नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला मारुतीरायां च्या फ्लेक्स बद्दल सांगितलं होतं. देवराला आम्हाला कसं बोलवून घेतलं, आमच्या मनात लंबे नारायण गुहेच्या साधू महाराजांबद्दल अचानक असे नकारात्मक विचार कसे आले आणि तिथे राहू नये असं ठरवलं, आमची एकूण एक इच्छा, आमच्या मनात येणाऱ्या एकूण एक विचार हा अगदी चपखलपणे खरा कसा ठरत होता, हे मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं होतं. जणूकाही आमच्यासोबत कुणीतरी चालतय आणि कुणाचे तरी विचार आमच्या विचारांच्या माध्यमातून बाहेर येतात असं काहीच आम्हाला जाणवत होतं. आता इथून पुढे सांगते.
देवरा नंतर धुरा, लूट गाव, रामघाट असं करत करत आम्ही दुधी घाटापर्यंत आलो खरं मात्र हा सगळा रस्ता कच्चा रस्ता होता. कधी शेतातून तर कधी मैया किनाऱ्याने वाट काढत काढत जायला लागलं. शेष घाटावर पोचायच्या आधी तर ओसाड माळरान असावं की काय असाच रस्ता होता. पाऊलवाट नाही, पक्का रस्ता नाही, कुणी कडे जायचं समजत नाही… आम्ही आपलं मैया उजव्या हाताला ठेवून चालत रहायचं इतकच काय ते ठरवलं होतं. मात्र मध्ये पर्वता सारखा आकार असल्यामुळे मैया नेमकी किती दूर आहे हे दिसत नव्हतं. फक्त दिशा तेवढी कळत होती, तीदेखील सवयी मुळे.
शेष घाटाच्या अलीकडे तर मजाच आली. एक छोटंसं मंदिर दिसलं त्यात आम्ही थोडावेळ विसाव्यासाठी म्हणून थांबलो. मंदिरात कोणीही नव्हतं मात्र समोरून सायकलवर एक माणूस येताना दिसला. त्याला थांबवून पुढचा रस्ता विचारला, आणि दोन शेतं दाखवून, त्याला वळसा घालून, दूरवर ते भगव्या रंगाचे मंदिर दिसत आहे तोच शेष घाट, असं त्याने आम्हाला सांगितलं. आता ते मंदिर डोळ्यापुढे ठेवून आम्ही चालू लागलो. पाऊल वाट किंवा रस्ता नाही. एक तर शेतातून जायचं किंवा शेतांना वळसे घालत घालत जायचं.
झाडं नाही शेतात, अगदी ओसाड माळरान. रस्ते सरळ नाही खूपच उंच-सखल. अशात खूप दूरवरून आम्हाला दोन परिक्रमावासी आमच्या दिशेने येताना दिसले. म्हटलं चला यांची सोबत होईल. आम्ही त्यांची वाट पाहू लागलो. ते हळूहळू आमच्यापर्यंत येऊन पोचले. नर्मदे हर झालं. “शेष घाट जा रहे हो महाराज जी?”. मी विचारलं आणि त्यांनी होकार अर्थ मान हलवली. मात्र मजा अशी झाली की आम्हाला जो रस्ता त्या सायकल वाल्या मुलानी सांगितला होता त्याच्या अगदी विरुद्ध रस्ता या दोन परिक्रमावासी ना दुसऱ्या कोणीतरी सांगितला होता. आता तेही आणि आम्ही ही गोंधळात पडलो कारण रस्ता कन्फर्म करायला कोणीच नव्हतं. मग आम्ही आम्हाला सांगितलेल्या रस्त्याने चालू लागलो आणि ते त्यांना सांगितलेल्या रस्त्याने जाऊ लागले.
खूप भरकटत शेतातून वाट काढत काढत आम्ही जात होतो. कुठे जायचं काहीच समजत नव्हतं. अशातच अचानक चार-पाच बायका आल्या आणि त्यांनी शेष घाटचा रस्ता सांगितला. आम्ही पोहोचलो आणि पाठोपाठ ती दोघं परिक्रमावासी देखील पोहोचलेत. ते आणि आम्ही वेगवेगळ्या रस्त्याने आलो होतो का एकाच ते काही माहीत नाही, मात्र त्यांनाही रस्ता सापडत नव्हता आणि त्यांनाही चार-पाच बायकांनीच रस्ता सांगितला होता.
शेष घाटावर थोडावेळ विश्राम करून आम्ही पुढे कंडीकापा मार्गे शिवाला घाट ला जायचं ठरवलं. पण कंडी कापा पर्यंतच आम्ही जाऊ शकलो. इथे एक शेतातली झोपडी होती, इथे कसलीही सोय नव्हती. फक्त पाण्याने भरलेला एक घडा ठेवलेला होता आणि एक माणूस शेतात काम करत होता. अगदी तासाभरात अंधार पडेल अशी वेळ. तो म्हणाला “आप ईटोर चले जाओ. यहा रुकना सही नही है.” इटोर साधारण तीन-चार किलोमीटर दूर असणार. म्हणजे तिथवर पोहोचेस्तोवर आम्हाला नक्कीच अंधार होणार होता मात्र इटोरच्या शाळेत व्यवस्था होईल असं या माणसाने सांगितलं आणि आम्ही झपाझप पावलं टाकत इटोरला पोचलो. इटोर च्या शाळेत गेल्यावर शाळा बंद आहे आणि इथे आता व्यवस्था होत नाही असं समजलं. आता कोणाच्या तरी घरी, अंगणात आश्रय घ्यावा लागणार होता. वस्ती अजून थोडी दूर होती. आम्ही वस्तीत शिरलो आणि एका किराणा दुकानात व्यवस्थेसाठी चौकशी केली. दुकानासमोर उघड्यावर झोपता येईल आणि भोजन प्रसादी ची व्यवस्था आमच्याकडे होऊ शकणार नाही कारण आमच्या कुटुंबात मयत झाली आहे असं समजलं. मग इथे राहूच नयेत असं वाटलं मात्र आता अंधार पडून झाला होता. आता रस्त्यावर आसन लावण्या शिवाय पर्याय नव्हता आणि जवळ जे काही असेल ते खाऊन आजची रात्र घालवायची होती. रस्त्याच्या पलिकडे एका झाडाखाली थोडी मोकळी जागा होती तिथेच आसन लावायचं असं ठरलं.
पिण्याचं पाणी संपलं होतं म्हणून बाबा म्हणाला “मी पुढच्या घरातून प्यायचं पाणी घेऊन येतो” हे घर मयतिच्या घरापासून साधारण दोन इलेक्ट्रीकच्या पोल अंतरा इतकं दूर होतं आणि मध्ये ओसाड जागा होती. बाबा प्यायचं पाणी घ्यायला गेला तो येताना दोन तीन माणसांना घेऊनच आला. आमचं सगळं सामान उचलून घेऊन जाऊन त्या घरात नेण्यात आलं. तेही एक किरराणा दुकानच होतं, मात्र दुकानातल्या वस्तू, पोती हलवुन त्या दुकानदाराने आमची राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था न विचारता केली होती. “परिक्रमावासी बाहर सोयेंगे अच्छा नही लगता. माताजी आई है तो हमारे दुकान मे ही आप सो जाओ” असं म्हणून दुकानातल्या मुलांना त्या दुकानदाराने आमचं सामान घ्यायला पाठवलं होतं. तिथे खूप छान व्यवस्था झाली. गरमागरम खिचडीची भोजन प्रसादी झाली. अगदी अनपेक्षित पणे नर्मदामैया जेवण आणि आसरा दोन्हीही देतेच. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर बाहेर पडलो आणि आज इतका उशीर लावायचा नाही, चार-साडेचार ला जिथे कुठे असू तिथे थांबून जायचं असं आम्ही ठरवलं.
पण आपण ठरवतो तसं होत नसतं. आता आम्ही इटोर होऊन तेडी संगम मार्गे शिवाला घाटला जायला निघालो होतो. शेतातले रस्ते हा प्रकार काही संपत नव्हता. शिवाला घाट पर्यंत आम्ही पोचू शकलो नाही. चंदन घाटला तसा संकेत आम्हाला मिळाला होता पण, तेव्हा फक्त दोन वाजले होते त्यामुळे आमच्या हातात साधारण दोन-अडीच तास अजून आहेत, त्यामुळे आपण थोडं पुढे जाऊ शकतो असा विचार करून आम्ही पुढे निघालो. शिवाला घाटला पोचू शकलो नाही मात्र रस्त्यात गावं होती आणि गावात कुठेतरी व्यवस्था होईलच हे माहीतच होतं. आम्ही कन्चनपुर इथे येऊन पोचलो.
कंचनपूर ला आल्यानंतर इथलं एकंदरीत वातावरण पाहून आम्ही जरा बिचकलोच. गावातल्या चौकाचौकात व्यसनाधीन माणसं शेकोटी पेटवून बसलेली दिसत होती. घरं अतिशय गरीब. घरातल्या बायकांना विचारल्यानंतर नवऱ्याला विचारून सांगेन आणि नवरा घरी नाहीत अशी उत्तरं मिळालीत. आता अशात एखादा शाळा शिक्षक किंवा गावचा सरपंच यांचे कडे जाऊन आपला प्रश्न मांडायचा असं ठरलं. गावात देऊळ नाही त्यामुळे याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
आम्ही सरपंचांच्या घरी गेलो. तिथे सरपंच यांची आई आणि बायको होत्या.त्यांनी आमची व्यवस्थित सोय केली. आम्ही गेलो त्या वेळी सरपंच बाहेर गेले होतेत. आमची भोजन प्रसादी होईस्तोवर सरपंच काही आले नाहीत. आम्ही आसनं लावली आणि झोपायची तयारी करू लागलो. बाहेरच्या ओसरीत आजींचा पलंग होता आणि खाली आम्ही दोघांनी आसन लावलीत. आम्ही झोपणार तेवढ्यात सरपंच आलेत. येऊन सरळ आमच्या पुढ्यात बसलेत. थोड्याफार गप्पा नंतर ते जातील आणि आम्ही झोपू असं आम्हाला वाटत होतं, मात्र हे सरपंच काही वेगळ्याच मूडमध्ये होते.. चंदन घाटलाच थांबलो असतो तर बरं झालं असतं असं राहून राहून आम्हाला वाटत होतं. बाबा तर फार वैतागला होता. कारणही तसंच होतं.. पण आम्हाला संयमाने घेणं आवश्यक होतं. त्या म्हाताऱ्या बाईचा आधार वाटत होता. असं काय झालं असेल? का वैतागला असेल बाबा, काय केलं त्या सरपंचांनी… सांगते.
या गावात लाईट नाही ही आमच्या साठी जमेची बाजू ठरली. हा सरपंच येऊन बसला. तास भर गप्पा झाल्यात. तो तिथेच जेवला, तोवर सगळं ठीक होतं. नंतर तो काही उठायला तयारच नाही. तास झाला, दीड तास झाला. आम्हाचे डोळे पेंगू लागले. शेवटी बाबा बोललाच, म्हणाला, “सरपंच जी अभी आप भी सो जाईये, हमे भी नींद आ रही है,” तर म्हणतो कसा, “ बाबा आप सो जाओ, हम मैयाजी से बात करेंगे” आता सगळं माझ्यावर आलेलं… मी पण म्हणाले, मुझे भी नींद आ रही है, तर म्हणाला, “इतने दिन बाद तो कोई मैयाजी मिली है, मुझे तो आपसे बाते करनी है. हे ऐकून बाबा खवळला.. डोक्यावरून पांघरूण घेऊन झोप असा मला इशारा केला, मी झोपले.. त्या आजी, सरपंचाची आई तिथेच होत्या, आणि अजून जाग्या होत्या, त्या ही आपल्या मुलाला समजावू लागल्या पण हा जाईच ना. मी डोक्यावरून पांघरूण घेतल्या नंतर ही तो बोलतच राहिला. मध्ये मध्ये “सुन तो रही हो मैयाजी” हे वाक्य असायचं. आता बाबा ही आडवा झाला. तरीही हा बोलतोच आहे. आमची आलेली सगळी झोप उडाली होती. याच्या मनात नक्की काय आहे, अशी विचित्र भीती आम्हाला वाटत होती. आम्ही निपचित पडून होतो. इथे लाईट नव्हते ही आनंदाची बाब होती आमच्यासाठी. साधारण पाऊण तासानी कंटाळून हा आत गेला. तो आत जाऊन १५ मिनिट झाले असतील, म्हणजे तो आता बाहेर येत नाही याची खात्री करून मग बाबा हळूच म्हणाला, “४ वाजताच अलार्म लाव, व्हायब्रेट मोड वर ठेव. हा उठायच्या आधी इथून निघायचं.”
ती रात्र कठीण जाणार होती, त्यातल्या त्यात थोडी सावरली गेली, असं म्हणायचं. आम्ही सकाळी अलार्म च्या आधीच उठलो. सगळं सामान सावरलं आणि बरोबर साडे चारच्या सुमाराला बाहेर पडायला तयार झालो, मात्र फाटकाला कुलूप घातलं होतं. आता पुन्हा थांबावं लागणार होतं आणि ते आम्हाला नको होतं… मग आता करायचं काय? आम्ही जाऊ शकलो, की थांबावं लागलं आम्हाला? पुन्हा त्या माणसाचा सामना करावा लागला का? रात्री पूर्ण अंधार असल्याने त्याचा चेहरा आणि हावभाव आम्हाला दिसले नव्हते पण बोलण्यावरून अंदाज येत होता, आणि आम्हाला पुनरावृत्ती नकोच होती. पण मग झालं काय नक्की? सांगणारे पण पुढच्या भागात.


Leave a Reply