नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ६२
नर्मदे हर
मागच्या भागात मी तुम्हाला अखंड रामायणाचा किस्सा सांगितला होता. अलीगंज ऊन सकाळी काळा चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. मागचे 30 तास झोप झाली नव्हती तरीही आम्ही उत्साहात होतो. पहिले काही तास आम्हाला थकवा जाणवला नाही. मात्र हा ही रस्ता नदीकिनारी असल्यामुळे हळूहळू वाळूत चालणं कठीण होऊ लागलं. काल सारखं पुन्हा भोजन प्रसादि घ्यायला जायचं तर गावात जावे लागेल आणि पुन्हा परत यावे लागेल, आज मात्र आमच्यात खरच एवढी ताकत नव्हती. पण काल जसे मैयानी आम्हाला जेवायला घातले आणि छान गोड मधुर बोरांचं जेवण झालं, तसंच आज सुद्धा त्या कनवाळु माऊलीला आमच्या जेवणाची काळजी वाटली असावी, आणि आजचं भोजन काल पेक्षा ही चविष्ट असं आम्हाला दिल आज तिनी.
आम्हाला भूक लागली त्यानंतर काहीच काळात एका ठिकाणी तीन दगडांची चूल पेटलेली आम्हाला दिसली. त्या चुलीच्या बाजूलाच नुकतेच शेतातून उपटून आणलेले हरभरे एका कागदावर काढून ठेवलेले दिसले. आणि काही रोपटी दिसली नुकतीच उपटून आणलेली. ती पेटलेली चूल पाहून आम्हाला असं वाटलं की इथे नक्कीच कुणीतरी असलं पाहिजे आणि त्या व्यक्तीने स्वतःच्या भोजनासाठी ही तयारी करून ठेवली असली पाहिजे. हा जो किनारा आहे अलीगंज ते चौरस पर्यंतचा हा बऱ्यापैकी निर्मनुष्य असतो. आता इथे कुणीतरी भेटेल असाच वाटलं ती चूल बघून. ज्या कोणी माणसाने स्वतःच्या जेवणाची ही तयारी केली असेल त्याच्याशी निदान दोन शब्द बोलूयात असं म्हणून आम्ही तिथे त्या व्यक्तीची वाट पाहू लागलो.
आम्ही थकलो होतो. वाटेत एका शेतकऱ्यांनी आम्हाला ताजे ताजे टमाटे दिले होते. टमाटे थोडे कच्चे होते, हिरवट होते. चूल पेटवून तयार होती तिथलीच हरभऱ्याच्या झाडाची एक फांदी उचलली आणि त्यावर टमाटे ठेवून छान भाजून घेतलेत. आणिक थोडावेळ आम्ही वाट पाहिली पण कोणी आलं नाही. मग कुणाची वाट न बघता आम्हीच ते टमाटे खाऊनही घेतलेत, तरीही कुणी आलं नाही. आमची टमाट्याची भोजन प्रसादी झाली होती. आमची वाट बघूनही झाली होती जवळजवळ दीड तास होत आला होता.आम्ही नर्मदे हर हर नर्मदे हर हाका आपण घातल्यात तरीही कोणी शेवटी तिथून निघायचं ठरवलं.
आम्ही अगदी निघणार तेवढ्यात समोरच्या बाजूने एक मध्यमवर्गीय शेतकरी येताना दिसला. आम्ही त्याला विचारलं. “यहा किसी ने चूल्हा जलाया है पर कोई दिख नही रहा?” तर तो माणूस आम्हाला म्हणतो, हम लोग ही थोडासा चना, टमाटर, सबजी रंख देते है… चुल्हा जला देते है, परिक्रमावासीओ के लिए ही रखते है… तुमने खाया नही? आजाओ थोडा चना सेक के देता हु”…. त्यांनी आम्हाला भरपूर चणे भाजून दिले, असं वाटलं खरंच आमच्यासाठी मांडून ठेवलेलं हे अन्न या शेतकर्यांनी नाही तर कालची भुकेनी झालेली काहिली बघून मैयाला लेकराची कीव आली आणि आज अगदी बरोबर भुकेच्या वेळेला तिनी स्वत: हे भोजन मांडून ठेवलेलं. एखादं बाळ जर रात्री नं जेवताच झोपून गेलं तर आई कसं सकाळी बरोबर त्याच्या आवडीचा नाश्ता तयार करून पोटभर खाऊ घालते आपल्या बाळाला? तेव्हा तिच्या चे-यावर जे तृप्तीचे भाव असतात तसच माझ्या मैयाच्या पाण्यात झालेला बदल मी बघितला की काय असंच वाटलं क्षणभर. चुलीवर भाजलेले खमंग चणे खाऊन आम्ही पुढे निघालो.
इथून बोरास जवळ होतं “आप बोरास मे रुक जाना” असं त्या शेतक-याने सांगितलं, आणि आम्ही बोरास च्या दिशेने निघालो. मजल दर मजल करत बोरास ला पोचलो तेव्हा साडेतीन-पावणेचार झाले असतील. इथे आश्रमात जाणार तोच काही लोक जमा झाली व “आश्रम मे व्यवस्था है” असं आम्हाला सांगू लागली. त्यातला एक जण तर अती उत्साहाने म्हणाला, “अब तो हम लोग अखंड रामायण का पाठ भी करते है, आपको बहुत अच्छा लगेगा”….खरं सांगते पहिल्यांदा श्री रामाची मनापासून माफी मागितली आणि मग निर्णय घेतला की आज काही बोरासला थांबायचं नाही!! पुढे चोरास कडे जायचं. आजचा पूर्ण दिवस पकडता 42 तासांची झोप ऑलरेडी झालेली नव्हती, आणि आता मात्र अजून जागं राहण्याची आमच्यात अजिबातच क्षमता नव्हती, त्यापेक्षा चार-पाच किलोमीटर पुढे जाऊन चोरास ला थांबणं आम्हाला साधं सोपं वाटत होतं. पण आपल्याला वाटतं तसं होत नसतं.
साधारण चारच्या सुमाराला आम्ही बोरास कडून चोरास कडे निघालो. सहा वाजेपर्यंत आम्ही पोहोचायला हवं होतं. पण इथे किन-याच्या जरी रस्ता असला तरी वाळूचा रस्ता नव्हता. इथे चक्क उंच-सखल जमीन होती, छोट्या छोट्या टेकड्या होत्या, आणि अतिशय अरुंद अशा पाऊलवाटा होत्या. भरीस भर म्हणून आभाळ भरून आलं होतं आणि सव्वा पाच साडेपाचला मिट्ट अंधार झाला होता. आम्ही चोरास ला पोचलोच नव्हतो. आता टॉर्च लावून पुढे चालत राहण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता. बाबाने त्याच्याजवळचा मोठा टॉर्च काढला. तो लावायचा प्रयत्न केला. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी अवस्था झाली होती, टॉर्च फारसा वापरण्यात आलाच नसल्यामुळे त्याची बॅटरी संपली हे लक्षातच आलं नाही. माझा छोटा टॉर्च काढला. त्याचा प्रकाश म्हणजे अगदी आपले पाय दिसतील इतकाच! त्याच प्रकाशात पुढे बाबा आणि मागे मी असं हळूहळू पुढे सरकत होतो. चोरास पर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल? हे अंतर खरंच तीन चार किलोमीटर आहे की त्याही पेक्षा जास्त? हे कळायला काही मार्ग नव्हता आणि रस्त्यावर कोणीही चिटपाखरू नव्हतं. अशातच पावसाला सुरुवात झाली. फार जोराने पाऊस आला नाही पण काहीच थेंब पडल्यावर आता आपण नक्की भिजणार त्यामुळे इथेच कुठेतरी आडोसा पाहून रात्र घालवावी लागणार असं वाटलं. थोडं पुढे दूरवर एक काट्याकुट्याचा आडोसा सापडला सुद्धा. तिथवर जाऊन बघतो तो त्या काट्या-कुट्याच्या झोपडीवजा आडोश्यामध्ये गाई गुरांचा चारा लादून ठेवला होता. आता इथे टेकून बसायचं आणि रात्र काढायची आम्ही ठरवलं….
आम्ही अंगावरच्या बॅगा उतरवणार तेवढ्यात डोक्यावर चाऱ्याचा भारा घेऊन एक माणूस आमच्या मागून चालत येताना आम्हाला दिसला….. हायसं वाटलं…. तो आमच्या जवळ आला आणि आम्ही न विचारताच म्हणाला “अभी थोडे ही दूर है चोरास, मे भी वही जा रहा हू. आधा घंटा लगेगा चलो मेरे पीछे पीछे” .. तो पुढे आणि आम्ही मागे चालू लागलो. त्याच्याजवळ भला मोठा कंदील होता त्यामुळे सहज सोपं गेलं. एका वळणावर त्यांनी आम्हाला किनारा चढून वर जायला सांगितलं आणि उजवीकडे वळल्यावर आश्रम दिसेल असं सांगितलं. “मुझे थोडा आगे जाना है तुम ऊपर चलेजाओ” असं म्हणून तो पुढे निघून गेला. आम्ही वर गेलो, आणि आश्रमाजवळ जाताच जोरात पाऊस सुरू झाला. आता तो माणूस पावसात भिजला असेल का? आपल्या मुक्कामाला पोहोचला असेल? असं वाटू लागलं, आणि चोरास च्या आश्रमात असलेल्या जयहिंद भाईला मी सहज म्हटलं “जिस आदमी ने हमे रास्ता दिखाया वो चारा ले जाने वाला आदमी तो भीग गया होगा”… जय हिंद भाई म्हणाले, हमने आपको तो आते हुये देखा, हम काफी देर से आपको आते हुए देख रहे थे, लेकिन हमे चारा ले जाने वाला कोई आदमी नही दिखा…… सुरुवातीला थोडं आश्चर्य वाटलं पण नंतर समजलं, नर्मदा मैया बरोबर काळजी घेतेच…
आश्रमात कोणी राहणार नव्हतं सगळे गावची तरुण मंडळींनी मिळून हा आश्रम तयार केला होता. इथे माझ्या खेरीज इतर कोणी बाईमाणूस नाही म्हणून जय हिंद भाई आम्हा दोघांना स्वतःच्या घरी घेऊन गेले. त्यांच्या घरची बाजूची खोली रिकामी करून दिली तिथे आम्ही आसनं लावलीत. पुरी खीर बटाट्याची भाजी असं पक्वान्नाचे जेवण आणि मागच्या काही तासांपासून न झालेली झोप यामुळे आम्ही पुरतं थकून गेलो होतो. जेवणानंतर आम्हाला लगेच झोप लागली आणि सकाळी जाग आली तो साडे सात वाजलेले होते…घरची मंडळी परिक्रमावासी झोपलेत म्हणून अगदी हळूहळू आवाज न करता आपली काम करत होती. सहा वर्षाचा लहानसा मुलगा सुद्धा शाळेत जायला आंघोळ पांघोळ करून तयार झाला होता….. जाग आली तेव्हा खूप लाज वाटली पण खरंच ही झोप होणं खूप महत्त्वाचं होतं. आंघोळीला गरम पाणी, पराठ्यांचा बालभोग, घरच्या आजी-आजोबांचं आमच्याशी येऊन येऊन गप्पा करणं, कौतुकाने आमच्या ट्रेक बँग बघणं, त्यात किती सामान मावतं ते बघणं, या सगळ्यात इतकी आपुलकी होती ना, की तिथून पाय निघत नव्हता.
ह्या जय हिंद भाईंकडे लाकडं मोजण्याचा मोठा तराजू होता. आणि या जय हिंद भाईंच्या आई खूपच लाघवी आणि गमतीदार. आम्ही बॅगा लावून पुढे निघत होतो त्या वेळेला त्यांनी मला आवाज दिला, आणि “बेग के साथ देखना तुम्हारा वजन कितना है” असं म्हणून मला चक्क तराजूवर बसायला लावलं… आणि नंतर बॅग से तो ज्यादा तेरा ही वजन है असं म्हणून टाळीसुद्धा वाजवली, आणि इकडे जय हिंद भाईंच्या वडिलांनी, रात्रभर बसून आमच्यासाठी शंभर मोठ्या आकाराच्या फुलवाती बनवल्या. सकाळी सुनबाई कडून त्या भिजवून घेतल्या आणि एक किलो तूप आणि ह्या शंभर फुलवाती आम्ही निघताना आमच्या हाती दिल्या. आमच्या जवळच्या फुलवाती तशाही संपत आल्या होत्या आणि त्यानंतर पूर्ण परिक्रमेत ह्या फुलवाती आम्हाला पुरल्यात… रोज सकाळ संध्याकाळ ह्या फुलवाती लावताना जय हिंद भाईंच्या कुटुंबियांची आठवण आल्याशिवाय राहिली नाही….
चौरास हून आम्ही पुढे अनघोरा ला निघालो. अनघोरा ला जाण्याआधीच तिथे असलेल्या उन्मेषानंद स्वामीं बद्दल ऐकून माहिती होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते महाराष्ट्रातील आहेत आणि अनघोरा इथे येऊन मुक्काम करा असं त्यांचं आग्रहाचं बोलवणं आहे म्हटल्यावर आम्हालाही त्यांना भेटण्याची ओढ लागली. चौरास हून साधारण दोन तासातच आम्ही अनघोरा इथे पोचलो… अरे हो वाटेतल्या ट्रॅक्टर वाल्या बद्दल तर मी सांगितलंच नाही! सांगते सांगते…..
या भागात रेती काढण्याचं काम सुरू होतं. इथे बरेच ट्रॅक्टर उभे असलेले दिसत होते. रस्त्यांवर म्हणजे वाळूत ट्रॅक्टरच्या चालण्यामुळे वाटा तयार झाल्या होत्या, आणि त्या वाटे मधूनच आम्हीदेखील चालत होतो. बराच वेळ पर्यंत हे असंच सुरू होतं. अचानक आम्हाला एका माणसाने आवाज दिला आणि म्हणाला, अब ट्रॅक्टर वाला रस्ता छोड दो…. अब यहासे सीधे रस्ते जावो” वाळूतून चालण्यापेक्षा या ट्रॅक्टरने बनलेल्या रस्त्यातून चालल्या थोडं सोपं जात होतं, “क्यू क्या हुआ बाबांनी विचारलं”…त्या माणसांनी काहीच उत्तर दिलं नाही मात्र तो तिकडून जा असं विनवू लागला. त्याचं बोलणं इतकं विनवणी पूर्ण आणि कळकळीचं होतं की पुढचं कुठलंही कारण न विचारता आम्ही ट्रॅक्टरच्या ने तयार झालेल्या मार्गावरून दूर झालो. दूर झाल्यानंतर बऱ्याच दुरून आम्ही तो ट्रॅक्टरचा मार्ग सहज बघितला तर दुरून एका ठिकाणी मैया ला दोन धारा फुटलेल्या दिसल्या आणि हा ट्रॅक्टरचा मार्ग चक्क मैयाची धार ओलांडल्या जाईल अशा ठिकाणी जाऊन संपत होता. थोडक्यात आमची परिक्रमा खंडित होता होता वाचली होती….. आम्ही तर दूर निघून गेलो आणि आम्हाला त्या ट्रॅक्टर वाल्याचे आभार सुद्धा मानता आले नाहीत.
आम्ही अनाघोराच्या रस्त्यावर आलो. आता अनाघोर्याच्या आश्रमाचे उंचावर असलेले भगवे झेंडे दिसत होते. रस्त्यात आम्हाला भेटणारे लोक “टीले वाले बाबाके यहा जाओ” असं सांगत होते. दुरूनच या जागेची कंपनं जाणवू लागली होती. मैया च्या किना-यावर फुलबागे सारख्या फुलांची झाडाची दाटी होती, काही ठिकाणी गव्हाची शेती होती आणि वर उंचा वर भगव्या वस्त्रातला, साधारण तिशी मधला एक सन्यासी आमच्याकडे पाहून नर्मदे हर करत होता.
या जागेची आकृती समोर निमुळती आणि मागे उंचावर त्रीकोणाकार होती. वर जाण्यासाठी मातीत खोदून तयार केलेल्या पाया-या होत्या, आणि वर जाताच अतिशय प्रसन्न असं हनुमानाचं मंदिर होतं.
या जागेला एक रहस्य आहे बरं का. हे महाराज उगाच इथे येऊन राहिले नाहीत. इथे या तरुण सन्यास्याला एक दृष्टांत झाला….एका गुहेची गोष्ट आहे ही…या गुहेत जे काही घडलं, लोकांचा जो काही समज झाला, त्यातून पुढे ही जागा निर्माण झाली. इथे नर्मदा मैयाचं रूप कसं दिसतं याला ही महत्व आहे, आणि आम्हाला इथे काय भाग्य लाभलं ते ही तुम्हाला सांगणारे, पण पुढच्या, म्हणजे ६३ व्या भागात.


Leave a Reply