बाप
बाप म्हणा की वडील संस्कारांनी घडविलं
लक्ष वेळोवेळी दिलं, सुशिक्षित आम्हा केलं
जणू दिव्याचा प्रकाश, जळतो हा अहर्निश
आम्हा पाहूनी संतोष होतो मनामध्ये खूप
रडतांना अश्रू नाही दुःख गिळतच राहील
संकटाला तोंड देई, संयमाचा वाट पाही
फक्त श्रोता ही भूमिका तोंड बंद जणू मुका
सहनशक्तीचा ठेका, असा बाप हा अनोखा
देतो सर्वांना प्राधान्य, सर्व करतो हा मान्य
मानतो स्वतःला धन्य, असा बाप हा सामान्य
जुने घालतो कापडं, धोतराला ते ठिगळं
शर्ट, पॅन्ट नाही धड, वाढीसाठी एकच ब्लेड
चिंता कुटूंबाची खूप, कष्ट करतो अमाप
कधी आला ही संताप, शांत होतो आपोआप
असा बाप ही गरीब, रात्रंदिन राबराब होते तब्येत खराब, अंधारात घेतो ऊब आई शोभते घरात, बाप बाहेरचा प्रांत समान हे तंतोतंत, नाही तुलना दोघांत
आई सारखाच बाप, सांभाळतो सर्व व्याप
तराजूत मोजू माप, तेव्हा कळतो हा बाप
किती करू हे वर्णन बाप विना सर्व उणं
शाई जाईल संपून, नसे अंत या कवनं
मन सागरा समान, उंची आकाशाप्रमाणं
असा बाप हा महान, निंबा करतो वंदन
लेखक :-
श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल
भ्रमण ध्वनी – 96370 79688


Leave a Reply