नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇३१👇 नर्मदे हर….. – बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇३१.👇
नर्मदे हर…..

तर सिसोदरा गावातल्या त्या दोन तरुणांनी दिलेला चहा पिऊन त्यांना निरोप देऊन मी पुढे निघाले. छान सोनेरी ऊन पडलं होतं. अजून सूर्यदेव व्यवस्थित दिसत होते, मात्र संध्याकाळचा गारवा हळू हळू जाणवू लागला होता. वातावरण प्रसन्न होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतं आणि खुरटी झुडपं होती. अगदी प्रत्येकच झाड वेगळं असावं असं वाटत होतं. जवळ हनुमानाचं मंदिर आहे असं सांगीतलं होतं, म्हणून ते येईस्तोवर हनुमान चालीसा म्हणत जावं असा विचार मनात आला, आणि मी हनुमान चालीसा सुरू केली. तेव्हा मला एक आनंददायक अनुभव आला. आता हा अनुभव आहे की माझ्या मनातल्या प्रसन्नतेचा आणि एकरूपतेचा भाग आहे ते नाही सांगता येणार, पण आनंदाची परिसीमा काय असते आणि तो आनंद इतका तेजोमय कसा असतो हे अनुभवण्याची संधी मला मिळाली हे नक्की.

*मी हनुमान चालीसा म्हणायला सुरवात केली, मी आजूबाजूला झाडांकडे, रस्त्याकडे बघत बघत, आपल्याच नादात हनुमान चालीसा म्हणायला सुरवात केली. एक ओळ झाली आणि मी उजवीकडे बघत असताना, माझ्या डाव्या बाजूने कुणीतरी दुसरी ओळ म्हणतय असा भास झाला, मी डावीकडे पाहीलं तर तिसरी ओळ ऐकू आल्याचा भास झाला, माझ्या समोर, थोडं अंतर दूर कुणी तरी ती म्हणतय असं वाटू लागलं….जसं कुणीतरी माझ्यासोबत हनुमान चालीसा म्हणत म्हणत जातय…मग काय, ज्या झाडाकडे बघीन ते झाड, ज्या दगडाकडे बघेन तो दगड, आभाळ, वाळलेली पानं…अगदी जिथे जिथे माझी नजर जाईल ते सगळंच माझ्याबरोबर हनुमान चालीसा म्हणतय असं वाटायला लागलं, किंवा असं जाणवायला लागलं म्हटलं तरी चालेल. अश्या परिस्थितीत मी एकटी चालतेय असं मला जाणवलं देखील नाही, किंबहुना ही सगळी सृष्टी माझ्या सोबत आहे आणि माझ्यात समरस झाली आहे असच वाटू लागलं. खरं सांगते त्या वेळेचा जो आनंद आणि उत्साह आहे तो मला शब्दात मांडताच येत नाहीये. तुम्ही विचार करा न, करून तर बघा, सगळं जग, सगळी सृष्टी जेव्हा तुम्हाला सोबत करत असते त्या वेळेला अजून दुसरं काय हवं असेल तुम्हाला? *“And, when you want something, all the universe conspires in helping you to achieve it.”*

मला पाओलो सेलो च्या अल्केमिस्ट मधलं वाक्य आठवलं पण खरं सांगू हे त्याहीपेक्षा मोठं होतं, कारण इथे मला कुठलीही अपेक्षा नव्हती… मला काहीही नको असताना सगळी सृष्टी मला मिळाली होती.ती ही अगदी अचानक. माझा हा आनंद कशावरच अवलंबून नव्हता, आणि म्हणूनच तो अक्षय आहे असं मला वाटतं.

हा अनुभव घेत घेतच मी कांदरोज च्या आधी येणा-या हनुमान मंदिरात आले, तिथे मारुती रायाच्या दर्शनाच्या वेळेस मला पुन्हा तेच जाणवलं जे मी मागच्या एका अनुभवात लिहिलं आहे.

कधीही हाक घाल,मी तुझ्या सोबत असेन

असं मारुतीराया म्हणत होते जणू, आणि याची प्रचिती होऊन मारुती रायांचं दर्शन झाल्याचा अनुभव आपण वाचला आहेच, मात्र प्रत्यक्ष भेट देण्यापूर्वी मला असे संकेत अनेकदा मिळत गेलेत हे महत्त्वाचं. ते त्या त्या वेळेला आपल्याला समजत नाही मात्र म्हणून ते नसतात असं नाही. माझं हे आनंदाचं पर्व मी एकटी असताना जास्त तीव्रपणे जाणवत होतं…असेल, कारण तो आनंद आता शेअर होत नसावा…. आणि म्हणूनच की काय कांदरोज चा अनुभव मला आला.

कांदरोज च्या अश्रमात पाऊल ठेवत नाही तोच समोर खुर्चीवर एक सत्तरी च्या जवळपासचे गृहस्थ काहीतरी वाचन करत बसले होते. मी अजूनही माझ्या आनंद पर्वातच रममाण होते. मी माझं आसन लावलं, हातपाय धुतले आणि बाहेर पायरीवर जाऊन शांतपणे बसले. माझी परिक्रमा सुरु होण्या आधीपासून चे सगळे दॄश्य माझ्या नजरेसमोर चित्रपटासारखे येत होते. कसं माझं पीएच. डी. चं सबमिशन झालं, कसे मी लोकांचे अनुभव ऐकायला जायची, अरविंद मुळे काकांना भेटायला गेले असतानाचा आमचा संवाद सांगते. मी त्यांना भेटायला गेले त्यावेळी मी परिक्रमेला कधीतरी जावं एवढी इच्छा च फ़क्त मनात होती, मात्र ती अतिशय तीव्र होती. माझं कधी जायचं हे काहीही ठरलं नव्हतं.काकांनी विचारलं “ ताई कधी जाताय तुम्ही परिक्रमेला?” मी सांगितलं, “कदाचित ओंकारचं म्हणजे माझ्या मुलाचं बी ई झाल्याशिवाय काही जाता येणार नाही” मात्र मुळे काका बोलून गेले “ताई मला तर वाटतय तुम्ही याच वर्षी जाणार”…. आणि असे काही चक्र फ़िरले की जुलै मधे झालेल्या ह्या संवादानंतर नोव्हेंबर मी परिक्रमेला गेले देखिल!, तर असे सगळे विचार मी करत त्या आश्रमासमोरच्या पायरीवर बसले होते, तितक्यात मागून आवाज आला, “सुरुचि ताई, या या, इथे भेट होईल असं वाटलं नव्हतं हो, कशी सुरु आहे परिक्रमा?”

बापरे, माझं नाव घेऊन, चक्क मराठीतून, आणि इथे गुजरात मधे कोण मला आवाज देतय? मी मागे वळून पाहीलं आणि मला अक्षरश: रडूच आलं. समोर खुर्चीवर एक सत्तरी च्या जवळपासचे गृहस्थ काहीतरी वाचन करत बसले होते, तेच माझ्याशी बोलत होते… ते मुळे काकाच होते. नागपूरहून आजच इथे आले होते….मी त्यांना बघितले होतं पण अजिबात ओळखलं नाही..का कोण जाणे! मी त्यांना बघावं, बघूनही मला त्यांना ओळखता येऊ नये, नेमके त्यांचे विचार त्या वेळी माझ्या मनात यावेत, आणि मागून त्यांनी मला आवाज द्यावा…हे सगळं कसं एखाद्या मुद्दाम आखलेल्या योजने सारखं नाही वाटत? मी व्यक्त होण्याच्याही पलिकडे होते त्यावेळी…

“जेव्हा आवडी भक्त जाहले। भक्तामाजी देव गवसले भजू कूणास, कुणी भजणे। भजनची आकळले अंती हो॥

अशी काहीशी माझी अवस्था झाली होती त्यावेळी. पण त्यावेळी मला एक मात्र जाणवलं. मी एकटी चालू लागले आणि त्या नर्मदा माईनी माझी जास्त काळजी घेणं सुरु केलं.मला एकटं वाटू नये याची जबाबदारी तिनी घेतली, त्यासाठी सगळी सृष्टी मला देऊ केली सोबतीला, आणि इथे माझ्या परिक्रमेची सुरवात करून देणारे मुळे काका पण भेटवलेत!..

माझ्या बरोबर पण मागून येणारी मंडळी ही रात्री इथे येऊन पोचली होती.दुस-या दिवशी सकाळी मला किंचित ताप होता. राजपरा ला जाऊन मी मुक्काम करावा असं मला वाटत होतं. तिथे जगदीश भाई परमार म्हणून एकजण सेवा करतात, तिथे चहा पाणी आणि प्रसादीची व्यवस्था आहे. हे अंतर फ़ार नाही, ७-८ किमी असेल, त्यामुळे इथे रात्री मुक्कामी थांबावं असा बाकी मंडळींचा विचार नव्हता, मात्र तब्येतीमुळे मी थांबून जाईन असं मला वाटत होतं. म्हणजे थोडक्यात निदान रात्री मुक्कामाला सोबत असणारी ही मंडळी उद्यापासून सोबत नसणारच…पण मी असा विचार केला होता, मैयाने नाही. काय झालं कुणास ठावूक, माझ्या मागोमाग, एक एक करून सगळेच इथेच थांबायचा विचार करू लागले, आणि थांबले पण!..एक दिवस मुक्काम करून दुस-या दिवशी वेणूग्राम कडे जायला निघालो.

या रस्त्यात अनुभव म्हणून नाही पण राष्ट्रीय एकतेची भावना अजूनही सामान्य जनमानासत शिल्लक आहे हे जाणवलं. काही अंतर चालत गेल्यावर आम्हाला एका मुलाने बिस्किटाचे पुढे दिले, प्रत्येकी २, मोठाले आणि अगदी आग्रहाने. यात काय राष्ट्रीय एकता? आहे ना, हा मुलगा मुस्लीम धर्माचा, मात्र त्याचा परिवार गेल्या अनेक वर्षांपासून परिक्रमा वासींना बिस्किट देतात, आणि नर्मदे हर चा गजर करून परिक्रमावासिंच्या पाया देखील पडतात. आणि तरीही या परिवाराला सेवा करण्याचं समाधान पूर्णपणे मिळत नाही. त्या मुलाशी बोलणं झालं तेव्हा तो म्हणाला, “ हमे बहोत अच्छा लगता है परिक्रमावासीयों की सेवा करना, हम चाहते है की परिक्रमावासी हमारे घर मे आये, पर हम मुस्लीम है इसलिये लोग हमारे यहा नही आते. हम पहले मांस मच्छी खाते थे, पर अब नही खाते, फ़िर भी लोग घर पर खाने के लिये मना करते है, इसलिये बिस्किट देना ही ठिक है”. इथे नर्मदा सगळ्यांचीच आई आहे, हे बघून छान वाटलं.

असाच नाही पण खूप वेगळा आणि खूप रोमांचक अनुभव दमगढ च्या आधी म्हणजे दम्हेडी नंतर जे जंगल लागतं तिथे आला..पण तो आता सांगणार नाही, तो तेव्हाच सांगेन..आता मात्र एक मजेदार किस्सा सांगते.

पूर्ण परिक्रेमेत तुमच्या सोबत जर कोणी कायमरित्या चालत असतील तर त्यातली एक म्हणजे आपली नर्मदा मैया, जिला इथे या भागात “मैया जी” असं म्हणतात, आणि दुसरे म्हणजे “पारले जी”. गुजराती प्रेम हे फ़ारच गोड आहे आणि पारले जी सारखंच स्ट्रॉंग आहे. इथे इतके बिस्किटाचे पुढे रोज मिळायचे की जीव नकोसा होऊ लागला..आणि इतक्या प्रेमानी ते दिल्या जायचे की नाही म्हणायला काही वावच नाही.काही खाल्ली, जी खाल्ल्या गेली नाही ती पिशवीत जमा केली. आता वजनही सहन होईना, शेवटी माझ्याजवळची ५ पाकिटं मी रस्त्यात दिसलेल्या लहान मुलांना देऊन टाकली. पण असं करून मी बिस्किटांपासून सुटले असं मला वाटलं होतं तरी असं नव्हतं. दगडू महाराज आश्रमातून बाहेर पडत नाही तोच १० बिस्किटांच्या पुड्याचा मिळून जो एक मोठा पुडा असतो तो मला देऊ करण्यात आला..”मी दिलेली बिस्किटं तू देऊन टाकलीस काय? घे तुला दुप्पट देते, घ्यावीच लागतील तुला” असं ती मैया म्हणत असावी बहुधा…आणि खरं सांगू, यानंतर मात्र फ़ार बिस्किटं मिळालीच नाहीत…हे १० पुडे बरेच दिवस चाललेत मला…

या गुजराती लोकांच्या बोलण्यावर न अज्जीबात विश्वास ठेऊ नये… फ़ार गांभिर्याने घेऊ नका हो, एक गम्मत आठवली म्हणून लिहिलं असं. सांगते, तुम्ही कुठल्याही गुजरात्याला कुठलाही पत्ता विचारा “ अभि हयीच छे” हेच उत्तर आपल्याला मिळतं. आता खरी गम्मत या “हयी” शब्दाची आहे. हयी चा अर्थ १ किमी ते ७ किमी असा कितीही असू शकतो. अभि हयी छे म्हंटल्यावर ७-८ किमी तरी चालावं लागेल हा विचार मनात पक्का असू द्यावा लागतो. अर्थात गुजरात संपता संपता त्याची सवय होतेच…असो, हा झाला गमतीचा भाग.

पुढे “हयी” च्या नादी न लागता एका इंद्रेश्वर महादेव मंदिरात आसन लावलं. इथून पुढे वेळूग्राम आणि भावपुरा ला जायचं होतं, मात्र भावपु-याच्या ही पुढे सरसाड ला आम्ही मुक्काम केला. या मुक्कामात एका छान कुटुंबाशी ओळख झाली. पुढे वढवाणा ते मणीनागेश्वर फ़ार सुंदर म्हणजे अगदी रमणीय रस्ता आहे, तो अनुभवला. मणीनागेश्वर ला एका सन्याश्याशी सत्संग झाला, आणी भालोद ला माझ्या जीवनाला पुन्हा एक दिशा मिळाली. भालोद हे स्थान माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं, प्रेमाचं आदराचं आणि जिव्हाळ्याचं स्थान आहे कारण इथे आलेला अनुभव माझ्या परिक्रमेतला अत्यंत महत्वाचा अनुभव आहे. पण मी तो पुढच्या म्हणजे ३० व्या भागात सांगणार…. नर्मदे हर.
©सुरूची नाईक-विदर्भ गट:देवा तुझा मी सोनार-9309926559.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*