नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇३५👇- बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇३५.👇

नर्मदे हर….

*गुमानदेव हनुमान मंदिराबद्दल मी बोलत होते. इथे मी पोहचले त्या आधी हायवे वरून चालत होते. एका पेट्रोल पंपावर पाणी भरायला थांबले तेव्हा एक गंमतच झाली.माझे कपडे मळले होते. चेहरा एव्हाना बराच काळवंडला होता. डोक्याला तेल, पाणी,शाम्पू काहीही नव्हतं. इतकच काय तर केस विस्कटले सुद्धा असावेत. मी पाणी प्यायला वॉटर कुलर पाशी गेले तसं मला चौकीदारानी हटकलं..”क्यू हात लगा रही हो, पानी चाहिये तो मांग लो ना” तो जरा ओरडूनच म्हणाला..मी अगदी विनम्रतेने पाणी मागितलं तसं त्यानी एका बाटलीत पाणी भरून मला दिलं आणि “अपनी बोटल मे भर दो” असं म्हणाला. ज्या बाटलीत त्यानी मला पाणी दिलं ती बाटली स्वच्छ नव्हती…जरा जास्तच अस्वच्छ होती..”पानी पीने के लिये चाहिये, साफ़ बोटल मे दो, नही तो मेरी बोटल मे दो” मी म्हणाले. आमचा हा संवाद ऐकून तिथेच असलेली दोन माणसं आपसात इंग्रजी मधून बोलत होती, माझ्याकडेच पाहून एक माणूस दुस-याला म्हणत होता- “her bag is branded but clothes are too dirty, either she is from better family background or must have stolen the accessesories”त्यांना वाटलं मला समजलं नसेल, आणि मी ही तसच दाखवलं. त्या चौकीदाराला माझी बॉटल देऊन पाणी मागितलं. मग ती दोघं मला विचारू लागली. “कहा से आई हो? कहा जाना है? त्यातल्या एकाने तर चक्क “इतना महंगा सामान कहा से आया” असं विचारलं. “मेरा है” मी सांगितलं… हे सगळं पाहून मला गम्मत वाटत होती. मी माझा परिचय न देण्याचं ठरवलं, आणि पुढे काय होतं ते बघावं असं ठरवलं, मात्र तेवढ्यात अजून एक माणूस आला, ज्याला परिक्रमेबद्दल माहित असावं, त्यानेच इतरांना मी परिक्रमावासी असल्याचं सांगितल्यावर ती दोघं निघून गेलीत.आपला परिचय खरच कशा कशावर अवलंबून असतो नाही? *म्हणजे कपडे, रूप, अवतार ह्या बाह्य रुपात आपण किती गुरफ़टलेले असतो!*

मी इंग्रजी मधे बोलून त्यांना थांबवू शकले असते पण असं करावं असं वाटलच नाही. आणि तशाने मी नाही तर माझ्यातला अहंकार बोलला असता. नाही का? मात्र ज्यावेळी अंकलेश्वर ला पोचले त्यावेळी मला बोलावच लागलं. गुमानदेव नंतर अंकलेश्वर चा तो अनुभव पण सांगते.

तर मी गुमानदेव मंदिरात पोहचले. तिथलं मंदिर छानच आहे मात्र परिक्रमावासींसाठीची जागा बरीच अस्वच्छ होती. बहुधा साफ़ सफ़ाई करणारे लोक नसावेत इतकी अस्वच्छ. महिला पुरुषांसाठी वेगळ्या जागा नाही, बाथरूम ला आतून कडी नाही, आणि मी एकटेच.कुठे आसन लावू असा विचार करत करत मी जागा बघत होते. “अकेली है क्या, आजा, मेरे पास लगाले आसन, चिंता मत कर, मै तो हू ना तेरे साथ, सभी है” एक पन्नास पंचावनी च्या माताजी मला म्हणाल्या. त्यांनी आपलं आसन बाजूला सरकवून भिंतीकडची जागा मला दिली. माझ्या बाजूला स्वत: आसन लावून कुणी पुरुष मंडळी च्या बाजूला मला आसन लावावं लागू नये ह्याची काळजी घेतली. म्हंटल्या प्रमाणे त्यांनी मला सोबत केली. अगदी मी स्नान करत असताना त्या दाराबाहेर उभ्या होत्या, माझ्या सामानाची त्यांनी काळजी घेत होत्या. मी पयाला तेल लावत असताना “मी तेल लावून देऊ का” असं विचारलं, आणि ज्या प्रेमाने आणि हक्काने त्या माझी काळजी घेत होत्या त्याच प्रेमानी “ मेरे घुटने पे तेल मल के दे” असं अधिकारानी सांगितलं. माझी काळजी घेणारी आणि माझ्याकडून सेवा करणारी, मला अचानक पणे भेटलेली ही माताजी मैयाच नाही का? सकाळी मात्र हा गृप पहाटेच निघून गेला. मी थकले असल्याने थोडी उशीराच उठले. जाताना त्या मला सांगून गेल्यात “ आजाना अपने पैर से, मैया सोचेगी तो मिलेंगे आगे”..मात्र गुमान्देव ते अंकलेश्वर त्या मला भेटल्या नाहीत. मात्र अंकलेश्वर ते बलबला कुंड त्या मला पुन्हा भेटल्यात.

*गुमानदेव ते अंकलेश्वर प्रवास हा अगदी हाय वे नी होता. अनेक लोक गाडी थांबवून “ अंकलेश्वर तक छोड दू क्या ?” असं विचारायचे. मात्र अंकलेश्वर ला मजेशीर अनुभव आला, मागे पेट्रोल पंप वर आला होता तश्या सारखाच! अंकलेश्वरची गोष्ट आहे. माझ्या जवळची पर्स तुटली होती, तिच्या बेल्ट ला गाठ मारून ती मी गळ्यात अडकवत असे. ती गाठ मानेला टोचून सोलल्या सारखं झालं होतं. मला स्लीपर ही घ्यायच्या होत्या, म्हणून मी एका दुकानात गेले आणि “नर्मदे हर” म्हणाले. “जाओ आगे, कुछ नही मिलेगा” असं उत्तर आलं. मला खरोखर वस्तू विकत घेणे गरजेचं होतं. मी म्हणाले, “मुझे मांगना नही है, खरीदना है”. “पैसे है?” त्यानी पुन्हा कन्फ़र्म केलं. “क्या चाहिये?” मला हव्या असलेल्या पर्स कडे बोट दाखवताच तो हसला… “तुम्हारे बस की नही है. महंगी है” मी म्हंटलं “दिखाओ”, त्याने दाखवली, मी बाजूला ठेवून दिली. मग त्याच्याच दुकानात मी स्लीपर पाहिल्या.. मग मी मोजे पण पाहिले, असं करत करत मी ५००-६०० रुपयापर्यंत पोचले. पर्स चाचपडली. माझ्याकडे कॅश होती, पण वाटलं ती राहू द्यावी, जिथे कार्ड चालणार नाही अशा ठिकाणी वापरावी म्हणजे पुन्हा ए.टी.एम शोधून पैसे काढण्याची गरज नाही. मी काही बोलणार इतक्यात तो म्हणाला “क्या हुआ, पैसे नही है क्या, फ़ालतू मे टाईमपास करते है, चलो निकलो यहासे”. *आजपर्यंत आयुष्यात असं कधीच झालं नव्हतं. इतकं घालून पाडून कुणी कधीही बोललं नव्हतं. खरं तर मला खूप राग यायला हवा होता, खूप वाईट वाटायला हवं होतं,पण यातलं काहीही झालं नाही. माझ्या मनानी त्याच्या या वागण्याची दखलच घेतली नाही बहुधा. “इदं न मम” चा मंत्र काम करून गेला.*

मात्र मला वस्तू खरोखरीच हव्या होत्या… मी म्हंटलं… “कार्ड या नेट बॅंकिग चलेगा? तो आश्चर्या ने पाहू लागाला. मग मी परिक्रमावासी असल्याचं सांगितल्यावर मात्र त्यानी मला खूप आग्रहानी चहा पाजला!

अंकलेश्वर ला मला भेटायला माझा मानलेला भाऊ, भैरव पारेख येणार होता. २००९ मधे केलेल्या हिमालयन ट्रेक सारपास पासूनची आमची ओळख आणि अगदी घरगुती संबंध. हा भैरव ३ तास प्रवास करून फ़क्त मला भेटायला आला होता. येताना त्याने माझ्यासाठी पांढरे कुर्ते, लोणचं, चटणी आणि बराच खाऊ आणला होता. या खाउंमधे इडली सांबार आणि पिज्झा पण होता. किती तरी दिवसांनी मी हे खाल्लं असेल! अगदी सगळं सगळं लक्षात ठेवून आणलं होतं त्यानी..हो एक कॅडबरी पण… कॅडबरी म्हणजे माझा वीक पॉइंट अगदी. ती कॅडबरी मला ३-४ दिवस पुरली. खूप दिवसांनी घरचं कुणी तरी भेटलं. खूप आनंद झाला होता. मी एकटी चालत असताना मैया माझी जास्त काळजी घेते हे पुन्हा जाणवलं. भैरव काही काळ माझ्या सोबत चालला आणि पुन्हा आपल्या घरी परतला.

*मी आता बलबला कुंडाच्या रस्त्यावर होते. भैरव ला नर्मदे हर करून ५ च मिनिट झाले असतील, ह्या गुमानदेव ला भेटलेल्या माताजी पुन्हा भेटल्या..म्हणाल्या ”आ गई मातारानी, मैया ने मिला दिया फ़िरसे, अब जब तक साथ है साथ रहेंगे, जब साथ छूट जायेगा तब नर्मदे हर” त्या माताजींनी कुठलीही ग्वाही दिली नाही. सोबत राहू असं आश्वासन दिलं नाही. *जब तक साथ है तब तक साथ रहेंगे*

या साध्या शब्दात किती प्रवाही विचार जाणवतो…आयुष्य असं प्रवाही असावं नं, नर्मदे सारखं….जे आहे ते स्वीकारून, आत्मसात करून पुढे चालत राहायचं…..कुणाच्या कुठल्या बोलण्यातून, वागण्यातून काय शिकायला मिळेल काही सांगता येत नाही. ती रात्र आम्ही सोबत होतो. माझा आणि त्या माताजींचा साथ बलबला कुंड पर्यंतचा… पण माहितिये का, दुस-या दिवशी चालता चालता माझ्या मनात विचार आला तेव्हा एक लक्षात आलं… ”जब तक साथ है, साथ रहेंगे”… म्हणजे कदाचित जोवर मी नर्मदा मैया च्या सोबत आहे, म्हणजे माझी श्रद्धा, माझा विश्वास, माझं प्रेम, माझी भक्ती ही सगळी जोवर आहे तोवर ती माझ्या सोबत असणार आहे! कुठलीच कमिटमेंट न देता ती जन्म जन्मांची कमिटमेंट देऊन गेली, हे मला समजलच नाही…! मला माझ्याच कवीतेचा काही ओळी आठवल्या,

हाय किती रे मी अज्ञानी..
हात जोडले, धूप लावले
नतमस्तक मी फ़ुले वाहूनी
अन हृदयीच्या तम गाभारी
दीप लावणे गेले विसरुनी… हाय किती रे मी अज्ञानी!

आता बलबला कुंडा बद्दल सांगते. तिथे एक कुंड आहे, ज्यातून बुड्बुडे निघतात म्हणून त्याला बलबला कुंड असं म्हणतात. पण हे बुडबुडे असेच निघत नाही, “नर्मदे हर” म्हंटलं की निघतात…मी कितीतरी वेळ हा खेळ खेळत होते. त्या वेळी मी कुंडावर एकटीच होते. नाही म्हणायले काही बगळे आणि काही कावळे पण आजूबाजूला होते. ते कुंडाच्या आजूबाजूला गवतात बसत. मी मोठ्याने नर्मदे हर म्हंटलं की उडून जात, अन पुन्हा येऊन बसत. बुडेबुडे आणि हे पक्षी बघणं अगदि एंजाॅय केलं मी.इथे बलबला कुंड ला एक ज्योतिर्मयी मैया म्हणून संन्यासिनी आहेत. त्यांच्याशी भेट झाली. त्या पुण्याच्या आणि मराठी भाषिक. त्यांना भेटून छान वाटलं. त्यांनी मला एक छान भेट दिली. माझे गुरू नानामहाराज तराणेकरांचा एक खूप जुना फ़ोटो आहे. नाना महाराजांची तूला करत असतानाचा. तेव्हा नाना महाराजांना मोठ्या महाराजांनी मांडीवर घेतल्याचं फ़ोटोमधे स्पष्ट दिसतय. आणि फ़ोटो एडिटींग च्या जमान्याच्या आधीच आलेला आहे. बलबलाकुंड चा मुक्काम छान झाला. बलबला कुंड ला अनेक मध्यप्रदेशी महिलांनी येऊन माझी चौकशी केली. त्या म्हणाल्या “ अरे छोरी को अकेले चलता देखा था.. पहुच गयी की नही ठिकसे पुछ लिया”… कुणी आपलं कसं चौकशी करेल तसं त्या ४ -५ अनोळखी मैया, ज्यांनी मला एकटं चालताना पाहिलं होतं त्यांनी येऊन येऊन माझी चौकशी केली.

पुढे हनुमान टेकडी, हांसोट च्या प्रवासात माझी काठी तुटली. मी ट्रेकिंग स्टिक घेतली होती, पण त्याची काही गरज नसते. आपला साधा बांबू चा दंड घ्यावा, तो उत्तम. आता ही तुटलेली काठी जोडणे नाहीतर दुसरी घेणे ..काहीतरी करावं लागणार होतं. हनुमान टेकडी ला आधी भेटलेले पाठक काका भेटलेत. त्यांनी तारे नी माझी काठी बांधून दिली. तो दिवस रात्री भजन कीर्तनात गेला..आता पुढचा टप्पा महत्त्वाचा. विमलेश्वरचा इथून पलिकडे च्या तीरावर नावेतून जावं लागतं. नावेतून जायचं; पण गेलो आणि बसलो असं होत नाही. आधीच ओखी मूळे भरपूर नंबर लागलेले. इथे किती वेळ वाट बघावी लागणार नेम नाही. लोकांना ५ दिवस सुद्धा वाट बघावी लागली होती आणि आश्रय म्हणाल तर एक मांडव घातलेला, बस… तिथे आधीच २०० ते २५० लोक होते.. आणि नुसतं वाट बघण्या पलिकडे काहिही करता येण्यासारखं नव्हतं.

कसा झाला माझा नावेतला प्रवास. छोटीशी लाकडी नाव ती.. रात्रीच्या प्रवासात काय काय झालं? किती वेळ, किती दिवस मला वाट बघावी लागली विमलेश्वर ला? कसा होता नावेतला अनुभव? भिती वाटली, की अजिबात वाटली नाही? लाईफ़ जॅकेट्स नसताना डोक्यावर उभं आभाळ घेऊन, ओलं होत होत गेले तेव्हा नक्की काय अवस्था होती? असे प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे. उत्तर सांगते न.. पण पुढच्या ३६व्या भागात.
©सुरूची नाईक–विदर्भ गट-देवा तुझा मी सोनार:
9309926559
🚩〰️〰️〰️〰️〰️〰️🚩〰️〰️〰️〰️〰️〰️🚩

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*