आज २८ जुलै:आज जागतिक हिपॅटायटिस दिवस.
〰️↕️〰️
जगातील अनेक लोकांना आपल्याला नेमकं काय होते हे नेमके समजत नाही,आणि ज्यावेळी हे समजतं त्यावेळी वेळ निघून गेलेली असते.हिपॅटायटिस हा असाच एक संसर्गजन्य रोग आहे.अनेकांना याची लागण झालेली समजत नाही. त्यामुळे जगभरातल्या लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो.या रोगाबद्दल सामान्य लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ जुलै हा दिवस जागतिक हिपॅटायटिस दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय.
जागतिक हिपॅटायटिसचा दिवसाचा इतिहास:
नोबेल पुरस्कार विजेते डॉ. बारुक एस ब्लुमबर्ग. यांच्या सन्मानार्थ जागतिक हिपॅटायटिस दिवस साजरा केला जातो.२८ जुलै १९२५ साली जन्मलेल्या या वैज्ञानिकाने “हिपॅटायटिस बी” चा शोध आणि त्यावरील औषधाचाही शोध लावला होता.सन २०१० साली पार पडलेल्या ६३ व्या जागतिक आरोग्य परिषदेमध्ये जागतिक हिपॅटायटिस दिवस साजरा करण्यास मंजुरी देण्यात आली.
जागतिक स्तरावर २०३० सालापर्यंत हिपॅटायटिसचे निर्मूलन करण्याचं लक्ष ठेवण्यात आले आहे.
हिपॅटायटिस हा एक संसर्गजन्य रोग असून त्यामुळे यकृताला सूज येते,जळजळ निर्माण होते. हिपॅटायटिसचे ए,बी,सी,डी,ई आणि जी असे सहा प्रकार आहेत.हा संसर्गजन्य रोग जरी असला तरी अनेकवेळा अल्कोहोलचे अतिरिक्त सेवन,टॉक्सिन,अनावश्यक औषधांचा अतिरिक्त डोस अशा इतर कारणांमुळेही याची लागण होते.यापैकी ए व इ हे विषाणू मुख्यत: दुषित अन्न व पाण्यावाटे पसरतात.
हिपॅटायटीस म्हणजे काय: हिपॅटायटिस या आजाराला बोली भाषेत काविळ असे म्हणतात. संसर्गजन्य रोगांपैकी एचआयव्ही,टीबी,मलेरिया या रोगांची ज्याप्रमाणे जनजागृती झाली आहे,तशीच हिपॅटायटिसबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे.
आजार व लक्षणे: पावसाळ्यात या रोगाचे प्रमाण वाढते.दाट लोकसंख्या,अस्वच्छता,पाण्याचे कृत्रिम साठे,दूषित अन्नपदार्थ,उघड्यावरील व कच्चे अन्न यांचे सेवन यामुळे याची प्रामुख्याने लागण होते. हा आजार सर्व वयोगटातील लोकांना होतो,पण लहान मुले व तरुण वर्गात याचे प्रमाण अधिक आहे. हा विषाणू आतड्यातील पेशींमध्ये प्राथमिक प्रजनन करतो व नंतर रक्ताद्वारे तो यकृतातील पेशींवर हल्ला करून दूषित करतो.
हिपॅटायटिस रोखण्यासाठी उपाय: स्वच्छतागृहात जाऊन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा,शिजवलेले ताजे अन्न खा,उकळलेले पाणी किंवा बाटलीबंद पाणी प्या,कच्च्या भाज्या धुतलेल्या व व्यवस्थित स्वच्छ केल्या असतील तरच कच्च्या खा, हिपॅटायटिसची साथ असलेल्या भागात जाणार असाल तर ‘हिपॅटायटिस ए’ची लस घ्या, टूथब्रथ, रेझर किंवा मॅनिक्युअरची साधने सामूहिक पद्धतीने वापरू नका,मद्यपान पूर्णपणे टाळा.
दररोज तीन हजारांहून जास्त मृत्यूमुखी: जागतिक आरोग्य संघटनेच्या एका आकडेवारीनुसार, हिपॅटायटिस बी मुळे २०२० साली जगभरातील जवळपास चार कोटी लोक संक्रमित झाले होते तर जवळपास १.२ कोटी लोक हे हिपॅटायटिस सी मुळे संक्रमित झाले होते. हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी मुळे दररोज तीन हजारांहून लोकांना आपला जीव गमवावा लागतोय असं जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते.याचाच अर्थ दरवर्षी ११ लाख लोकांना केवळ हिपॅटायटिस या आजारामुळे मृत्यूमुखी पडावं लागतंय. भारताचा विचार करता दरवर्षी साधारणत: अडीच लाख लोकांना हिपॅटायटिसमुळे आपला जीव गमवावा लागतो.
स्तोत्र:गुगल/इंटरनेट
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
ll🌹🙏शुभम् भवतु:🙏🌹ll


Leave a Reply