१५ जून, ज्येष्ठ नागरिक छळ विरोधी कायदा दिन – बडगुजर. इन

आज १५ जून ज्येष्ठ नागरिक छळ विरोधी कायदा दिन
_ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यांनी आचरणात आणावयाची सूत्रे!
देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्येनुसार ६६ टक्के ज्येष्ठ नागरिकांना दोन वेळचे जेवण आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ९० टक्के ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक,आर्थिक,आरोग्य सुरक्षितता नाही.७३ टक्के नागरिक निरक्षर असून केवळ शारीरिक श्रम करून ते जगू शकतात. ३९ टक्के ज्येष्ठ नागरिक आपल्या आयुष्याला दोष देत एकाकी आयुष्य जगत असतात, अशा प्रकारची माहिती ‘हेल्पेज इंडिया’ या सेवाभावी संस्थेने प्रसिद्ध केली आहे. या सर्व गोष्टींचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

१. वृद्धाश्रम: विभक्त कुटुंबपद्धत, व्यक्तीदोष, आर्थिक अडचणी अशा विचारसरणीमुळे वृद्धाश्रम ही एका दृष्टीने चिंतेची गोष्ट बनली आहे. या वयात ज्येष्ठ नागरिकांना प्रेम, माया, आपुलकीची आवश्यकता असते.

२.(एकत्र आणि विभक्त कुटुंबपद्धती: यामुळे समाजाचे विघटन होऊ लागणे
अ.)एकत्र कुटुंबपद्धती : ‘ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक जाणिवेचा आविष्कार’ या विषयाचा विचार करण्यापूर्वी सामाजिक जाणिवा पालटत गेल्या. समाज व्यवस्थेमध्ये जोपर्यंत एकत्र कुटुंबपद्धत होती, तोपर्यंत घरातील सर्व निकडी (गरजा) परस्पर सहकार्याने भागत असत. घरात थोड्या प्रमाणात का होईना, सुबत्ता नांदत असे. प्रत्येक जण दुसर्‍याचा विचार करत होते.

आ.)विभक्त कुटुंबपद्धती : यामुळे ‘मी, माझा’ ही भावना बळावत गेली. त्याला आर्थिक कारणही कदाचित् असू शकेल; म्हणून एकमेकांमध्ये दुरावा वाढत गेला आणि परस्पर सहकार्याने होणारी घरगुती कामेही होणे कठीण झाले. अशा प्रकारे समाजाचे विघटन गेल्या काही वर्षांत वाढू लागले.

३.)बहुतेक सुशिक्षित कुटुंबात आर्थिक सुरक्षिततेसाठी एकच मुलगा किंवा मुलगी ही भावना: रुजणे आणि पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे ‘अंकल’, ‘आन्टी’ यांसारखी दिखाऊ नातीच मुलांना कळू लागणे, या सर्व गोष्टींमुळे समाज घडी विस्कटणे
बहुतेक सुशिक्षित कुटुंबात आर्थिक सुरक्षिततेसाठी ‘हम दो, हमारे दो’ वरून ‘हम दो, हमारा एक’ ही भावना रुजली आहे. एकच मुलगा किंवा मुलगी यांना योग्य शिक्षण देऊन मोठे करणे, हाच ध्यास प्रत्येक घरात दिसू लागला आहे. यात काही चूक आहे, असे नाही; पण एकमेकांना जोडणारे नातेसंबंध दुरावत गेले. याही पुढे जाऊन एकमेकांचे नाते कोणते, याचाही विसर पडला. त्यातच पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे ‘अंकल’ (काका), ‘आन्टी’ (मावशी) यांसारखी दिखाऊ नातीच मुलांना कळू लागली. कझिन, ब्रदर या नात्याने मावस आणि मामे भाऊ, चुलत भाऊ आणि आतेभाऊ ही नाती पार विसरून गेली आणि त्यामुळे समाजघडी विस्कटली.

४.)वृद्धापकाळात आवश्यक असलेली त्रिसूत्री:
अ.) वृद्धांनी स्वतःचे मनःस्वास्थ टिकवण्यासाठी नेहमी जागरूक राहून कुटुंब आणि समाजातील सर्वांशी जाणीवपूर्वक चांगले बोलावे.

आ.) स्वतःपासून इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी.

इ.) संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि मनःशांती या त्रिसूत्रांची वृद्धापकाळात आवश्यकता असते.

५.)‘मनाची उभारी: वार्धक्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट
वार्धक्यात ‘मनाची उभारी’ ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते. मानसिक स्वास्थ्य आणि विचारातील उत्साह यांमुळे या वयातही मनाला एक ताजेपणा रहातो. ती मिळवणे तितकेसे कठीण नाही.

६.नकारात्मक विचारांना मनात स्थान न देणे:
आपल्या विचारानुसार प्रकृती कार्य करत असते. वृद्धापकाळात मन प्रसन्न ठेवणे आवश्यक आहे; कारण मनाचे रंग विटले की, सारे जगच बेरंगी होऊन जाते. ‘आमची नोंद कोणी घेत नाही’, असे नकारात्मक विचार वृद्धांनी मनात आणू नयेत.

७.नकारात्मक दृष्टीकोनापेक्षा सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास स्वतःचे उत्तरायुष्यही सुखाचे होऊ शकणे:
आपल्या हाताला नेहमी काही ना काही काम असावे आणि आपले मन प्रसन्न ठेवावे. आपल्याला जमतील तेवढी कामे करण्याचा प्रयत्न या वयातही केला पाहिजे. आपण आपला अहंकार सोडून सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे. आपल्या आयुष्यातील चांगले अनुभव इतरांना सांगावेत. आवश्यकता असल्यास असेल, तेथे त्यांना मार्गदर्शन करावे. आपण नकारात्मक दृष्टीकोनापेक्षा सकारात्मक दृष्टीकोन ठेवला, तर स्वतःचे उत्तरायुष्यही सुखाचे होऊ शकेल, यात शंका नाही. असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवला, तर दोन पिढ्यांमधील अंतर न्यून होऊ शकते. ज्येष्ठांना असा विचार करणे सहज शक्य होऊ शकते. त्या दृष्टीने विचार करून वेगवेगळे पर्याय पडताळून पहाणे फार महत्त्वाचे आहे.

८.ज्यांची मुले विदेशात चाकरी करत आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांची व्यथा:
अ. एकटेपणाची भावना मनात रुजायला लागणे : आज असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत की, त्यातील काही ज्येष्ठ नागरिकांची मुले विदेशात चाकरी करत असतात. अशा वेळी अनेकांच्या मनात एकटेपणाची भावना रुजायला लागते. त्यांना तो एकटेपणा वाटायला लागला की, आपला विदेशातील नातवंडांचा बोबडा स्वर केवळ दूरध्वनीवर ऐकता येतो. त्यांची वाट पहाण्याचा काळ सरता सरत नाही.

आ. मुलांना आपल्यासाठी वेळ नाही, ही बोचरी बोच बोथट होत जाणे : या दिवसांतही ज्येष्ठांना स्वतःच्या आयुष्याचा जमाखर्च पुनःपुन्हा मांडावा लागतो. ज्येष्ठांना त्यांच्या तरुण वयातील रग आठवली की, त्यांना आपल्यासाठी वेळ नाही, ही बोचरी बोच बोथट होत जाते. आपला जोडीदारही आपल्यासोबत थकत चाललेला असतो, हे भानही ज्येष्ठांनी ठेवले पाहिजे.

इ. जसा समाज पालटला, तसे ज्येष्ठांनीही पालटण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचेही जीवन आनंदी होण्यास साहाय्य होईल : आज सभोवताली पाहिले, तर लक्षात येते की, समाज पालटला, सिनेमा-नाटक पालटले, त्यातील नात्यांचे संदर्भही पालटले. हे सारं काय आहे ? हे सगळे तरुणांसाठी आहे. यातील ज्येष्ठांसाठी काय आहे ? ज्या वेळी ज्येष्ठ समाजात वावरतो, तेव्हा त्याने या वयास थोडीशी मुरड घातली, तर हे सगळे आपल्यासाठीही आहे, असे त्यांना वाटेल.

९.बहुतांशी वृद्धांचा प्रश्न वृद्धांसाठी ज्या स्वयंसेवी संस्था काम करतात:
त्यांच्याकडे साहाय्य मागणार्‍या वृद्धांचा प्रश्न बहुतांशी कौटुंबिक अवहेलना हा असतो,अवहेलनेच्या संदर्भात सांगायचे झाले, तर आई-वडील मुलांच्या घरात रहातात कि मुले आई-वडिलांच्या घरात रहातात ?, हे बहुतेक कुटुंबात अतिशय ज्वालाग्राही सूत्र असते. त्याचे दुसर्‍या पक्षावर प्रचंड मानसिक दडपण असते. बर्‍याच कुटुंबांमधून आई-वडिलांनी घर स्वतःच्या नावावर करून द्यावे; म्हणून मुलगा त्यांच्यावर दडपण आणत रहातो, छळही करतो. वृद्ध आई-वडिलांनी रहाते घर मुलांच्या नावे करून देऊ नये, असे नेहमी मत दिले जाते; पण तसे न केल्यासही आई-वडिलांना जगणे नकोसे करणारी मुले असतात.

१०. वृद्धांचे स्वतःचे वागणे काही अंशी अवहेलनेला कारणीभूत असणे:
वृद्धांनी घरात असे वागावे की, ते कुटुंबात प्रेमाने सामावून घेतले जातील. यात तरुण पिढीची बाजू अशी असते की, त्यांना आपापले प्रश्न असतात. प्रत्येकाला दैनंदिन जीवनात आपापल्या कामाचे ताणतणाव असतात. वृद्ध लोकांच्या ते लक्षात येत नाहीत किंवा ते समजूनही घेत नाहीत. मुलांजवळ अजिबात वेळ नसतो आणि वृद्ध मंडळी त्यांच्याकडे एकटेपणा घालवण्यासाठी भूणभूण करतात. आपण मुलांसाठी काय काय केले, त्याची उजळणी करत रहातात. काही अंशी वृद्धांचे स्वतःचे वागणे अशा स्थितीला कारणीभूत असते. पुष्कळदा त्या वृद्ध व्यक्तीचा काही कारणाने आलेला राग व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून वैयक्तिक अवहेलना केली जाते.’
अश्याप्रकारे जेष्ठ नागरिकांना त्रास दिला जातो, छळ होतो म्हणून शासनाने १५ जून २००७ रोजी जेष्ठ नागरिक छळ विरोधी कायदा केला,त्याबद्दल आपण माहिती घेऊ या! 👇👇👇
ज्येष्ठ नागरिक कायदा-२००७
पोट कलम १: या कायद्यास आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम, 2007 असे संबोधण्यात येते. सदरचा कायदा जम्मु-काश्मिर वगळता संपुर्ण भारतातील ज्येष्ठ नागरिक व भारता बाहेरील, भारतीय ज्येष्ठ नागरिकांना लागू राहिल.

कलम-२: व्याख्या
मुले (Children), म्हणजे जे ज्येष्ठ नागरिकाची मुले-मुली यामध्ये मुलगा, मुलगी, नात, नातू यांचा समावेश आहे.निर्वाह भत्ता (Maintenance) म्हणजे यामध्ये अन्न, कपडेलत्ते, निवारा, वैद्यकीय सोयी-सुविधा व उपचार याचा समावेश होतो.पालक (Parents)- म्हणजे यामध्ये आई-वडील,नैसर्गिक पालक, दत्तक पालक,तसेच सावत्र वडील, सावत्र आई यांचा समावेश होतो.मालमत्ता (Property) म्हणजे यामध्ये चल,अचल संपत्ती, स्व:कष्टार्जीत केलेली अथवा वारसा हक्काने प्राप्त झालेली संपत्ती.
कलम ३:ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen) म्हणजे कोणतीही भारतीय स्त्रि व पुरूष व्यक्ति, ज्यांचे वय वर्षे 60 अथवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांना ज्येष्ठ नागरिक असे संबोधण्यात येते. न्यायाधिकरण (Tribunal) म्हणजे या कायद्याचे कलम 7 अंतर्गत निर्वाहभत्ता निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेले न्यायाधीकरण
कलम ४: कायद्याचे कलम 4(1) प्रमाणे जे ज्येष्ठ नागरिक हे स्वत:च्या उत्पन्नामधून अथवा त्यांच्या मालमत्तेमधून, स्वत:चा चरितार्थ चालवू शकत नाहीत, अशा व्यक्तींना चरितार्थासाठी कलम-5, प्रमाणे निर्वाहभत्त्यासाठी संबंधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांचेकडे अथवा संबंधीत जिल्हयातील, विभागाचे उपविभागीय अधिकारी(महसूल) तथा अध्यक्ष, “ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरण” यांचेकडे अर्ज दाखल करता येईल.
कलम ५: निर्वाह भत्त्यासाठी करावयाचा अर्जस्वत: ज्येष्ठ नागरिक अथवा त्यांचे पालक यापैकी कोणीहीजर ज्येष्ठ नागरिक अर्ज करण्यास सक्षम नसेल तर त्यांनी प्राधिकृत केलेली कोणतीही व्यक्ति अथवा संघटना अर्ज करू शकते.न्यायाधिकरण स्वत: ( Suo Motu ) अशा प्रकरणात दखल घेईल.
कलम ६: न्यायाधिकरणाचे कार्यक्षेत्र – या कायद्याअंतर्गत अपिलावरील सुनावणी ही अर्जदार हा ज्या ठिकाणी वास्तव्य करतो अथवा मुले, नातेवाईक ज्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करतात अशा कोणत्याही न्यायाधिकरणाचे कार्यक्षेत्रात सुनावणी घेण्यात येईल.
कलम ७: ह्या कायद्यांतील कलम 7 (1) प्रमाणे हा कायदा अस्तित्वात आल्या पासून 6 महिन्यात राज्य शासन अधिसूचनेद्वारे जिल्ह्याच्या प्रत्येक उपविभागात एक अथवा त्यापेक्षा जास्त अशी न्यायाधिकरणे स्थापन करील.7(2) प्रमाणे सदरचे न्यायानिधकरणावर अध्यक्ष म्हणून, “उपविभागीय अधिकारी” किंवा त्यापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. निर्वाहभत्त्या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या उप विभागासाठी “न्यायाधीकरण” गठीत करण्यात येईल. प्रत्येक विभागासाठी ‘पिठासीन अधिकारी’ म्हणून उपविभागीय अधिकारी (महसूल) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कलम ८: कायद्यातील कलम 8(1) प्रमाणे प्राप्त झालेल्या अर्जावर, ‘ज्येष्ठ नागरिक न्यायाधीकरणाकडे’, सुनावणी घेवून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
कलम 8 (2) प्रमाणे न्यायाधिकरणास, शपथेवर पुरावे दाखल करुन घेणे, साक्षीदार यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी बाध्य करणे, कागदपत्रे दाखल करणे व त्याची खात्री करणे इत्यादी बाबत दिवाणी न्यायालयाचे अधिकार (Power Of Civil Court) आहेत.
कलम ९:कलम 9(1) प्रमाणे ज्येष्ठ नागरिक यांची मुले, नातेवाईक अथवा पाल्य यांनी ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यास निष्काळजीपणा दाखविल्यास, नकार दिल्यास, तसेच ही बाब चौकशी नंतर सिध्द झाल्यास व निष्काळजीपणा करत असल्याचे, न्यायाधिकरणाचे मत झाल्यास, न्यायाधिकरणाला आदेशीत करेल.कलम 9(2) प्रमाणे न्यायाधिकरण जास्तीत जास्त मासिक निर्वाहभत्ता निश्चित केल्याचे आदेशीत करेल. तथापी, पाल्यांकडून देण्यात येणारी चरितार्थासाठी रक्कम रुपये 10,000/- प्रतीमहा पेक्षा जास्त असणार नाही.
कलम ११: चरितार्थ आदेशाची अंमलबजावणीकलम 11(1)(2) प्रमाणे निर्वाह न्यायाधिकरणाने पारीत केलेले आदेश, कोणतेही शुल्क न आकारता, ज्येष्ठ नागरिकांना मोफत देण्यात येतील.तसेच ज्यांच्या विरुध्द हे आदेश दिलेले आहे, त्यांना आदेश देऊन अंमलबजावणी करण्यासाठी सुचित करण्यात येईल.कलम 11(2) या कायद्याअंतर्गत न्यायाधिकरणाने पारीत केलेला आदेश,हे गुन्हेगारी दंडसंहिता 1973 मधील प्रकरण 9 मध्ये दिलेल्या आदेशा इतकेच महत्त्वाचे व परिणामकारक असतील.
कलम 13 – न्यायाधिकरणाने चरितार्थ व कल्याणासाठी मंजूर केलेले आदेश व त्यामध्ये निर्देशित केलेली रक्कम आदेश पारित केल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांत, मुले अथवा नातेवाईक यांनी ज्येष्ठ नागरिक यांना न्यायाधिकरणाच्या आदेशामध्ये नमुद केलेल्या सूचनांनुसार देणे बंधनकारक आहे.
कलम १५: कलम 15(1)(2) प्रमाणे न्यायाधिकरणाच्या आदेशाविरूध्द अपिल दाखल करण्यासाठी, राज्य शासन अधिसूचनेद्वारे प्रत्येक जिल्ह्यात 1 अपिलीय न्यायाधिकरण,(Appellate Tribunal) स्थापन करेल. सदर अपिलिय न्यायाधिकरणाचे, अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी यांच्या पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करेल.
कलम १६: कायद्याचे कलम 16(1) प्रमाणे न्यायाधिकरणाच्या आदेशाबाबत ज्येष्ठ नागरिकांचे अथवा पालकांचे समाधान न झाल्यास संबंधितांना, सदर आदेशाविरूध्द 60 (साठ) दिवसाचे आत “अपिलीय प्राधिकरणाकडे” अपिल दाखल करता येईल. तथापी न्यायाधिकरणाने निश्चित केलेला निर्वाहभत्ता की जो नातेवाईक यांनी ज्येष्ठ नागरिक यांना देणे अपेक्षित आहे व तसे आदेशित केलेले आहे, ती रक्कम ज्येष्ठ नागरिक यांना अपिलीय प्राधिकरणाचे आदेश होईपर्यंत देणे बंधनकारक राहिल.
कलम १७: कायदेशिर बाजू मांडण्याचा हक्क – या कायद्या अंतर्गत काहीही नमूद केले असले तरी पक्षकारांना न्यायाधिकरण किंवा अपिलीय प्राधिकरण यांचे समोर बाजू मांडण्यासाठी वकीलांमार्फत प्रतिनिधत्व करता येणार नाही.
कलम १८: कायद्याच्या कलम 18(1) प्रमाणे राज्य शासन, जिल्हा समाज कल्याण अधिकारी (सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण) यांना अथवा त्यांच्यापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याची पदसिध्द निर्वाहअधिकारी (Maintenance officer) म्हणून नियुक्ती करेल.
कलम १९: या कायद्याचे कलम 19 (1) प्रमाणे राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यात सोयींच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची संख्या विचारात घेऊन 150 क्षमतेचे सर्व सोईसुविधांनी युक्त असे प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक वृध्दाश्रम टप्प्या टप्प्याने स्थापन करील.
कलम २०: ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य व वैद्यकिय देखभाली बाबत करावयाच्या उपाय योजना – राज्य शासन खात्री करील की कलम 20(1) शासकीय दवाखाने, तसेच शासन मान्यता प्राप्त अनुदान तत्त्वावरील दवाखाने यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी बेडची सुविधा उपलब्ध करुन देतील. कलम 20(2) हॉस्पिटल व दवाखाने या ठिकाणी जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात येईल.कलम 20(3) दुर्धर आजारावरील उपचार तसेच असाध्य आजार यावरील उपचार ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येतील.कलम 20(4) जेष्ठ नागरिकांचे दुर्धर आजार तसेच वयोपरत्वे झीज (Degenerative) होणाऱ्या आजारांवर संशोधनात्क उपक्रम हाती घेण्यात येतील.कलम 20(5) प्रत्येक हॉस्पिटल मध्ये वृध्दापकाळाचे (Geriatric) आजाराने ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी, स्वतंत्र व्यवस्था असावी, तसेच यासाठी वृध्दापकाळाचे (Geriatric) आजाराचे ज्ञान असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल.
कलम २१: कायद्याचे कलम 21 अंतर्गत राज्य शासन खालील उपाययोजना करेलया कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या तरतूदींची दूरदर्शन, रेडिओ व प्रिंट मिडिया यांचेमार्फत व्यापक प्रमाणात वारंवार प्रसिध्दी करण्यात येईल.या कायद्याची अंमलबजावणी करणारे केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी पोलीस अधिकारी, तसेच न्यायिक सेवांमधील सदस्य यांचेसाठी संवेदना जागृती (Sensitization) व जाणीवजागृती (Awareness) बाबत वारंवार प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल.कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी विधी विभाग, गृह विभाग, आरोग्य विभाग, तसेच संबंधीत सर्व विभाग यांचेमध्ये समन्वय ठेवण्यात येईल वच अंमलबजावणीबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येईल.
कलम २४: या कायद्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषणाची जबाबदारी असलेली मुले, पालक अशा व्यक्तिंनी ज्येष्ठ नागरिकांना, कायम स्वरूपी अथवा तात्पूरते सोडून देण्याच्या उद्देशाने कृती केली असल्यास या कायद्या अंतर्गत असे करणाऱ्या व्यक्तिस 3 (तीन) महिने पर्यंत तुरुंगवास / अथवा रुपये 5,000/- पर्यंतचा दंड अथवा दोनही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे.
कलम २५: या कायद्यान्वये कलम 25(1) प्रमणे गुन्हेगारी संहिता 1973 अंतर्गत काहीही नमूद असले तरी या कायद्यांतर्गत घडलेला गुन्हा ‘दखलपात्र’ व ‘जामीनपात्र’ आहे. ह्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासनाने दिनांक 23 जून,2010 च्या अधिसुचनेव्दारे नियम पारीत केलेले आहेत. कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या प्रकरणांवर अधिनियम व नियमांतील तरतूदीनुसार कार्यवाही करण्यात येते.
(टिप :- वर नमूद कायद्याचे कलमांमधील अर्थ हा सन 2007 चा अधिनियम क्रमांक 57 मधील कायद्यानुसार राहील.)
(संदर्भ:आयुक्त,समाज कल्याण,महाराष्ट्र राज्य.)
🔱〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️🔱

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*