मराठी भाषेची आवड-जबाबदारी सर्वांची
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।
जाहली खरेच धन्य ऐकतो मराठी।।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
‘मराठी’ विषयी आसक्ती, आदर, कणव, आणि निस्सिम प्रेम व्यक्त करण्यास कवी सुरेश भटांच्या काव्य शिल्पातला वरील तुकडा पुरेसा बोलका ठरतो. ज्ञानेश्वरांच्या ओवींनी, तुकोबारायांच्या अभंगांनी, एकनाथांच्या भारुडांनी, कुसुमाग्रजांच्या अलौकिक काव्याने, शाहीरांच्या पोवाड्यांनी, साने गुरुजींच्या ममत्व पेरणाऱ्या संस्कार कथांनी, बहिणाबाईंच्या अपूर्व गप्पांनी आपल्या या ‘माय’ मराठीला वैविध्यपूर्ण आणि अवीट बनवलं. अवघ्या वसुंधरेवर ‘माय’ म्हणून मिरवणारी एकमेव भाषा म्हणजे मराठीच!
अहिराणी, वऱ्हाडी, मालवणी, या सारख्या तब्बल ३२ बोलींच्या रत्नांनी माय मराठीचा मुकुट सजवलाय आणि हा अतिशय पवित्र मुकुट आपण साऱ्यांनी धारण केलाय ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. पण माय मराठीचा हा मुकुट आज खरोखर सुरक्षित आहे? खरंच येणारा काळ बाका आहे? अशा प्रश्नाचे असंख्य सुरवंट मनात काहूर माजवतात तेव्हा जीवाची काहीली होते. ‘माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका’। या ओळीतून कविवर्य कुसुमाग्रज बरंच काही चपखलपणे सांगून गेलेत.

या भारत वर्षात चौथ्या क्रमांकाच्या सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या माय माऊली मराठी ‘आवडती’ करण्याचा जागर आपणांस आजही करावा लागतोय हे एक मराठी भाषिक म्हणून आपणा सर्वांस आंतर्मुख करण्यास प्रवृत्त करणारं भयाण वास्तव आहे.
शासन, लेखणीकार-साहित्यिक, लोककलावंत या साऱ्यांकडून मराठीची आवड निर्माण करण्याचे प्रयत्न अविरतपणे चालू आहेत; परंतु असे असूनही सामान्य माणसाची नाळ मराठी पासून का तुटत चाललीय? मराठी माणसालाच मराठीचा आकस का वाटावा? याची कारणं शोधल्यास अंतिम धागा गवसतो तो म्हणजे मराठी ‘राजभाषा’ तर झाली पण ‘राज्यभाषा’- राज्य करणारी भाषा होऊ शकली नाही हेच मोठे दुर्दैव! ह्याची सारी कारणं लपली आहेत अर्थकारणात. महाराष्ट्राच्या अर्थकारणावर पर प्रांतीयांची (अमराठी) अत्यंत मजबूत पकड असल्यामुळे मराठीला डावलून हिंदी, इंग्रजी भाषांचा सर्रास वापर केला जातो आणि या भाषांच्या वर्चस्वाचा परिणाम नकळतपणे येणाऱ्या पिढ्यांवर होतो. [इतिहासाच्या पानात डोकावल्यास याची सत्यता कळेल.] आणि हे अनेक शतकापासून चाललयं म्हणूनच मराठीला आज ‘आवडती’ होण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागतोय.
‘भाषा मरता देश मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे।
गुलाम भाषिक होऊनी आपल्या प्रगतीचे शिर कापू नका।।
कुसुमाग्रजांनी केलेल्या या मार्मिक टिप्पणीचा अन्वयार्थ लावल्यास आपणांस काय करायला हवं याची दिशा मिळेल.
मराठीची आवड रुजावी यासाठी शाळा व कुटुंबस्तरावरुनच प्रयत्न होणे अगत्याचे आहे. लहानग्यांच्या कानांवर उत्तम दर्जेदार मराठीचे सूर उमटतील अशी तजवीज आपण समाजात व शाळेत करावयास हवी. मुलांना आवडणाऱ्या कार्टून फिल्म या अस्सल मराठीतून बनायला हव्यात व त्या आपल्या लेखकांनी लिहीलेल्या आणि इथल्या मराठी संस्कृतीचं चित्र रेखाटणाऱ्या असाव्यात. कारण टी. व्ही. वरील कार्यक्रम हे भाषेचा प्रचार व प्रसार करण्याचे प्रभावी माध्यम असते. याच्याच जोडीला व्टिटर, व्हॉट्स अॅप, फेसबुक, टेलिग्राम, इन्स्टाग्राम या सारख्या ‘सोशल नेटवर्किंग साइट्स व अॅप्स आणि संगणक यावर देखील मराठीचा वापर बिनघोर व्हायला हवा. या साऱ्यांचं मराठीकरण होणं अत्यंत आवश्यक आहे. जगातील बहुतांश सर्व माहिती या साऱ्या माध्यमातून मराठीतूनच प्राप्त व्हायला हवी म्हणजेच मराठी ‘ज्ञानभाषा’ व्हावी तरच सर्वांना मराठीच्या पदरात आसरा घ्यावासा वाटेल. लोककला व लोककलावंतांना, साहित्यिकांना राजाश्रय, लोकाश्रय मिळाल्यास त्यांनाही नवी उमेद मिळेल व ‘मराठी’ सामान्य बांधवांपर्यंत नेणारे वारकरी ते ठरतील. इथल्या आर्थिक नाड्या आपल्या हातात घेण्यासाठी उद्योग-धंद्यात ‘कोटीच्या-कोटी’ उड्डाणे घेणे मराठी तरुणांनी शिकायला हवं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्व मराठीजनांनी मराठी बोलण्याचा आग्रह धरायला हवा तर आणि तरच आपण मराठी ‘आवडती’ होण्याच्या जाणिवाचं बीज येणाऱ्या तमाम पिढ्यांच्या अंतःकरणात पेरू शकू. मराठीचा एक पाईक म्हणून ही सीऱ्यांचीच जबाबदारी आहे; जी आजन्म पार पाडून माय माऊली मराठीचे पांग फेडण्याचा ध्यास सर्वांनी घ्यायला हवा.
– श्री. योगेश मनोहर जाधव सर (बडगुजर)
मुळ गाव- भाटपुरे ता. शिरपूर
ह.मु. चोपडा


खूपच छान बनवले आहे एकदम झकास ?✌
Really i appreciate your story of Marathi language so proud of u..
अप्रतिम आणि अस्सल…
Really i appreciate your story of Marathi language so proud of u..