नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती भाग क्रमांक ६८
नर्मदे हर.
मागच्या आठवड्यात मी तुम्हाला धुवाधार चा अनुभव सांगितला होता. बरमान ची छोटीशी मैया जी आणि बगुरशीला सरपंच अली ठाकूर यांच्याकडे लाभलेल्या नऊ कन्या आणि त्यांचं कन्यापूजन याही बद्दल सांगितलं होतं. आता तिथून पुढे जाऊयात. मागच्याच आठवड्यात “गुरूपासून पळून जाता येत नाही”याची प्रचिती आली असंही मी सांगितलं होतं. तिथून आता पुढे सांगते.
खरंतर सरपंच अली ठाकुर कडून पुढे निघालो त्याला उशीरच झाला होता. गुरुसी च्या थोडं पुढे आम्हाला आमच्या मागे पुढे असणारे मंदार वाळींबे, सुदिन पराडकर आणि पराडकर काका हे पुन्हा एकदा भेटलेत. वाटेत थांबत हळू हळू पुढे सरकत त्यादिवशी आम्ही फार काही पुढे जाऊ शकलो नाही. त्याला एक कारणच घडलं. मंदार आणि सुदिन दोघं तरुण मुलं. ती पुढे पुढे जायची आणि कुठेतरी वाट बघत थांबायचीत. आपल्यामुळे इतरांना उशीर होऊ नये म्हणून पराडकर काका आपल्या चालीने हळूहळू पुढे सरकायचेत. या गुरसी जवळ गंमत झाली बरं का.
तीन-साडेतीन ची वेळ. मंदार आणि सुदिन पुढे होते पराडकर काका आपल्या चाली ने निघाले होते मी आणि बाबा मागे होतो. तेवढ्यात मंदार आणि सुदिन समोरून मागे आम्हाला शोधत शोधत येताना दिसले. “काय रे असे उलटे का येत आहात? आम्ही विचारलं तेव्हा म्हणाले काका कुठे दिसत नाही, काका हरवले, आता त्यांना शोधतोय!” अरे बापरे कुठे गेले असतील काका? शिवाय काका जवळ फोन सुद्धा नव्हता. आता त्यांना शोधल्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. डोक्याला साईबाबां सारखा पांढरा रुमाल बांधून कुर्ता आणि लुंगी घातलेले, हातात काठी आणि पाठीला बॅग लावलेले असे परिक्रमावासी कुठे दिसतात का? असा शोध घ्यायला आम्ही सुरुवात केली. मागच्या चौकातून उजवीकडे गेले का, डावीकडे गेले का, रस्ता चुकले का, असा सगळे जण शोध घेत होते… आम्ही सगळेच खरोखर गांगरलो होतो. शेवटी ठरलं आम्ही चौकाच्या पलीकडला भाग बघायचा आणि सुदिन नी चौकाच्या मागचा भाग बघायचा मंदारने पुढे जायचं, ते पुढे गेले का आहेत का ते शोधायचं आणि तिथून सगळ्यांनी एकमेकांशी फोनवर संपर्क ठेवायचा. सुदिन तर फारच बावरला होता, झपाझप पावले टाकत मागे पाच-सात किलोमीटर पर्यंत गेला, तिकडे दुसऱ्या दिशेला मंदार देखील दोन-तीन किलोमीटर पुढे गेलाच. आम्हीदेखील तिथल्या आसपासच्या भागात काका कुठे विश्रांती घेत बसले तर नाहीत हे शोधू लागलो.
शेवटी बराच वेळाने काका सापडले. सुदिन चा फोन आला. आम्हाला वाटलं तसंच झालं होतं, काका मागच्या चौकातून डावीकडे वळले होते आणि रस्ता चुकले होते.सुदिन काकांना घेऊन आला मंदार सुद्धा आला आणि आम्ही सुद्धा जिथून निघालो होतो तिथे परत आलो. सगळेच घाबरले ही होते आणि थकलेले ही होते. आता पुढे जाण्याची हिंमत नव्हती म्हणून तिथेच थांबायचा निर्णय घेतला. इथे कुठे व्यवस्था आहे ते शोधू लागलो तो गावात आश्रम असा नाही, राहायचं कुठे तर लोकांनी एक जुनं शिवमंदिर दाखवलं.
मंदिर फारच जुनं होतं. तीन पायऱ्या चढून आत मध्ये एक शिवाची पिंड होती आणि एक यज्ञकुंड होतं. दोन-तीन छोट्या छोट्या मुर्ती होत्या मात्र या मंदिरात नियमितपणे पूजाअर्चा होत नसावी हे स्पष्ट जाणवत होतं. गावातल्या लोकांनी तिथे बल्ब लावून लाईटची व्यवस्था केली खरी पण लाईट लावल्यावर लक्षात आलं की इथे बरीच जाळी जळमटी झाली होती. उंदीर आदि प्राणी इथे येऊन जाऊन असतात हे समजलं, त्यांची विष्ठा पडलेली दिसत होती. मग कुठून तरी झाडू फडे जमा करून त्या मंदिराची साफसफाई केली,आसनं लावली आणि आता भोजन प्रसादी ची व्यवस्था म्हणून समोरच्या दुकानात विचारलं. तशी काही व्यवस्था गावात नसल्याचं समजलं शेवटी जवळ असलेले मुरमुरे फुटाणे इत्यादी घेऊन त्यावरच आज गुजारा करायचा असं ठरवलं. पण पुन्हा तेच आपण ठरवतो तसं काहीच होत नसतं.
मंदिराच्या समोर असलेल्या एका घरातून हातपाय तोंड धुवायला आणि प्यायला पाणी आणलं होतं. त्यांच्याच घरी प्रातर्विधीसाठी व्यवस्था झाली, कारण असं की आम्ही भर गावात होतो, येथून बाहेर दिशेला जाण्यासाठी सुद्धा दोन-तीन किलोमीटर चालून जावं लागणार होतं. त्यामुळे ही व्यवस्था गावातच कोणातरी कडे होणं आवश्यक होतं. ती झाली. आणि आम्ही प्रत्येकजण दोन-तीनदा पाणी आणायला गेल्यामुळे त्या घरच्या मंडळीशी थोडी थोडी ओळख झाली. रात्री त्यांनी आम्हाला खिचडीची भोजन प्रसादी आणून दिली. चला म्हणजे थोड्यावेळापूर्वी काकांना शोधणारी आम्ही सर्वजण आता जेऊन खाऊन निवांतपणे आराम करत बसलो होतो. काका सापडले आता काही नसलं तरी चालेल हाच आमच्या सगळ्यांच्या मनात काका हरवले त्यावेळी विचार येत होता. काका काय विचार करत होते हे मात्र आजतागायत समजलेलं नाही!
असो तर सांगायचा मुद्दा असा की मी आणि बाबा सरपंच अली ठाकूर यांच्या घरून उशिराच निघालेलो, आणि आता पुन्हा गुरुसीच्या थोडसं पुढे मुक्काम केला. आज दिवसभरात आमचं काही चालून झालं नव्हतं त्यामुळे आता आम्हाला पुढे जायचं होतं.... काका, सुदीन आणि मंदार आमच्यापुढे निघाले होते आणि मी आणि बाबा मागे होतो. इथून सातच किलोमीटरवर रमपुरा नावाचं गाव आलं. तिथे महाराष्ट्रीयन परिक्रमावासी दिसले की त्यांना बॅग घेऊन सरळ आत मध्ये घेऊन जातात आणि मुक्कामच करावा लागतो असं आम्ही ऐकून होतो. आता माझी थांबण्याची तयारी नक्कीच नव्हती.सुदिन आणि मंदार ला आश्रम धार यांनी थांबवून घेतलं होतं आणि मंदार चा मला सतत फोन येत होता. “ताई तुला इथे थांबावच लागणार आहे” आणि मी देखील तितक्याच जिद्दीने मी इथे थांबणार नाही असं म्हणणार ला वारंवार सांगत होते. मी विचार करत होते, मी न आश्रमाच्या समोरून जाणारच नाही, मी नं मागून शेतातून निघून जाईन, दुसरा कुठला रस्ता असेल तर तो शोधेन पण मी कुठल्याही परिस्थितीत आज रात्री तिथे थांबणार नाही, मी पुढे जाणार…. ही कसली आणि काय जिद्द होती ते काही माहित नाही पण त्यावेळेला मी हट्टालाच पेटले होते. आणि अशातच गुरूपासून पळून जाता येऊ शकत नाही ही प्रचिती मला आली. मंदारचा पुन्हा फोन आला.यावेळी त्याचा आवाज गंभीर होता आणि तो मला सांगत होता ताई तू इथून पळून जाऊ शकत नाहीस,आता मी तुला जे सांगणार आहे ते सांगितल्यानंतर तुला इथे यावच लागेल…. तो पुढे म्हणाला आज गुरुवार आहे म्हणून इथे तुझे गुरु नाना महाराज तराणेकर यांची पूजा आणि त्यानंतर त्रिपदी करणार आहेत. हा आश्रम नाना भक्तांनी स्थापन केलेला आश्रम आहे त्यामुळे तुला इथे येण्या व्यतिरिक्त काहीही पर्याय नाही. त्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर आता मी कुठेही पळून जाऊ शकत नाही याची मला खात्री पटली होती. त्याला कारणही तसंच होतं तिथे गेल्यानंतर मला लेले काकांनी विषयी महत्त्वाची बातमी समजायची होती. लेले काका आठवतात न? परिक्रमेच्या पहिल्या दिवशी ऐंशी वर्षाचे आजोबा मला भेटले होते ते लेले काका…मला म्हणाले होते मी कोण हे तुला तुझी परिक्रमा शेवटच्या टप्प्याच्या जवळ असेल त्यावेळेला तुझे लोक आणि नर्मदामैय्या सांगेन! आठवतंय का? हा अनुभव मी तुम्हाला आधीच सांगितलेला आहे. तर हे लेले काका साक्षात शंकर महाराज आहेत याचा उलगडा मला जिथे झाला तेच हे ठिकाण रमपुरा. लेले काकांचा अनुभव आधी सांगितलेला आहे म्हणून तो आता पुन्हा लिहीत नाही…. मात्र गुरु पासून आपण कुठेही पडूच शकत नाही याची आलेली प्रचिती तेवढी सांगितली.
रमपुरा हून पुढे निघालो तेव्हादेखील काका सुदिन आणि मंदार थोडे पुढे होते तर आम्ही थोडं मागे होतो. इथून आम्ही मैया किनाऱ्याचा रस्ता पकडला होता. रामपूरा, केरपानी, डोंगरगाव धूम गड आणि हिरापूर असा हा रस्ता. आज हिरापूर ला थांबावं असं ठरवलं. हे अंतर तसे फारच कमी होतं मात्र नदी किनाऱ्याचा रस्ता हा जरा कठीणच जातो. आम्ही हिरापूर पर्यंत पोचू शकत नव्हतो. जिथे पाच-साडेपाच होतील तिथे थांबायचं असा अलिखित नियम होता.
रोहणी नावाचं गाव होतं. थोड्याच वेळात अंधार पडणार होता. नदी किनारा खाली आणि गाव थोडं उंचावर त्यामुळे चढून जायला आम्हाला वेळ लागणारच होता. गावात गेल्यावर आसनं लावण्याची व्यवस्था बघायची. आम्ही गावात गेलो. इथेदेखील आश्रम म्हणून विशेष अशी काही व्यवस्था नव्हती. गुरसी सारखंच एखादं मंदिर असेल तिथे राहू असा विचार केला, पण या गावात एकही मंदिर नाही, या गावात शाळा देखील नाही,मग आता कुणाच्यातरी घराच्या बाहेर आसन लावायचं म्हणून आम्ही लोकांना विचारू लागलो. इथे परिक्रमावासी बद्दल थोडी उदासीनता जाणवली कोणीही पटकन तयार होईना. आणि आम्हाला आग्रह करून विचारणं बरं वाटेना. अगदी पाणीसुद्धा न देता लोक हापशी कडे बोट दाखवत होती. आम्ही गावातून फेरफटका मारून एखादं झाड, एखादा कडप्पा, एखादा ओटा असं काही दिसतं का याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तसा आमच्या मागून पांढरी वस्त्र धारण केलेला एक परिक्रमावासी येताना दिसला. आता आम्ही तिघे जण निवारा शोधू लागलो. सोबत आलेला हा परिक्रमावासी आम्हाला आधी कुठेही भेटला नव्हता. मात्र तो सोबत आहे हा आधारच वाटला. करता करता आम्हाला एक बंद घर सापडलं. त्या घराच्या बाहेर एक रिकामी पडवी दिसली. त्या पडवीच्या खाली पाचोळ्याचा प्रचंड ढीग होता.आम्ही तिघांनीही एकमताने तिथेच आसन लावायचं ठरवलं. आम्ही आमची पूजाअर्चा केली तोवर हा परिक्रमावासी ध्यानस्थ अवस्थेत बसला होता. त्याचं ध्यान झाल्यावर मग आमचं थोडाफार बोलणं सुरू झालं.”मै बेरागी हु श्रीरामजी का हनुमानजी का भक्त हू” असं त्यांनी सांगितलं… मग म्हणाला भोजन प्रसादी के लिये तुम्हारे पास कुछ है क्या? माझ्याजवळ दोन पेरू होते, वाटेत कोणीतरी दिले होते. ते पेरू काढून मी समोर ठेवलेआणि म्हणाले “इतना है बाबाजी इसी से काम चला लेंगे”. ते बाबाजी जरा नाराजच झाले, म्हणाले आज तो मक्के की रोटी और तुअर की सब्जी खाने का मन हो रहा है… पण या गावातली उदासीनता पाहता असं होईल असं काही शक्य नव्हतं. हापशी वरची गर्दी कमी झाली होती आणि म्हणून पडवी समोरच असलेल्या हापशी वर मी माझे कपडे धुवायला घेतले. बाबा देखील मला मदत करू लागला आणि हे बाबाजी फेरफटका मारायला निघाले. पाचच मिनिटात परत आले आणि म्हणाले “चलो मक्के की रोटी खिलाता हू”… कपडे वाळत टाकून आम्ही त्याच्यापाठोपाठ जाऊ लागलो. गावाच्या अगदी टोकाला एका शेताच्या मध्यभागी एक घर होतं तिथे ते बाबाजी आम्हाला घेऊन गेले. त्यांनी बाहेरूनच आवाज दिला. “नर्मदे हर माताजी मेहमानो को भोजन दिया हो तो परिक्रमावासी यो को भी खीलादो.….”लगबगीने आतून एक माताजी बाहेर आल्या आणि आग्रहानी त्यांनी आम्हाला पानावर बसवलं. झणझणीत आंब्याचं लोणचं, गरम मक्याच्या भाकरी आणि तुरीच्या दाण्यांची उसळ असं जेवण पानात वाढलेलं बघताच आम्ही दोघही आश्चर्याने या बाबाजींनी कडे बघू लागलो. ते म्हणाले देखो मत भोजन पाओ नर्मदामैया ने इच्छा पुरी कर दी है…. अशावेळी प्रश्न पडू द्यायचे नसतात हे आतापर्यंत समजलं होतं. अशावेळी लुटायचा असतो तो फक्त तिच्या कृपेचा आनंद, पोटभर जेवून आणि मनभर आनंद लुटून आम्ही परत आपल्या पडवीत परतलो. बाबाजी पुन्हा ध्यान लावून बसले आणि आम्ही निद्राधीन झालो. मध्यरात्री एक-दोनदा झोप उघडली असता बाबाजी ध्यानातच बसलेले पाहिले होते, मात्र अगदीच पहाटे “नर्मदे हर मै आगे चलता हू” असा आवाज देऊन आम्ही उठायच्या आधीच ते बाबाजी पुढे निघून गेलेत…. कालची भोजन प्रसादी आणि आसन लावण्याची व्यवस्था बाबाजींच्या रूपात आलेल्या नर्मदा माई ने केली होती इतकं समजण्याइतके अनुभव आतापर्यंत तिने दिले आहेतच की.
रोहनी हून पुढे निघालो ते खरं मालकछारला जायचं होतं पण झासी घाटला पाऊस सुरू झाला आणि थांबावं लागलं. इथला आश्रम छानच होता मात्र तिथे बरेच नियम होतेत. आणि या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे तिथे गेल्यावर चहापाणी झाल्यावर ह्या श्रमाबद्दल एक वेगळीच वार्ता समजली. अंगावर काटा आला आणि ती रात्र अतिशय कठीण गेली.. कसे ते सांगणारे पण पुढच्या भागात नर्मदे हर.


Leave a Reply