नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇५२.👇
आज अजून एका मैया बद्दल लिहिणार आहे. जिच्यामुळे या लेख मालिकेला सुरवात झाली ती माझी सखी अमृता. डॉ. अमृता इंदूरकर, माझी बाल मैत्रीण. मला आलेले अनुभव आले, मी अनुभवले असं म्हणून मी शांत होते. ते लिहून काढायचे वगैरे काहीही माझ्या मनात नव्हतं, मात्र ह्या माउली ने माझ्या जवळ हट्टच धरला. “ ते काही नाही सुरु, तू तुझे अनुभव लिहायलाच हवेत. तू परिक्रमा करून आलीयेस, काहीतरी मिळालय नं तुला? मग ते स्वत;पुरतं ठेवतेयस? काय अर्थ मग त्या परिक्रमेला? वाटून टाक… आणि मोकळी हो….”.. असच अजून एक हक्काचं माणूस म्हणजे माझा बालमित्र घना, श्री घनश्याम सहस्रभोजनी. तू छान लिहितेस, लिहून तर बघ… लिहिलंस का? असं सारखं विचारून पाठपुरावा करणारा घना आणि अमृ यांच्या या उद्गारांनी मला जाणवलं… जे काही मला मिळालय त्याची उजळणी जर मी करत राहिली नाही तर ते मला अंमलात कधीच आणता येणार नाही. आणि ते जर चारित्र्यात उतरलं नाही तर काय अर्थ आहे? कठीण आहे मान्य आहे… पण निदान या लिखाणामुळे मी पुन्हा पुन्हा त्या त्या अनुभवातून जाते आणि पुन्हा पुन्हा अनेक वळणावर न वळता, माझ्या मार्गाची मला आठवण होते. कारण हे अनुभवण, शिकणं आणि आपण तसं घडत जाणं ह्या तीनही वेगळ्या प्रक्रिया आहेत, आणि त्या पार पाडण्यासाठी काल नामक सहाय्याची गरज लागणार आहेच. तेव्हा या कालचक्रात मला माझ्या मैयाशी जोडून ठेवून, माझ्या मार्गाची जाणीव करून देणारे हे अनुभव या लेखमालिकेच्या स्वरूपात पुढे आणणा-या माझ्या अमृता माईचे, आणि “घनशाम बाबा” चे शतश: आभार!
*आता त्या लोकांचे आभार ज्यांच्या भरवश्यावर ही परिक्रमा पूर्ण होवू शकली. नर्मदा माई ज्यांच्या ज्यांच्या म्हणून रुपात येऊन मला जेवू खाऊ घालून गेली, ज्यांच्या ज्यांच्या म्हणून घरी माझा दाणा पाणी त्या मैयांनी लिहून ठेवलं होतं त्या सगळ्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम फक्त काय तो मी करू शकते .. आभार ही तर औपचारिकता आणि ती करावीशी वाटत नाही कारण या ऋणातून मला बाहेर पडायचं नाहीचे मुळी.
*मला आठवतो तो खापारामाळचा शांतीलाल पावरा, त्याची बायको.. स्वत: उपाशी राहून आम्हाला खाऊ घालायला तयार असलेली… मी नाही विसरू शकत माझ्या बाबाला, माझी अतोनात सेवा केली होती त्याने मी आजारी असताना, नारेश्वर ला…. मोलगी चे नाईक काय किंवा बगवानीयाची ती दोन लहान मुलं काय……ते म्हातारे लाल पुरी बाबा, आमच्या साठी भर थंडी अंगावर आभाळ पांघरून झोपतात,ती कुक्षी मा.. माझा वाढदिवस साजरा करते, मला कपडे करते… त्या मध्यप्रदेशातल्या परिक्रमावासी मैया बलाबला कुंड ला येऊन माझी चौकशी करणा-या, राज घाट ला रात्री ११ वाजता फक्त मला भेटायला येणारे मांगीलाल चे जावई,५० किमी पर्यंत जेवणाचा डबा घेऊन येणारी मोनिका, मांगीलाल, हरी ओम भाई, किती किती नावं घेऊ? ही संपता न संपणारी यादी आहे. या प्रत्येकाकडून माझी काळजी घेतली गेलीये, माझं संगोपन केलं गेलय, माझं पालन पोषण केलं गेलंय, मला योग्य वाटेवर नेऊन ठेवण्याच्या या प्रक्रियेत बहुमोलाचा वाटा या प्रत्येकाचा आहे आणि म्हणून हे श्रेय त्या प्रत्येकालाच!माझ्या आई वडिलांची पुण्याई म्हणून ही संधी मला मिळाली. माझे पाठीराखे भाऊ, माझी नवी नवेली भावजय, हे सगळे माझ्या निर्णयाच्या मागे खंबीर पणे उभे राहिले म्हणून हे शक्य झालं. परिक्रमेला जातेय म्हटल्या वर डोळ्यात पाणी आलेली आणि मायेनी डोक्यावरून हात फिरवणारी, आशीर्वाद देणारी माझी ९५ वर्षाची आजी,माझा परिवार, माझा नवरा, सासू सासरे, दीर जाऊ, माझा लेक आणि माझ्या लहानग्या पुतण्या यांचं सहकार्य मिळालं आणि म्हणूनच घर सोडून पाच महिने मी घराबाहेर राहून हे कार्य सिद्धीस नेऊ शकले.
*सरते शेवटी बोलेन ते थोरल्या मोठ्यांचे आशीर्वादाबद्दल. चितळे बाबा,आणि “तुझी वाट लागलेली आहे.. निश्चिंत रहा” असं पहिल्याच दिवशी सांगणा-या चितळेमाई, ताई तू याच वर्षी जाणार परिक्रमेला म्हणणारे अरविंद काका मुळे, या सगळ्यांच्या ऋणात मला राहू दे गं मैया…असच म्हणेन..
*गुरु गोविंद दोनो खडे, का के लागू पाय
*बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो बताये….
*आणि अश्या माझ्या सद्गुरूला मी काय सांगावं? त्याच्या चरणी फक्त नतमस्तक होता येतं… आणि मग आपसूक काय घडायचं ते घडत जातं… परीक्रमा ही अशीच घडत गेली, आणि ही अनुभव मालिका ही अशीच उतरत गेलीये…याहीपुढे येणारा प्रत्येक क्षण हा असाच येत जाणारे, आपसूक.. आपण फक्त निमित्तमात्र.. आपण फक्त चालायचंय. ती मैया आणि सद्गुरू चालवतील तसं.. आपण फक्त भिनू द्यायचाय तिचा जयघोष, आपल्या देहात्म्याच्या कणाकणात… जीव, प्राण, आत्मा रोम रोम तेजाळून निघताहेत या … आई म्हणून आपण फक्त हाक माराचीये तिला….. नर्मदे हर.. अशी!
*या भागात मी अनुभव सांगितला नाहीये याची मला जाणीव आहे. तुम्ही वाट बघताहेत हे माहितीये आणि म्हणून हा भाग इथेच संपवतेय. पुढच्या भागात मंडळेश्वर ला जाताना चा अनुभव, आपण आपल्या गुरुस्थानाकडे कसे नकळत खेचल्या जातो तो अनुभव, आणि एक रहस्य सांगणारे….22 किमी अन्न आणि पाण्याविना आम्ही कसे चालू शकलो याचं, थोडा धीर धरा… पुढच्या रविवारी येतेय भाग ५३.
नर्मदे हर हर
©सुरूची नाईक – विदर्भ गटगट
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply