नवे वर्ष नवा संकल्प – लेखक श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

नेमेचि येतो पावसाळा… याचप्रमाणे दरवर्षी येणारा गुढीपाडव्याचा दिवस! दरवर्षी प्रमाणे याही वर्षीचा पाडवा काही दिवसांवर येऊन ठेपला. पण नेहमीप्रमाणेच नव्या वर्षाचा नवा संकल्प, हा काही अजून ठरला नाही. तसे दरवर्षी अगदी मनापासून वाटते, यावर्षी काहीतरी नवीन संकल्प करावा आणि तसा तो आपण करतो सुद्धा! पण नेमकी ‘माशी कुठे शिंकते’ कुणास ठाऊक पण तो संकल्प काही वर्षभर टिकत नाही. मात्र आता यावर्षी काहीतरी संकल्प अर्थात वर्षभर टिकणारा संकल्प करायचा विचार केला आहे. काय बरं करावा??
तसे करण्यासारखे बरेच संकल्प आहे. एक सोपा संकल्प म्हणजे पाण्याचा वापर कमी करणे गरज नसताना बेसिन मधला नळ चालू न ठेवणे बाथरूम मध्ये आंघोळ करताना शॉवर ऐवजी बादलीचा वापर करणे. कपडे धुताना ते नळाखाली धुण्याऐवजी बादलीचा वापर करून धुणे. तहान लागली असेल तेवढेच पाणी पिण्यासाठी घेणे, उरलेले पाणी बेसिन मध्ये टाकण्याऐवजी कुंडीतील झाडांना टाकणे. थोडक्यात पाण्याची बचत करणे. आपल्या घरापर्यंत येणारे शुद्ध पाणी किती महत्प्रयासाने आपल्यापर्यंत पोहोचते, याचे महत्त्व कळण्यासाठी वाळवंटी प्रदेशात किंवा पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या प्रदेशात पाणी मिळणे किती कठीण आहे याची माहिती घेणे आवश्यक आहे. तेव्हा आपला पाण्याचा अमर्याद वापर कसा चुकीचा आहे ते कळेल. म्हणून हा पाण्याची बचत संकल्प करण्यास हरकत नसावी.
तसे पाहिल्यास वेळेची बचत हा सुद्धा संकल्प होऊ शकतो. त्यासाठी आपण वेळेचा अपव्यय कसा करतो हे समजून घेणे आवश्यक ठरेल. जन्म आणि मृत्यू हा प्रत्येक सजीवाच्या आयुष्यातील एक अपरिहार्य भाग आहे. प्रत्येक जीव जन्माला येतो, जीवन जगतो आणि मरतो. तसेच माणूस सुद्धा जन्माला येतो, जीवन जगतो आणि मरतो. पण यामध्ये फरक असतो. मानवाला आपले जीवन सार्थक करता येते तसे इतर प्राण्यांच्या बाबतीत ही संधी खूप कमी असते. प्रत्येक मानवाला आपल्या जीवनाची दिशा ठरवण्याची संधी असते. आपल्याला मिळालेले आयुष्य कसे व्यतीत करायची मिळालेली वेळ कशी वापरायची याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. मोबाईलवर तासंतास निरुपयोगी बडबड करणे, किंवा अनेक प्रकारे मोबाईलचा निरर्थक वापर करणे, यापेक्षा उपलब्ध वेळेचा सत्कार्यासाठी उपयोग केल्यास नक्कीच महान कार्य घडून येईल. म्हणूनच शक्य असेल तेवढी वेळेची बचत करून ती वेळ जास्तीत जास्त चांगल्या कार्यासाठी वापरणे म्हणजे आपल्या आयुष्याचे सार्थक होईल नाही का??
तसा आणखी एक संकल्प करण्यास हरकत नसावी तो म्हणजे पैशाची बचत तसे पैशाचे महत्व कळलेले नाही असा मनुष्य सापडणे हल्ली कठीण आहे. याच पैशाला अति महत्व दिल्यामुळे हल्लीच्या काळात बऱ्याच प्रमाणात माणसांमधील नाती कमी होत आहेत, असे दिसते. हल्ली पैशाचे महत्त्व कळून सुद्धा त्याचा वापर अनिवार्य वाढला आहे. घरामध्ये निरर्थक वस्तूंचा संग्रह वाढत आहे. बाजारात आलेली प्रत्येक वस्तू आपल्या घरी पाहिजेच असा अट्टाहास दिसून येतो. हे जर कमी केले तर बरेच प्रश्न सुटतील. मला वाटते गरीबी सुद्धा कमी होईल. अगदी EMI भरून वस्तू घेण्याची उठाठेव न करता गरज असलेलीच वस्तू पैशाची बचत करुन घेतली तर आपण स्वावलंबी होऊ शकतो.
आणखी एक संकल्प हा विद्यार्थ्यांबाबत आहे. हल्ली दरवर्षी नवीन पुस्तके, वह्या घेण्याची पद्धत आहे. पूर्वीच्या काळी एकच पुस्तकांचा संच पुन्हा पुन्हा वापरण्यात येत असे. त्यात काही वावगे नसावे. नवीन पुस्तक आणि जुने पुस्तक यामधून मिळणाऱ्या ज्ञानात काही फरक असतो, असे मला वाटत नाही. मात्र नवीन पुस्तकांच्या अट्टहासामुळे दरवर्षी लाखो पुस्तक छापली जातात आणि जुनी पुस्तकं रद्दीत दिली जातात. त्यांचा सदुपयोग ही केला जात नाही. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवले जात नाही. याचप्रमाणे वर्षाचे शेवटी वह्या सुद्धा कोरी पानं असताना सुद्धा तशाच रद्दीत दिल्या जातात. मात्र इतर वेळी झाडे लावा, झाडे वाचवा असा संदेश दिला जातो पण वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी किती झाडांचा बळी जातो हे मात्र कुठेही विचारात घेतले जात नाही. यासाठी पालक विद्यार्थी व शिक्षक यांनी जागरूकता दाखवणे आवश्यक आहे. पुस्तकांचा पुनर्वापर, वह्यांचा वापर करताना पानांची बचत करणे व वह्यांच्या उरलेल्या पानांचा वापर पुरेपूर करणे हे आवश्यक ठरते. थोडक्यात कागदांची बचत हा सुद्धा एक संकल्प ठरू शकतो.
तसेच जागेची उपलब्धता व आवड असल्यास झाडे लावा, झाडे जगवा हा सुद्धा एक उपयुक्त संकल्प आहे.
आणखी एक संकल्प सुचवता येईल तो म्हणजे विजेची बचत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि रात्री झोपल्यावर सुद्धा सकाळी उठेपर्यंत आपल्याला विजेचा उपयोग होत असतो. प्रकाशासाठी लाईट, ट्यूबलाइट, हवेसाठी पंखा, एसी, कुलर, किचनमध्ये फ्रीज, तसेच कॉम्प्युटर आणि सर्वात जास्त वापर असणारा मोबाईल यासाठी आपल्याला विजेची सतत गरज असते. मात्र हा वापर करत असताना आपण बऱ्याच प्रमाणात विजेचा गैरवापर किंवा अपव्यय करत असतो. अगदी आपल्या घरापासून सुरुवात केल्यास मोबाईल चार्जिंग पूर्ण झाल्यावर बऱ्याचदा आपण मोबाईल काढून घेतो पण स्विच ऑफ करण्याची तसदी घेत नाही. पंखा, ट्यूबलाईट बऱ्याच वेळा गरज नसताना सुद्धा चालू असतात. आपण एका खोलीत असताना दुसऱ्या खोलीतील पंखा, लाईट चालू असतात असे अनेक उदाहरणे सांगता येतील. शाळा, सरकारी ऑफिस यामध्ये तर कोणाला काही त्याचे देणेघेणे नसते. विजेचे बिल आपल्याला भरायचे नसते. त्यामुळे अशा ठिकाणची लाईट, पंखे बंद करण्याची तसदी कोणीही घेत नाही. पण पर्यायाने भविष्यातील विजेच्या कमतरतेला किंवा विजेच्या दरवाढीला अप्रत्यक्षपणे प्रत्येकजण जबाबदार ठरतो.
त्यामुळे विजेची बचत करण्यास प्रत्येकाने हातभार लावण्यास काही हरकत नसावी. जिथे शक्य असेल तिथे एक स्विच ऑफ करणे फार कठीण काम नाही. पण त्यामुळे होणारी विजेची बचत ही आपल्याला उज्वल भविष्याकडे नेऊ शकते.
तसाच आणखी एक संकल्प सांगता येईल तो म्हणजे अन्नाची बचत तसे पाहता ही काय बचत करण्यासारखी गोष्ट आहे का? तर होय, बऱ्याचदा आपण अन्न वाया घालवतो. आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न बनवले गेल्यामुळे ते वाया जाते. तसेच उरलेल्या शिल्लक अन्नाची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यामुळे अन्न वाया जाते. अन्नधान्याचे उत्पादन करताना करावे लागणारे कष्ट, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, नैसर्गिक आपत्ती याची सर्वांना प्रत्यक्ष कल्पना नसल्यामुळे अन्न सर्रास वाया घालवले जाते. लग्न समारंभ किंवा सार्वजनिक कार्यक्रमात आपल्याला हे सर्वत्र आढळून येते की ताटात घेतलेले सर्व अन्न खाल्ले जात नाही व त्यामुळे वाया जाते. त्यामुळे ताटात घेतानाच ते आवश्यकतेनुसार घ्यायला हवे. यालाच अन्नाची बचत म्हणता येईल. घरोघरी अन्न तयार करताना गरजेपुरतेच अन्न तयार केल्याने अन्नाची बचत होते. तसेच उरलेले अन्न कचऱ्यात टाकण्याऐवजी गरजू भुकेल्यांना दिले तर त्यामुळे त्यांची भूक भागेल.
अशा प्रकारे अन्न बचत म्हणजे एका अर्थाने अन्न निर्मितीच होय.
दुसरी एक हल्ली वाढत चाललेली सवय म्हणजे कचरा निर्मिती! कोणत्याही वस्तूचे काम झाले की कचऱ्यात टाकणे, ही हल्ली अभिमानाची गोष्ट मानली जाते. भौतिक सुखवस्तु परिस्थितीमुळे कोणत्याही वस्तूचे महत्त्व टिकून राहत नाही आणि पैशाच्या जोरावर आपण पाहिजे तेव्हा पाहिजे ती वस्तू विकत घेऊ शकतो या प्रवृत्तीमुळे कोणतीही वस्तू सांभाळण्यास कोणीच तयार नाही. त्यामुळे कचरा वाढत चाललाय. ही मोठी समस्या निर्माण होत आहे. तसेच कचऱ्याचे योग्य वर्गीकरण न केल्यामुळे कचऱ्याची व्याप्ती वाढत आहे. कागद, प्लास्टिक, काच, प्लास्टिक पिशव्या इत्यादी स्वरूपातला कचरा पुनर्वापर करता येतो पण त्यासाठी त्याचे वर्गीकरण करून योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे बऱ्याच ठिकाणी यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात परंतु मिळणाऱ्या थंड प्रतिसादामुळे ते तितकेसे यशस्वी होत नाही यासाठी प्रत्येकाने कचरा कमी करणे, त्याचे वर्गीकरण करून योग्य विल्हेवाट लावणे हा संकल्प केल्यास सुद्धा कचरा समस्येवर तोडगा निघेल.
आणि आता सर्वात शेवटचा पण महत्त्वाचा एक संकल्प सुचवावासा वाटतो, तो म्हणजे वाचनाचा संकल्प. कोणत्याही वयोगटातील माणसासाठी वाचन हा एक जीवाभावाचा मित्र ठरू शकतो. लहान मुलांसाठी गोष्टीचे पुस्तके, गमती जमती, शाब्दिक कोडी, गणिती कोडी, विज्ञान खेळ अशी पुस्तके वाचल्याने त्यांचे ज्ञान वाढते, विकास होतो, अभ्यासात गोडी निर्माण होते आणि पर्यायाने प्रगती होते. तरुण वयोगटांमध्ये विविध क्षेत्रांमधील प्रेरक कथा या तरुणांना त्या क्षेत्राकडे आकर्षित करतात, प्रोत्साहित करतात, प्रेरणा देतात. यामुळे तरुणांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळते. निराशावादी वातावरणातून आशावादी, उत्साहवर्धक वातावरणाकडे जाण्यासाठी वाचन हा अति उपयुक्त मार्ग ठरतो.
मोठ्या वयोगटासाठी विरंगुळा, ज्ञानसंवर्धन व ज्ञान संक्रमणासाठी वाचन हे उपयुक्त ठरते. अडीअडचणीचे प्रसंग, त्यातून आलेली निराशा, यातून बाहेर येण्यासाठी वाचन हे उपयुक्त ठरते. तसेच भौतिक सुखाच्या मृगजळामागे न धावता सरतेशेवटी प्रत्येकाला अध्यात्मिक शांतीची आवश्यकता असते. त्यासाठी विपुल प्रमाणात आध्यात्मिक साहित्य उपलब्ध आहे. पण वाचन करणारे मात्र दूर्मिळच! त्यामुळे या खऱ्या सुखापासून आपण दूरच राहतो. म्हणूनच वाचन संकल्प हा आपल्या आयुष्याच्या कर्तुत्वाचा कळस ठरू शकतो.
तसे अनेक संकल्प सुचवता येतील. सुचवणे सोपे असले तरी प्रत्यक्ष अंमलात आणणे कठीण आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली आवड, सवड व निवड, यानुसार उपलब्ध वेळ, गरज, उपयुक्तता (स्वतःला आणि इतरांना) यानुसार योग्य संकल्प निश्चित करून तो वर्षभर अंमलात आणण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!!

लेखक :-

श्री. कैलास भाऊलाल बडगुजर
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*