नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇४१.👇
नर्मदे हर….
तर भाग ४० मध्ये मी उल्लेख केला होता कर्नाली च्या एका मंदिरा चा. एक छोटं मंदिर होतं. ते बघण्याची इच्छा होती म्हणून तिथेच मागे राहणा-या तिथल्या पूजा-यांना विचारलं. त्यांचं नाव शौचे गुरुजी. ते नाशिकचे राहणारे. आता योगायोग बघा. आम्ही अनेक मंदिर बघत बघत जात होतो. नेमकं हेच मंदिर बघावसं वाटलं. आणि इथले पुजारी ही महाराष्ट्रीय निघाले. त्यांनी चहा ला आत बोलावलं आणि तिथून जे काय सुरु झालं ते विलक्षण आहे. लाकडी जुन्या वाड्याचं दार उघडून आम्ही आत गेलो,आत समोर बघतो तो मुरालीधराचं मंदिर. काळीशार आणि देखणी मूर्ती. असं वाटलं आता बोलेल की काय इतकी रेखीव. ते सगळं वातावरण च असं जादुई वगैरे म्हणतात नं तसं होतं. थांबा, नीट वर्णन करते म्हणजे जस च्या तसं सांगता येईल मला.
तर दारातून आम्ही आत गेलो, ती एक पडवी होती. चौकोनाकार. त्या पडवी चं छत हे जुन्या बांधणी चं होतं. उंच अगदी. वर माळया सारखं काहीतरी लाकडी पाटी लावून तयार केलेलं होतं आणि त्यावर कौलं घातलेली.खाली दगडी फरशी.
साधारण ८ फुट रुंद आणि बरीच मोठी ती पडवी. अंगणाच्या चारही बाजूला, आतून चौकोन करावा तशी. मध्ये हे मुरलीधर मंदिर. मंदिरा ला मोठा गाभारा. आणि बराच मोठा सभामंडपाचा भाग. त्या सभा मंडपात आणि पडवी मध्ये भले मोठे जाड जुद खांब, त्यावर सुरेख नक्षी कोरलेली. मंदिरा समोर तुळशी वृंदावन आणि गाभा-याच्या पुढे उभं राहिलं की येणारा मंद सुगंध. अरे हो, प्रकाश व्यवस्थेकडे विषेश लक्ष या बांधकामात दिलेलं आढळलं. सभा मंडपाच्या वरच्या बाजूला एक चौकोन आकाशाकडे मोकळा सोडलेला आणि सभा मंडपाच्या वरच्या माळ्यावर आपल्या कडे बालकनी असते ना तशा बालकनी दिसत होत्या चारही बाजूनी. या आकाशाकडे उघड्या असलेल्या चौकोनातून प्रकाश आत येणार आणि एरवी पडवी ला असलेली दारं उघडली तर. पडवी आणि मंदिरा च्या मध्ये एक चार फुट जागा सोडलेली होती, ती सुद्धा आकाशाला उघडी असणारी. म्हणजे खूप भक भक असा प्रकाश नाही की मरगळ वाटेल असं कोंदट वातावरण ही नाही. प्रसन्न आणि कमालीचं शांत. ही शांतता फक्त आवाज नसल्याची शांतता नव्हती,यात एक स्थीरता आणि एक गांभीर्य होतं. इथल्या भिंतीवर अनेक फोटो लागले होते. त्यात रामदास स्वामी, श्रीधर स्वामी, शिवाजी महाराज आणि किती तरी अनेक फोटो होते. या मंदिराच्या आत आम्ही आलो तेव्हा फक्त टीव्ही वर दिसणारे जुने वाडे काय ते बघितलेल्या आम्हाला आपण घड्याळ उलट फिरवून इथे आलो की काय असं वाटावं इतकं विलक्षण चित्र डोळ्यासमोर होतं.
मंदिराच्या मागून वर जाणारा लाकडी पाय-यांचा आणि उंच जिना चढून आम्ही वर गेलो. तिथे शौचे परीवाराचं वास्तव्य. अगदी साधी राहणी. गुरुजी कुणाला तरी वेद पठण शिकवीत होते. काकुंनी चहा केला. गप्पा झाल्यात आणि कुठे राहणार असं विचारल्यावर आम्ही चौघांनी ही इथेच राहू का म्हणून विचारलं. दोघांनी आनंदानी होकार दिला आणि आम्ही खाली पडवी मध्ये आसन लावलं. या वाड्याचा नक्की इतिहास माहित नाही मात्र शौचे यांच्याकडे तो २५० वर्षांपासून आहे. त्या आधी बडोद्याचे धायबर ( तिथल्या राज्यातील सरदार ) हे इथे राहत. यांनी हाच वाडा शौचे यांना इनाम स्वरूपात दिला असं समजलं. रात्री काकुंनी बटाट्याची भाजी कढी आणि पोळ्या / भात असा स्वयंपाक केला आणि आम्ही जेवून आसनावर आलो.
रात्री मंदार ला नारायण धारपांच्या अनेक गोष्टी आठवल्यात.. वाडा तसाच होता मात्र इथे अतिशय शुद्ध कंपन असल्याने तशी भीती देखील वाटली नाही.
इथला एक अनुभव नक्की सांगेन. इथे श्रीधर स्वामी यांचा एक खूप प्रेमळ फोटो आहे. या फोटो कडे बघता बघता मला अचानक माझं लहान पण आठवलं. मी हा फोटो माझ्या लहानपणी बघितलेला.
अगदी जुना, कृष्णधवल. आमच्या बेडरूम मध्ये कपाटाच्या बाजूला लावलेला होता. मी असेन ५-६ वर्षांची. मी त्या फोटोकडे रोजच बघायचे. अर्थात हे सगळं मला अचानक फोटो पाहून आठवलं होतं. मला आठवत होतं की मी खालून वर त्या फोटो कडे बघत असे. त्या फोटो मध्ये मला माझ प्रतिबिंब पण दिसायचं आणि महाराजांचा फोटो पण. मग माझा हा खेळ बराच वेळ चालायचा. मला त्या वेळी श्रीधर स्वामी हे नाव माहित नव्हतं. पण मला त्यांच्या तेजस्वी आणि प्रेमळ स्मित हास्याची नेहमीच ओढ असायची. मी मनातल्या मनात त्यांना हसणारे आजोबा म्हणायचे हे ही मला आठवत होतं. लहानपणी हे आजोबा मला खूप आवडायाचेत हे ही मला आठवत होतं. आणि या वाड्यात हे सगळे जुने फोटो बघून मला ह्या सगळ्या गोष्टी इतक्या चटकन आठवल्या की जश्या काही काल घडलेल्या गोष्टी आहेत आणि न राहावून मी आईला फोन केला. आईला हे सगळं सांगितलं. सगळं आठवल्याचं ही सांगितलं, आणि आई जे म्हणाली ते ऐकून मी चार फुट वर उडालेच. आई म्हणाली “आपल्याकडे कधीच श्रीधर स्वामींचा फोटो नव्हता… अगदी कधीच नाही…”
मग मला जे इतकं स्पष्ट आठवत होतं ते काय होतं? असं होणं अशक्य आहे! माझ्या डोळ्या समोर येणारे ते प्रसंग अगदी काल घडलेल्या गोष्टी सारखे समोर आले आणि एखादी खूप जुनी आणि आपली असलेली आणि आवडती गोष्ट खूप वर्षांनी आपल्याला परत मिळाली की कसा आनंद होतो नं तसा आनंद झाला मला. काही कळत नाही कारण मी कधीच श्रीधर स्वामींच्या उपासनेला आधी गेली नव्हते की कधी कुठे हा फोटो पाहिल्याचं आठवत नव्हतं. कारण दुसरीकडे कुठे ही मी तो फोटो इतका वेळ आणि इतका निरखून आणि इतका रोज रोज कसा बघेन?…. हा नक्कीच मला काहीतरी आठवण करून देणारा संकेत होता…
काहीतरी होतं या मागे… आणि वाचकहो, परिक्रमा संपवून मी नागपूरला आले तेव्हा त्याचं उत्तर मिळालं. माझा एक खूप जुना मित्र मला अचानक व्हॅटस एप वर सापडला. मधली बरीच वर्ष अगदी काहीही संबंध उरला नव्हता त्याच्याशी.आमच्या गप्पा झाल्या आणि त्यांनी सहज मला घरी बोलावलं. त्याच्या घरात पाउल ठेवलं तसे माझे डोळे भरून आले. त्याच्या घरी श्रीधर स्वामींचा हाच फोटो लावलेला आहे. त्याच्या कडे त्या वेळी स्वामींच्या पादुका यायच्या होत्यात, मी त्याला माझा अनुभव सांगितला आणि नंतर त्याच्या सोबत श्रीधर स्वामींच्या उपासनेला पण जाऊ लागले. त्याच्या घरी मला स्वामींच्या पादुकांच दर्शन पण झालं. माझ्या नकळत पणे स्वामींचे आशीर्वाद मला मिळत राहिले होते, आणि अजूनही मिळताहेत…आणि हाच तो संकेत असेल कदाचित.. “बाळ काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आधी ही होतो, आताही आहे, आणि पुढेही असणार आहे” एवढी जाणीव फक्त मला त्यांनी करवून दिली.. तीही कुठे तर गुजरात मधल्या कर्नाली ला शौचे यांच्या वाड्यात!माझ्या मागच्या जन्मीचं काहीतरी इथे येऊन पूर्ण झालं असं मला वाटून गेलं. खरच मी किती म्हणून भाग्यवान? मला नाना महाराजांसारखे गुरु मिळालेत, मला शंकर महाराजांचं दर्शन झालं, मला श्रीधर स्वामींचा आशीर्वाद मिळतोय… ही परिक्रमा म्हणजे माझा भाग्योदय आहे असं म्हटलं तर चूक ठरणार नाही..
दुस-या दिवशी मुरालीधराच दर्शन घेऊन आम्ही कुबेर भंडारी ला आलो. इथे ही एक गंम्मत झाली.. मला कुणीतरी माझ्या नावाने आवाज दिला.. “ ओ सुरुचि ताई.. ओ ताई”.. इथे गुजरात मध्ये आम्हा चौघांखेरीज मला ओळखणार आहे कोण? ते एक साठीचे परिक्रमावासी होते. “ताई आपण तुमच्या परिक्रमेच्या दुस-या दिवशी मोरटक्का च्या पुढे भेटलो होतो, तुम्ही मला तुमची कविता वाचून दाखवली होती…त्यात तुम्ही नर्मदा माई बद्दल लिहिलंय! अभंग लिहिले आहेत नं तुम्ही? छानच लिहिलेयेत! लिहा लिहा.. भरपूर लिहा, आणि पाठवा बरं का मला” त्यांनी मला ओळख देण्याचा प्रयत्न केला खरा पण मला काही केल्या आठवेना, आणि गंम्मत अशी की त्या वेळी माझ्यासोबत असलेली एकही मंडळी आता सोबत नव्हती त्यामुळे काही शहा निशा ही करता येत नव्हती. पण एक नक्की सांगते, मी माझ्या परिक्रमेच्या दुस-या दिवशी पर्यंत नर्मदा माई वर एकही कविता केलेली नव्हती… अभंग तर मुळीच नाही…आणि मला हे खात्रीपूर्वक माहितीये कारण माझ्या प्रत्येक कवितेच्या खाली मी तारीख लिहिलेली असते. मग हे कोण होते मला आवाज देणारे? मी ते मैयावर सोडलं मात्र यातून एक संकेत मिळाला, अर्थात ते ही मला नंतर समजलं…ते काका मला नर्मदे हर करून निघून गेले.
न त्यांनी फोन नंबर दिला नं घेतला, न पत्ता दिला न घेतला.. मग अभंग पाठवायाचे कुठे? आणि अभंग तर मी एकही लिहिला नाहीये?…आणि हेच काहीतरी माझ्या मनात कुठेतरी फिरत असेल म्हणून की काय, पण त्याच दिवशी रात्री मला चक्क अभंग सुचला..मी तो लिहून ठेवला, आणि कदाचित हाच तो संकेत… माई वर काहीतरी लिहित राहणे, कदाचित हीच माझी माझ्या नर्मदा माउलीला शब्द पुष्पांची भेट… पण हा अभंग मी तुम्हाला आताच देणार नाहीये..
नाही नाही पुढच्या भागात पण देणार नाही, पण देईल नक्की एक दिवस.तर आम्ही कुबेर भंडारी चं ऐश्वर्य बघून चकित झालो होतो. लख्ख चमकणा-या त्या मूर्ती डोळयासमोरून हलत नव्हत्या मात्र आम्हाला पुढे जाणं भाग होतं. आता आमच्या चालण्याचा वेगही वाढला ओता आणि अंतरही. चुडेश्वर, मोरीया वगैरे गावं करत करत आम्ही तिलकवाड्याला पोहोचलो. माझ्यासाठी तिलकवाड्याला जाणं हे हे काही खूप वेगळं नव्हतं कारण मी फारसं त्याबद्दल ऐकलं नव्हतं. आम्ही हा प्रवास ब-यापैकी किना-याने केला होता, त्यामुळे असेल, पण चालून झालं होतं तरी तितकासा थकवा जाणवत नव्हता, हं थोडं फार थकायला होणं स्वाभाविक होतं. पण जस जसं तीलकवाडा जवळ जवळ येत होतं तसं तसं मन प्रसन्न होऊ लागलं होतं. वाटलं संध्याकाळ होतेय म्हणून असेल, मैया किनारी छान च वाटतं संध्याकाळी…. पण ते कारण नव्हतं, कारण वेगळं होतं. बरं ते कारण सांगण्या आधी एक अजून सांगते.
इथे नर्मदा मैया उत्तरवाहिनी झाली आहे. आणि असे असल्याने इथे या स्थानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्यांना पूर्ण परिक्रमा पायी करता येत नाही त्यांनी जर उत्तर वाहिनी परिक्रमा केली तर पूर्ण पायी परीक्रमेचे फळ मिळतं. ही उत्तर वाहिनी परिक्रमा चैत्रात असते आणि असंख्य भाविक ही परिक्रमा करत असतात.
तर आता तिलकवाड्या बद्दल सांगते. इथे विष्णू गिरी महाराज असतात, पण या वेळी माझी त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही, मात्र तरीही इथे मी जे २ दिवस राहिले ते दोन दिवस फारच आनंदाचे होते. इथे संपूर्ण मोकळीक होती. आपलाच आश्रम असल्यासारखे मी इथे वावरत होते. या वेळी इथे बरेच परिक्रमावासी तर होतेच शिवाय सेवा द्यायला येणारे अनेक लोक होते आणि जवळ जवळ सगळे मराठी होते. मोठा काळ अमराठी राज्यामध्ये घालवल्या नंतर खूप सारे मराठी लोकं भेटलेत तेव्हा जाणवलं की किती दिवसात आपण मनमोकळं मराठी बोलेलोच नाहीये…इथे मला देवेंद्र (दीक्षित) दादा सारखा भाऊ मिळाला.खूप खूप छान वाटलं, पण यासाठी मला आधीपासून प्रसन्नता जाणवत होती असं नाही… मला जे काही इथे आल्यावर मिळालं तो पुन्हा एकदा एक संकेत होता. अत्यंत महत्त्वाचा. माझी परिक्रमा, माझं अस्तित्व, माझी श्रद्धा, माझा विश्वास माझं भाग्य.. सारं सारं उजळून निघालय हे सांगणारा संकेत. भालोद पासून खरं तर मला मिळत होता मात्र मला समजायला वेळ लागला होता. कारण भालोद पासून पुढे असं काही होत होतं की हा केवळ योगायोग नाही. पुढे चीखलदा ला तर कहरच झाला, पण तो नंतर सांगेन. आधी तिलकवाड्याला मी का ओढल्या जात होते ते सांगते, पण पुढच्या भागात…नर्मदे हर.
©सुरूची नाईक-विदर्भ गट…
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply