नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇१५.👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇१५.👇
नर्मदे हर.. हर हर नर्मदे
मागच्या भागात आमचे मार्ग वेगळे झाल्याचे मी सांगीतले होते. ते कसे झाले ते आधी सांगते. मी आणि सुरेखा ताई पुढे होतो, आणि शेतात रस्ता विचारत आम्ही जात होतो, तर आम्हाला एका माणसाने सांगीतले, “उधर से मत जाओ, नाला है, नाले मे पानी बहोत ज्यादा है, और नाव खराब है,तुमको इंतजार करना पडेगा, इधर से जाओ, थोडा लंबा पडेगा पर सीधा सीधा रास्ता है, नवलाय को पोहोच जाओगे, चिच्ली जाने की जरूरत नही”. आम्ही न विचारता त्यानी आम्हाला हा रस्ता सांगीतला होता. खरं तर आम्ही लगेच फ़ोन करून मागच्यांना तसं सांगितलं देखिल, म्हणजे त्यांना सुद्धा हाच रस्ता घेता यावा.. पण मी मागच्या अनुभवात सांगितलं तसच असतं.. वेगवेगळे अनुभव यायचे असतात, ते जसे नशीबात असतील तसे मार्ग आपल्याला मिळतात.

ज्या ठिकाणी दोन रस्ते जात होते तिथे एक पिंपळाचं झाड होतं, तिथून पुढे गेलं की एक छोटासा नाला होता, अगदी उडी मारून पार करता येईल येवढा, आणि तो पार करून मग डाव्या बाजूला रस्त्याला लागायचं होतं. आम्ही या दोन खुणा मागच्यांना फ़ोन करून सांगितल्या आणि अडचण आल्यास पुन्हा फ़ोन करा असं ही सांगितलं. आता गंम्मत कशी झाली बघा, त्यांना त्या खुणा दिसल्याच नाहीत… आणि त्या खुणा शोधत असताना त्यांना कुणितरी माणूस रस्त्यात भेटला आणि त्याने या मंडळींना दुसरा रस्ता दाखवला. या मागच्या मंडळीनी आम्हाला फ़ोन करण्याचा प्रयत्न केला पण आमच्या दोघिंचाही फ़ोन काही लागेना. आम्ही नो नेटवर्क झोन मधे असू, आणि आम्ही काही त्यांना फ़ोन केला नाही कारण ते त्या झाडापशी आले की करतीलच फ़ोन असं आम्हाला वाटत होतं. शेवटी चुकामुक झालीच.

आता आम्हाला आणि त्यांना, वेगवेगळे अनुभव कसे आले ते सांगते. आम्ही गावागावातून जात होतो. आमचा बालभोग झाला होता. सकाळ चे १० वाजले असतील. आम्ही छोट्याश्या छान टुमदार घरांची बांधणी बघत बघत जात होतो, तिथे कुठेतरी थोडं थांबून दहा पंधरा मिनिटाची विश्रांती घ्यावी म्हणून एका घराबाहेर असलेल्या छोट्या कट्ट्यावर बसू असं आम्ही ठरवलं.. आम्ही त्या कट्ट्याकडे जात असताना त्या घरातून एक छोटीशी, ३-४ वर्षांची मैया धावत घराबाहेर आली आणि तिला पकडायला म्हणून तिची आजी पण आली. आम्ही नर्मदे हर केलं आणि सामान खाली ठेवणार तितक्यात त्या आजी नी माझा हात धरला, आणि म्हणाली, “माताजी इधर बाहर नही अंदर विश्राम करलो” तिनी मला अक्षरश: ओढून नेलं म्हटलं तरी चालेल.

आम्ही आत गेलो,जोडे मोजे काढले, सामान ठेवलं, हात पाय धुतले, तेवढ्यात ही छोटी मैया आपल्या इवल्या हातात पाणी घेऊन आली, आणि म्हणते कशी, “दीदी, चाय पिओगे के छाछ, अम्मा पुछ रही है”. आम्ही थकलो होतोच थोडं, ताक पिऊ असं सांगीतलं…. तेवढ्यात घरची सून बाहेर आली, तिनी आम्हाला नमस्कार केला, आणि म्हणाली…”आप तो इधर के नही लगते?

इधर का खाना बहोत टेस्टी होता है, छाछ बादमे पीना, तूअर है घर के, मक्के की रोटी बना रही हू, खाना लगा दिया है, थाली भी सजा दी है, बस आप को खाना खाकर ही जाना है, अम्मा ने आपको खीचके लाया तब ही उनके मन मे था की आपको खाना खिला के ही भेजेंगे”.. आता यावेळी भूक फ़ार नसतानाही आम्ही नकार दिला नाही कारण मागचा फ़टका आमच्या लक्षात होता..

गरमा गरम मक्याच्या भाकरी, घरच्या तुरीची उसळ, सरसो चं साग, वेळेवर तळलेले बटाट्याचे भजे, असं पोटभर आणि खरोखर चविष्ट जेवण आम्ही जेवलो, वरून पुन्हा घरचं ताक ही प्यायला दिलच! ती छोटी मैया, तिची आई, आणि तिची सासू, ह्या तिघीही जणू मैया ची च रुपं होत्या…इतकी आपुलकी झाली त्या छोट्याश्या मैयाला की आम्हाला जाऊ द्यायला तयारच होईना ती..”अम्मा दिदी अपने घरमे ही सोयेंगे” असं म्हणून रडू लागली… हेच ते.. काहीतरी देणं घेणं शिल्लक असेल आमच्या मागच्या जन्मींच…म्हणून हे असं घडलं!

आता त्या मागे रहिलेल्या मंडळी चा अनुभव सांगते. सांगीतल्या प्रमाणे त्यांना तो नाला लागला, त्यात भरपूर पाणी होतं, जवळच एक खराब झालेली नाव ही होती, आणि आता तो पार करायला साधन ही नव्हते. मंडळीनी तिथे अर्धा तास वाट पाहिली आणि आता पुन्हा मागे फ़िरून दुसरा कुठल्या रस्त्याने जाऊ असं त्यांनी ठरवलं. आणि परतून मागे वळणार तितक्यात तिथे एक सन्यासी आला, आणि म्हणाला, “दुसरी नाव आ ही रही है.” त्याला कुणी सांगीतलं की नाव येतेय ते माहित नाही पण लागलीच पलीकडच्या काठावरून एक नावाडी आपली नाव ढकलत घेऊन येताना दिसला, आणि इकडे अलिकडे नाव घेऊन आला.

साधू महाराज कोण होते माहित नाही, पण आमच्या, म्हणजे माझ्या आणि सुरेखा ताईच्या भाग्यात त्या महारांजाचं दर्शन घेणं नव्हतं आणि त्या मंडळीच्या भाग्यात या तिघी मैया, आणि अन्नपूर्णेच्या हातचं जेवण नव्हतं. पुढे आम्ही नलवायला भेटलो तेव्हा हे अनुभव एक मेकांना सांगितले. त्यांनी वर्णन केलेला तो सन्यासी नक्कीच कुणीतरी महान संत किंवा शक्ती असणार, कारण नाव येतेय हे त्यानी अचानक सांगीतलं… हे असच असतं..आमचे अनुभव आम्हाला मिळाले आणि त्यांचे त्यांना.. मैया मत्र आपल्या सर्वच लेकरांची व्यवस्थित काळजी घेते.

पुढे लोहा-याला जाताना एक खूप मजेशीर अनुभव आला, एक खूपच आश्चर्यकारक अनुभव आला आणि एक संकेत ही मिळाला. मैया आपल्याला वेळोवेळी संकेत देत असते. ते फ़क्त समजणं गरजेचं असतं.. ते समजलं की तुमची पुढची परिक्रमा सहज आणि सोपी होते. लोहार-या नंतर दत्तवाडा आणि मग पुढे राजघाट, या राजघाट च्या पुढे शूलपाणी ची झाडी सुरू होते, पण आमच्या साठी हा राजघाटचा प्रवास अंगावर काटे आणणारा होता..पुढच्या अनुभवात सांगते.
© सुरूची नाईक:देवा तुझा मी सोनार-9309926559

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*