नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग ७७
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला कनक धारा या गावातील वॉशिंग मशीनचा आलेला अनुभव सांगितला. सतराच दिवस आधी ज्या घरचा करता सवरता पुरुष काळाने ओढून नेला होता त्या घरी आम्हाला मिळालेली अतिशय प्रेमाची वागणूक आणि तशाही परिस्थितीत संयमानं वागणारी घरची मंडळी यांच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. आता इथून पुढे जाऊयात.
मोहतरा, गाडा सराय, बोंदरगाव, सूनिया मार ,ही गावं पार करत करत आम्ही खरगहना येथे पोहोचणार होतो. बोंदरगाव चा एक अनुभव सांगते.मला वाटतं मागे कुठल्यातरी भागात मी या अनुभवाचा उल्लेख केलेला आहे. बोंदरगाव इथे आम्ही एका झाडाखाली विश्राम करत बसलो होतो. त्याच झाडाखाली काही लहान मुले खेळत होती. आम्ही त्या लहान मुलांचा खेळ बघत होतो. परिक्रमावासींना बघितलं की “नर्मदे हर” करायचं आणि टॉफी मागायची हा नर्मदा किनारी लहान मुलांचा चालणारा खेळच जणू. ह्या लहान मुलांनी देखील आम्हाला “नर्मदे हर” केलं आणि आमच्याकडे टॉफी मागितल्या. मात्र यातली एक लहान मुलगी आमच्याकडून टॉफी घ्यायला तयार नव्हती. ती मला पाहून ढसढसा रडू लागली. तिला असं रडताना बघून मलाही रडायला आलं. ती मला बिलगुन रडु लागली. आम्ही तिला तिच्या घरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे तिच्या घरी गेलो. ती मुसलमान धर्माची. तिच्या आईने सांगितलं की गेल्या तीन दिवसांपासून ती कोणाची तरी वाट बघत होती. “मेरी मा ने वाली है” असं म्हणत होती. ह्या मुलीच्या घरी आम्ही गुळाचा खडा पाणी आणि चहा प्यायलो. तिला खूप खूप आशीर्वाद दिलेत.तिचं माझं मागच्या जन्मीचं काय नातं असावं माहित नाही, पण परिक्रमेत अशाप्रकारचे दोन-तीन अनुभव आलेत हे मात्र खरं. माझे मागे सुटलेले किंवा मला मागे सोडलेले कुठलेतरी जीव माझ्या भेटीसाठी,काही कारणास्तव असेल कदाचित, पण अडकून होतेत… कदाचित माझ्या किंवा त्यांच्या, पुढल्या जनमांतही ही एक भेट तेवढी घडून यायची होती असं असेल, पण ती भेट घडून आली आणि त्या चक्राला पूर्णविराम मिळाला हे मात्र नक्की. एक मात्र अगदीच लक्षात घेण्यासारखं आहे ते असं की असे अनुभव मला आले त्यावेळी मला भेटणाऱ्या चारही व्यक्ती या लहान मुलांच्या रूपात होत्या. एक छोटसं बकरीच पिल्लू ही होतं. स्वतःच्या आईकडे न जाणारं आणि माझ्याकडून दुसरीकडे कुठेही न जाणारं एक आठ महिन्यांचं बाळ होतं… विक्रमपूर जवळ भेटलेला साडेतीन चार वर्षाचा मुलगाही मला सोडायला तयार नव्हता… या सगळ्यांचं आणि माझं काय नातं होतं माहित नाही कारण आत्ताच्या म्हणजे ह्या जन्मात तरी त्यांची माझी पुन्हा भेट होईल याची शाश्वती देता येत नाही… असो असे प्रश्न फक्त सोडून द्यायचे असतात.
आम्ही पुढे निघालो. अगदी पुढचं गाव सुनिया मार. इथे एका बाईंनी आम्हाला चहासाठी बोलावलं. तिच्याकडे समोर छोटसं अंगण होतं तिथे विश्रामा साठी थांबलो. आतून एक सतरा-अठरा वर्षांची तरुणी बाहेर आली. आम्हाला म्हणाली “कुछ कपडा वगैरे सिलना हो तो बताओ मै टेलर हू”… मी तुम्हाला मागच्या भागातच सांगितलं होतं की मला लुंग्या शिवून घ्यायच्या आहेत आणि आज टेलर शोधून त्या शिवून घेऊ असं ठरवलं होतं. माझ्या दोन्ही लुंग्या काठापासून फाटत आल्या होत्या. त्या ताबडतोब शिवणं गरजेचं होतं. आम्हाला टेलर शोधायची गरजच पडली नाही. जिथे आम्हाला विश्रांतीसाठी, चहासाठी बोलावलं ते घरच मुळी टेलरचं निघालं… लुंग्या शिवून झाल्यात… त्या कापाव्या लागल्या त्यामुळे त्या उंचीला कमी झाल्या, म्हणून या तरुणीने लुंगीला स्वतःजवळ कापड जोडून दिलं. एरवी एखाद्या टेलर न प्रोफेशनॅलिझम चा विचार केला असता, मात्र या तरुणीने मला न विचारताच, फक्त माझी गैरसोय होऊ नये यासाठी कुठलसं कापड वरच्या काठाला जोडून , लुंगी ची उंची आधी सारखी केली आणि अशी तयार लुंगी मला दाखवायला बाहेर घेऊन आली. जेव्हा इतकी आपुलकी, इतकं प्रेम, समोर येतं तेव्हा त्याची पैशात मोजणी करणं म्हणजे शुद्ध अपमान करणं आहे…. पण त्याची किंमत ही जाणिवेतून ठेवायला हवी…. अशावेळी परिक्रमावासी हा माईच्या आणि त्या तिच्या लेकरांच्या ऋणातच राहतो… तरीही फुल ना फुलाची पाकळी.. किंवा “टोकन ऑफ लव” म्हणू हवं तर, असं काहीतरी करायची प्रचंड इच्छा होत असते. तुम्हाला इच्छा झाली आणि मैय्या ने पूर्ण केली नाही असं होतच नाही… इथेही तसंच झालं. बोलता बोलता या तरुणीचं लग्न ठरलं असल्याचं समजलं. तिचा भाऊ शहरातून खरेदी करून आला होता. मग आम्हा परिक्रमावासी ना अगदी घरातल्या सारखं वागवून लग्नाची खरेदी दाखवण्यात आली. या खरेदी मार्फत मला आणि बाबाला ह्या तरुणी साठी प्रेम भेट देण्याची संधी मिळाली. “बहोत सुंदर चूडा है ये… ये मेरी तरफ से होगा आपकी शादी के लिये…. आपने मुझे मैय्याजी कहा है बेटा, तो आप अब इनकार नही कर सकते..” माझ्याही नकळत मी बोलून गेले, अन् तिला सुद्धा नकार देता आला नाही. किंबहुना तिला इतका आनंद झाला की तो आनंद तिच्या डोळ्यातून घळाघळा वाहू लागला…. लग्नाचा चुडा म्हणजे सौभाग्याचा दागिना.. आणि तो नर्मदा माईच्या परिक्रमावासींकडून मिळतोय यात तिला इतका आनंद होत होता म्हणून सांगू..! आम्ही निरोप घेऊन पुढे निघालो.
आता खरं कुंडा या गावाला जायचं होतं. पण खरगहना जवळच अंधार पडेल असं वाटलं. आम्ही निवारा शोधू लागलो. एका मंदिरात डोकावलं तर तिथे कुणीही नव्हतं. आजुबाजुची घरं पाहिली. राहता येईल अशी काही ही अवस्था नव्हतीच. पुढे अजून एक मंदिर लागलं. तिथे एक संन्यासी होतेत. आम्ही नर्मदे हर केलं आणि इथे राहता येईल का अशी चौकशी केली. त्या सन्यासांचा मूड नसावा कदाचित. “यहा नही रह सकते जावो आगे”.. कारण नसतानाच ते आमच्या अंगावर खेकसलेच… जाऊदे बघू यात पुढे असं म्हणून आम्ही पुढे निघालो.. तेवढ्यात त्याच सन्याश्याने पुन्हा आवाज दिला. “परिक्रमा में हो क्या? अगर यहाँ रुकना हुआ तो कब तक रूकोगे? भोजन व्यवस्था अपने आप करना होगा… चलेगा तो आजाओ…”
तिथे गेल्यावर सर्वप्रथम चहापाणी झालं. गरम गरम चहा पिऊन संन्यासी महाराज थंड झाले असावे. आम्ही कुठून अशी त्यांनी चौकशी केली. मग ते पुन्हा गरम झाले.. “परिक्रमा मे हो तो हुकुम क्यू नही करते? मंदिर मे आये हो, किसी के बाप का घर नही है! याद रखो, जब कभी भी मंदिर जाओगे तो अधिकार के साथ वहा रहो. मंदिर किसी की जहागिरी नही है… भगवान का घर है… और तुम परिक्रमा कर रहे हो, भगवान के घर निवास करने का पूरा अधिकार है तुम्हारा. एक रात रूक के आगे जाते हो तुम… हक से बोला करो की आसन लगाना है…” ही मात्र आतापर्यंत मिळालेली नवीन शिकवण होती. अर्थात एकंदरच परिक्रमेत असताना विनम्रता आणि स्वीकार या दोन गोष्टी अंगात रुजल्या सारख्या झाल्या होत्या, मात्र गरज असताना असा अधिकार देखील गाजवायचा हे नव्याने समजलं होतं. अर्थात या अधिकारात मगरूरी नसावी फक्त गरज आहे हे भान असायला हवं.
संध्याकाळी संन्यासी महाराजांनीच स्वयंपाक केला. छान सत्संग झाला. तुम्ही परिक्रमावासी बरेचदा आपले अधिकार गाजवत नाहीत हेच तुम्हाला शिकवायचं होतं असंही महाराज म्हणाले. इथून पुढे कुकरा मठ, बीच्छिया रोड, असं करत करत दिंडोरी ला पोहोचलो. दिंडोरी ला पोहोचण्याच्या आधी वाटेत आम्हाला कन्हैया भैया म्हणून एक जण भेटलेत. ते पुन्हा दिंडोरी ला देखील भेटलेत, किंबहुना आमच्यासाठी खास म्हणून आलेत. दिंडोरी पासून ते सक्का पर्यंतच्या प्रवासात सुद्धा एक म्हातारे आजोबा भेटले होते. आणि याच प्रवासात सतीश भाई नायक भेटले होते…. याच प्रवासात पुन्हा एका अशा घरी थांबलो जो अनुभव थोडाफार कनकधारा सारखाच होता… नायक भाईंच प्रेम मात्र वाखाणण्याजोगं…कारण पहिल्याच नव्हे तर दुस-याही परिक्रमेत नायक भाईंची आणि माझी भेट झाली, तेव्हाही त्यांचं मैयाप्रेम मैया इतकंच अथांग आहे हे जाणवलं.. त्याही अनुभवाबद्दल सांगेनच पण पुढच्या भागात.


Leave a Reply