युवा शक्ती – एक तळपता सूर्य -लेखक श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

युवा शक्ती – एक तळपता सूर्य

  "म्यानातुन उसळे तलवारीची पात   
   वेडात मराठे वीर दौडले सात"

हे स्फूर्तीगीत ऐकल्यावर आजही अंगात रक्त उसळल्याचा भास होत अशाच एका उत्तुंग ध्येयाने छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या तरुण, उत्साही मावळ्यानी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि शूर पेशव्यांनी त्या साम्राज्याची पताका अटकेपार फडकवली, ती या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने ! आजच्या तरुणांनी आपल्या वयात छत्रपती शिवाजी महाराज काय करीत होते, एवढा जरी इतिहास धुंडाळला तरी आपण कुठे चुकतो आहोत ते कळायला वेळ लागणार नाही. अनुकरण कोणाचे करावे व कोणाचे करू नये? याचा विचार केला पाहिजे. अपयश आल्यावर व्यसनाधीन होण्यापेक्षा आज आपल्याच वयाचे अनेक उत्तुंग यश मिळवणारे तरुण आपल्या सभोवती आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही कृती करणे आवश्यक आहे. आपल्या क्षमतांची अचूक चाचपणी करून योग्य मार्ग निवडणे आणि प्रयत्नांची पराकाष्टा करणे, अपयशाने खचून न जाता नव्या जोमाने अपयश ही यशाची पहिली पायरी आहे या न्यायाने पुढील मार्ग निश्चित करणे हे आजच्या युवा पिढीसाठी, त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी आवश्यक आहे. केवळ नोकरी हेच आपल्या प्रगतीचे निकष नसून अनेक वाटा आपल्याला खुणावत आहेत. यासाठी युवकांनी सर्वांगीण प्रगती करण्यासाठी सर्व दिशांनी जागरूक राहणे आवश्यक आहे.

सावरकरांनी समुद्रात मारलेली उडी स्वामी विवेकानंदांचे बंधू व भगिनींनो” हे दोन शब्द संपूर्ण जगाला बदलवू शकतात, आजही प्रेरणा देतात. अशा अनेक प्रेरणादायी ऊर्जा स्थानांचे उगमस्थान असलेल्या आपल्या भारत देशातील युवाशक्ती सुप्त कशी राहू शकते. आजही जगाचे नेतृत्व करण्याची ताकद आपल्या देशातील युवा पिढीमध्ये आहे. कोणत्याही देशाची ताकद ही त्या देशातील युवा पिढी ठरत असते. त्यामुळे आज युवकांच्या हातात काय आहे? हे आपल्या लक्षात येईल.

“केवळ शिक्षण उच्च शिक्षण, परदेशातील शिक्षण, परदेशातील नोकरी, गडगंज कमाई म्हणजेच यश” ही सध्या केली जात असलेली यशाची, प्रगतीची व्याख्या पण अर्थातच पूर्ण सत्य नाही.

भगतसिंग, राजगुरू यांची देशाला ‘स्वातंत्र्य’ मिळवून देण्याची इच्छा त्यांना मृत्यूला कवटळण्याची सहज प्रेरणा देते तर नेताजी सुभाष चंद्र बोस हे ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ अशी ग्वाही एका वेगळ्याच प्रेरणेने देतात. स्वतःवरच्या आत्मविश्वासाने देतात. या प्रेरणा असलेल्या देशांमध्ये युवाशक्ती म्हणजे एक अतिशय प्रचंड, प्रभावी ऊर्जेचे माहेरघरच म्हणता येईल!

केवळ पैसा, संपत्ती ही आयुष्याच्या शेवटी समाधान देऊ शकत नाही, अशी अनेक उदाहरणे आपण आजूबाजूला पाहतो. ‘रतनजी टाटां’सारखे उत्तुंग व्यक्तिमत्व आजच्या तरुण पिढीचे प्रेरणास्थान असायला हवे. आज ज्या व्यक्तींची नावे आदराने घेतली जातात त्यांनी केवळ गडगंज संपत्ती कमावलेली नाही. पण त्यांचे कर्तृत्व हे सुद्धा अविस्मरणीय आहे. असं काहीतरी अविस्मरणीय करायचे म्हणजे त्यासाठी ‘ध्येय आणि ध्यास’ हवा. ध्येय उत्तुंग हवे आणि ध्यास पराकोटीचा हवा तरच काहीतरी उच्च कोटीचे घडते आणि वर्षानुवर्षे, पिढ्‌यानपिढ्या स्मरणात राहते.

वाल्मिकींचे रामायण, व्यासांचे महाभारत, श्रीकृष्णांची भगवद्‌गीता, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, समर्थ रामदासांचे दासबोध ही अशीच उदाहरणे आहेत. हे आपल्या मातीतले ज्ञानग्रंथ संपूर्ण जगाला मार्गदर्शन करतात. पण आपण मात्र त्यापासून दूर आहोत याचं काही प्रमाणात दुःख वाटते.

राजे, राज्य आणि त्यांचे साम्राज्य ही संकल्पना कधीच ह‌द्द‌पार झाली आहे. आता संपूर्ण विश्व कवेत घेईल आणि संपूर्ण विश्वावर अधिराज्य करेल अशा विश्वगुरूची संपूर्ण विश्वाला गरज आहे. असा विश्वास जगाला देण्याचे सामर्थ्य अर्थातच आपल्यामध्ये आहे. मात्र त्यासाठी आजच्या तरुण पिढीचा सहभाग, सहकार्य आवश्यक आहे. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या न्यायाने ‘हे विश्वचि माझे घर’ हे ध्येय साध्य करण्यासाठी

आजचा तरुण पेटून उठला पाहिजे. तरच हे ज्ञानकुंड आणि कर्तुत्वाचे अग्नीकुंड धगधगत राहील आणि त्याच्या प्रकाशाने संपूर्ण विश्व उजळून उठेल.

आज आपला देश महान महाशक्ती बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे.

अर्थात त्यासाठी देशातील युवाशक्ती हेच आशास्थान आहे. भारताचे नेतृत्व विश्वगुरु बनू शकते हा विश्वास जवळजवळ संपूर्ण जगामध्ये कोरोना काळापासूनच निर्माण झाला आहे. फक्त हा विश्वास टिकवण्याची आवश्यकता आहे आणि हे स्वप्न साकार करण्याची गरज आहे. ते फक्त आजचा तरुणच करू शकतो. आजच्या प्रत्येक तरुणाने सूर्याकडून प्रेरणा घेऊन म्हणायला हवे,

तू सूर्य

मी पृथ्वी

तू तेज

मी अंधःकार

तू सावकार

मी भिकारी

तू फूल

मी काटा

तू श्वास

मी उच्छ्‌वास

तू जीवन

मी मृत्यू

तू अनंत

मी शून्य

तू सर्वस्व

मी तुच्छ

तू पूर्ण

मी अपूर्ण

तू ज्ञानियांचा राजा

मी शतमूर्ख

म्हणूनच तू देत रहा

मी फक्त घेत राहील

घेता घेता कधी तरी

मी पण एक सूर्य होईन.

अशाप्रकारे आकाशाला गवसणी घालण्याचे ध्येय उराशी बाळगून ते साकार करण्याची ताकद आजच्या तरुणाईत आहे. गरज आहे ती फक्त हे स्फुल्लिंग चेतवण्याची! आणि आज या महामेळाव्याच्या निमिताने हे साध्य होईल हीच अपेक्षा! प्रत्येक तरुणाचा एक तळपता सूर्य होण्यासाठी अनंत शुभेच्छा !!

लेखक : कैलास विमल भाऊलाल बडगुजर टिटवाळा (पूर्व) भ्रमणध्वनी : 8888284265

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*