चला मराठी भाषेची प्रतिष्ठा वाढवू या – प्रा. मिलिंद चिंधू बडगुजर, जळगांव

माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीनदीन स्वर्गलोकाहून थोर मला तिचा अभिमान

असे अभिमानाने सांगून आपल्या काव्य प्रतिभेने अवघ्या मराठीजनांना एक अभिमानाची भावना देणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस म्हणजेच २७ फेब्रुवारी मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो.

मराठी असे आमची मायबोली

म्हणजे मराठी भाषा ही आपल्यासाठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार प्रेमळ असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्दही बोलू शकते तशीच ही आपली मराठी आहे हळूवार ,गोड ,लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी ,आणि प्रसंगी वज्राहुनी कठीण शब्दाने वार करणारी. जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात. कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी ही माझी मायबोली मराठीमाझी मराठी.

इये मराठीचीये नगरी । ब्रह्मविद्येचा सुकाळू करी

अशा शब्दात श्री संत ज्ञानेश्वरांनी मराठीचा उल्लेख करता करता ब्रह्मविद्या म्हटले आहे शब्द ब्रह्म ही म्हटले आहे .याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते. ” अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या ” या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ मध्ये झाला कवितेमध्ये रमतांना त्यांनी कथा कादंबरी नाटक ललित वांडःमयातही मुक्तविहार केला. वयाच्या १७ व्या वर्षापासून ” बालबोध मेवा ” या मासिकातून त्यांनी कविता आणि ललित साहित्य लिहायला सुरुवात केली १९४२ मध्ये प्रसिद्ध झालेला ” विशाखा ” हा त्यांचा काव्यसंग्रह साहित्यातला अमोल ठेवा आहे. कुसुमाग्रजांच्या …क्रांतीचा जयजयकार , वेडात मराठे वीर दौडले सात , आगगाडी आणि जमीन , पृथ्वीचे प्रेमगीत , या कविता ही तितक्याच लोकप्रिय आहे. नटसम्राट या महान नाट्यकृती साठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला १९८८ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांच्या साहित्‍य सेवेचा गौरव करण्यात आला. तेव्हापासूनच २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन .,जागतिक मराठी भाषा दिवस,. मराठी भाषा दिन ,. मराठी भाषा गौरव दिन अशा अनेक नावाने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.

ज्या माय मराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र धरले , आपल्याला लहानाचं मोठं केलं , .या बहुआयामी जगात स्वतःला सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये निर्माण केली ,. आपणाला व्यक्त होण्यासाठी जिने शब्दांची पखरण केली , .आज तिच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठीच हा महन्मंगल दिवस आहे .याच दिनाचे औचित्य साधुन आज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत त्यात काव्यवाचनाचा कार्यक्रम निबंध स्पर्धा घेण्यात येतात. मी सर्वांना या दिनानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो.

अज्ञान तीमिरा दूर करून ।ज्योती तेवते मराठी भाषा ज्ञांनवर्धिनी परी परखड। तरी मायाळू मराठी भाषा शान महाराष्ट्रीय मनाची । बहुप्रसव मराठी भाषा राज्यभाषा दिन गाऊ गाणी । माय आमची मराठी भाषा

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा ही विनंती करतो. एखाद्या भाषेच्या विकासाकरिता ती वर्तमानात व्यवहार भाषा, ज्ञानभाषा ,व्यवसाय भाषा ,अविष्कार भाषा, आणि राजभाषा म्हणून सुदृढ होईल याची काळजी घेतली गेली पाहिजे. कुठलीही भाषा स्वतः हुन बलवत्तर किंवा कमतर नसते. भाषकांची ताकद ही भाषेला बळ देते .ही इंग्रजी भाषेच्या इतिहासाकडे पाहिल्यास सहज लक्षात येते. भाषा मरत नाही .भाषक मरतात. गेल्या दोन-तीन दशकांत हजारो-लाखो मराठीभाषक मेले म्हणजे त्यांनी मराठीचा त्याग केला. आणि इंग्रजीच्या हव्यासापोटी म्हणा किंवा इतर कुठल्याही कारणासाठी आपल्याच मातेचा खून केला .

उद्धारीली ज्ञानदेवे जगती मायबोली मराठी भाषा। अमृताची घेऊन ती गोडी जगी वाढेल मराठी भाषा। विपुल साहित्य शोध निबंध, लाविते नित्य मराठी भाषा सहज गम्य । सामान्या उमगे । शूर मर्दांची मराठी भाषा ….।

मराठी ही मुळची आर्यांची भाषा असून तिला जवळजवळ पंधराशे वर्षांचा इतिहास आहे .काळाप्रमाणे ,.स्थला नुसार मराठी भाषा बदलत गेली त्यातूनच आजच्या मुख्य मराठी, अहिराणी ,मालवणी, वऱ्हाडी ,कोल्हापुरी, असे अनेक पोट प्रकार पडत गेले ……

महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन सहा दशके झाली तरी राजभाषा मराठीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत मोठ्या खेदाने म्हणावे लागते की ,मराठीचा वापर सक्तीचा करण्यासाठी नवे नवे आदेश काढण्यात आले .त्यांची अवस्था मागील पानावरून पुढे …….अशी होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करावी लागते. मराठी भाषा हा राजकारणाचा किंवा अस्मितेसाठी मिरवण्यात पुरता विषय नाही त्यासाठी राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती असावी लागते आणि ती सरकारच्या कृतीतून दिसते. मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी निमसरकारी नोकर्‍यांमध्ये प्राधान्य मिळायला हवे मराठी ही रोजगाराची भाषा बनेल तेव्हाच तिला प्रतिष्ठा मिळेल तिचा वापर वाढेल त्यासाठी आदेश काढण्याची गरज भासणार नाही आणि ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

मराठीच्या वाट्याला तर भाषा संवर्धन पंधरवडा चे पंधरा दिवस भाषा दिनाचा 1 आणि महाराष्ट्र दिनाचा एक असे सतरा दिवस येतात तरीही काहीजण मराठीसाठी काम करणारी माणसं रडत असतात असे मराठी मातीत जन्मलेले माणसं म्हणतात खरंतर काळानुरूप भाषा बदलत असते असं म्हणणारे, मराठी संदेश लॅटिन लिपीत पाठवणारे, देवनागरी लिपीतले वेलांटी उकार कठीण म्हणणारे,.” मराठी घेऊन भाकरी मिळणार नाही ” असा उपदेश करणारे मराठी पेक्षा मिंग्लिश व मिंदी वापरणारे,, या सर्वांचे आजच्या दिनी मराठीवरील एवढे उपकार म्हणावे लागतील तेवढे कमीच नाहीका,? …

आर्थिक प्रगल्भता लाभलेली भाषाच जगात सर्वाधिक रूढ होत असते याचा इतिहास सर्वांना माहीत आहेच संस्कृत ही संपूर्ण आर्य भाषांची जननी जरी असली तरी पुढील काळात संस्कृत शिकून पैसा कमवता न आल्याने ती मागे पडत गेली लँटीन भाषा यांच्याबाबतीतही हाच इतिहास समोर आला. आज इंग्रजी बोलून पैसा कमावता येतो नोकरी मिळवता येते उच्चशिक्षण करता येते यामुळेच ती शिक्षणाची व आर्थिक गतीची भाषा बनल्याने सर्वदूर प्रचलित झाली आहे. उद्या दुसऱ्या एखाद्या भाषेमध्ये हेच कौशल्य आल्यास ती भाषा लोकं शिकतील आणि इंग्रजीला मागे टाकतील हे नवीन सांगण्यासारखे नाही. माझ्या मराठी भाषेने सुद्धा आर्थिक संपन्न व गुणवत्तापूर्ण ज्ञानसंपन्न होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहिले पाहिजे . मराठी भाषेच्या अभिवृद्धी ची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करण्यासाठी प्रत्येक जण जेव्हा पटून उठेल तेव्हा खऱ्या अर्थाने मराठी भाषा ही प्रतिष्ठित झालेली असेल असे मला वाटते.कारण…

“” माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा “”

तरुण मुलांना इंग्रजी सोबत मराठी भाषेचे ज्ञान द्या मुलांना मराठी शाळेत पाठवा जर इंग्रजी शाळेत गेला तर आपल्या विद्यार्थ्यांची दुसरी भाषा ही मराठी असावी असा कटाक्ष किंवा आग्रह तुमचा असला पाहिजे तुमच्या मुलांना महाराष्ट्राचा इतिहास मराठीचा इतिहास आपल्या भाषेतील साहित्य वाचायला प्रवृत्त केले पाहिजे हे करताना तुम्ही ते पहिली करत आहात का हे पहा लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करत असतात खरं तर आपल्या घरात किती मराठीपुस्तक आहेत याचा शोध आपण घेतला पाहिजे आणि आपण किती वाचतो हेसुद्धा हे सुद्धा समजून घेतले पाहिजे भाषेला प्रतिष्ठित व प्रगल्भ बनवण्याचे काम प्रत्येकाचे आहे आज जपान किंवा चीन या देशाची उदाहरणे घेतली तर हिरोशिमा नागासाकी या शहरांवर ती जेव्हा बॉम्ब हल्ला करण्यात आला तेव्हा ही शहरे पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली होती परंतु आज संपूर्ण जगामध्ये याच शहरांमधली तयार झालेली तंत्रज्ञाने वापरली जातात याचे मुख्य कारण जर आपण बघितले तर त्या देशात मातृभाषेतून दिले जाणारे उच्चशिक्षण हेच आहे आपल्या देशात अजूनही उच्च शिक्षण हे इंग्रजी भाषेतच असल्यामुळे मुलांना त्यामध्ये कुठल्याच प्रकारचे संशोधन किंवा मूलभूत ज्ञान प्राप्त करण्यात अडचणी येत असतात यासाठी मेडिकल इंजिनियर डॉक्टर तसेच इतर उच्च शिक्षण क्षेत्रातील क्रमिक अभ्यासक्रमाचे रूपांतर मातृभाषेत करण्यासाठी नवोदितांनी व तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने माझी मराठी भाषा प्रगल्भ व प्रतिष्ठित होईल यात शंका नाही उच्च शिक्षण इंग्रजीत उपलब्ध असल्यामुळे आज सर्वत्र इंग्रजीचा वापर केला जातो याअगोदर संस्कृत व लॅटिन भाषेत चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता मात्र नंतरच्या काळात इंग्रजीतून ज्ञानाची प्रगल्भता व उच्च शिक्षणाची पुस्तके मिळू लागल्याने लॅटिन व संस्कृत भाषा मागे पडले मराठीमध्ये हीच शमता निर्माण झाल्यास येणाऱ्या भावी काळात सर्वजण मराठी शकतील हे निश्चित यासाठी मराठी भाषा ही व्यवहार भाषा व्यवसाय भाषा रोजगार भाषा बनली पाहिजे आणि हे सर्व करण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे चला तर आज च्या या राजभाषा मराठी दिनानिमित्त आपण शपथ घेऊया की पुढील काळात आज पासून मराठीचा वापर वाढवून तिला प्रतिष्ठित करण्यास हातभार लावूया जय महाराष्ट्र जय मराठी

शब्दांंकन – प्राध्यापक मिलिंद चिंधु बडगुजर जळगांंव मो. नं. ९४२११८४४९५

प्रा. मिलिंद बडगुजर सर, जळगांव

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*