श्री. संजय रामदास बडगुजर हे जळगांव येथील रहिवासी असून राष्ट्रपती कडून रामायण ब्रेल लिपीत लिहल्याबद्दल समान्मित करण्यात आले आहे. त्यांना कविता लिहायला फार आवडते. त्यांनी लिहिलेल्या कविता पैकी एक कविता आपल्या सर्वांसाठी…
आतुरता आगमनाची..!
आतुरता आगमनाची मज समजतेय सारीl
येतोय मी घरी तुमची झाली का तयारीll
मान तुमचा राखण्यास मी पृथ्वीवर येतोl
पण लक्ष द्या जरा तुम्हास विनंती करतोll
इवल्या माझ्या डोळ्यांना भारीच होतोय त्रासl
किती गावे अंधारात थोपवा विजेचा ऱ्हासll
सुपाएवढ्या कानांनी मी आधीच झालोय बेजारl
ध्वनी प्रदूषण आवरा करा की सारासार विचारll
संवेदनशील सोंड माझी त्याने घुसमटतोय श्वासl
पहा उघडी गटारे नेमकी त्यावर असते आरासll
माझ्या तुंदील तनुला आता सोसवत नाही भारl
सोकावलेत उंदीर त्यांनी पुकारलाय असहकारll
चार जरी हात माझे तरी हतबल मी तुमच्यापुढेl
हात उठेना आशीर्वादास समजून घ्या हे कोडेll
दुखवायचे नाही कोणास माझा समजून घ्या भावl
गाऱ्हाणे मी ऐकेन तुमचे मात्र ठेवा शुद्ध भक्तिभावll
समाजाचे देणेकरी तुम्ही ठेवा जरा समाजीक भानl
उत्सवाने मिळवून द्या सकल जनांस समाधानll
~~~~~~
प्रा.संजय रामदास बडगुजर, स्वर-साधना,आदर्श काॕलनी, जळगांव.


Leave a Reply