नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇४२👇

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇४२.👇

*नर्मदे हर हर..

*मी मागच्या भागात तिलकवाडा या गावाबद्दल बोलत होते. इथे मी जस जशी जात होते तसं मला फारच प्रसन्न वाटू लागलं होतं. सूर्य मावळतीला आलेला होता. सगळीकडे सोनेरी प्रकाश पसरला होता. मोठा पण कच्चा रस्ता होता आणि दूर वर हे गाव दिसत होतं. किना-या वरून आल्यामुळे आम्ही जरा वस्ती च्या दूर होतो. वंदना ताईनी आधीच फोन केला होता आणि आम्हाला घ्यायला शर्मा जी स्कुटी वरून आले होते. अर्ध्या रस्त्यात येऊन त्यांनी आमचं सामान आग्रहाने स्कुटी वर घेतलं आणि रस्ता दाखवून ते पुढे निघाले. अंधार पडायला आला होता. वाटेत चहा घेऊन आम्ही आश्रमात गेलो. इथे आमच्या आगोदर बरीच मंडळी येऊन पोहोचलेली होती. त्यातली काही परिक्रमावासी होती तर काही फक्त इथे भेट देण्यासाठी आली होती. आज अंधार पडून गेल्यामुळे हॉल बंद होता, आमचं दर्शन झालं नाही. रात्री जेवून आम्ही झोपलो मात्र दुस-या दिवशी सकाळीच आधी मंदिरात जाऊ असं वाटलं. आज कोण का जाणे भालोद च्या प्रतापे महाराजांची आठवण येत होती. ते म्हणाले होते मला, तू गरुडेश्वर ला आलीस की मला फोन कर, मी येईन तुला भेटायला. तिथली मोठ्या महाराजांची मूर्ती आठवत होती. मी आंघोळ आटोपून दर्शनाला गेले आणि बघते तर इथे ही मोठ्या महाराजांची मूर्ती.. ती पाहून मला गहिवरूनच आलं. काल उशीर झाल्यामुळे मी इथे येउ शकले नाही, आज मी इथे यायच्या आधी मला प्रतापे महाराजांची आठवण झाली.. काय पण नं किमया आहे सद्गुरु ची.. मी बाबाला म्हणाले होते कालच, “बघ, काहीतरी मला ओढतय” हो अगदी असं म्हणाले होते मी.. आज आठवण ही आली मला मोठ्या महाराजांची आणि आता इथे ही मूर्ती दिसली, “मला नं आता माझ्या गुरुंची आठवण येतेय, माझ्या नानांची आठवण येतेय”.मी बाबाला म्हणाले. बाबा काही न बोलता फक्त हसला, म्हणाला “आता तू रडणार आहेस”, आणि असं म्हणत त्यांनी माझ्या पाठीमागे बोट दाखवलं, मी वळून पाहिलं आणि खरच माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण तिथे माझ्या नानांचा फोटो होता. मी इथे आली तेव्हा इथे काही लोक बसले होते, त्यामुळे मला तो फोटो आधी दिसला नाही, मी मात्र बराचवेळ बसून होते, अगदी आम्ही दोघं फक्त उरलो होतो आत, जवळ जवळ तासभर बसलो असू आम्ही, आणि आता इतक्या उशिरा माझ्या अगदी बरोबर पाठीमागे नानांचा फोटो होता… मी खरच रडत होते, बघा न समोर माझ्या गुरुंचे गुरु, आणि पाठीशी सद्गुरू आणि नेमकं मी मध्ये बसलेली, आणि याच वेळी मला मोठ्या महाराजांची ही आठवण आली आणि माझ्या नानांची ही… हा संकेत होता मला… माझ्या वरच्या कृपेचा, माझ्याकडे माझ्या गुरुचं आणि मोठ्या महाराजांचं किती लक्ष असतं बघा.. . इथे मोठ्या महाराजांनी चातुर्मास केलाय, किती पावन असेल ही जागा, आणि इथे मला माझ्या नकळत असा संकेत मिळावा… पाठीशी गुरु माउली आणि समोर, म्हणजे मार्ग दर्शन करायला मोठे महाराज… अजूनही आठवलं की अंगावर काटा येतो.. आणि म्हणून मी ओढल्या जात होते…मी अजूनही इथेच बसले होते… बाबा मात्र उठून बाहेर गेला होता… आणि आता बाबाच्या रडण्याची वेळ आली होती…सांगते..

*बाबा बाहेर गेला तेव्हा बाजूला एक हनुमानाचं मन्दिर आहे तिथे जाऊन आला. “खूप छान आहे हनुमानाचं मंदिर, लवकर चल, बंद होइल ते थोड्या वेळात” बाबांनी मला आग्रह केला आणि मी गेले पण. तिथेही खूप प्रसन्न वाटत होतं. आम्ही तिथे बसून वडवानल स्तोत्र, हनुमान चालीसा, रामरक्षा म्हंटली, थोडा वेळ बसलो आणि बाहेर आलो. बाबा म्हणाला, “आज दासबोध वाचूयात का?” पण हे मंदिर दुपारला बंद होणार होतं, आम्ही अजून एक दिवस इथेच थांबणार होतो, म्हणून ठरलं उद्या वाचूयात, याच मंदिरात. असं ठरवून आम्ही बाहेर आलो, तोच ते मंदिर बंद करणारा पुजारी आला. आम्ही त्यांना विचारलं, “उद्या दासबोध वाचायचा विचार आहे थोडा उशीर झाला तर चालेल का? “ते पुजारी जे बोलले ते ऐकून आता बाबा रडू लागला.. बाबा चा दासबोधाचा बराच अभ्यास आहे आणि रामदास स्वामी हेच त्याचं आद्य दैवत. दासबोध प्रचार कार्यात बाबा कायमच असतो. आणि इथे बाबा ला दासबोध वाचावासा वाटला .. हम्म, तर ते गुरुजी काय म्हणाले माहितीये का? ते म्हणाले, “ अहो नक्की वाचा दासबोध, कितीही वेळ लागला तरी चालेल, तुम्हाला सांगतो, ह्या मारुतीची स्थापना स्वत: रामदास स्वामींनी केली आहे”.. आता सांगा का नाही रडू येणार बाबा ला? दुस-या दिवशी आम्ही दोघांनी तिथे बसून संपूर्ण दासबोध वाचला.

*या तिलकवाड्याला कमालच झाली नाही? आम्हा दोघांनाही आमच्या गुरुंनी अश्या प्रकारे शुभ संकेत दिलेत आणि आमच्या कडून योग्य ते कार्य करवून घेतलं. आता दोघांनाही अश्या म्हणजे एकाच प्रकारचा अनुभव एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी येणं याला तुम्ही तरी योगायोग म्हणाल का? मी तर नक्कीच नाही म्हणू शकणार. भालोद नंतर थोड्या थोड्या दिवसांनी असे अनुभव येत राहिले, म्हणजेच गुरु आपल्याकडे लक्ष ठेवून आहेत तेव्हा त्यांचे संकेत समजून घ्यावे, बाकी काय करायचे ते ते बघतील, आपण आपलं समोर येईल तशी परिक्रमा करत राहावी हेच आम्ही ठरवलं.

*आता इथून पुढे गरुडेश्वर, म्हणजे पुन्हा मोठ्या महाराजांच स्थान!.. इथे काय नवीन पदरात वाढून ठेवलंय ते बघायला आता मन आसुसलं होतं. पुन्हा एक योगायोग झाला. माझी एक मैत्रीण गरुडेश्वर ला येतेय असा तिचा फोन आला आणि त्याच संध्याकाळी मी आणि बाबा गरुडेश्वर ला निघालो. वंदना ताई ला आणि मंदार ला पण विष्णू गिरी महाराजांची भेट घ्यायची होती म्हणून ते इथेच थांबले. मंदार ला जुने सोबती पण इथे मिळाले होते एक विष्णू राउत आणि दुस-याचं नाव आता आठवत नाहीये. त्याला सोबत होती आणि वंदना ताईचे यजमान येणार होते त्यामुळे तिला ही सोबत होतीच. इथे हा आम्हा चौघांचा गट तुटला,आम्ही पुढे निघालो.

*गरुडेश्वर ला पोचलो आणि तिथल्या ऑफीस मध्ये गेलो. रूम मिळेल का विचारलं तेव्हा १५० रुपये लागतील असं सांगितलं. आम्ही तयार झालो, आता डायरीत नावं लिहिणे बाकी होतं, तोवर जरा गप्पा झाल्यात. बाबानी नाव पत्ता वगैरे लिहिला आणि मी पैसे द्यायला पर्स बाहेर काढली तर तिथले कर्मचारी म्हणाले “पैसे नकोत”… अरे आताच तर १५० रुपये म्हणाला होतात तुम्ही” मी विचारलं. ते म्हणाले “ तुम्ही नाना महाराजांच्या शिष्या आहात, पुरेसं आहे”. त्यांनी आमच्या कडून एकही रुपया घेतला नाही. ती रात्र निवांत गेली.

*मी प्रतापे महाराजांना फोन लावला. ते मला भेटायला येणार होते. ते येईपर्यंत मी इथून पुढे निघणारच नव्हते, कारण याच्या पुढे मला त्या माउलीची भेट पुन्हा कधी कुठे घडेल हे माहित नव्हतं आणि मी आतुरतेने वाट बघत होते. तो दिवस ही गेला. म्हणजे आता तिसरा दिवस होता आमचा गरुडेश्वर चा. मला सकाळी सकाळी प्रतापे महाराजांचा फोन आला, “ बेटा, मी येतोय आज”.. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही.. अगदी लागलीच सगळी तयारी, आरती पूजा सगळं आटोपून मी मैया किनारी जाऊन महाराजांची वाट बघू लागले. आता मला त्यांच्या भेटी शिवाय काही नको होतं. पण मी निदान चहा तरी प्यावा म्हणून बाबा मला हट्टाने तिथून घेऊन गेला… माझा चहा संपत नाही तो दुरून मला नाव येताना दिसली.. कुणी तरी म्हणालं, प्रतापे महाराज येताहेत…हातातला चहाचा कप मी तसाच ठेवून अक्षरश: धावत सुटले… मी त्यावेळी कशी आणि किती जोरात धावले याचं भान मला नव्हतं मात्र मी जी धावत गेले ते महाराजांच्या पायावर डोकं ठेवूनच शांत झाले…: अगं हळू बेटा, हळू…” असं म्हणत महाराजांनी प्रेमानी मला जवळ घेतलं आणि लहान मुल आईला भेटून कसं बिलगतं तिला, आणि आनंदानी त्या बाळाला कसं रडू येतं तसं झालं होतं मला. मला कश्या कश्याच भान नव्हतं. माझी माउली फक्त माझ्यासाठी धावत आली होती.खरं तर आज महाराजांकडे भालोदला ३० लोक जेवायला यायचे होते. असं असताना देखील ते फक्त माझ्यासाठी नर्मदा माई ओलांडून मला भेटायला आले होते.

*मोठ्या महाराजांच्या पायावर घालायला म्हणून त्यांना नुकताच मिळालेला “जीवन गौरव” पुरस्कार ही त्यांनी आणला होता. आम्ही मंदिरात गेलो. दर्शन घेतलं आणि तो पुरस्कार प्रतापे महाराजांनी पूजा-यांकडे दिला, मोठ्या महाराजांच्या पायाला लावून तो आता परत घ्यायचा होता.तेव्हा प्रतापे महाराज पूजा-यांना म्हणाले “हा महाराजांच्या पायावर घातलेला पुरस्कार माझ्या हाती न देता माझ्या ह्या लेकीच्या हाती द्या, तिलाही असाच पुरस्कार मिळायचा आहे असा आशीर्वादच आहे तिला” हे ऐकून तर मी खरच भाग्यवान आहे याची मला खात्रीच पटली. महाराज पुढे म्हणाले “बेटा, तुझ्या सगळ्या जवाबदा-या पूर्ण झाल्या की तुला मालासामोट ह्या आदिवासी क्षेत्रात काम करायचय, आणि तोवर तुला जितकं शक्य असेल तितकं समाजा साठी काहीतरी करावस तू.. करशील, खात्री आहे माझी” मला जाणवलं की महाराजांचा माझ्यावरचा विश्वास आणि प्रेम खरच किती गाढ आहे, एका माउली शिवाय ते तसं असूच शकत नाही. पण मला बरेचादा खंत वाटते की अजून तरी मी काही करू शकत नाहीये, पण करेन नक्की.. नर्मदा माई, माझे गुरु, आणि ही माउली हेच मला योग्य वेळी योग्य दिशा दाखवतील हेच खरं. असो.

*आता गरुडेश्वर ला काल मंदार,आणि पराडकर काका पुतण्या येऊन पोचले होते. गरुडेश्वर पासून ते पुन्हा आमच्या सोबत असणार होते. आता मंदार, सुदिन,पराडकर काका, मी आणि बाबा असे ब-यापैकी सोबत होतो. थोडंफार मागे पुढे व्हायचो पण तसे सोबतच होतो. त्या संध्याकाळी मैया किनारी आरती पूजा आटोपून आम्ही झोपी गेलो आणि सकाळी लवकर पुढच्या प्रवासाला निघालो. आता इथून पुढे गुजरात मधून पुन्हा एकदा मध्य प्रदेशात प्रवेश करायचा होता. गुजरात ची श्रीमंती सोडून आता पुन्हा एकदा या गरीब पण मनाने मोठ्या असलेल्या लोकांच्या देशात काय काय अनुभव येतात हे बघण्यासाठी आम्ही तयार होतो. या वेळी पर्यंत मैया आपल्याला आता काय दाखवते? हा एकाच प्रश्न असायचा, बाकी काहीही नाही. जे येईल ते समोर ताट मांडल्या सारखं जेवून घ्यायचं आणि त्यातून नकळत पणे मिळणा-या आनंदाच धनी व्हायचं इतकच आम्हाला माहित.

*इथून पुढे वगाच ला जायचं होतं. इथे लोकांना विचारून विचारून पुढे जायचं, तर आम्ही ७ किमी वाट चुकलो आहोत हे लक्षात आलं. आता ७ किमी मागे जाणं शक्य नव्हतं म्हणून पुढे गेलो आणि एका पोलीस स्टेशन ला रस्ता विचारला. पोलिसांनी रस्ता ही सांगितला आणि चहा ही पाजला शिवाय “ माताजी आपको फ्रेश होना है तो यही हो लो, आगे जगह नही मिलेगा” असं ही सांगितलं. तिथे एक गेस्ट रूम होती तिथे मी फ्रेश झाले आणि आम्ही पुढे निघालो. परिक्रमावासी म्हटलं की लोक आपणहून पुढे येतात मदतीला हे काही आता नवीन नाही.

*आम्ही पुढे निघालो. आजचा दिवस तसा प्रसन्न होता आणि आम्ही सकाळी लवकर निघालो होतो. अजून आमचं बालाभोग करून झालं नव्हतं. आम्ही पोलीस स्टेशन मध्ये थांबलो असताना मंदार, सुदिन आणि काका पुढे गेले होते पण फोन वर आम्ही बोलत होतो त्यामुळे ते कुठे थांबलेत याचा अंदाज मिळत होता. “ या तुम्ही लवकर, बालाभोग करून पुढे जाऊ” सुदिन चा फोन झाला होता. रस्त्यात आम्हाला एकाने क्रीम चे बिस्कीट दिले आणि तिथे एक छोटीशी मैया माझ्या हातातल्या बिस्कीटाकडे बघून रडू लागली. मी ते बिस्कीट तिला दिले आणि तिच्या आईने लगेच आम्हाला १० बिस्किटाच्या पुड्याचा एक मोठा पुडा दिला..अगदी नाही नाही म्हणता ना देखील! मैयाचं हे असच आहे..

तुम्ही तुमच्यातल अगदी तिळभर द्या कुणाला काढून, ती तुम्हाला मणभर परत करेल.

*कितीदा तरी अनुभवलंय हे.. अगदी तिथेच पुढे पुन्हा असाच अनुभव आला. एक कुणी परिक्रमावासी रिक्षाने जाणार होता. त्याच्याजवळ सुटे पैसे नव्हते म्हणून त्याने आमच्याकडे सुटे आहेत का विचारलं. माझ्याकडे २० रुपयाची नोट होती, ती मी दिली, “तो म्हणाला मला ५ रुपयेच हवे आहेत, सुटे हवेत फक्त” मी ही त्याला म्हणाले “ चाय पी लेना बाबाजी”, आणि आम्ही पुढे निघालो. एका दुकानात आम्हाला चहा ला बोलावलं. आता आम्हाला खरच चहा नको होता, “ बोहोत चाय होगया बाबूजी, आप पानी पिला दो” असं म्हणत आम्ही चहा ला नकार दिला तर या माणसाने अर्धा लिटर दुधाचं पाकिटच आमच्या हाता ठेवलं! आम्ही त्या बाबाला चहा ला पैसे दिले होते, मैयांनी आम्हाला ते असे परत केले. अश्याच प्रकारचा एक विलक्षण आणि अविश्वसनीय अनुभव बाकानेर च्या नंतर कल्याण पुरा लागतं तिथल्या लाल पुरी महाराजांचा, पण तो आता सांगणार नाही. आपण काल्याणपुराला पोहचू तेव्हा सांगेन. मी विसरले तर आठवण करून द्या मला मंडळी. खरं सांगू का, जेव्हा मी हे अनुभव लिहिते नं तेव्हा मला तुम्ही समोर बसून ऐकताय असच वाटतं, आणि म्हणून हक्कानी तुम्हाला मी मला आठवण करून द्या असं ही सांगते.. असो.. तर कल्याण पुरा चा अनुभव नंतर..

*आता आपण सुदिन आणि मंडळी थांबली तिथे बालभोगा साठी पोहोचलो. खूप भूक लागली होती. जलेबी पोहा ची ऑर्डर देऊन झाली होती. आमच्या कडचं दुधाचं पाकीट आम्ही त्या दुकानदाराला दिलं, कारण आम्ही दुध पिणार नव्हतो आणि तसं ठेवून ते नासून गेलं असतं, आम्हाला तर आता भरपूर बालभोग करायचा होता. आधी पोहे झाले २ २ प्लेट, मग जिलेबी पण खाल्ली आम्ही, आणि नंतर पैसे विचारले तर हा माणूस घेईना…अरे देवा, इथल्या इथे असा हा तिसरा अनुभव, पण त्याचे पैसे बरेच झाले असावेत, पराडकर काकांनी त्याला पोह्याचे पैसे घ्यायला लावलेत, जिलेबीचे मात्र त्याने घेतले नाहीत… आम्ही पुढे निघालो आणि आता पुढे “पैसे घेणार असशील तर ऑर्डर देतो” बाबा असं विनवून मगच ऑर्डर द्यायची असं ठरवलं आम्ही. कुणी स्वत:हून दिलं तर एकवेळ सेवा म्हणून ठीक आहे पण बिचा-या गरीबाचा धंदा असताना इतकं मोठं बिल न देणं हे काही योग्य नाही हो वाटत!..

*असो..आम्ही वाडिया, खापरिया, उन्डवा करत करत पुढे गेलो.. उन्डवा पासून नर्मदा केनल लागतो, याच्या काठा काठांनी जा असं आम्हाला सांगण्यात आलं, पण भला मोठा रस्ता हा, संपता संपेना.. प्रत्येक पुला पाशी पोहोचलं की कुणीतरी सांगायचं, “ये नही अगले पूल के पास गाव है, तो अगला पूल काही यायला तयार नाही. अहो संध्याकाळ होत आली तरी राहण्यासारखं काही ठिकाण सापडेच ना! इथे काहीच नव्हतं आणि, एखाद दुसरं सर्किट हाउस … बस.. आज आमचं आधीच ३७ किमी चालून झालं होतं तरीही अजून काही सोय होत नव्हती.. मग राहण्याचं ही अजून माहित नाही तर जेवणाच काय झालं असेल आमच्या? झाली असेल का काही सोय? की रस्त्यावरच झोपायला लागलं आज आम्हाला? सांगते.
क्रमश: भाग-४३.
©सुरूची नाईक–विदर्भ गट *+91 98236 53511*
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*