व्यावसिकांनो उधारी टाळा ? – उद्योजक श्री. रविंद्र बडगुजर शिंदखेडा

भारतातील जवळ जवळ ३६% लहान व्यवसाय उधारीमुळे बंद पडतात, यात मुख्यत्वेकरून किराणा दुकान, बिल्डिंग मटेरियल, कृषी खते व औषधे इत्यादी अनेक प्रकारचे लहान मोठे व्यवसाय येतात. उधारीची सुरवात ही अगदी लहान प्रमाणात व वैयक्तिक ओळखीमुळे होते. व्यवसाय वाढावा म्हणून दुकानदार उधार देतो व शेवटी उधारी वसूल न झाल्यामुळेच व्यवसाय बंद करायची वेळ येते. या विषयावर काही मार्गदर्शक तत्त्वे व्यावसायिकांनी घालून घेतली पाहिजेत.
१) वैयक्तिक ओळख व घसट करू नका. ‘घोडा घाससे दोस्ती करेगा तो खायेगा क्या?’ व्यवसाय करत असताना ग्राहकांशी वैयक्तिक व खाजगी व्यवहार, बोलणे चालणे टाळा. तुम्ही व्यवसाय करण्यास बसला आहात, हे ओळखी व मैत्री वाढवायचे माध्यम नव्हे. पैसा हाच तुमचा मित्र हे लक्षात ठेवा.
२) कामाशिवाय बसू नये, व्यवसायाच्या ठिकाणी हा नियम तुम्ही लावा. ग्राहकांना त्यांच्या खरेदी व व्यवसायाव्यतिरिक्त बिनकामाचे फार वेळ बसू देऊ नये. यातूनच उधारीला सुरुवात होते.
३) स्पष्टवक्तेतपणा ठेवा. ‘विनंती केली आहे. आम्ही काय पळून जातो का? ऐवढा विश्वास नाही का?’ नम्रपणे हात जोडा व सांगा, ‘दोस्ती मेरे से करो, धंदे से नही. उधार मागू नका, मित्र म्हणून मी एक काय दोन वेळा चहा पाजतो.’
४) काही प्रमाणात व काही दिवसासाठी काही व्यवसायात उधारी द्यावीच लागते. उदा. कंपनीचे टेंडर, दुधाचा व्यवसाय, पेपर दूध इत्यादी. अशा उधारीचे प्रमाण एकूण व्यवसायाच्या उलाढालीच्या २५% हून अधिक नसावे म्हणजे काही प्रमाणात उधारी उशिरा वसूल झाली तर फारसा फरक पडणार नाही
५) वह्या भरलेल्या व गल्ला मोकळा. काही जणांची मी हास्यास्पद परिस्थिती पाहतो. उधारीच्या वह्या भरलेल्या, एकूण १० लाख येणे आहे पण आज गल्ल्यात ५ हजारही नाहीत. खेळता पैसा नसल्यामुळे धंदा ठप्प झालेला असतो.
६) प्रत्येक ग्राहकाची उधारी पेलण्याची ऐपत लक्षात ठेवून उधारी द्या. एखाद्याच्या दोन महिन्याच्या कमाईपेक्षा जास्त उधार देऊ नका. पहिली उधारी दिली नसेल, तर इथून पुढे रोखीने व मागची उधारी घ्या. त्याला २ ते ३ टप्पे करा.
७) कोणत्याही सबब पुराव्याशिवाय उधार देऊ नका. उदा. पी.डी.सी चेक, कायमचा पत्ता, नोकरीचे ठिकाण इत्यादी. स्वत:कडे जेवढे भांडवल असेल तेवढ्याचीच उधारी करा, बाजारातील उचललेल्या मालावर उधारीचा धंदा करू नका, नाहीतर दोन्हीकडची पण जाईल. उधारीची भीड चेपत नसेल, तर धंदाच करू नका; कारण तो निश्चित नुकसानीचा मार्ग आहे.

श्री. रविंद्र बडगुजर, उद्योजक, शिंदखेडा सदस्य, अ. भा. ब. स. युवक समिती

आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*