नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५५ – बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा – एक विलक्षण अनुभूती- भाग ५५

नर्मदे हर

तर मागच्या भागात मी सांगत होते त्या साधू बद्दल जे कंबरेवर हात देऊन माझ्या पुढे उभे होते आणि माझ्याकडे रागाने बघत होते. “उपर जाकर खाना खा लो अशी शपथ त्या आजीनी मला घातली होती. ती आजी माझ्यासाठी कळवळली होती रडली होती… तर आता सांगते काय झालं ते.

त्या आजीनी शपथ दिल्यामुळे आम्ही टेकडीवर गेलो. आम्ही टेकडी चढून दमलो होतो, म्हणून झाडाखालाच्या पारावर बसलो. समोरच हे संन्यासी छान लोळत पडले होते. आम्ही नर्मदे हर केलं पण हे काही उत्तर देईना. असं दोन तीन दा झालं… आम्हाला काही इथे भोजन मिळणार नाही कारण हे साधं नर्मदे हर ला उत्तर देखील देत नाहीयेत, मग भोजन प्रसादी काय देणार? आणि आता आजीच्या शपथे चं काय करायचं? आता मी पेचात पडले.. मग उपाय म्हणून समोर च्या पाण्याच्या टाकी मधून पोट भर पाणी आम्ही प्यायलो..अगदी १ लिटर पाणी प्यायली असेन मी. म्हणजे पोट भरेल आणि आजीची शपथ मोडणार नाही. भोजन प्रसादी मिळणारच नसेल तर करणार काय? पण तिच्या सांगण्याप्रमाणे निदान “पोटभर” असं काहीतरी आम्ही पोटात घातलं हेच समाधान. आता थोडावेळ बसायचं आणि मग पुन्हा टेकडी उतरून पुढच्या प्रवासाला निघायचं.आम्ही थोडं बसून निघालो, तेवढ्यात आतून एक अजून संन्यासी बाहेर आला. त्याच्या हातात एक ताट होतं. ते ताट त्यांनी आमच्या पुढे आणलं आणि जोरदार आपटलं…इतक्या जोरात की त्यातलं अन्न वर उसळल्या गेलं. तो रागानी आमच्या कडे बघत होता… “ ये लो खाना.. पुरा खा लेना, इतनासा भी छोडा तो देखो फिर!.. हम मेहनत से खाना बनाते है और तुम थोडासा खाकर बाकी गाय, बकरी, कुत्तो को खिलाते हो? उनके लिये मेहनत नही करते हम… एक निवाला भी कैसे छोडते है देखता हू” आणि असं म्हणत त्याने ते ताट अक्षरश: आदळलं आमच्या पुढे. बरं थोडं थोडकं काही असेल तर खाता ही आलं असतं.. पण त्यात ६ टिक्कड, भरपूर भात, पालकाची पातळभाजी, कारल्याची भाजी, भजी, वरण आणि पापड इतकं सगळं होतं. आधीच पोटभर पाणी प्यायालेलो आम्ही दोघं आणि आता हे सगळं खा म्हणतोय हा….!

बरं ही टिक्कड काय असते ते सांगते, म्हणजे आमचा जीव का दडपला ते समजेल. आपल्याकडे भाकरी असते नं जाड त्याहून मोठी आणि जाड गव्हाच्या पिठाची भाकरी म्हणजे टिक्कड. एरवी आपल्या ४ ते ५ पोळ्या होतील एवढ्या पिठाची ही एक टिक्कड असते, आणि अर्ध्या टिक्कड मध्ये माझं पूर्ण जेवण अगदी पोटभर होतं हे मला माहितीये, आणि या ६ टिक्कड आणल्यात त्या साधुनी आणि त्यातल्या ३ मला खाव्या लागणार म्ह्टल्यावर माझं काय होणार? आणि आधी पाणी प्यायलेले ते वेगळच!पण हा गडी काही ऐकेना. तो राहिला उभा तासभर आणि ३ टिक्कड मला आणि ३ बाबाला खायलाच लागल्यात. सोबत घेऊन जायची सुद्धा सोय नाही. कसं बसं, अगदी घशाशी अन्न येत असताना पोटात ढकलायचं म्हणजे कष्ट नाही का? बरं प्रेमाने आग्रह करत असेल तर काहीतरी समाधान हो? डोळे वटारून हे महाराज समोर उभे होते.. त्यातून फक्त आमच्यासाठी स्वयंपाक केलाय हे ही सांगितलं होतं त्यांनी आम्हाला’… नाईलाज.. दीड तास लागला जेवायला, हा मात्र ठाण मांडून बसला. काही बोलावं याच्याशी तर बोलायला तयार नाही… खाल्लं शेवटी… आणि ९.३० चं आलेलो आम्ही १२.३० पर्यंत हललोच नाही इथून… इतकं खाऊन झाल्यावर एक पाऊलही चालवत नव्हतं खरं तर, पण इथे जर थांबलो तर रात्री पुन्हा काय खाऊ घालेल हा, किंवा अजून काय रागावेल ती कल्पना ही करवेना… त्यामुळे इथून निघून जे पाहिलं गाव येईल तिथे थांबू असं ठरवलं.. जास्तीत जास्त ३ ते ४ किमी चालू शकू…त्यानंतर अशक्य होईल हे माहित होतं आम्हाला..पण आपण ठरवतो तसं नसतं.

आम्ही ठरवलं खरं पण आम्ही वाट चुकलो. इथे शेतातून पुढे जायचं होतं, आणि आम्ही कदाचित भलत्याच दिशेला गेलो. दुपारची वेळ असल्यामुळे कुणी रस्ता विचारायाला ही दिसेना. किना-यावर मार्ग नाही, वरून जायचय इतकंच माहित होतं. वाटेत शेतं संपलीत आणि झाडी सुरु झाली, वाटलं माळरान असेल, हे झालं की लागेल गाव. संध्याकाळचे ५ वाजलेत तरी ही झाडी काही संपेना. तशी ही झाडी म्हणजे काही जंगल वगैरे नव्हतं, पण निवा-याचं असं काही स्थान अजूनपर्यंत मिळालं नव्हतं. आता काय करावं काही समजेना कारण तासाभरात अंधार होणार. आम्हाला वाट सापडली नाही तर आम्हाला रात्र इथेच काढावी लागणार…. काही खायला नाही की प्यायला नाही… झाडाखाली बसून रात्र काढायची हा एकाच मार्ग उरणार होता, आणि ही वेळ आमच्यावर येऊ शकते हे त्या माई ला कदाचित सकाळी ९.३० लाच समजलं होतं… आम्हाला शपथेवर तिनी वर पाठवलं, आधी पाणी पाजलं आणि मग खाऊ घातलं, ते ही अगदी इतकं की दिवसभर आणि पुढे रात्रभर देखील काही मिळालं नाही तरी चालू शकेल….

आम्ही आता झपाझप चालत होतो.. अगदी धावत होतो म्ह्टलं तरी चालेल. पाउलवाट दिसत होती म्हणजे कुठेतरी ती जाणार इतकच समाधान. आणि थोड्याच वेळात डोक्यावर काटक्यांची मोळी घेऊन जाणारी एक मैया रस्त्यात भेटली. तिला विचारलं “मैयाजी कहां जाना है अब हमे?” आम्हाला आम्ही रस्ता चुकलो आहे हे समजलच होतं. ती म्हणाली “गंगा खेडी की टीले से उतरे होंगे तुम लोग.. उलटे हात उतर गये.. तुमको नवा घाट जाना चाहिये था… मैयाजी को क्यू छोड दिये तो?” आम्ही कुठल्या विचारात असताना त्या रस्त्याला लागलो माहित नाही… मैया पासून बरच लांब येऊन गेलो होतो चालत चालत.. समजलच नाही काही.. पण नंतर या मैयांनी विमलेश्वर चा रस्ता दाखवला.. आम्हाला उशीर होणार होताच पण इलाज नव्हता.

विमलेश्वर च्या आधी कुठेशी एक अति प्राचीन शिवमंदिर लागलं. अंधार झालाच होता. तिथे चौकशी केली तर एक आजी होत्यात, अगदीच थकलेल्या त्या म्हणाल्या “बेटा तुम यहा आसन तो लगा सकते हो लेकीन भोजन प्रसादी की व्यवस्था नही हो पायेगी… मेरे लिये पास के गाव से खाना आता है सुबह, रात को भोजन नही करती, चाय पिला सकती हू” आम्हाला तरी कुठे जेवायाला हवं होतं? इतकं ठासून भरलेलं होतं पोट की अजूनही भूक लागली नव्हती. मोबाईल वर किमी चं एक एप आहे माझ्याकडे, त्यात पाहिलं तर २२ किमी अंतर दाखवत होतं टेकडी नंतर… कमाल वाटली… आपण रस्ता चुकणार हे तिला समजलंच कसं… का तिनी इतक्या आग्रहानी खाऊ पिऊ घातलं? का तो संन्यासी कमरेवर हात ठेवून दटावून खाऊ घालत होता, ते आता समजलं. आमचा निवारा मिळण हे ही तिला माहित होतं. असो..

दुस-रा दिवशी इथून निघून बडवाह ला पोचलो आणि आज इथे थांबूनच गेलो. श्रीराम महाराजांची भेट झाली नाही कारण ते नाशिक ला गेले होते. त्यांची भेट घेऊन उद्या निघू असं ठरवलं पण त्यांना यायला उशीर होईल असं माताजी म्हणाल्या आणि आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही काहीच अंतर चालून होत नसेल तर वाईट बातमी वा-यासारखी पसरली. श्रीराम महाराजांचा अपघात होऊन त्यात ते अनंतात विलीन झाल्याचं समजलं.. वाईट वाटलं. त्यांच्या आश्रमात राहून तिथल्या भक्तमंडळी शी झालेल्या चर्चेनंतर, त्यांनी लिहिलेले श्लोक वाचाल्यां नंतर, अचानक अशी वार्ता आली… पण नियतीचा नियम असतो तो… आमची भेट होणं लिहिलं नव्हतच..

इथून पुढे मोठं ध्येय आणि ज्याबद्दल ऐकून होतं असं म्हणजे लक्कडकोट की झाडी. बडवाह नंतर काही वेळाने जंगलाचा भाग सुरु होतो. डोलारा, कोठावा, मोहोरी असं करत करत च्यवन आश्रमात जायचं. काही लोक म्हणायचे ते आडवाटेला आहे, जाऊ नका, आणि काही म्हणायाचेत जायलाच हव… आम्ही जायचं ठरवलं आणि चांगलच झालं आमचं जाणं झालं ते. ही जागा अतिशय रमणीय आहे. निवांत, शांत आणि खूप सकारात्मक कंपन आहेत इथे. इथे गरम पाण्याचे झरे आहेत. अगदी चुकवूच नये असं स्थान आहे हे. इथे आम्हाला भोलादास जी महाराज भेटलेत. उदासीन आखाड्याचे. त्यांनी आम्हाला सुकन्या आणि शर्तारी राजाची गोष्ट सांगितली. अश्विनी कुमारांनी दिलेल्या आशीर्वादाने च्यवन ऋषि पुन्हा कसे तरुण झाले आणि सुकन्येला आपला वर कसा प्राप्त करून घेता आला ते ही समजलं. आणीही बराच सत्संग झाला.

इथे आमची भेट अजून एका तरुण बाबा शी झाली. मागे एकदंत महाराजांची गोष्ट सांगितली होती मी आठवतेय का? घोंगश्याला, म्हणजे शुलपाणीतल्या झाडीत असताना? या अनुभव मालिकेच्या २० व्या भागात आहे बघा! तर आज भेटलेला हा बाबा पण ब-यापैकी तसाच.. म्हणजे कशाचं काही भानच नसलेला…असे लोक नं अगदी मनापासून सुखी असतात, सुखी असतात असं म्हणणं पण चूक च आहे.. मला सांगता येत नाहीये नीट पण त्यांन्ना कशा कशाचं भान नसतं.. ते त्यांच्या ध्येयात असतात फक्त.. विलीन झाले असतात.. देह आहे इतकच काय ते जिते पणाचं लक्षण… काय भाग्य म्हणावं..!

तर या बाबांबद्दल सांगेन थोडसं.. पण एक गंम्मत सांगते बरं का आधी.. इथे च्यवन आश्रमात तुम्हाला पिंजा-यात राहावं लागतं.. हो, खोटं नाही काही! घनदाट जंगल आहे इथे, आणि सगळे प्राणी पिंजा-या बाहेर असतात म्हटल्यावर तुम्हाला पिंजा-यातच राहावं लागणार नं….अहो इथे खूप माकडं आहेत… त्यांच्या चेष्टा बघण म्हणजे पोरखेळासारखं होतं अगदी…सांगेन थोडी मजा म्हणून. पण आम्ही इथून निघालो आणि तीरांन्या पर्यंत गेलो तो प्रवास, नंतर जयंती माता मंदिर च्या आधी अनुभवलेलं ते थरारक हालचालींच साम्राज्य, नदीकाठी पाहिलेलं दृश्य, आणि जयंती माता मंदिरात आलेला अनुभव, जेव्हा ऐन थंडीत मला थेंब पडतील इतका घाम आला, माझ्या हृदयाची गती थांबेल असं वाटू लागलं आणि एका भयानक दु:खद सत्याचा परिचय जवळून झाला तो अनुभव कधी सांगते तुम्हाला असं झालय… पण हा भाग मोठा होईल खूप, म्हणून थांबू इथेच… पण

©सुरूची नाईक – विदर्भ गट

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*