नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇२४👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇२४.👇

माझा नर्मदा बाबा…

नर्मदा परिक्रमेच्या माझ्या अनुभव कथनाची मालिका आपण दर रवीवारी वाचत आहातच. मात्र या अनुभवा व्यतिरिक्त ही या परिक्रमेतून मला खूप काही मिळालं आहे. किंबहुना मला जे मिळाळं आहे ते केवळ आणि केवळ माझ्या नर्मदा माईनी दिलं आहे असच मी म्हणेन.

आज माझ्या एका अवडीबद्दल मी लिहीणार आहे. मला वाचनाची खूप आवड, अगदी लहानपणापासूनच वडीलांनी मला वाचनाची आवड लावली. आणि पुढे पुस्तकं वाचनाची ही आवड माणसं वाचण्याकडे वळली ती माझ्या आवड्त्या लेखकां मुळे, अर्थातच पुलं मुळे. कुठेही गेलं की सभोवताल दिसत असलेली माणसं माझ्याकडून नकळत वाचली जातात. ती वाचता वाचताच कामं ही होतात. कुठे कधी वाट बघण्याची गरज पडली तर ती माझ्यासाठी पर्वणी असते, कारण भरपूर रिडींग मटेरिअल चालत्या बोलत्या अवस्थेत माझ्यासमोर तयार असतं. परिक्रमेच्या कालावधीत, रोजच्या जप पूजा आणि चालणं झाल्यावर, मला ही संधी मीळत असे. माझी ही आवड सुद्धा परिक्रमेत माझ्या आईनी खूप खूप जोपासली आहे. आज अश्याच एका वाचलेल्या व्यक्तीबद्दल लिहितेय.

त्यांचं नाव बाबा. म्हणजे परिक्रमेत सगळे पुरुष हे बाबा, दादा, बाबाजी, महाराज जी असेच असतात. त्यांना इतर नावाने संबोधन करायचं नसतं कारण ती मैयास्वरूप म्हणून आपल्याला भेटलेली असतात. हे बाबा ही मला परिक्रमेत सापडले. ह्या बाबांची मला सक्त ताकिद होती.. “मला ए बाबा म्हणायचं, अहो बाबा नाही”. त्याला कारण होतं पण मी ते नंतर सांगेन.

हा बाबा दिसायला उंचपूरा, आडदांड अगदी. ६ फ़ूट उंच आणि १२० किलो वजनाचा. पायी परिक्रमा करायला निघालेला. पांढरे फ़ेक केस, तशीच पांढरी दाढी. मोठे डोळे, पीळदार मिशा, उंच कपाळ आणि त्यावर भला मोठा कुंकवाचा टिळा. अंगात पांढरी बंडी, खाली लुंगी आणि पायात स्पोर्ट्स शूज. त्या बाबासारखी त्याच्या पाठीवरची त्याची बॅगही आडदांडच,आणि तसाच भारी त्याचा नक्षीकाम केलेला दंड. एकूणच हे व्यक्तीमत्व अगदी वजनदार. प्रथमदर्शनी बघता भिती वाटावी असं. ह्या बाबाच्या रुपासारखाच त्याचा अवाजही! जाड, वचक वाटावी असा. या बाबानी नुसता आवाज जरी दिला नं तरी दम देतोय असं वाटायचं. कुणाशी बोलताना बाबा जोरात हसला तर त्याचा आवाज पुढचे एक दोन किमी वर सुद्धा स्पष्ट ऐकू येईल. मला बाबा भेटला त्यावेळी त्याच्या दाढी मिश्या वाढल्या होत्या. परिक्रमेत केस दाढी मिश्या काढता येत नाही, मात्र परिक्रमेच्या सुरवातीचा, त्याच्या प्रमाण पत्रावरचा फ़ोटो मी जेव्हा पाहिला तेव्हा मला चाचा चौधरी च्या साबू ची आठवण झाली.. तर असं हे व्यक्तीमत्व.

बाबा तसा बि एस एन एल मधून सेवनिवृत्त, मात्र बि एस एन एल तर्फ़े सात वर्ष कुपवाड्याच्या स्पेशल फ़ोर्स मधे, सैन्यात काम करत होता. त्याला सैन्याचं ही background असल्याने त्याच्या हालचालीत एक वेगळाच जरब देखिल होता. तर असा दिसणारा हा माणूस मी माझ्या नकळत वाचायला घेतला तेव्हा माझ्या जे लक्षात ते फ़ार फ़ार वेगळं होतं. देवाची करणी खूप खूप अनाकलनीय असते. हा धिप्पाड आडदांड बाबा अगदी फ़णासा सारखा. जितका तो दिसायला कठोर, तितकाच आतून मऊ. त्याच्याकडे बघितल्यावर जितकी भिती वाटावी नं त्यापेक्षाही तो खूप खूप साधा. कदाचित जास्त साधा म्हंटलं तरी चालेल. छक्के पंजे अजिबात न समजणारा. अगदीच भोळसट नाही म्हणता येणार, पण भोळा नक्कीच. अगदी कुणीपण त्यच्याकडे यावं आणि काय हवं ते मागावं याला. हा देणार! स्वत: जवळ नसलं तर कसं ही करून जमवून देणार, मिळवून देणार. वाट्टेल ती धावपळ करणार, पण आलेल्या माणसाला रिकाम्या हाती परत जाऊ देणार नाही. आता हा स्वभाव वाईट नाहीच, पण लोक यामुळे या बाबाचा बरेच दा गैरफ़ायदा घेतात, आणि या बाबाला समजत नाही असं मला अनेकदा वाटायचं. परिक्रमेत तरी असं होताना मी पाहिलं होतं.

एकदा एका अश्रमात आम्ही थांबलो असताना आम्ही कपडे धुवायला घेतले. विहीर जरा दूर. तिथून पाणी आणून आणून कपडे धुवायचे. बाबानी पाणी आणून द्यायचं, आणि सगळे कपडे मी धुवायचे अशी कामाची वाटणी झाली. त्याप्रमाणे बाबानी पाणी आणलं. मी माझे आणि त्याचे पण कपडे धुवून दिले. आमचे कपडे धूणं झाल्यावर तिथे अजून दोन पुरुष परिक्रमावासी कपडे धुवायला आले. आता ते कपडे धुणार आणि आम्ही आमचं स्वयपाकाचं बघणार, असं खरं तर करायचं होतं, मात्र मला अजिबात भूक नव्हती, त्यामुळे बाबा पुरताच स्वयपाक होता.

ही दोन परिक्रमावासी माणसं बाबाला म्हणाली, “आप हमारे मे भोजन पा लेना”. बाबाला पण ते पटलं. मात्र ही दोघं आपल्याला भोजन देतील आणि आपण आयतं खायचं हे काही बाबाला पटेना. त्याने या दोघांना पाणी आणून द्यायचं ठरवलं. आणि तो पाणी आणून देऊ लागला. आयतं पाणी आणून मिळतय म्हंटल्यावर त्या दोघांनी भरपूर आणि जास्ती चे कपडे धुवून घेतले. आणि बादल्या बादल्या पाणी आणण्याचं काम हा बाबा करू लागला. त्या वेळेला साधारण संध्याकळचे चार साडेचार झाले असतील. यांचे कपडे धुवून झाले. आता पूजा पाठ, आणि मग भोजन प्रसादी.

पण माहितिये का गम्मतच झाली. त्या दोघांनी सगळे कपडे प्लास्टिक च्या पिशवीत भरले, म्हणाले, “अगले गाव जाकर रुकेंगे अभी तो समय है, जा सकते है, वहा तयार भोजन मिलता है, हम थक गये है, अब भोजन बनाने का मन नही कर रहा” ते लोक ८- १० किमी अजून चालू शकणार होते. आम्ही मात्र २५ किमी चालून आलो होतो, आम्हाला पुढे चालणं शक्य नव्हतं. ते दोघे जेवणाचा विषय ही न काढता निघून गेले. बाबा मात्र खूप शांतपणे त्यांना निरोप देत होता. मग मी आणि बाबानी खिचडी बनवून घेतली.

त्या दोघांनी बाबाच्या जेवणाचा वीचारही केला नाही, आणि बाबा पाणी आणून देतोय हे पाहून त्यांनी जास्तीचे कपडे धुवून घेतले हे पण मी पाहिलं होतं. हे बाबानी पण पाहिलं होतं खरं तर….आणि ते थांबणार नाहीत याची कल्पना पण बाबाला आली होती असं त्याच्या बोलण्यावरून जाणवत होतं. ते तसं वागले याचा बाबाला रागच आला नाही, की त्यांनी बाबा कडून काम करवून घेतलं आणि स्वत:ची वेळ आल्यावर मात्र स्वयंपाक करायचं टाळलं, हे बाबाला समजलंच नाही की काय माहित नाही. मात्र पुढे अनेकदा मी पाहिलं, आणि त्याच्या बोलण्यातून सुद्धा मला जाणवलं की लोक त्याच्याकडून कामं काढून घेत असतात. मात्र आमच्या बाबाला चंटपणे कामाला नाही म्हणंण काही सुचत नाही. याचा हा मदत करण्याचा स्वभाव चांगला आहे पण याला काही सीमा असावी की नाही? बाबा भोळा आहेच याबद्दल वाद नाही पण मदत आणि भोळेपणा हे दोन्ही एकत्र येऊन बाबावर भारी संकट ओढवलं असतं एकदा.

एकदा नं एका आश्रमात असतानाची गोष्ट. रात्रीचं सगळं आटोपून मी नुकतेच अंथरुणावर पडले होते. त्यावेळी आमच्या सोबत त्या आश्रमात मध्य प्रदेशातले ४ परिक्रमावासी अजून होते, दोन स्त्रीया आणि दोन पुरुष होते. त्यातली एक मैया जी माझ्या जवळ आली आणि म्हणाली “आपको डोलडाल जाना है क्या” (डोलडाल म्हणजे लॅटरीन). मी म्हंटलं “नाही”. ती म्हणाली, “अब मै क्या करू, मुझे जाना है” आणि असं म्हणत ती एकटीच निघून गेली. आमच्या बाबाला काय वाटलं माहीत नाही. मिनिट दोन मिनिट नंतर हा टॉर्च घेऊन उठला आणि बाहेर जाऊ लागला. मी सहजच विचारलं, “काय झालं बाबा? कुठे जातोयेस?” तर म्हणाला, अगं त्या मैया जवळ टॉर्च पण नाहीये, तिला टॉर्च तरी देऊन येतो, बीचारी एकटी कुठे गेली असेल अंधाराची?”… मी अगदी ओर्डूनच सांगीतलं त्याला, ..असू दे, गेलीये नं ती, तू अश्या वेळी जाऊ नकोस मदतीला…..नाही गेला तो, पण त्याला काय समजलं आणि काय नाही माहित नाही बाबा! मी मात्र वीचार करूनच घाबरले. ती गेली त्या दिशेला हा गेला असता, आणि तेही टॉर्च घेऊन तर……?…….? वाचला! लोकांचे गैरसमज व्हायला वेळ लागत नाही हो! हा जायचा चांगल्या उद्देशानी, मात्र याचा उद्देश चंगला आहे हे त्या वेळेस कुणाला ही समजलं नसतं…. तर काय वाटलं असतं लोकांना?… असो..

असे एक ना दोन, अनेक किस्से आहेत बाबाचे. बाबा अतिशय बडबड्या स्वभावाचा. कधी बोलायचं, आणि कधी थांबायचं ह्याची अजिबात जाणीव नसलेला. बोलण्याच्या नादात बरेचदा तो खूप जास्त बोलत, इतका की लोक कंटाळून उठून जात. आमचा बाबा भडभडा हो अगदी. तिलकवाड्य़ाची गोष्ट. जेवणं झाली की थोडावेळ सगळे परिक्रमावासी शेकोटी जवळ बसत. मग कुणी अनुभव सांगायचे आपले, तर कुणी आपले प्रश्न विचारायचे. बराच सत्संग चालत असे. आम्ही ३ दिवस होतो तिलकवाड्याला. तर तिथे एकदा सामुहिक भजन करायचं ठरलं. बाबाला संगीताची भारी आवड. तबला छान वाजवतो तो. पण आपण परिक्रमेत अहोत आणि संगीताच्या कार्यक्रमात नाही हे काही त्याच्या लक्षात येईना.

तर झालं असं, की ज्याला जी जी भजनं येतात ती ती त्यानी गायची आणि बाकीच्यांनी साथ द्यायची असं ठरलं. सगळेच परिक्रमावासी काही गाणारे असतात का? पण या बाबाला हे समजवणार तरी कसं? बाबानी जवळचा लाकडी स्टूल घेतला आणि तबल्याची, म्हणजे ठेक्याची साथ करायला सुरवात केली. त्यानी त्या स्टूलवर जे काही वाजवलं ते छानच होतं. तबल्याची सर नव्हती तरी ठेका देता येत होता. अगदी सगळ्यांनी त्याची खूप तारीफ़ केली. झालं… नेमकं इथेच गाडं बिनसलं. आमच्या बाबाच्या अंगातला तब्बलजी जोमाने जागा झाला. इकडे भजन गायला सुरवात झाली की बाबा त्या परिक्रमावासी ला मधेच थांबवत.. “ शर्मा जी, ताल पकडीये, देखो ये ये …ऐसा” असं म्हणत, मानेला हिसका देत तो शर्मा जीं ना ताल समजवून देऊ लागला. दोन तीन भजनं असे थांबवत थांबवत गायल्यानंतर शर्मा जींना सहन होईना. ते उठून निघून गेले. बाबा मात्र अजूनही फ़ार फ़ार रंगात होता.

असे अजून दोन तीन लोक निघून गेल्यावर लोकांना रीतसर शिकायला का आवडत नाही असा प्रश्न बाबानी अगदी साधेपणाने केल्याचं मला आठवतय. उरलेल्या मंडळींनी बाबाच्या या तब्बलजींना आवरायचा एक विलक्षण उपाय शोधून काढला, पण तो उपाय पूर्णपणे फ़सला. बाबाने तबला वाजवू नये म्हणून एका तरुण परिक्रमावासी नी आपली चतुराई वापरून उपाय काढला तो असा… हा तरूण म्हणाला, “बाबा, तुम्ही वाजवण्यापेक्षा नं भजन गायलं तर जास्त छान साथ होईल, म्हणजे तुम्ही ठेक्यात गाल आणि आम्ही तुम्हाला सोबत करू”. हे ऐकून बाबा जाम खुश झाला. आणि कुणी भजन गायला सुरू केलं की त्याच्या आवाजाला दाबून आपल्या खडया आवाजात आणि ठेक्यात गायला लागला. तबला बंद झाला पण आवाज सुरू, आता उरलेली मंड्ळी पण पेंगू लागली. मी बाबाला ३-४ दा थांबावण्याचा प्रयत्न केला पण बाबा काही थांबेना. शेवटी सगळे लोक निघून गेले, आणि शेवटी मी एकटीच उरल्यावर बाबा गायचा थांबला. पण इतकं झाल्यावरही बाबाला त्यात वावगं वाटलं नाही आणि लोक आपल्याला कंटाळून उठून गेले होते हे ही त्याला समजलच नाही.

आमचा हा बाबा कमालीचा विसराळू पण होता. हो म्हणजे होतं कधी कधी विसरायला पण इतकं होतं हे मला जरा नवीन होतं. त्याच्या विसरभोळेपणाचा एक मजेशीर किस्सा सांगते. एकदा संध्याकाळी आम्ही ठरवलं की सकाळी चहा घेऊन पुढे जायचं आणि दुपारची भोजन प्रसादी अगदी कमी घ्यायची किंवा बालभोग जास्त घेतला तर दुपारी जेवायचं नाही. दुपारी पोट्भर जेवलं की चालणं होत नाही ना, म्हणून असं करायचं आम्ही दोघांनी ठरवलं. नंतर बाबा जरा फ़ेरफ़टका मारायला गेला असताना गावात कुणीतरी आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी जेवायचं आमंत्रण दिल्याचं बाबाने मला दुस-या दिवशी सकाळीच सांगीतलं.. मी चट्कन म्हणाले त्याला, “ अरे पण आपण सकाळी जेवण घ्यायचं नाही असं ठरवलं होतं ना”.. तो ही म्हणाला.. “ अरे हो, प्रश्न च मिटला, आपण जेवणारच नाही आहोत”..मी:- “अरे पण तू त्यांना हो म्हणून सांगीतलय्स का?, तसं असेल तर जायला हवं आपण”..आता मात्र बाबा गोंधळला, म्हणाला मी आधी त्यांना हो म्हणालो होतो, नंतर बहुतेक मी नाही म्हणून सांगितलं, पण मला आठवत नाहीये!..आता विचारायचं तरी प्रॉब्लेम आणि नाही विचारायचं तरी प्रॉब्लेम! आणि गंमत म्हणजे कुणाकडे जेवायला बोलावलं होतं ते ही तो विसरला होता. शेवटी ज्यांच्या घरून आमंत्रण होते ते सकाळी पुन्हा आले आश्रमात, तेव्हा मला उलगडा झाला.

लोक बाबाला टाळायचे, त्याच्याकडे दूर्लक्ष करायचेत, मात्र काम असलं की त्यांना बाबा हवा असायचा. मला त्या वेळी फ़ार वाईट वाटायचं. वाटायचं बाबाला सांगावं, तुझा लोक फ़ायदा घेतात, तुला टाळतात.. पण मी तसं करूच शकेल नाही. कारण मी आतापर्यंत सांगीतलेला बाबा ही त्याची एक बाजू होती. जी दुसरी बाजू मी बाबाची पाहिली ती अजूनच वेगळी.ती आता सांगते.

दासबोधाची सतत पारायणं करणारा हा बाबा दासबोध वाचताना इतका मग्न आणि शांत होऊन जायचा की त्यानी वाचत रहावं आणि आपण ऐकत राहावं.

प्रत्यक्ष रामदास स्वामीच दासबोध सांगताहेत असं वाटायचं त्या वेळी. प्रभू रामचंद्र, बजरंग बली हनुमान आणि रामदास स्वामी यांचा विषय निघाला की बाबाच्या अंगात नक्कीच कुठलीशी शक्ती संचारू लागलीये असं वाटायचं. त्याच्या डोळ्यात प्रचंड तेज चमकू लागायचं. तो तुमच्या आमच्या विश्वाच्या बाहेर असायचा कुठेसा… आणि दासबोधाचे समास अन समास तोंडपाठ असलेला हा बाबा कोड्यासारखाच वाटायचा मला! मला नेहमी म्हणायचा तो..”तुझा बाबा तुझ्यासोबत आहे, तुला कधीच कुठलाच त्रास होऊ देणार नाही”.. हे असं कसं झालं माहितिये? सांगते.

मला बाबा पहिल्यांदा नारेश्वर ला भेटला. त्या वेळी मी एकटी होते, माझ्या अंगात ताप होता ..जवळ जवळ १०३ असावा. मी आश्रमाच्या हॉलमधे कण्हत विव्हळत पडले होते. माझी काळजी घ्यायला कुणीच नव्हतं, तेव्हा माझी ओळख ही नसलेला हा आडदांड माणूस माझ्यासाठी धावपळ करत होता. एक अनोळखी मुलगी, एकटी, तापाने फ़णफ़णलेली पाहून ह्याचं हृदय पाणी पाणी झालं होतं. आपल्या जवळचं पांघरूण यानी आईच्या मायेने माझ्या अंगावर पांघरलं होतं. बापाच्या काळजीनी हा धावत गेला होता डॉक्टर ला आणायला! माझ्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या रात्रभर ठेवणारा आणि रामरक्षेची आवर्तन करणारा हा बाबा मला ओळखत देखिल नव्हता. माझा ताप उतरल्यावर जेव्हा मी याच्या पाया पडले तेव्हा त्याच्या डोळ्यातला बाप रडताना मी पाहिला होता….”मला नर्मदा माईनी मुलगी दिली नव्हती, ती आज दिली” हे उदगार काढणारा हा बाबा त्या दिवसापासून माझा बाप म्हणून माझ्या सोबत होता तो परिक्रमा संपेपर्यंत!

त्याचं ते विसराळूपण खूप मोठं होतं ज्यात तो लोकांनी त्याच्याशी केलेली वागणुक संपूर्ण पणे विसरून जायचा. त्याचा तो हळवा स्वभाव अगदी कुणाही साठी दुखायचा तो फ़क्त सदिच्छेपोटी, निस्वार्थतेने, त्याचं ते गाणं वाजवणं दिलखुलास असायचं..कुणाचं मन मोडणं कधी आलच नसेल याला! तर असा हा बाबा, जसा होता तसा, जसा माझ्या मैयानी मला दिला होता तसाच ठेवायचं मी ठरवलं. पुढे परिक्रमेत त्याच्या भोळया व्यक्तिमत्वाचा कुणी गैरफ़ायदा घेऊ नये इतकी मी काळजी घेत गेले, माझ्यापुरती, कारण ह्या निश्पाप मनात राग द्वेश काहीही नव्हतं, आणि या विकारांची जाणिव सुद्धा त्या मनाला होऊ नये इतकं जपण हीच माझी बाबा साठीची निस्वार्थ सदिच्छा होती…आणि कायम असेल!
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
सौ. सुरुचि नाईक-देवा तुझा मी सोनार:9309926559

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*