नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇४८👇
*आता लुनेर ला थांबून आराम करावा असं वाटत होतं पण देव जाणे तिथे थांबायची इच्छाच झाली नाही.वेळही होता,पुढे निघालो तर सगळा शेतातला रस्ता.पाणी मागायला देखील कुणी नाही. आधी लुनेर पर्यंत आणि नंतर पुढे १२ किमी चालून झालं होतं आणि आता थकवा आला होता, भूकही लागली होती. संध्याकाळ असल्यामुळे शेतांमध्ये ही कुणी नाही, मात्र दूर हायवे चा आवाज येत होता. रस्त्यात मात्र मैयांनी आमची सोय केलीच. इतक्या मोठ्या परिसरात फक्त एक झोपडी आम्हाला दिसली. तिथे पाणी मागितलं, मैयाजींनी पाणी आणि सोबत ताक ही आणलं. ताक म्हणजे माझ्यासाठी अमृत आहे माहितीये का? खूप आवडतं मला.. अगदी मी ताकावर जगू शकेन, इतकं.. आणि अश्या थकलेल्या वेळी ते मला नं मागता मिळत गेलय ! असो, तर माझी पाण्याची तहान चक्क ताकावर शमवण्यात आली. इथे नं अजून एक गम्मत झाली. “दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम “हे आपण नेहमीच म्हणतो नं? ते इथे इतकं सत्य होतं माहितीये का? इथे, या झोपडीत, म्हणजे बालीपुरा गाव बरं का हे, तर या मैयांनी कणकेचे मोठाले लाडू पण आम्हाला दिले, आणि सोबत एक लाडू एका पिशवीत भरून दिला. म्हणाली, “ मैया जी, अभी थोडी देर पहले यहाँ से एक परिक्रमावासी बाबा भी आगे निकल गये है, ज्यादा दूर नही गये होंगे, आप तेज चलते हो, पकड लेना उन्हे, और ये लड्डू उनको दे देना” ठीके, देईन मी.. असं म्हणत निरोप घेतला आणि निघालो. आता एकच ध्यास होता. हा लाडू ज्याच्या नावे लिहिला होता त्याला पोहोचवणे. कसं असतं नं, त्या वेळी मला अजून काही दिसत नव्हतं, माझ्या नजरेसमोर फक्त तो भुकेला परिक्रमा वासी येत होता, ज्याच्या नशिबात हा लाडू लिहिला होता. आणि मैयाची इच्छा होती ती, एक म्हातारा संन्यासी एका झाडाखाली बसलेला दिसला. बालीपुरा मधल्या झोपडी वाल्या मैयांनी वर्णन केला तसाच…नर्मदे हर झालं, आणि मी त्याला त्याच्या नावाचा लाडू दिला. सांगितलं, मागे जी झोपडी लागली नं, त्या मैयांनी तुम्हाला बघितलं होतं, म्हणून तुमच्या साठी पाठवलाय. तर तो संन्यासी काय म्हणतो, “मुझे तो कोई झोपडी दिखी ही नही, आप अपने खाने मे से मुझे दे रहे हो, मेरे लिये तो आप ही मैयाजी हो” असं म्हणत त्यांनी मला नमस्कार केला…
*काय ही किमया तिची, जिथे आम्ही थांबलो ताक घेतलं, लाडू खाल्ले, त्याच रस्त्याने हा संन्यासी पण आला होता खरं. पण याला कशी काय नाही दिसली झोपडी? आणि त्या मैयांनी जर या संन्याश्याला पाहिलं होतं तर तेव्हाच थांबवून का नाही दिला लाडू? पाहिलं तर होतं कारण झोपडीतल्या मैया ने या संन्याश्याचं अगदी तंतोतंत वर्णन केलं होतं.. ह्या मैयाचं नं काही काळात नाही. मी मात्र फार आनंदात होते कारण काही का असेना लाडू त्याच्या पर्यंत पोहोचवण्यात माझ्या या देहाचा, आत्म्याचा थोडाफार सहभाग झाला हेच माझं भाग्य. तिच्या भक्तांची सेवा करण्यात केवढा आनंद आहे खरच… खरं तर सेवा ही नाही म्हणता येणार याला, एक लाडू पोहचवणे काही सेवा झाली का? पण तो लाडू खाताना त्या थकलेल्या जीवाच्या चेह-यावरचा आनंद जितका मौल्यवान आहे नं तितकं काही काही नाही. सहज विषय निघतोय म्हणून सांगते, मला अनेकदा लोक म्हणतात, काय मिळतं गं तुला असं भटकून… मी ही सांगते गमतीत.. जे तुम्हाला नाही मिळत ना ते.. पण गमतीचा भाग बाजूला ठेवून विचार केला तर समजतं, हे जे काही मला मिळतंय न त्याची तुलना कशाशी ही होऊ शकत नाही आणि भौतिक जगात सर्वोच्च स्थान घेतलेल्या आणि अत्यावश्यक असलेल्या “पैसा” नामक क्षणभंगुर वस्तू शी तर अजिबात होऊ शकत नाही. कारण पैशाने सर्व विकत घेता येईलही, पण समाधान आणि आत्मशोध हा विकत घेता येणार नाही. आता आत्मशोध मी घेतलाय का हे विचाराल तर मी म्हणेन तो प्रत्येकाचा वेगळा आहे. मला तो काव्यात, लिखाणात, परिक्रमेत मिळेल, तर अजून कुणाला तो कलेत, स्वयंपाक करण्यात मिळेल… हवा असतो तो फक्त एक साक्षात्कार. मला तो माझ्या मैया कडे मिळाला आणि म्हणून आज मी सर्वसुखी व्यक्ती आहे.. “जगी सर्व सुखी असे कोण आहे, विचारी मना तूची शोधून पाहे” याचं उत्तर मला माझ्यात सापडतं, मी जगात सर्वसुखी आहे हे म्हणण्याचे अनुभव मला माझ्या मैयांनी दिलेत…असो..!
*पुढचा मुक्काम आमचा रामधाम ला होता. तिथून पुढे आमची बी जे पी चे मंडलाध्यक्ष श्री श्रीमाली यांची भेट झाली, त्यांची ही बरीच मदत झाली. त्यापुढचा मुक्काम छीतरी ला झाला, अगदी उघड्यावर.. आणि मग मांडू ला पुन्हा एकदा अनेक अनुभव आले… मागच्या भागांमध्ये सांगितलेले दोन संन्यासी आठवतात नं? “राम को मत छोडना” सांगणारे? एक खलघाट चा राजबिंडा संन्यासी, आणि एक लाल पुरी बाबा. ज्यांना मी स्लीपिंग बॅग दिली..आता तिसरा संन्यासी काय म्हणाले ते सांगणारे, आणि हो शेंगदाणे खाता खाता आमच्या हातात चांगले किलोभर रसरशीत टपोरे बदाम येऊन पडलेत माहितीये?
*कसे?..सांगणारे, आणि गम्मत सांगते, मंडू उतरलो नं तेव्हा बगवानिया हून कुणीतरी खास आम्हाला घ्यायला आलेलं.. कोण? अहं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारे मी पण ४९ व्या भागात.
©सुरूची नाईक – विदर्भ गट….
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply