक्षण केलेय का?

आई ला खूप कामं असतात त्यावेळी आई आपल्या तान्ह्या बाळा ला खाली ठेवते आणि बाळ रडू लागतं. पण आईला कामं असतात, मग त्याचं मन रमावं म्हणून आई त्या बाळाला खेळणी देते, बाळ रमतं थोडा वेळ, मग पुन्हा रडू लागतं. मग आई बाळाला थोडे मुरमुरे किंवा असच काहीसं देतं, तेव्हा ही ते रमून जातं, मग रडलं की आई कणकीचा गोळा देते त्या बाळाला खेळायला… मग बाळ पुन्हा रमतं…मात्र एक वेळ अशी येते की जेव्हा आई त्या बाळाला कशातच रमवून ठेवू शकत नाही. तीला त्या बाळाला उचलून घ्यावच लागतं.बेटा थोडी फ़ार साधना,जप केला की आपल्याला समाधान वाटू लागतं,आपण आपल्या आईच्या जवळ आहे असं वाटू लागतं. हे थोड्यावेळेचं समाधान म्हणजे आई नी आपलं मन रमण्यासाठी दिलेल्या खेळण्यांपैकी एक आहे. एकदा त्यातून बाहेर पडलं की मग येते सिद्धी किंवा तत्सम खेळण्यांची वेळ. त्यावेळी आपण आईच्या जवळ आहोत म्हणून आपल्याला अमुक तमुक सिद्धी प्राप्त झाल्या आहेत असं साधकाला वाटू लागतं…तेही एक खेळणं च असतं… मूळात साधक आई हून दूर असतो. मग त्यानंतर येते कणकेच्या गोळ्याची वेळ, ’आपण जणू या विश्वाचा रचैताच आहोत’ या भावनेनी ते लहान मूल कणकेच्या गोळ्यातून वेगवेगळ्या वस्तूंना आकार देत असतं, तसाच प्रकार साधकाचा होतो, मात्र ज्या वेळी ह्या सगळ्यात मन रमत नाही आणि आता कुठलही खेळणं, इच्छा माणसाच्या मनाला मोहवू शकत नाही त्या वेळी ती आई आपल्याला तिचा सहवास घडवून आणते. यात एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे आईने बाळाला जरी दूर ठेवळ असतं तरी तीचं लक्ष त्याच्याकडे असतच.. ती त्याला पडू झडू देत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे? कुठल्याही गोष्टीत मन रमू न देता तीचा धावा करायचा आहे, कशातही न रमणारं मूल कायम जेव्हा “आई मला कडेवर घे” ही एकच मागणी शांतपणे, आईला त्रास न होवू देता, पण सातत्यानी आईकडे करेल त्या बाळा बद्दल आईच्या मनात लवकर करुणा उत्पन्न होईल आणि कशातही न रमणा-या बाळाला आई चटक उचलून कवेत घेईल.”

प्रतापे महाराज बोलत होते आणि मी ऐकत होते. किती साध्या शब्दात आणि मला समजेल अशा भाषेत महाराजांनी किती मोठी गोष्ट सांगीतली होती! आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसांना अनेक आमिषं मोहवत असतात. त्या आमिषांकडे धावताना आपण कधीच आपल्या ह्या गुरुस्वरूप, ईश स्वरूप आईचा विचार करतच नाही. आपण रमावं म्हनून तिने दिलेल्या खेळण्यांमागे आपण धावत राहातो. मागच्या एका अनुभवामधे मी

“इदं न मम”

चा मंत्र सांगीतला होता, आणि त्याही आधी सियाराम बाबांचं वाक्य सांगितलं होतं..”

मै तो सिर्फ़ तमाशा देखता हू” म्हणजे काय तर “नो इन्व्होलव्ह्मेंट”. अर्थात प्रत्येकच आईच्या जवळ असलेलं मूल आपल्याला हेच सांगत असतं, मार्ग वेगळे असतात… इतकच!

अजूनही मी आणि महाराज रस्त्यातच होतो, आश्रमात पोहोचायला अजूनही वेळ होता. माझ्या मनातले प्रश्न कमी झाले होते पण संपले नव्हते. माझ्या मनात पुन्हा एक नवा प्रश्न उभा राहिला. मग समाधानाचं काय? ते का मिळत नाही? कसली तरी तळमळ कायमच माझ्या मनाला का असते?

मला नक्की काय हवय?

जे हवं आहे असं वाटतं ते मिळाल्यावरही तळमळ संपत का नाही?…. एका पाठोपाठ एक प्रश्न माझे प्रश्न येत राहिले मात्र ते प्रतापे महाराजांना कसे समजत याचं ला आश्चर्यच वाटत! महाराज पुन्हा बोलू लागले “ अगं ज्या दिवशी तुला समाधान मिळेल त्या दिवशी तुझी तळमळ बंद होईल, मात्र तुला समाधान तेव्हाच मिळेल जेव्हा तुला हवी असलेली, हवी असलेली म्हणण्यापेक्षाही तुझ्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट तुला मिळेल तेव्हा खरं समाधान मिळेल की नाही तुला?

तळमळ ही फ़ार आवश्यक आहे बाळा, कारण जोवर तळमळ आहे तोवर आपण धडपड करू

… तोवरच आपण हालचाल करू. आता प्रश्न आहे तुला काय हवय याचा.. तुझ्या पेक्षा तुझ्या आईला जास्त आणि चांगलं माहित आहे की तुला कशाची गरज आहे.. म्हणजेच काय? तू एकदा का आई जवळ गेलीस की तुझ्या समाधानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुला समाधानासकट सारं काही जर आईच्या जवळ गेल्यावर मिळत असेल तर तळमळ कशाची व्हायला हवी? समाधानाची का आईची? आईची तळमळ धरलीस तर सारं काही तुझं च आहे, आणि तुला समाधान मिळत नाही कारण अजून तू आईच्या कडेवर नाहीस.. तिनी तुला थोडं दूर ठेवलय! आणि तुला कशातही न गुंतता तिचा धावा करायचय, तिनी उचलून घेतलं की तळमळही संपेल आणि समाधानही मिळेल. तळमळ असणं आवश्यकच आहे. जोवर यात्रा आहे तोवर तळमळ आहे. जोवर शोध आहे तोवर यात्रा ही आहेच!

आम्ही आश्रमात पोहचलो. संध्याकाळची प्रसादी आदि आटोपून आता उद्याची तयारी करायची. उद्या इथून निघायचं होतं. मी माझी बॅग भरत होते. महाराज माझ्याजवळ आले आणि एक पिशवी माझ्या हाती दिली. त्यात एक निळ्या रंगाचं मफ़्लर होतं. आणि एक मऊसूत धोतराचं पान. म्हणाले हे घे, माझ्याकडून तुझ्यासाठी काहितरी. ते मऊसूत धोतर अंगावर पांघरलं की आजही मला माझ्या तळमळीची आठवण येते आणि ती योग्य दिशेनी वळावी यासाठी प्रयत्न होऊ लागतात.

भालोदच्या या प्रवासात मला एक माहेर मिळालं. एक माऊली मिळाली. भालोद हून निघताना आम्हाला निरोप देताना महाराज काही अंतर चालत आले. आता त्यांना नर्मदे हर करून पुढे निघायचं, पण पाऊल निघेना.. एखादं लहान मूल कसं आईला बिल्गून रडू लागतं तशी मी व्याकुळ झाले. प्रतापे महारांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला “ म्हणाले, बाळ असं नाहीनं करायचय आपल्याला? माझे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच.. बरं ऐक, तू समुद्रपार करून गरुडेश्वर ला आलीस नं की मला फ़ोन कर. मी तुला भेटायला येईल.” आणि खरोखर ज्या वेळी मी प्रतापे महाराजांना फ़ोन करून गरुडेश्वर ला आल्याचे सांगितले त्यावेळी सगळी कामं सोडून फ़क्त माझ्यासाठी ही माऊली नर्मदा पार करून गरुडेश्वर ला मला भेटायला आली. त्या ही वेळेची गोष्ट इथेच सांगते.

प्रतापे महाराजांना त्यांच्या कार्यासाठी समाज गौरव पुरस्कार देण्यात आला होता. तेव्हा तो मोठ्या महारांजाच्या पायावर घालायला म्हणून गरुडेश्वर ला येताना ते तो सोबत घेऊन आले होते. मोठ्या महारांजाच्या पायाला लावून तो पुरस्कार परत घेतेवेळी महाराज तिथल्या पुजा-याला म्हणाले.. “हा पुरस्कार मोठ्या महारांजाच्या पायाला लावला आहे, आता तो माझ्या लेकीच्या हाती द्या” असं म्हणत तो पुरस्कार माझ्याकडे दिला आणि “ तुझ्या जबाबदा-या संपल्यात की तुला मालसामोट च्या आदिवासी क्षेत्रात काम करायचं आहे, तिथल्या बांधवासांठी तू काहितरी करावंस, केलं पाहिजेस” असं सुचवलं. मला एक अजून मार्ग आणि एक अजून दिशा मिळत आहे असच वाटू लागलं.

भालोद हून पुढे अविधा पर्यंत मी आणि पसारकर काका काकू सोबत होतो, मात्र पुढे माझा जगदीशमढी चा रस्ता चुकले आणि मी एकटीच गुमान देव कडे निघाले. आता माझी आणि काका काकुंची ही ताटातूट झाली. इथून पुढे नारेश्वर पर्यंत मी एकटीच होते, अगदी मागे पुढेही आतापर्यंत सोबत असलेली मंडळी नव्हती. इथल मंदीर फ़ारच सुरेख मात्र आश्रम तितकाच अव्यवस्थित होता. महिला आणि पुरुषांसाठी वेगळी व्यवस्था नव्हती, त्यातून मी एकटी… पण आपल्या पेक्षा आपल्या त्या आईला आपली काळजी कशी असते ते मला पुन्हा एकदा जाणवलं….

इतकच नाही तर आपल्या भेटणा-या प्रत्येक व्यक्तीचे आणि आपले ही त्या व्यक्तीला भेटण्यामागचे काहितरी कारण असतेच. कुणीच कुणाला उगाच भेटत नाही. प्रत्येकाचं काहीतरी देणं घेणं शिल्लक असतं आणि ते पूर्ण करत करत हा प्रवास तुम्हाला करायचा असतो. हे जेव्हा अनुभवातून जाणवतं तेव्हा खात्री पटते… सोपान दादा, एक परिक्रमावासी मला असेच भेटलेत..२ -३ दा, वेगवेगळ्या ठिकाणी…आणि ते का भेटले ते कारण मी तुम्हाला पुढच्या अनुभवात सांगते. शिवाय अंकलेश्वर ला आलेला मजेशीर अनुभव, आणि गुमान देव ते बिमलेश्वर चा प्रवास हेही सांगते पुढच्या ३५ व्या भागात.
नर्मदे हर.

©सुरूची नाईक-विदर्भ गट:देवा तुझा मी सोनार-
9309926559

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*