माझ्या कंपनीचे मालक…रॉबर्ट बॉश
स्मृतिदिन :- बॉश कंपनीचे संस्थापक रॉबर्ट बॉश…
जाणून घ्या या जगप्रसिद्ध कंपनीविषयी…

जर्मनीच्या स्टुटगार्टमध्ये सगळी अभियंता मंडळी नवनव्या मोटारींच्या प्रेमात पडत असताना शुद्ध अभियांत्रिकीच्या प्रेमापोटी एक तरुण धडपडत होता. मोटारींसाठी लागणारे सुटे भाग, इंजिनाच्या जोडण्या, वेगवेगळय़ा इंधनांच्या इंजिनांसाठी लागणारे वेगवेगळे भाग.. या सगळय़ाचा त्याला नाद होता. त्यासाठीच त्यानं आपली स्वत:ची अशी वेगळी कंपनीच काढली १८८६ साली. आज १२५ वर्षांनंतरही ही कंपनी अधिकाधिक तरुण होत चालली आहे. ती स्थापन करणाऱ्याचं नाव रॉबर्ट बॉश आणि कंपनी अर्थातच बॉश लिमिटेड.
हिचा जन्मही स्टुटगार्टमधलाच. गावाच्या मध्यभागी कंपनीचं मुख्यालय आहे. तिथून जवळच टेकाडावर कंपनीनं गावासाठी काढलेलं रुग्णालयही आहे. कंपनीच्या मुख्यालयाचा फेरफटका म्हणजे मानवी मनाच्या कल्पनाशक्तीला बहुरूपात भेटणं आणि तिचा आवाका पाहून चकित होणं. साधी दुचाकी असो वा श्रीमंती गाडय़ा, विमानांच्या इंजिनाचे भाग, बॉशमध्ये बनत नाही असं काही नाहीच. भर अर्थातच इंजिनाशी संबंधित काही ना काही बनवण्यावर. जर्मनी आणि एकंदर युरोपातच पर्यावरण जागृती जरा अतिच असते. म्हणजे अर्थातच आपल्या दृष्टीनं तर बॉश आता दुचाकींवर काम करत आहे. अत्यंत छोटी, हलकी अशी इंजिनं या कंपनीनं तयार केलीत. ती बसवून वेगवेगळय़ा आकारांच्या ज्या काही दुचाकी केल्यात त्याला तोड नाही. तासाला २५ किमी इतक्या आणि इतक्याच वेगानं या दुचाकी चालवता येतात. वेग २५ किमीच का, २६ का नाही? तर तसं केलं तर तीमधून कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण वाढतं आणि मग त्यासाठी वाहतूक खात्याची.. म्हणजे आपल्या कडच्या आरटीओची.. वगैरे परवानगीचं झंझट मागे लागतं. त्यामुळे सर्व दुचाक्या २५ किमी प्रति तास ही मर्यादा पाळणाऱ्या. त्यांचं इंजिन हे इंजिन वाटतच नाही. आवाजच नाही त्याचा. आणि इंधन? एक तर सूर्यप्रकाश. पण युरोपात तो हिवाळय़ात नसतो. तेव्हा त्या काळात चक्क बॅटऱ्या. त्यासुद्धा दुचाकी चालते तशतशा आपोआप चार्ज होत जातात. आमचं गाव इतकं उंचसखल आहे.. अगदी आरामात वापरतो आम्ही या दुचाकी गावभर भटकायला..
बार्बरा झेलेनी अभिमानानं सांगत होत्या. बॉशच्या जागतिक पातळीवरच्या त्या जनसंपर्क प्रमुख. बॉश आता पोर्शे आणि फोल्स वॅगन यांच्यासाठी आणि सहाय्यानं तेल इंधन आणि विजेऱ्या यावर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याच्या कामात गुंतलंय. अशा मोटारींचं प्रारूप तयारही झालंय. एकदा वीज भरली की तीनशे किलोमीटर बघायला नको. त्या विजेवर चालणाऱ्या मोटारीतून फेरफटका मारून चाचणीही घेता आली. मोटार चालू आहे की बंद.. हेही कळत नाही इतकं मुलायम इंजिन. बॉशचा प्रयत्न आहे. पेट्रोलपंपासारखी वीजभरती केंद्र तयार करायची. नाक्यावर ट्रकचं कसं वजन होतं तशा या वीजभरती केंद्रात पट्टय़ा असणार.. गाडी नुसती त्यावर उभी करायची. बॅटऱ्या आपोआप चार्ज. पुढच्या पंचवीस वर्षांत तेल आणखीनच महाग होईल. तोपर्यंत आमच्या या गाडय़ांना चांगलीच किंमत आलेली असेल, बार्बरा म्हणाल्या.
पुढचं त्यांचं विधान जागं करणारं होतं. त्या म्हणाल्या. इथल्या प्रत्येक संशोधनाचं पेटंट आम्ही घेत असतो. साधारण दिवसाला सरासरी ३० या गतीनं जगभरात ठिकठिकाणी बॉशच्या नावावर पेटंट्स जमा होत असतात. एकटय़ा २०१० सालात फक्त आम्ही ३८०० पेटंट्स मिळवली. यंदा हा आकडा पार होईल.
आपल्या अख्ख्या देशात घेतल्या जाणाऱ्या पेटंट्सची संख्या सांगायला तीन आकडेच पुरतात.
बॉश # रॉबर्टबॉश
Robert Bosch
Bosch Business

लेख – श्री. महेश रामकृष्ण बडगुजर, नाशिक

Leave a Reply