चाकाचा शोध लागला अन मानवी जीवनाला गती मिळाली.ही गती इतकी वाढली की संपूर्ण जगच विलक्षण गतीने धावू लागलं .या धडपडीतच अनेक नाविन्यपूर्ण शोध लागले. त्यामुळे मानवी जीवनाला कलाटणी मिळाली. मानव आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पृथ्वीतलावर अधिराज्य गाजवू लागला. नवनवीन शोधांमुळे मानव नाविन्यपूर्ण जीवन जगू लागला. खरतर हा क्रांतीचा पहिला टप्पा म्हणावा लागेल .त्यानंतर अठराव्या शतकामध्ये वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लागला आणि औद्योगिक क्रांती घडून आली. तदनंतर आलेल्या संगणकाने जगात तिसरी क्रांती घडवून आणली. संवाद आणि संज्ञापन क्रांतीमुळे जग एक छोटेसे खेडे बनले आहे. मार्शल मॅकलुहान या कॅनेडियन माध्यम तज्ज्ञाने आपल्या, ‘अंडरस्टँडिंग मिडिया,’ या ग्रंथात भाकीत केले होते की ,” तंत्रज्ञानातील बदलामुळे जग एक वैश्विक खेडे बनेल ” .तेच वास्तव आपण आजच्या काळात समाज माध्यमांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुभवत आहोत . समाज माध्यमे ही प्रत्येकाच्या जीवनातील एक अत्यावश्यक बाब बनली आहे विशेषतः फेसबुक आणि व्हाट्सअप चा वापर प्रत्येक जण करीत असतो. भारतात 100 कोटींपेक्षा अधिक लोक मोबाईल वापरतात. स्मार्टफोनच्या माध्यमातून प्रत्येक जण माहितीच्या महासागरात डुंबत असतो .

” हे विश्वची माझे घर “
या तुकाराम महाराजांच्या उक्तीची प्रचिती मानवाला येऊ लागली .या सर्वांमध्ये इंटरनेटचा सिंहाचा वाटा आहे. आज मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा प्रभावी वापर केला जात आहे .यामुळेच शैक्षणिक सामाजिक आर्थिक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आलेत. आपल्या घरात बसून जगाच्या कानाकोपर्यात पर्यंत एका क्षणात पोहोचण्याचे सामर्थ्य इंटरनेट मुळे मानवाला प्राप्त झाले.
छोट्या गावापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत समाजजीवन ढवळून टाकण्याचं काम समाज माध्यमांनी केले आहे. समाज माध्यमाद्वारे एकत्र आलेल्या जनतेने आपल्या देशातील हुकूमशाही राजवटी उलटून लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याचे काम अनेक देशात केले आहे. वेबपोर्टल हे त्यातीलच एक समाज माध्यम होय. समाजातील लक्षावधी लोकांशी संपर्क साधने यामुळे सहज शक्य होते. समाजातील आबाल थोरांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने बडगुजर प्राउड ग्रुप मधील नवयुवक यांनी तयार केलेल्या आणि अ. भा. ब. स. युवक समितीच्या अनमोल सहकार्याने “बडगुजर डाँट इन” वेब पोर्टल चे लॉन्चिंग 17 फेब्रुवारी 2019 रोजी पारोळा येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात करण्यात आले. या वेब पोर्टल चे ब्रीद वाक्य” एक समाज एक व्यासपीठ ” हे असून त्यामार्फत, समाज पुस्तिका, नोकरी विषयक माहिती, व मार्गदर्शन, बिझनेस डीरेक्टरी ,वधू-वर परिचय विभाग, न्यूज अलर्ट ,समाजातील डॉक्टर विषयक माहिती, समाज इतिहासाची माहिती, गावागावातील समाज मंडळ यांची माहिती,बडगुजर समाजातील तळागाळातील तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध ठिकाणी पोहोचवण्याचे उद्देशाने पोर्टलची निर्मिती झाली. आजच्या ऑनलाईन युगात आपला बडगुजर समाज ऑनलाइन एकमेकांशी जोडला गेला पाहिजे त्यासाठीच समाजाचे स्वतःचे हक्काचे व्यासपीठ म्हणून आपण “बडगुजर डॉट इन” ” एक समाज एक व्यासपीठ “हे वेब पोर्टल निर्माण करण्यात आले .आजच्या काळाची गरज ओळखून विवाह विद्यार्थी करिअर मार्गदर्शन नोकरीतील संधी व्यवसाय उद्योग मार्गदर्शन तसेच समाजाची डिरेक्टरी तयार करून गावागावातील शहरातील परदेशातील सर्व समाज बांधवांना एकमेकांच्या संपर्कात आणण्यासाठी तद्वतच समाजातील सामाजिक संस्थांची सामाजिक घडामोडींची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने टाकण्यात आलेले हे एक पाऊल होते.

आज हे बाळ एका वर्षाचे झाले आहे.या वेब पोर्टल मधील समाज पुस्तिकेत बरेच कुटुंबांनी माहिती भरली वर अपलोड केली आहे. अजूनही काही लोकांची माहिती भरायची बाकी आहे
# नोकरी विषयक :
या वेब पोर्टल मार्फत नोकरी विषयक माहिती आणि मार्गदर्शन या कार्यक्रमांतर्गत जळगाव येथे 4/11/2018 रोजी माननीय प्राध्यापक मधुकर कोटवे सर दिल्ली यांना बोलून समाजातील विद्यार्थ्यांना एमपीएससी यूपीएससी बाबत मार्गदर्शन करण्याचा एकमेवाद्वितीय असा कार्यक्रम घेण्यात आला. बडगुजर समाजातील तरुणांना मुलाखत कौशल्य अवगत व्हावे तद्वतच त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास व्हावा म्हणून अ भा बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड ग्रुप व पोर्टलच्या माध्यमातून पिंप्री तालुका धरणगाव येथे दिनांक 9 /12 /2018 रोजी प्राध्यापक मिलिंद बडगुजर प्राध्यापक नितीन बडगुजर आणि प्राध्यापक प्रशांत बडगुजर या त्रिवेदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना मुलाखत कौशल्यांचे बाळकडू पाजण्यात आले. अ भा बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड ग्रुप व वेब पोर्टल एवढ्यावरच न थांबता आजपर्यंत वेब पोर्टलच्या माध्यमातून वीस पेक्षा जास्त मुलांना नोकरी मिळवून देण्यात यशस्वी ठरली आहे यासोबतच 50 पेक्षा अधिक मुलांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यास मदत केलेली आहे वेब पोर्टलच्या माध्यमातून 400 पेक्षा अधिक नोकरीविषयक माहिती समाजातील बांधवांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य बडगुजर वेब पोर्टलने केलेले आहे .यासाठी स्वतंत्र ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे.
# बिझनेस डीरेक्टरी :
यातीलच एक अनोखा उपक्रम म्हणजे बिझनेस डीरेक्टरी होय. समाजात आज रोजी कार्यरत असलेल्या विविध क्षेत्रातील व्यावसायिक व उद्योजक बांधवांची माहिती आणि ऑनलाइन बिजनेस प्रमोशन या विभागामार्फत सदर बिझनेस डीरेक्टरी चे लवकरच प्रकाशन करण्याचा मानस आहे. यासोबतच यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांची माहिती देण्याचे कार्य या वेब पोर्टलमार्फत केले जात असते. समाजातील अत्यंत गरीब परिस्थितीतून आज रोजी नावलौकिक प्राप्त केलेल्या उद्योजकांच्या प्रेरक कथा प्रकाशित करण्यात येऊन त्यातून बडगुजर समाज बांधवांना तरुणांना उद्योजकाकडे वळण्यास प्रेरित केले जात असते .लवकरच बडगुजर समाजाचे पहिले व्यवसाय मार्गदर्शनपर शिबीर आयोजन करून समाजातून उद्योजक घडविण्याचा मानस आहे .यातही वेब पोर्टल नक्कीच यशस्वी होईल याची खात्री वाटते. कारण
“”सोच बदलो सितारे बदल जायेंगे
नजर को बदलो नजारे बदल जायेंगे
कश्तिया बदलने की जरूरत नही
दिशाये बदलो
किनारे अपने आप बदल जायेंगे
वरील उक्तीवरुन असे दिसून येते की विचारपूर्वक घेतलेला निर्णय योग्य दिशा देऊन मानवी जीवनात योग्य परिवर्तन घडवून आणतो. त्याप्रमाणे या वेबपोर्टलमुळे जीवनात विधायक परिवर्तन घडवून आणण्यात सिंहाचा वाटा असेल असे भासते .
# बडगुजर मॅट्रिमोनियल वेबसाईट :
ऑनलाइन मॅट्रिमोनियल वेबसाईट प्रमाणेच बडगुजर वेब पोर्टलच्या माध्यमातून व पुणे समाज मंडळाच्या सहकार्याने वधू-वर परिचय सुचक विभागातून लग्नायोग्य असलेल्या मुला-मुलींची ऑनलाईन माहिती जमा करून प्रकाशित करण्यात येत असते यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुयोग्य असा वर किंवा वधू आपल्या मुलामुलींसाठी शोधणे सोपे होत आहे दरवर्षी या वेबपोर्टल विभागात नवनवीन वधु-वरांची नोंदणी केली जात असते आता पर्यंत वेब पोर्टलच्या माध्यमातून ३० पेक्षाही अधिक संसार फुलले आहेत.
# सामाजिक बातमी आणि सामाजिक कार्यक्रम
या विभागातून समाजातील वेगवेगळ्या गावांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यक्रमांविषयी बातम्या, विवाह समारंभ, निधन वार्ता, वाढदिवस, तद्वत विविध प्रकारचे वैचारिक लेख, कविता, कथा, समाज विषयक बातम्या ,समाज बांधवांपर्यंत पोहोचविल्या जात असते. आज पर्यंत या विभागात एकूण ११९७ बातम्या प्रसारित करण्यात आलेल्या असून या बातम्यांचे १.७५ लाखा पेक्षा जास्त वेळा बघितले गेलेले व्यासपीठ, ४० हजारा पेक्षा अधिक व्हिजीटर्स लोकांनी सदर विभागास भेटी दिल्या असून अनेक बातम्यांना कमेंट सुद्धा पाठवल्या जात असतात. एक वाचक कमीत कमी चार बातम्या वाचतच असतो.
# डॉक्टर विषयक माहिती :
सामाजिक आरोग्याची काळजी घेण्याचे कार्य सुद्धा सदर वेब पोर्टलच्या माध्यमातून केले जात आहे. यात समाजातील कुठल्याही गावात किती बडगुजर डॉक्टर आहेत. त्यांची स्पेशालिटी काय आहे. तद्वतच समाज बांधवातील डॉक्टरांच्या क्लिनिक व मेडिकलची माहिती सुद्धा संकलित करण्यात येत आहे. यासोबतच समाजातील आरोग्यविषयक निकड असलेल्या गरीब बांधवांना पोर्टलच्या माध्यमातून मदत केली जाते. गरीब आँपरेशनचा खर्च पेलू न शकणाऱ्या समाजबांधवांसाठी आर्थिक मदतीचे आव्हान करून, त्यांच्या दुःखात समाविष्ट होण्याचा प्रयत्न केला जात असतो .
# सामाजिक माहिती, लेख, कविता :
आज रोजी समाजात अनेक शिक्षक प्राध्यापक डॉक्टर बांधव असून त्यांच्यामार्फत बडगुजर समाजाचा इतिहासाची माहिती , देवस्थान विषयक माहिती ,तद्वतच बडगुजर समाजातील विविध विषयांची माहिती वेब पोर्टलच्या समाज विभागातून मिळत असते .
# समाज मंडळांची माहिती :
यासोबतच गावागावांमध्ये स्थापन झालेल्या समाज मंडळाची माहिती सुद्धा वेब पोर्टलच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जात आहे.
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. अभय गौड यांनी समाज माध्यमांविषयी बोलताना म्हटले आहे
” सोशल मीडिया बन गया हे एक नया संसार
जिस्मे बढता जा रहा है सूचना का भंडार
सच झूठ से नही रहा अब कोई वास्ता
सबकी अपनी मंजिले सबका अपना रास्ता “
त्यांच्या कवितेच्या ओळी समाजवाद्यांच्या गैरवापर यांविषयी सूचित करते. मानवी जीवन सुकर करण्याकरता एखाद्या गोष्टीचा वापर विधायक पद्धतीने केला तर त्याचा परिणाम चांगला होतो तसेच एखाद्या गोष्टीचा वापर विघातक पद्धतीने केला तर त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होताना दिसतो म्हणूनच समाजातील सर्व लोकांनी स्वतःच्या भविष्याच्या पर्यायाने समाजाच्या भविष्याचा विचार करून या माहिती तंत्रज्ञानाचा वापर सद्सद्विवेक बुद्धीने केल्यास स्व विकासाबरोबरच समाज विकास साधणे सहज शक्य होईल.
” बडगुजर डॉट इन “या वेब पोर्टलने आज सद्सद्विवेक बुद्धी चा मार्ग समाजाला दाखवून विधायक कार्य करण्याचा वसा घेतलेला दिसून येतो यामुळे एक वर्षाचे झालेले हे बाळ येणाऱ्या भावी काळात लवकरच धावायला लागेल यात शंका वाटत नाही . कारण ” आधी केले मग सांगितले “या वाक्याने प्रेरित होऊन वेब पोर्टलचे काम सुरू आहे.यासाठी समाजातील वेगवेगळ्या कार्य क्षेत्रातील बाधवांची मदत व मौलिक मार्गदर्शन लाभत आहे. समाजातील प्रत्येकाला एक समान व्यासपीठ देण्याचे कार्य या माध्यमातून केले जात आहे .वेब पोर्टलच्या या कार्यास माझा त्रीवर मुजरा .पुढच्या भावी वाटचालीस अनेक अनेक शुभेच्छा धन्यवाद. – प्रा. मिलिंद बडगुजर, जळगांव


Leave a Reply