नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇३६.👇
नर्मदे हर…..
मी विमलेश्वर ला पोहचले त्यावेळी दुपार झाली होती. जेवणं नुकतीच आटोपली होती. खूप गर्दी होती तिथे. लोक सारखे नावेच्या ठेकेदाराच्या ऑफ़िसकडे डोळा लावून बसलेले. तिथे पद्धत अशी की कुणीतरी एका परिक्रमावासीनी ४० परिक्रमावासी जमवायचे, त्याची यादी द्यायची, मगच तो ठेकेदार नंबर काढेल. अनेक जण ४० चा गट तयार करायच्या मागे लागलेले. काही जण ज्यांच्याकडे जास्त नावे त्या गटांचा शोध घेताहेत…नुसता गोंधळ… मला काही समजत नव्हतं. मी आपली आसन लावायला जागा शोधतेय.
एक जागा मिळाली..टाळूच्या फ़ोडा सारखी मध्य भागी. ती ही जरा सरकवा सरकवी करतच. माझ्या एका बाजूला एक मराठी संन्यासी आणि दुस-या बाजूला एक सत्तरीच्या आजी होत्या. हे दोघे ही गाडीनी परिक्रमा करत होते. मी आसन लावलं त्यावेळी त्या संन्याश्याने माझी मदतच केली, पण खरं सांगू का…कधी कधी उगाचच मदत घेतली आपण असं वाटू लागतं नं तसच झालं. अगदी दोन्ही बाजूनी तसं झालं. झालं असं की हे संन्यासी बुवा उठता बसता मला काय काय सांगू लागले. सत्संग असता तर कदाचित बरं वाटलं असतं पण हे संन्यासी बुवा फ़राळाच्या पदार्थांच्या रेसीपी सांगू लागले, आणि दुसरी कडे असलेल्या आजी या संन्यासी बुवांचे गा-हाणे करू लागल्या.मला आता या दोघांपासून सुटका करवून घ्यावीशी वाटत होती आणि ती मिळाली…ते मागे मणिनागेश्वर ला आणि भालोद ला मला सोपान दादा म्हणून एक मराठी परिक्रमावासी भेटले होतेत, ते ही विमलेश्वर ला होते. घडत असलेला हा प्रकार त्यांनी बघितला आणि “ताई इकडे या, इकडे आसन लावा, थोडी अडचण होईल, पण या इकडे च”. असं म्हणाले. मी पडत्या फ़ळाची आज्ञा घेतली.
अरे हो, मागे मी मगर मैया च्या दर्शनाबद्दल बोलले होते पण लिहिण्याच्या ओघात तो अनुभव नमूद करायला विसरलेच बहुधा! आता सांगते.तर मणिनागेश्वर ला मी धिरडे आणि चिवडा मिळ्यालाचा अनुभव सांगितला होता न, तेव्हाच तिथल्या मंदिरात दर्शन घेऊन झाल्यावर मी मैया किनारी जाऊ असं ठरवलं. जरा पाय-या उतरत नाही तर वरच्या पाय-यांवरून सोपान दादाचा आवाज आला, “ताई मगर बघायची का, वर या, खाली नका जाऊ, एक नाही तर दोन मोठ्या मोठ्या मगरी आहेत.” मी धावत वर आले, वरून बघते तर एका चिंचोळ्या जमिनीच्या भागावर एक भूरी आणि तिच्या अगदी खलोखाल एक काळी मगर होती. आम्ही बरच वर होतो, पण तरी त्या मगरी स्पष्ट दिसत होत्या.. तरी शेपटीपासून तर डोक्या पर्यंत पूर्ण लांबीचा विचार केला तर पाच साडेपाच फ़ूट नक्की असतील….
भूरे मगर पे करे सवारी
हाथ कमल का फ़ूल
सबको देती रिद्धी सिद्धी
हमे गयी क्यु भूल...
मैया अमरकंठ वाली
तुम हो भोली भाली…
असं एक भजन आम्ही रोजच म्हणत असू. आज या भु-या आणि काळ्या अश्या दोन्ही मगरींच दर्शन झालं. मैया च्या वाहनाचं दर्शन झालं म्हणजे तीचं ही झालच .. ती मगर म्हणजे मैया चेच रूप…. अनपेक्षीत पणे पहिल्यांदा हे दर्शन झालं मात्र मग मैया किनारी चालताना नजर सारखी मैयाच्या पाण्यावर झालेल्या हालचालींकडे असायची. पुन्हा केव्हा मगर मैया दिसेल या आशेनी का होईना मैया सतत डोळ्यांसमोर राहू लागली, आणि हो, अनेक दा पुढे मगर मैया दिसलीच हे काही वेगळं सांगायला नको, कारण नर्मदा माई कधी ही कुठलीही इच्छा अपूर्ण ठेवतच नाही. पुढे जिथे जिथे दर्शन झालं ते आठवणीनी सांगेन बरं का….आणि मी विसरली तर तुम्ही आठवण करून द्या नक्की.
असो तर आता पुन्हा विमलेश्वर ला येऊयात. तर ह्या सोपान दादांनी मला त्यांच्या बाजूला आसन लावू दिलं आणि मी संन्यासी आणी आजींच्या तावडीतून सुटले. सोपान दादा इथे येऊन दोन दिवस झाले होते, आजचा तिसरा दिवस होता. ओखी वादळा मुळे गेली काही दिवस बोटी समुद्रात सोडता आल्या नसल्याने परिक्रमावासींना इथेच मुक्काम करावा लागत होता. खरं तर सोपान दादा नंतर ३ दिवसाने मी आले होते पण सोपान दादांनी असं काय केलं माहित नाही, पण त्यांच्याच नावेत आणि त्याच दिवशी, म्हणजे रात्री च्या फ़ेरीत माझा नंबर लागला. मला इथे २४ तास देखिल वाट बघावी लागली नाही. मी जेव्हा सोपान दादांना विचारलं तर म्हणाले “माताजी हमारे गाव की है, और अकेली है, हमारे साथ रहेगी तो सहायता होगी- इतकचं बोललो मी”, कमालच झाली.. लोक ५- ५ दिवस वाट बघताहेत आणि मला एकही दिवस पूर्ण वाट बघावी लागली नाही.
आमची रात्र फ़ेरी होती. १.५ वाजता तयार असावं लागणार होतं, त्यामुळे बॅग पॅक असायला हवी, शिवाय प्लास्टिक ची बॅग घेऊन त्यात ती बांधून ठेवायची, म्हणजे मग नंतर काही घालयचं नाही, काही काढायचं नाही…. स्लीपिंग बॅग सकट मी सगळं पॅक केलं खरं, पण आता बसायला सुद्धा काही नव्हंतं, आणि पांघरायला सुद्धा… कुड्कुडण्या शिवाय पर्याय नाही…. तरीही, सोपान दादा ने कुठूनशे दोन पोते आणले आणि रात्री १० ते १.५ त्या पोत्यांवर बसून आम्ही झोपायचा प्रयत्न केला… पण झोप लागली नाही. सगळ्यांची हीच अवस्था. शेवटी भजन, मैयाची गाणी असं हळू हळू सगळेच परिक्रमावासी गाऊ लागले, काही हौशी माताजी एकत्र येऊन भजनांवर नाच करू लागल्या, देवळातली भजन मंडली पण ढोलक आणि इतर वाद्य घेऊन साथ देऊ लागली..खूप उत्साहात आणि आनंदात वेळ कसा गेला समजलं नाही.. १ वाजला..१ वाजता नावाड्याने आवाज द्यायला सुरवात केली. ४ नावा सुटतात. प्रत्येकी मधे ४० परिक्रमावासी. नाव म्हणजे काही मोठी नाही ह्मं… लाकडी, मधे पाट्या ठोकलेली, अगदी लहानशी..आम्ही सगळे एकत्र झालो आणि आता नावेकडे जायची वाट बघू लागलो… खरी कसोटी तर इथून पुढची आहे. इथे समुद्र देवात जोडे चप्पल घालून जाता येत नाही, ते किना-यावरच सोडावे लागतात. मी नुकत्याच अंकलेश्वर ला घेतलेल्या स्लीपर्स सोडून दिल्या आणि पायी चालू लागले. किर्र अंधार, त्यात पायाखाली आधी दगडं, मग कोरडी वाळू. मला अनवाणी चालण्याची सवय नाही.. तीन चारदा तरी पडले असेल मी… शेवटी एका ठिकाणी शिट्टी वाजली आणी थांबा, असा नावाड्याचा आवाज आला… अजून भरती हवी तशी आली नाही. नावा सोडता येणार नाही, वाट बघावी लागेल…सोसाट्याचा आणि गारेगार वारा, माझ्याकडे एकेमेव पोतं… बाकी सगळं बॅगेत….मला शिंका यायला लागल्या.. काही केल्या थांबेनात, डोकं धरलं, ताप येईल असं वाटू लागलं, पण करणार काय? पण मैया ची पण कमाल असते. ह्या सोपान दादानी चक्क नावाड्यालाच मागून माझ्यासाठी एक ब्लॅंकेट आणलं आणि “ ताई, इथेच गार पडल्या तुम्ही, घ्या पांघरा” असं म्हणून चक्क पांघरून पण दिलं….गारवा इतका होता की थंडी पूर्ण गेली नाही, मात्र खूप, अगदी खूपच आधार झाला मला त्या ब्लॅंकेट चा. तिथे आम्ही २.५ वाजेपर्यंत होतो, म्हणजे आम्हाला १.५ तास वाट बघावी लागली.. शेवटी एकदा नावाड्याने आमच्या नावेचा नंबर घेतला.जस्सा नावाड्याने ४ नंबर उच्चारला तस्से सगळेजण बोटीच्या दिशेने धावू लागले. सोपान दादा तर त्यांची बॅग घेऊन सर्वात आधी धावले. कदाचित जागा मिळण्यासाठी ची ही घाई असावी. मी मात्र जरा आजारी, म्हंटलं जिथे मिळेल तिथे बसेन, पण आता धाववत नाही माझ्यानी….मी हळू हळू चालत नावेपाशी पोचले. सगळ्यांची नावेत चढायची धड्पड सुरू होती कारण नावेचा काठ हा खांद्या इतका उंच.. हातावर जोर देवून चढायचं म्हणजे कसरत. त्यातून ती नाव काही स्थीर म्हणून नाही, पाण्यावर तरंगती नाव स्थीर राहील कशी? आणि हो मांडी पर्यंत पाय पाण्यात असणार होते. नावेचा धक्का लागून काही लोक पडत होते. मी चढूच कशी? काही समजेना.. मी शांत पणे उभी राहून विचार करत होते…. तेवढ्यात सोपान दादा धावत माझ्याकडे आले आणि माझी बॅग घेऊन गेले, ती नावेत ठेवून परत आले आणि मला नावेत चढायला मदत केली. मी कशीबशी नावेत चढले, चढले काय, सोपान दादांनी मला अक्षरश: ओढलं. त्यांनी माझ्यासाठी जागा पण धरून ठेवली होती, अगदी इंजिन च्या बाजूला, जेणेकरून मला इंजिनची ऊब मिळेल! ते माझ्या समोर बसले होते आणि नावाड्याचं ब्लॅंकेट मी पांघरलं होतच. मी नावेच्या कडेला होती, माझ्या डावीकडे पाणी, समोर सोपान दादा, मागे परिक्रमावासी आणि उजवी कडे इंजिन. तीन बाजुंनी माझं प्रोटेक्शन छानच जमलं होतं आणि डावीकडे समुद्र भगवान दर्शन, बसल्या जागेवरून ओटी भरायची व्यवस्था, बाटलीत पाणी बदलून घेण्याची व्यवस्था आणि शिवाय ब्लॅंकेट अशी सोय माझी करण्यात आली होती.
हा पूर्ण प्रवास खूपच वेगळा आणि “हटके” असाच होता. बोट चालू लागली तसं इंजिन गरम होऊ लागलं.. ते जास्त गरम होऊन मला पायाला चटके बसू लागले….हलायला देखिल जागा नव्हती. नाव खचाखच भरली होती. एकी कडे चटका आणि दुसरीकडे गार पाण्याच्या लाटा… अंगात ताप.. काय अवस्था झाली असेल? अजूनही भरीस भर म्हणून असे अनेक प्रकार घडलेत, लाईफ़ जॅकेट वगरे सोपस्कार काहीही नव्हते आणि अचानक एक जोराचा हिसका नावेला बसला… आम्ही सगळेच ब-यापैकी उसळलो… असं काय झालं होतं?. तो जोरदर हिसका का बसला…काय वाटलं तेव्हा… हे सगळं सांगते पुढच्या म्हणजे ३७ व्या भागात.
©सुरूची नाईक–वियदर्भ गट-देवा तुझा मी सोनार:
9309926559


Leave a Reply