नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇३३.👇
नर्मदे हर….
मणिनागेश्वराच्या त्या संन्यास्यानी अगदी वेळीच माझी शिगेला पोहोचलेली उत्कंठा थांबवली, आणि खरच आहे, मला काय गरज त्या संन्यासाबद्दल जाणून घेण्याची न? आपण उगाच धावत असतो बरेचदा, गरज नसताना… ती धावपळ करून झाली, थकलो की मग समजतं, याची गरजच नव्हती…पण ते वेळेवर समजलं असतं तर तो वेळ, आणि ती धावपळ कुठल्यातरी गरजेच्या गोष्टीसाठी उपयोगात आणता आलं असती असं वाटतं… सत्पात्री दान कसं असतं तसं… पण हेच तर आयुष्य आहे न!..असो
आता धिरड्याची गोष्ट. मी चिवडा खाल्ला. कुणीतरी मराठी व्यक्तिंनी तो त्यांना दिला होता, माझी इच्छा ओळखून त्यांनी तो मला दिला. आता तो खाऊन झाल्यावर माझ्या मनात धिरड्याची आठवण सुद्धा शिल्लक नव्हती. खाली बालभोगासाठी मंडळी बसली होती. मला बसायला जागा नव्हती म्हणून तिथल्या एका शिष्याने मला पाक घराच्या पायरीवर बसायला सांगीतलं. मी पाक घरात डोकावत होते, सहज म्हणूनच. एका शिष्याने मला ४ पुर-या आणि भाजी वाढलेली ताटली दिली. “चार पुरी ज्यादा हो जायेगी, हमको बस २ ही चाहिये” असं म्हणून मी त्याला ताटली परत केली, त्यानी दोन पु-या कमी करून पुन्हा मला ताटली दिली, बघते तर त्यात २ पु-या, एक धिरडं होतं, ते ही मुगाचं, आणि भाजी होती. “ये चीला तो खा लो मैया, पुरी पसंद नही है तो चीला तो पसंद होगा, वैसे कल का है, पर अच्छा है” तो म्हणाला…. आता काय म्हणू मी… मी इच्छा व्यक्त पण केली नाही, फ़क्त विचार आला माझ्या मनात, आणि पूर्ण झाली इच्छा.
बालभोग करून आम्ही पुढे भालोद च्या मर्गाने निघालो. भालोद च्या प्रतापे महाराजांबद्दल ऐकून माहित होतं. ते आपल्या नागपूरचे, म्हणून भेट व्हावीच असंही वाटत होतं. शिवाय त्यांनाही कुणीतरी माझ्याबद्दल बोललेलं आहे हे माहित होतं. मी भालोद ला पोहचले. अगदी जिथे दत्ताचं मंदिर आहे त्याच्या ४-५ घरं दूर पर्यंत उदबत्तीचा सुगंध येत होता.मंदिरात गेले आणि मला एका क्षणात रडू आलं. आनंदानी.मी मंदिरात गेले आणि आत बसते तो समोर मोठ्या महाराजांची इतकी जीवंत मूर्ती आहे की क्षणभर प्रत्यक्ष महाराजच बसले आहेत असं वाटू लागलं. त्या मूर्तीवरून काही केल्या नजर हटेच ना. मनात कसलेही विचार नव्हते मात्र डोळ्यातून पाणी घळघळा वाहात होतं. प्रतापे महाराज आतून बाहेर आले, त्यांनी सगळ्या परिक्रमावासींचं स्वागत केलं आणि “ती नागपूरची सुरुची कोण आहे हो तुमच्यापैकी” असं माझ्या नावासकट माझ्याबद्दल विचारलं.. इतकच नाही तर “ माझ्या गावाची आहे ती” असं आपुलकीचं बोलणं ऐकून गहिवरून आलं. माझी महाराजांची भेट झाली. अगदीच प्रेमळ आहेत महाराज… माझी माऊलीच ती. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फ़िरवला तेव्हा इतकं शांत वाटलं की ते मला शब्दात सांगता यायचं नाही. आता इथेच थांबायचं, निदान ३ दिवस तरी, माझ्या मनानी ठरवून टाकलं.दुपारी पुण्याची काही मंडळी आली होती, त्यांनीच भोजन प्रसादी केली होती, ती घेतली. ती घेण्या आधी प्रतापे महाराजांनी मला आत, म्हणजे जिथे भोजन प्रसादी ची व्यवस्था असते तिथे बोलावलं. म्हणाले “ हे बघ मी तुला काय दाखवतोय” असं म्हणत त्यांनी मला जे दाखवलं ते पाहून मला अजूनच भावुक व्हायला झालं. तिथे माझ्या गुरुमाऊलीचा, माझ्या नानांचा फ़ोटो होता. “तुला तुझ्या गुरुंनी पाठवलय बरका इथे” ते म्हणाले. मग आता काय, जिथे माझी गुरुमाऊली ती जागा माझ्यासाठी किती आनंदमयी असणार! भोजन प्रसादी झाली आणि पुण्याची मंडळी गाडीनी परत निघाली.आता संध्याकाळ होत आलेली.प्रतापे महाराजांनी त्यांच्या परिक्रमेच्या गोष्टी सांगीतल्यात. अगदी पत्रकारापासून तो आतापर्यंतचा प्रवास सांगीतला,आणि तिथे भालोद ला असणा-या दत्त मूर्तीची ही गोष्ट सांगीतली. ती तर सांगतेच मात्र आधी या मूर्तीबद्दल सांगते तुम्हाला.
काळ्याशार मूर्तीचं हे रूप खूप मोहक आहे. या मूर्तीची एक गम्मत आहे. या मूर्तीमधे सगळे च्या सगळे चक्र अगदी व्यवस्थीत दिसतात. शिवाय गोमुख पण दिसतं. अत्यंत बोलकी मूर्ती आहे ही. तर आता थोडक्यात ह्या मूर्तीची गोष्ट सांगते. ही मूर्ती ज्यांच्याकडे होती त्या बाई अविवाहित होत्या आणि आता म्हाता-या झाल्या होत्या. त्यांच्या वडिलांना त्यांनी वचन दिलं होतं की मी अविवाहित राहून या देवाची सेवा करीन, पण वयपरत्वे ते आता त्यांच्याकडून होत नव्हतं आणि म्हणून ती मूर्ती कुणाकडे तरी सोपवणं भाग होतं. या मूर्तीबद्दल प्रतापे महाराजांच्या कानावर आलं आणि दर्शन घेण्यासाठी तरी आपण इथे भेट देऊ असं त्यांनी ठरवलं. इकडे त्याच रात्री त्या बाईंना स्वप्न पडलं, त्यात ती मूर्ती बाईंना म्हणाली, “ उद्या जो पहिला माणूस मला भेटायला येईल त्याला मला दे”.. बाईंनी मूर्ती महाराजांच्या स्वाधीन केली आणि भालोदला मग पुढे तिची स्थापना झाली आणि तेव्हापासून प्रतापे महाराज ह्या मूर्तीची सेवा करताहेत.
भालोद ला मोठ्या महाराजांनी ज्या जागेवर बसून साधना केली तिथे आता एक खोली बांधली आहे. मी इतकी भाग्यवान आहे की त्या खोलीत बसून ध्यान करण्याची संधी मला मिळाली. तीथे खोली तयार केली आहे हे समजल्यावर “ मला ती बघता येईल का?” असं मी प्रतापे महाराजांना विचारलं.. “बघू नकोस गं नुसती, तुझी माळ घेऊन ये, बस तिथे, ध्यान कर, जप कर, बघ तुला कसं वाटतं ते” महाराजांचं हे उत्तर ऐकून आनंदाला पारावार च राहिला नाही माझ्या. खरच तिथे ज्या वेळी मी बसले आणि जप केला त्या वेळी माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता. वेळ कसा गेला मला समजलच नाही. महाराजांनी आवाज दिला तेव्हा एक-दीड तास निघून गेला होता. मी शरीराने तिथे होते पण मनाने, आत्म्याने कुठे होते हे मला सांगताच येणार नाही.
बाहेर येऊन चहा कॉफ़ी झाली आणि महाराज म्हणाले “ बस आता जरा वेळ, एक गम्मत बघ” आता अजून काय दाखवणार होते महाराज? मी वाट बघत होती. त्यावेळी पर्यंत बाकी परिक्रमावासी एकतर बाहेर गेले होते, किंवा काही अजून आराम करत होते. थोड्या वेळात एक मोर मंदिरात आला. अगदी न घाबरता त्यानी महाराजांच्या हातून दाणे खाल्ले. मोठ्या महाराजांच्या मूर्ती समोर बराच वेळ रेंगाळत राहिला, आणि मग पुन्हा बाहेर निघून गेला. त्याचा हा नित्यक्रम आहे. दिवसातून तो दोन दा येतो, मोठ्या महाराजांना नमस्कार करतो, प्रतापे महाराजांच्या हातून दाणे खातो आणि जातो! कुणाचं काय नशीब आणि कुणाचं काय कर्म काही सांगता येत नाही बाबा. हा कुठला जीव या योनीत आला असेल आणि का? असा सहज प्रश्न माझ्या मनात येऊन गेला.
रात्रीची भोजन प्रसादीची वेळ झाली. आज पुण्याची मंडळी नसल्याने कामाचं बोझा एकट्या मावशींवर पडणार म्हणून “अगं जरा स्वयंपाकचं बघ, ये मी तुला सांगतो काय कुठे ठेवलय ते” असं म्हणत महाराज मला स्वयंपाक घरात घेऊन गेले..” तो फ़्रीज उघड, बघ तिथे एक वाटी आहे, ती उचल अन लाव तोंडाला, तुला सोलकढी आवडते नं, तुझ्यासाठी काढून ठेवली सकाळी” मला माझ्याबद्दलही कदाचित माहित नसेल तितकं महाराजांना कसं माहित? मला त्यांना काहीच सांगावं लागलं नाही… आणि याचा कहर म्हणजे आमचा दुस-या दिवशीचा संवाद, पण तो नंतर सांगते.. आधी आज रात्रीचा विलक्षण अनुभव सांगते.
मी माझं आसन मोठ्या महाराजांच्या मूर्ती समोर लावलं होतं. अगदी समोर.. म्हणजे डोळे उघडले की पहिले मला जर काही दिसेल तर ती मोठ्या महाराजांची मूर्ती, अगदी अश्या ठिकाणी माझं आसन लावलं होतं मी, पण काय झालं माहितीये… खरं तर मला पण माहित नाही काय झालं नक्की, जे समजलं ते असं… मी मोठ्या महाराजांच्या मूर्तीकडे बघत बघत अंथरुणावर अंग टाकलं. त्या नंतर किती तरी वेळ मी मूर्तीकडे बघतच होते. मला कधी झोप लागली, झोप लागली की नाही ते ही मला आठवत नाहीये, आणि समजत पण नाहीये, पण सकाळी चार वाजता मला प्रतापे महाराजांच्या आवाजाने भान आले, ते म्हणाले “अरे वा, जागी आहेस तू, चल मग नर्मदा स्नान आणि काकड आरती करू. कधी उठलीस?” त्यांनी मला पाहिलं तेव्हा माझे डोळे उघडे होते मात्र मी रात्री जशी अंतरुणावर पडले होते तशीच होते आताही! भिंतीला टेकून उश्या ठेवल्या होत्या मी आणि मोठ्या महाराजांकडे बघत होते रात्री, इतकच आठवतय! माझे डोळे कधी बंद झाले, पुन्हा कधी उघडले, मी झोपले की झोपलेच नाही… काही काही समजलं नाही. मात्र मी खूप फ़्रेश होते…हे असं कसं झालं असेल? नक्की काय झालं असेल?…असो
मी प्रतापे महाराजांबरोबर नर्मदा मैयावर जाऊन आले, स्नान करून आले आणि मग जे मी बघितलं ते विलक्षण च होतं. गाभा-यात मंद प्रकाश होता. गाभा-यासमोर उंबराच्या झाडाखाली मी बसले होते आणि महाराज आत पूजा करत होते. मूर्ती स्नान झालं तेव्हा महाराजांनी मला बोलावलं आणि मूलाधार चक्रापासून सहस्रकार चक्रापर्यंतची सगळी चक्र त्यांच्या वलयासकट फ़िरत असल्याचं मला जाणवलं. दोन खांदे आणि छातीवरचं गोमुख अगदी स्पष्ट जाणवलं. आणि ती मूर्ती मंद स्मीत करतेय माझ्याकडे पाहून असा भास झाला. गंमत म्हणजे यावेळी तिथे आम्ही तिघं च होतो. मी, प्रभू दत्तात्रेय आणि प्रतापे महाराज. असा पार पडला हा काकड आरतीचा सोहळा.
आज दुपारी इथेअजून काही परिक्रमावासी ही आले होते. त्यांनी दाल बाटी चा बेत बनवला होता. मात्र मला उपास असल्याने मी भगर खाल्ली. ती भगर घ्यायला सुद्धा मीच दुकानात गेले होते तेव्हा एक सरस्वतीचं मंदिर मला दिसलं. खूप जाण्याची इच्छा झाली मात्र भगरीसाठी उपास असलेली मंडळी वाट बघत असतील म्हणून मी मोह टाळला. मात्र त्याच संध्याकाळी महाराज मला त्याच मंदिरात घेऊन गेलेत. मी न मागता, न विचारता.ही संध्याकाळ माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण इथे झालेला संवाद हा मोलाचा संवाद आहे. “ मी भाजी घ्यायला जातोय. कोण कोण येणार?” असं महाराजांनी विचारलं.. मी चटकन “हो” म्हंटलं. मग महाराज पुढे आणि मी मागे, आम्ही भाजी बाजारात जाऊ लगलो. या वेळी माझ्या मानात जे काही प्रश्न आले त्याची उत्तरे प्रतापे महाराजांनी मी न विचारता मला दिलीत. मला समजेचना असं कसं होतय.. पण ते समजण्याची कुवत माझी नसावी,मी मात्र अनुभव गाठीशी ठेवला आहे,आणि तुम्हालाही तो सांगणार आहे मात्र पुढच्या ३४ व्या भागात.
©सुरूची नाईक:विदर्भ गट-देवा तुझा मी सोनार:
9309926559
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply