नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇३२👇 नर्मदे हर….. – बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇३२.👇
नर्मदे हर…..
*इंद्रेश्वर महादेव पासून आतापर्यंत अधून मधून सोबत असणारे पसारकर काका काकू मागे पडलेत आणि मयूरेश सुरेखा ताई पुढे आणि स्मीता आणि त्या नंतर मी असे चालू लागलो. एकट्याने चालण होत होतं तरी अजूनही या बाकी मंडळी एकतर मुक्कामावर किंवा अधे मधे सोबत भेटत असत. *मात्र अनुभव येतात ते एकट्याने जास्त, हेच खरं*.

आजचं हे अंतर बरच लांबचं होतं. वाटेत चहा, ताक वगैरे काहीही आज मिळालेलं नव्हतं. लोक वस्ती गावा गावापुरती दिसत होती मात्र गावामधे बरीच अलिप्तता जाणवली.खरं तर मला भावपु-याला थांबायचं होतं पण तो रस्ता जरा डवीकडे वळून जात होता, आणि भावपु-याचा रस्ता तिकडे जातोय हे काही मला कुणी सांगितलच नाही. म्हणजे पुढे चालणारे मयुरेश सुरेखा आणि स्मिता हे नक्की कुठे गेलेत हे ही मला माहित नव्हतं, आणि जसा रस्ता जातो तस तशी मी चालत होते, वाटेत एका ठिकाणी दोन परिक्रमावासी मुक्काम करताना दिसलेत, त्यांनी सांगितलं, की भावपुरा मागे राहिलं आणि आता बरच अंतर पुढे राहण्याची सोय नाही. ते दोन परिक्रमावासी मध्यप्रदेशी होते. त्यांची चालण्याची क्षमता आणि गती माझ्यापेक्षा खूपच जास्त होती, त्यामुळे पुढे मला एकटीनेच जाणं भाग होतं.वाटेत एक नदी ओलांडून जायची आहे हे समजलं. नदीचं पात्र बरच मोठं होतं. जोडे काढून चालावं लागणार होतं. नदी कुठून उतरायची हेच समजत नव्हतं. अचानक आभाळ भरून आलं होतं आणि पाऊस पडेल की काय अशी भिती वाटत होती. नदी मधे उतरून जायला एक बराच खोलगट रस्ता होता, पण नक्की हाच रस्ता आहे की नाही हे ही समजत नव्हतं. नदीवरचा पूल तुटलेला असल्याने कदाचित याच रस्त्याने ये जा होत असली पाहीजे. असा विचारच करत होते तो एक माणूस मोटर सायकल हातात घेऊन समोरच्या बाजुने नदी उतरू लागला. त्याने खुणेनेच रस्ता बरोबर असल्याचे सांगीतले आणि इतकेच नाही तर आपली गाडी एकी कडे उभी करून थोडं अंतर माझ्या सोबत चालून वळणानंतर चा रस्ता मला समजवून सांगीतला.

पुढे एका घळीतून जावं लागतं. तिथे पुन्हा रस्ता चुकेल की काय अशी भिती होती. मात्र ती ही आपोआप दूर झाली, तिथे डोक्यावर काहीतरी घेऊन दोन युवक माझ्या मागून नदी ओलांडून आले. त्यांना मी रस्ता विचारला पण त्यांना ओ म्हणता ठो कळेना. त्यांची भाषा मला काही केल्या समजेना.. आता काय करावं, आली का पंचाईत.. पण ती जिकडे जातील तिकडे जायचं, मी ठरवलं… जस्तीत जास्त काय होईल, थोडी वाकडी वाट होईल पण रात्रीचा निवारा नक्कीच मिळेल… मी त्यांच्या मागोमाग चालू लागले, अगदी काहीही माहिती नसताना. हा रस्ता म्हणजे दोन्ही बाजूला टेकड्या, त्यांच्या वर घनदाट झाडी, आणि मधून रस्ता… त्या टेकड्यांच्या पलिकडे काय आहे याचा अंदाजही येत नव्हता.कदाचित एखादी नदी, कदाचित माझी नर्मदा माई, कदाचित शेतं किंवा घनदाट जंगल.. अगदी काहिही असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.थोडं दूर गाव दिसलं तेव्हा हायसं वाटलं. गावात मात्र एका दुकानात एका बाईनी सांगीतलं, “तुम्हारे साथवाले उधर आखरी वाले घर मे गये है, वहा जाओ”…अरेच्या म्हणजे नाही नाही म्हणता म्हणता आम्ही सगळे पुन्हा एकत्र येणार होतो… हा खेळ काही समजेना.

हे गाव होतं सरसाड. ज्या घरचा पत्ता त्या बाईनी दिला होता ते होते रमणभाई शंकरभाई. नर्मदा माईचे परम भक्त. बघा नं ती मैया आपल्याला अशा तशा कुठल्याही ठिकाणी नेतच नाही. जिथे तिच्या लेकरांची व्यवस्थित सोय होणार असेल, त्यांचा आदर होणार असेल अशाच ठिकाणी आपला दाणा पाणी तिने लिहिलेला असतो.

शंकर भाईंना भेटल्यावर, त्यांच्याशी बोलल्यावर त्यांची आणि त्यांच्या संपूर्ण घराण्याची पुण्याई लक्षात येते. समाधान सुख काय असतं ते शंकरभाईंच्या चेह-यावर वाचावं. नर्मदा माईनी या भक्ताला स्वतःच्या किना-यावर कसं आणि का ठेवून घेतलं हे ऐकलं तेव्हा क्षणभर त्यांचा हेवा वाटून गेला, पण त्या हेव्यामागे कुठलाही वाईट विचार नव्हता, आणि एक गम्मत सांगू का, काही काळानंतर मला ही नर्मदा माईनी तेच सुख दिलं ज्या बद्दल मला शंकर भाईंचा हेवा वाटत होता. तो प्रसंग होता महेश्वर चा, पण तो जर मी आताच सांगितला तर शंकर भाईंच्या बद्दल चं बोलणं अर्धवट राहून जाईल, म्हणून तो अनुभव आपण महेश्वर च्या भागात वाचू. मात्र एक नक्की, इथे परिक्रमेते तुमची एकही इच्छा अपुरी राहात नाही हे मी सांगू शकेन.

तर आता शंकर भाई रमण भाईंबद्दल सांगते. रमण भाइंची नर्मदा परिक्रमा झाली होती. त्यामुळे त्यांना परिक्रमावासिंच्या गरजा आणि त्यांना हवं असणारं प्रेम आपुलकी याबद्दल माहिती होती. आम्हाला माईनी एका परिक्रमावासीयाच्या घरीच आणलं होतं, पण हेच काही ते विशेष नाही जे मी तुम्हाला सांगणार ते काहीतरी वेगळंच आहे. शंकर भाई रमण भाईंच्या केवळ एक नाही तर दोन परिक्रमा झाल्यात. त्या नंतरही गोरा कॉलोनी इथे त्यांनी १२ वर्ष परिक्रमा वासींची सेवा केली. इतकच नाही तर त्यांचे मोठे भाऊ आणि आता त्यांचे लहान भाऊ देखिल परिक्रमा करत आहेत. घरी असलेल्या लहानग्या म्हणजे ८ महिन्याच्या बाळाला बाकी काही बोलता येत नाही मात्र नर्मदे हर करता येतं. ज्या कुटुंबातच आई नर्मदे चं वास्तव्य आहे तिथे आम्हाला रहाण्याचा योग आला हे भाग्यच नाही का?

सरसाड च्या कुटुंबानी आमची खूप मन लावून आणि खूप सेवा केली. अगदी तिथून निघताना पाय निघेना अशी अवस्था होत होती, मात्र आपलं ध्येय हे परिक्रमा करण आहे, आणि ज्या अडकून पडण्या पासून दूर जाण्यासाठी वैराग्याची देवी नर्मदेची आपण परिक्रमा करत आहोत तिच्याच भक्तांच्यात जीव लावून अडकून पडायचं? नाही नाही, इथून पुढे निघणं भागच होतं. आम्ही मोठ्या जड पावलांनी शंकरभाईंचा निरोप घेतला.

सरसाड ते भालोद चा प्रवास आज करायचा होता. मधे वढवणा आणि मणिनागेश्वर ही स्थानं लागतात. हा रस्ता जंगलातून जातो आणि अत्यंत रमणीय रस्ता आहे. उंच सखल वाट, आजूबाजूला जंगली फ़ुलांनी डवरलेली वाट, केशरी, जांभळी, गुलाबी फ़ुलं, वळणं घेत घेत जाणारा ओहोळ…खूपच प्रसन्न असा हा रस्ता आम्ही अगदी एन्जाॅय करत करत गेलो. वढवाणा च्या हनुमान मंदीराबद्दल सांगते. मोठी मूर्ती आणि अतिशय प्रसन्न असं हे स्थान आहे. मंदीराचं बांधकाम असं आहे की भल्या मोठा हॉल असलेल्या या मंदिराला तीन चार दालनं आहेत मात्र कुठल्याही दालनातून बघितलं तरी ही मूर्ती आपल्याकडेच बघतेय असा भास होईल. मंदिरांच्या भिंतीवर वाल्मिकी रामायण कोरलेलं आहे. मंदिराच्या आतील घंटे खाली उभं राहिलं की भान हरपल्या सारखं होतं इतके कंपन तिथे जाणवतात. आम्ही मंदिरात गेलो त्यावेळी आमच्याव्यतिरिक्त कुणीही तिथे नव्हतं. मंदीर थोडं उंचावर आणि गावापासून लांब असल्याने तिथे खूप शांताता ही होती, खरं तर इथेच राहावं असं वाटत होतं पण त्याबद्दल विचारायलाही कुणीच नसल्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. हनुमान चालीसा ११ वेळा म्हणून मी पुढे निघाले.

इथून पुढे मणिनागेश्वराचं स्थान आहे. अत्यंत प्राचीन आणि अत्यंत जागृत. पण त्या आधी झालेली एक गम्मत सांगते. जसं जसं मणिनागेश्वर जवळ येत गेलं तस तसं लोक वस्ती तुरळक होत गेली. मात्र मधेच कुठेतरी गावातून एक कुत्रा आमच्या मागे मागे चालू लागला. आधी काही काळ तो कुत्रा अगदी शहाण्यासारखा फ़क्त मागे मागे येत होता, मधेच काय झाले कोण झाला, तो कुत्रा माझ्याकडे पाहून भुंकू लागला. अगदी दात ओठ खाऊन अंगावर आल्यासारखा करू लागला. मी घाबरले, आणि माझ्या तोंडून नर्मदे हर चा आवाज आपसुकच बाहेर पडला, आणि काय गम्मत माहितिये, हा कुत्रा बटन दाबावं तसा एक्दम खाली बसला आणि भुंकायचं थांबलाच. मला हे पहिल्या वेळेला लक्षातच आलं नाही, मात्र असाच प्रसंग तीन चार दा झाल्यावर समजलं, नर्मदे हर म्हटलं की हा थांबतो. कदाचित माझा नर्मदे हर चा जप कमी होत असेल म्हणून की काय, मणिनागेश्वर पर्यंत हा कुत्रा माझ्या मागे मागे येत राहिला, आणि माझा जप जणू माझ्याकडून या कुत्र्यानी करवूनच घेतला.

मणिनागेश्वर ला पोचल्यावर छान दर्शन झालं. इथे छोटी छोटी खूप मंदिरं आहेत. इथे मुक्कामाची छान व्यवस्था आहे. माझा बालभोग झाला नव्हता, मला थोडी भूकही लागली होती. खाली भंडा-याची तयारी सुरू होती त्यात पुरी भाजी तयार होताना दिसत होती. चला म्हणजे इथे बालभोग होईल असं वाटलं. पण गंमत माहितिये का, आज नं मला धिरडे खावेसे वाटले अचानक, आणि आपला महाराष्ट्रीयन चिवडा पण… पण इथे तर भाजी आणि पुरीची तयारी होती, अर्थात जे मैया पानात वाढेल ती प्रसादी… धिरडे आणि चिवडा जसा आला तसा माझ्या मनातून निघूनही गेला. मी तिथल्या स्थान धारी बाबांचं दर्शन घ्यायला म्हणून त्यांच्या निवासाकडे गेले हे बाबा कर्नाटकाचे होते. त्यांनी माझी चौकशी केली. मी मराठी आणि नागपूरची आहे म्हटल्यावर त्यांनी आपुलकीनी आणि मराठीत “ या या” असं म्हंटलं…” हमको थोडा थोडा मराठी आता है”, असं ही ते म्हणाले. त्यांचा छान सत्संग झाला.. आणि शेवटी जाता जाता त्यांनी मला बजावलं, “यू नीड टू गेट डिटॅच विथ एवरी थिंग, यू हॅव टू…..थोडा समय लगेगा, पर ध्यान से करोगी तो हो जायेगा”. मला भेटणारी प्रत्येकच मोठी व्यक्ती मला गुंतू नको हेच सांगतेय, मात्र ते करायचं कसं हा मोठा प्रश्न माझ्यापुढे होता, कारण आपण सर्व सामान्य माणसं कधी न कधी या मोहांना बळी पडतोच… मी त्यांना माझा प्रश्न विचारला तर ते म्हणतात “ मै तुम्हे जवाब नही दुंगा, क्युंकी तुम्हे कोई और इसका जवाब देने वाला है”.. मी नंतर त्यांना आग्रह केला नाही. मात्र हे कोण सन्यासी आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्यांचा परिचय विचारला.. ते म्हणाले “धिस इज द फ़र्स्ट स्टेप टुवर्डस अटॅचमेंट..यूर क्यूरोसिटी… क्या जरूरत है हमारे बारे मे जानने की? जो आपको जानना है वो आगे मिलेगा ये हमने बता दिया है… अब और मत सोचो.. ये लो, ये खाओ, तुम्हारे महराष्ट्र का है” असं म्हणत त्यांनी एका द्रोणामधे मला महाराष्ट्री पद्धतीचा चिवडा दिला…..आता काहीच क्षणांपूर्वी मला चिवडा हवा होता, तो मिळाला होता, पण तेव्हा वाटलेली तीव्र इच्छा आता चिवडा समोर असूनही तितकी तीव्र वाटत नव्हती… तसच काहीसं धिरड्याबद्दलही झालं… इथेच, मणिनागेश्वरालाच…. आणि हो, आजवर ज्या मगर मैयांला बघायची, तिचं दर्शन घ्यायची इच्छा होती ती पण पूर्ण झाली… पण नक्की काय झालं ते पुढच्या भागात सांगते.. हो माझ्या प्रश्नांची उत्तर पण मला पुढे मिळाली… कशी ते पुढच्या म्हणजे ३३ व्या भागात सांगते.
नर्मदे हर….
©सुरूची नाईक-विदर्भ गट-देवा तुझा मी सोनार: 9309926559

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*