सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील परीस म्हणजे नानासाहेब मा. प्रा. ईश्वर हरचंद बडगुजर सर – श्री. चंद्रकांत बडगुजर सर, बोराडी


असे म्हणतात की काही लोक ही सोन्यासारखी असतात. मात्र काही लोक ज्यांना भेटतील त्यांना सोनं करतात अशी खूप कमी असतात. त्यातीलच एक म्हणजे मुकटी या गावातील सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य ईश्वर हरचंद बडगुजर. बालपणातच नानांचे पितृछत्र हरपले, घरात अठरा विश्व दारिद्र्य, त्यातच भावंडांची जबाबदारी बालवयातच कष्टाच्या व हलाखीच्या भट्टीत तापलेल्या नांनाचे परीस होण हे साहजिकच आहे. सामाजिक स्तरावर आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना उराशी बाळगून गरजवंतांची गरज ओळखत नानांनी त्यांच्याजवळ आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कधी खाली हात परतवले नाही. व्यक्ती हा आयुष्याच्या शेवटी हिशोब लावतो मी या जगात येऊन काय केलं, काय कमावलं, काय गमावलं काय शिल्लक ठेवलं. मात्र ही गोळा बेरीज नानांना करण्याची गरज नाही त्यांनी काही कमावलं असेल तर सोन्यासारखी माणसं कमावली. काही शिल्लक ठेवल असेल तर नव तरुणांसाठी विचारांची शिदोरी व आदर्श शिल्लक ठेवला. आई दुर्गाइंचा आशीर्वाद लाभलेल्या नानांना कितीही मोठे संकट आले तरी ते पेलण्याची ताकद आणि जिद्द कधीच कमी पडले नाही. आई दुर्गाई म्हणजे नानांच्या मातोश्री ज्याप्रमाणे शिवरायांच्या मातोश्री जिजाई, साने गुरुजींच्या मातोश्री यांनी बालमनावर जसे संस्कार घडवले, त्याचप्रमाणे तिघ मुलांना व मुलीला आई दुर्गाईंनी संस्कार देतांना तीळमात्र ही कसर सोडली नाही.या संसाररुपी तापलेल्या वाळवंटात पदराची सावली मात्र मुलांना दिली आणि स्वतःच्या पारड्यात मात्र चटके व दुःख ठेवले. धन्य त्या माई त्यांना कोटी कोटी नमन.

प्रा. ईश्वर सरांचा सहपरिवार सत्कार करतांना श्री. चंद्रकांत बडगुजर


राजकारण असेल किंवा समाजकारण सर्वप्रथम नानांचा सल्ला अनमोल मानला जातो. असा धुळे जिल्ह्यातील कुठलाही राजकीय, सामाजिक इतिहास नसेल जो नानांना माहीत नसेल राजकारणातील व समाजकारणातील आरंभी तर अंत असा प्रवास नाना तोंड पाठ सांगतात. या क्षेत्रातील अनेक राजकीय सामाजिक मित्र देखील नानांनी मनापासून जपलेले आहेत. गावातील कार्य असो किंवा समाजातील नानांचा सहभाग हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या असतोच. अगदी गरिबातील गरीब व्यक्ती देखील हक्काने नानांजवळ येतो. अशी आपुलकी नानांनी जपली,असे नाते संबंध जपले. नानांना पदोन्नती म्हणून प्राचार्य पद मिळाले जणू ही त्यांनी केलेल्या कामाची पावतीच होय. प्राचार्य पदावर असताना कोरोना काळात नानांनी मृत्यूला अगदी जवळून पाहिले. काळोखाच्या गर्द काखेत मृत्यू नानांना गिळणार तोच हजारो विद्यार्थ्यांच्या प्रेमाने, सोन्यासारख्या मित्रांच्या स्नेहाने, व परिवाराच्या साथीने नाना सुखरूप मृत्यूलाही शय देऊ शकले. यमालाही आल्या पावली परत जावे लागले. एवढा आत्मविश्वास नांनामध्ये कायम होता आणि आहे. जीवनातील सुखाचे प्रसंग असो अथवा दुःखाचे प्रसंग असो असे प्रसंग नानांनी मनाच्या अंतर्भागात जपून ठेवले आहेत. लोक नेहमी चांगलेच अनुभव व चांगलेच प्रसंग लक्षात ठेवतात. मात्र नाना नेहमी चांगले, वाईट अनुभव प्रसंग अल्बम मध्ये जपून ठेवतात. नाना नेहमी म्हणतात आपण जेवढे सुखद अनुभवांना जपतो तेवढेच दुःखद अनुभवांनाही जपलं पाहिजे. जेणेकरून आपल्यातील माणुसकी ही टिकून राहते.


एक शिक्षक हा लाखो विद्यार्थ्यांचे जीवन घडवत असतो. नानांनी धावपळीच्या काळात देखील आतला शिक्षक कधी मरू दिला नाही. मुलांना अर्थशास्त्र शिकवताना अर्थशास्त्र हे किती मूल्यवान आहे हे सांगत असताना जर जीवनातील अर्थशास्त्र बिघडलं तर जीवनातील अनेक शास्त्र कोलमोडून जातात हे सहज विद्यार्थ्यांना पटवून देत. अर्थाजनाच्या अनेक वाटा विद्यार्थ्यांसमोर मांडत. व स्वावलंबी होण्यासाठी प्रवृत्त करत. पूर्वी मुकटी गावातील विद्यार्थी धुळ्यात शिकण्यासाठी जात असे, मात्र आज मुकटीतच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात नानांचा सिंहांचा वाटा आहे. नवनवीन शैक्षणिक पद्धतींचा वापर ,शाळा सुशोभीकरण व मनोरंजनात्मक कार्यक्रम यासर्व नानांच्या कल्पना यामुळे विद्यार्थ्यांचा कल अभ्यासाकडे वाढला शाळेविषयी आपुलकी निर्माण झाली. अनेक विद्यार्थ्यांचे जीवनाचे या परिसामुळे सोने झाले आहे.

प्रा. ईश्वर बडगुजर सर सहपरिवार फोटो


एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो मात्र नानांच्या आयुष्यात तर दोन स्त्रियांचा हात आहे एक आई दुर्गाई आणि दुसरी पत्नी सौ.जयश्रीताई. अतिशय बिकट परिस्थितीत देखील आमच्या मामींनी नानांची साथ दिली. संपूर्ण परिवार एकत्र बांधून ठेवले. मुलांवर संस्कारांचे धडे गिरवले. एक स्री बरोबरच आदर्श माता, आदर्श सून ,आदर्श मुलगी, आदर्श पत्नी,आदर्श गृहिणी या जबाबदाऱ्या मामींनी पार पाडताना कुठल्याही प्रकारची कसर बाकी ठेवली नाही.म्हणून आमच्या मामींनाही नाना इतकेच श्रेय द्यावे लागेल. घराची जबाबदारी मामींनी अतिशय प्रभावीपणे सांभाळली म्हणून नानांना सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करता आले. नानांचे भाऊ म्हणजे रामायणातील भरता सारखे बंधू प्रेम , आदर त्यांचा सदैव डोळ्यात दिसून येते. कुठलीही जबाबदारी पार पडताना नाना कधीही मागे हटत नाहीत त्यांचे मुळ कारण म्हणजे नानांचे खंदेबंधू भालचंद्र व रतिलाल होय. बंधू प्रेमाचे आदर्श उदाहरण आपणास नानांच्या आदर्श कुटूंबात पहावयास मिळते.
अशाच आदर्श कुटुंबातील आदर्श नानांची थोरली मुलगी प्रियंका ही माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या कुटुंबातील स्नेहभाव ,प्रेम ,आपुलकी यात वृद्धी झाली. माझ्या आई-वडिलांना माझ्यापेक्षा अधिक जीव लावणारी एक आदर्श सुन बरोबरच एक आदर्श आई, आदर्श पत्नी प्रियंका केव्हा माझ्या आयुष्यात आली आणि केव्हा सर्वांना आपलसं केलं हे कधी कळलेच नाही. आज आई वडिलांच्या आदर्शा वर चालणारी प्रियंका आज शिक्षिकेची भुमिका बजावताना वडिलांच्या म्हणजेच नानांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते हे अभिमानाने सांगते. घरातील सर्व कामे करून शाळेतही ज्ञानदानाचे कार्य करत असताना थकवा तिला कधी जाणवत नाही याचे श्रेय नांनाना द्यावे लागेल. कारण कर्तव्यात कधीही कसर करू नये हे बाळकडू नानांनी बालवयातच पाजलं असावं.
दि.30जुलै 2023 रोजी नानांचा शैक्षणिक प्रवास हा कागदोपत्री संपेल. मात्र ज्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला, गोरगरिबांना व शालेय विद्यार्थ्यांना घडविण्याचे बाळकडू लहानपणातच घेतले असेल ज्ञानदानाचा वसा ज्यांनी उराशी बाळगला असेल त्यांच्या प्रवास संपु शकतो हे मुळीच शक्य नाही.त्यांच्या या जीवन प्रवासात नानांच्या हातून असेच सत्कार्य घडत रहावे. आणि हे करण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती प्रदान करो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आदरणीय नानांचे व आमच्या मामींचे आरोग्य सुदृढ व निरोगी रहावे यासाठी प्रार्थना करतो. बडगुजर. इन टिम कडून व अ. भा. ब. स. युवक समिती कडून प्रा. ईश्वर सरांना सेवानिवृत्ती च्या हार्दिक शुभेच्छा व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो…..

असाच परिसाचा स्पर्श आम्हालाही लाभला आहे यात आम्ही स्वतःला धन्य समजतो…

मनोगतार्थी — श्री. चंद्रकांत बडगुजर सर, बोराडी

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*