नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇२८.👇
नर्मदे हर…..
तर मागच्या भागात मी एका मंत्रा बद्दल बोलत होते. तसा हा मंत्र मला कुणी दिला हे आधी सांगते. झरवानी ते गोरागाव या प्रवासात मी आणि पसारकर काकू सोबत होतो. आम्ही दोघी ब-यापैकी मागे होतो. हा रस्ता उताराचा आणि जंगलाचा रस्ता होता. इथे आमच्या मागेपुढे एक साधू चालत होता. एका ठिकाणी थोडं थकलं असताना आम्ही दोघी रस्त्याच्या कठड्यावर बसलो असता हे साधू महाराजही तिथे आलेत. आम्ही दोघी बसलेल्या पाहून ते आमच्या समोर असलेल्या बाकावर बसले. पसारकर काकांच्या मागच्या परिक्रमेत ते काकांना भेटले होते, त्यामुळे त्यांची थोडीफ़ार ओळख होती. त्यानुसार त्यांनी काकांची चौकशी केली आणि काकूला विचरलं, “काकाजी आगे चले गये क्या?, आणि मग ते म्हणाले, ऐसाही होता है परिक्रमा में, कोई किसीका नही होता…आणि शेवटी ते म्हणाले, जीवन तो एक परिक्रमा ही है”..
या सगळ्याचा मी नीट विचार केला असता या जीवनात प्रत्येक जण आपापल्या वाटेवर जातो आहे आणि इथे कुणीही कुणाचं नाही, इथे प्रत्येकाला आपला मार्ग एकट्यानेच चालायचा आहे, असा काहिसा निष्कर्ष माझ्या मनाने काढला.त्याचबरोबर इथे आपलं काहीही नाही हे ही समजलं पण ते अमलात कसं आणायचं हा प्रश्न कायम होता. तेव्हा आपण आपल्या स्वत:ला वारंवार समजावून सांगण्याशिवाय हे समजणार नाही हे लक्षात आलं आणि त्याप्रमाणे मी स्वत:ला समजवू लागले.
पुढे, म्हणजे बरच पुढे, गुजरात मधे असताना कांदरोज नंतर मला एक साधू महाराज भेटले. त्यावेळी ते माझ्या सोबत, म्हणजे थोडं फ़ार मागेपुढे होते. ते म्हणाले, “अकेले चल रही हो?”.. मी सांगितलं, अभीतक कुछ लोक साथ थे, अब मै अकेले चल रही हू.” ते म्हणाले, “बहूत अच्छा, अकेले ही चलो, वैसे भी यहा तुम्हारा कुछ नही है. एक मंत्र बताता हू, याद रखना तो आसानी होगी” मला वाटलं हा मंत्र चालताना संकट येऊ नये म्हणून असेल किंवा, तत्सम काही असेल, पण तो मंत्र होता “इदं न मम.
ते म्हणाले “ बेटा जी, ना ये दिन तुम्हारा है, ना रात, ना ये शरीर, ना ही कोई रिश्ता.. जो तुम्हे मिल रहा है वो तो समय का दान है, जैसे मिला है वैसे ही चले जायेगा, रहेगा नही.. तो इसलिये तुम्हे जब भी कोई भी चीज मिले, उसे जीने से पहले खुदको यकीन दिलाओ, कहो के ये मेरी नही है, जितने समय तक मेरे पास है वह मेरे लिए है, परंतु मेरा उसपर अधिकार नही है. जब तुम्हारा अधिकार ही नही है तो उसके प्रती कैसा ममत्व? कैसी ममता? बस कहते जाओ..इदं न मम..!
अगदी हाच विचार मी आधी केला होता आणि इथे या साधू महारांजानी माझ्या विचार करण्याची दिशा योग्य आहे असा संदेश दिला. तर असा हा मंत्र, इदम न मम…अगदी हातवर पडलेल्या प्रसादापासून तर अंगावरच्या दागिन्यासकट, पोटच्या गोळ्यापासून तर कपाळाच्या कुंकवापर्यंत..इदं न मम..ज्यावेळी मी पुढे महेश्वरला गेले तिथे तेव्हा पोटच्या गोळ्या बद्दलच्या जिव्हाळ्या विषयी बराच सत्संग झाला, पण तो महेश्वर च्या भागात लिहीन.
पुढे हरि धाम आश्रमात म्हणजे गोरा कॉलोनी नंतर, गुवार इथे आम्ही मुक्काम करायचं ठरवलं. इदं न मम हे तोपर्यंत घर करून होतच. इथे विचारांनी अजून एक दिशा घेतली. ह्या “मम” बद्दलचे विचार मनात येऊ लागले. हे माझं नाही… पण माझं काय आहे हे समजून घेण्या आधी हा “मी” माहित असायला हवा! अर्थात ह्या मी पेक्षाही ह्या “मी” कडे पुरवलं जाणारं लक्ष जास्त धोकादायक असावं असं वाटलं. काय झालं, गुवार ला हरि धाम आश्रमात असताना बरेच गांजा धारी परिक्रमावासी आजूबाजू ला होते. तिथे तो गांजा चा वास पसरला होता. मला अजिबात सोयीचे वाटत नव्हते. आणि तेव्हा विचार आला, ह्या मनाचे फ़ार जास्त लाड पुरवले जात आहेत. आपल्याला वाटलं तस झालच पाहिजे हा अट्टहास कशासाठी?आणि जगावयाच्या प्रत्येक दिवशी आपण, म्हणजे आपलं मन काहितरी ठरवतं आणि त्या मागण्या पूर्ण करण्यात आपला दिवस जातो..दिवस दिवस जाता जाता आयुष्य जातं. ह्याच्या कडे त्रयस्था सारखं बघता येईल का? म्हणजे आपण अनोळखी माणसाशी कसं तेवढ्यापुरतच बोलतो, तसं करायचं.. आता नेमकं उत्तर मला पुढे मिळालंय पण ते पुढेच सांगेन. विचारांची दिशा बदलत गेली हे मात्र सांगू शकेन.
इथून पुढे आम्ही आनंद आश्रमात गेलो. काही जागा खूपच सकारात्मक असतात. तसाच हा अनंद आश्रम. तिथल्या मंदिरात माणुस हरवून जाईल अशी शांतता आणि असेच कंपंन देखिल. पंचतारांकित आश्रमांसारखा हा आश्रम, निटनेटका, पॉश, आणि भरपूर सुविधा देखिल. गुजरात मधे धनाची आणि मनाची दोन्ही श्रीमंती बघायला मिळते. मोठाले बगीचे, कारंजी आणि काय काय. जेवण सुद्धा अगदी पंचपक्वान्नांनी भरपूर होतं. जेवण झाल्यावर गरमा गरम दूध. झोपायला मोठ्याला खोल्या, आंघोळीला ऐसपैस बाथरुम. परिक्रमेत आल्यानंतर असं वैभव पहिल्यांदाच बघितलं. खरं सांगू, अगदी पहिल्यांदाच फ़ोम च्या मऊ मऊ गादीवर बसलेल्या एखाद्या गरीब लहान मुलाला जे कौतुक वाटत असेल नं तसं वाटलं तेव्हा… हे आपलं नाही हे त्या मुलाला महित असतं, मात्र तो क्षण महत्त्वाचा आणि तेवढा जगायचा, हेही त्याला माहित असतं. म्हणूनच तो कौतुकानी सगळं अनुभवत असतो मात्र हे मला मिळालं पाहिजे ही आसक्ती निदान त्या वेळी तरी त्या मुलाच्या मनाला शिवत नाही. अगदि तसं काहीसं झालं होतं.. इदं न मम,म्हणजे नक्की काय ते समजलं होतं आणि म्हणूनच जे मिळतय ते बोनस होतं सगळं. ते सुख जितका वेळ आहे तो क्षण त्या सुखाचा,इतकं महत्त्वाचं.
इथे जेवण आणि नंतर ची शेकोटी वगैरे ची मजा घेऊन आम्ही आमच्या खोलीत गेलो.आम्ही ६ जण होतो. इथे एक विचित्र अनुभव आला. इतकी सकारात्मक जागा आणि असा विचित्र अनुभव? काही समजेना.. झालं असं की रात्री बारा साडेबाराच्या सुमारास, अचानक मयुरेश दादा झोपेत मोठ्या मोठ्यांदा ओरडू लागले, खूप घाबरले होते ते, त्यांना दरदरून घाम फ़ुटला होता. आम्ही सगळे झोपेतून जागे झालो पण मयुरेश दादा मात्र अजूनही ओरडत होते. त्यांना जागं केलं तेव्हा काहितरी भयंकर स्वप्न पडल्याचं त्यांनी सांगितलं. काहीतरी अघटित घडावं तसं..नक्की काय ते मी विचारलं नाही पण अंदाज आला मला! खूप विचित्र वाटलं त्यावेळी. इतक्या सकारात्मक जागी हे असं स्वप्न? पण असं नसतं. अश्या स्वप्नांचा आणि जागेचा संबंध नसतो. तो संबंध तुमचा आणि तुमच्या साधनेचा असतो. हे मी खात्रीपूर्वक सांगते कारण असाच अनुभव मला चिखल्दा इथे आला. अगदी वासुदेवानंद सरस्वती, म्हणजे मोठे महाराज, माझ्या गुरुंचे गुरु,यांनी ज्या ठिकाणी चातुर्मास केला तिथे मी थांबले होते, त्याच मंदिरात.. अगदी त्याच खोलीत. तरीही आला तसा अनुभव, पण मी आता सांगणार नाहीये. आपण चिखल्द्याला जाऊ न तेव्हा सांगणार आहे.
आता दुसरा अनुभव सांगते. गुवार हून पुढे आम्ही सगळेच आगे मागे होऊ लागलो.मी काका आणि काकू मागे आणि मयुरेश दादा, सुरेखा ताई आणि स्मिता पुढे. पण आम्ही इतके दिवस ब-यापैकी सोबत जात असल्याने ताटातूट होईल असं काही वाटलं नाही. मात्र तपोवन आश्रमाच्या मुक्कामा नंतर तशी ताटातूट होईल याचे संकेत मिळू लागले. तपोवन आश्रम मैया किनारी आहे. आम्ही दत्त जयंती तिथेच केली.आणि दत्त जयंतीलाच, दत्त जन्मानंतर लगेच, मला मयुरेश दादा चा फ़ोन आला.. “ कुठे आहेस?, लवकर किना-यावर ये,लग्गेच”. मी किना-यावर गेली तर समोर पाण्यावर लांब लचक मगर मैया तरंगत होती. अगदी १० -१२ फ़ुटावरुन तिचं दर्शन झालं. तो किनारा रमणीयच आहे. तिथे जप केला असता अतिशय मन लावून जप झाला. खूप समाधान कारक वाटू लागलं. मात्र ताटातुटीचा तो अनुभव इथेच आला.
इथे जप केल्यानंतर मला कुणाच सोबत जाऊ नसे असं मनातल्या मनात वाटू लागलं, पण असं बोलून दाखवणं योग्य नव्हतं. आम्ही एका परिवारासारखे सोबत होतो,त्यामुळे असं करणं मला प्रशस्त वाटत नव्हतं. पण परिवार म्हंटलं म्हणजे गुंतणं आलं. बंधनं आलीत.. आणि तीच सोडायला आपण परिक्रमेला आलो आहोत. द्वीधा मनस्थिती होऊ लागली तशी मैयाने ही काळजी घेतलीच. आता मी एकटी, काका काकू, आणि सुरेखा मयुरेश आणि स्मिता असे गृप आपोआपच पडलेत. आता आमचे मुक्कामाचे ठिकाण एक असे मात्र चालताना आम्ही वेगवेगळे चालत असू. या आधी तावसे काका काकू आमच्या पासून असेच वेगळे झाले होते. आणि असेच अनेक लोक एकत्र येतात आणि वेगळे ही होतात. याला कारण आहे. आपण माणसं आहोत. आपल्या सोबत कुत्रा मांजर जरी असलं तरी कालांतराने आपल्याला त्याचा लळा लागतो. मग हाडा मासाची माणसं सतत सोबत असतील तर लळा लागणं स्वाभाविक आहे. परिक्रमेच्या मूळ हेतू लाच जर तडा जात असेल तर अर्थ तरी काय? आणि म्हणून ती मैयाच असं काहीतरी घडवून आणत असते. जेणेकरून तुम्ही तुमच्या संकल्पासाठी योग्य पद्धतीने तयार व्हाल.
मी माझा जप झाल्यावर आश्रमात परत आली तोवर ही मंडळी पाठीवर बॅगा लावून तयार होती. मला माझं आवरून तयार व्हायला वेळ लागणार होता. मी मंडळी ना पुढे जायला सांगीतलं आणि त्याप्रमाणे मंडळी पुढे गेली. आता पुढे कोण कुठे जातं, कोण कुठे थांबतं माहित नाही. पुढचा आश्रम तसा जवळ होता. मी एकटेच निघाले. रस्त्यात मला एक म्हातारे गृहस्थ भेटलेत आणि “रामानंद आश्रम मे स्वामीजी के दर्शन करके जाना असं सांगितलं”. मी रामानंद आश्रमात पोचले. तिथे आसन लावायला म्हणून ऑफ़िस मधे गेले तर तिथे आधीच सुरेखा ताई, स्मीता आणि मयुरेश पोचले होते. ते ही इथेच थांबणार होते. आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलो. हा असा खेळ भालोद पर्यंत सुरू होता, आणि तिथून पुढे मात्र आम्ही वेगवेगळे झालो.
इथे रामानंद आश्रमात खूप छान अनुभव आला. तिथे गादीवर सध्या स्वामी अभिराम दासजी त्यागी महाराज आहे. दिसायला अगदी रामदास स्वामींसारखे. अतिशय तेजस्वी. त्यांचा सत्संग खूप वेगळा असतो. तिथे आलेला अनुभव आणि सत्संग या दोन्हीबद्दल पुढच्या भागात सांगते….
©सुरूची नाईक-विदर्भ गट-देवा तुझा मी सोनार-9309926559.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply