नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇२७👇 – बडगुजर. इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇२७.👇
नर्मदे हर.
सकाळी लवकर उठून आम्ही वडफ़ळी कडे निघालो. अंतर फ़ार नव्हतं पण काल संध्याकाळी नक्कीच पूर्ण झालं नसतं. वडफळी ला पोचतो तोच तिथे श्रीपाद, जो मागे आम्हाला विकास जी जोशी,राहणार धुळे, यांच्या सोबत भेटला होता त्याने आमचं स्वागत केलं.. तिथल्या आश्रमाच्या दारशी आले आणि पुन्हा माझं मन हळवं झालं. दाराच्या पाटीवर ” जय गुरू नाना” असं लिहिलं होतं. नाना माहाराज माझे गुरु, आणि श्रीपाद हा माझ्या नाना परिवारातलाच एक बंधू. माझं हळवं होण्याचं कारण असं की ज्या ज्या वेळेला मला काही वेगळे अनुभव आले त्या त्या वेळी माझे गुरू आजुबाजूला आहेत असा संकेत मला मिळत जात होता. मी शूलपाणीत असताना, उडी मारून जाण्याचा तो प्रसंग, त्या वेळी माझ्या दोन्ही दंडांना कुणीतरी पकडल्याचं मला जाणवलं होतं आणि नंतर लगेच मला नर्मदा माईनी दर्शन दिलं होतं. काल मला अश्वत्थामांचं दर्शन झालं आणि आज हा “ जय गुरु नाना” चा मिळालेला संकेत. खरं तसच पुढे भालोद (गुजरात) मध्ये प्रतापे महारांजाच्या कडेही अनुभव आला, पण आपण भालोद ला पोचलो की मी तो अनुभव सांगेन.

मी अगदी प्रत्येक दिवसाचे वर्णन करत नाहीये, मात्र जे जे अनुभव मला येताहेत ते आणि परिक्रमे मधे एकूण माझं बदलत गेलेलं आयुष्य आणि त्याची कल्पना येईल असे बदलत गेलेले विचार मी मंडण्याचा प्रयत्न करतेय. रोजनिशी लिहिण्याची माझी इच्छा नाही. बरेचदा वाचकांची इच्छा ही अनुभव वाचण्याची असते, मात्र त्यांचा झालेला परिणाम सुद्धा लक्षात घेणं माझ्या मते गरजेचं आहे. किंबहुना ते जास्त महत्त्वाचं आहे कारण ज्यांची परिक्रमा झाली आहे त्यांच्या अयुष्यात दु:ख का शिल्लक राहात नाही, आणि परिक्रमा केलेली मंडळी कायम त्या परिक्रमेतून बाहेर कशी येत नाही याची ही कारणं आहेत असं मला वाटतं. एखाद्या व्यक्तीची परिक्रमा झाल्यानंतरही त्या व्यक्तीला मैया किना-याची ओढ आयुष्यभर लागून राहते ते या परिणामांमुळेच.

आपली मैया आणि आपले गुरू आपल्या सोबत आहेत असे संकेत कायम मिळत राहिल्याने परिक्रमा पूर्ण होईल आणि विनाविघ्न होईल हे समजत होते, मात्र अजून आत्मपरिक्षण होणे गरजेचे होते. माझ्या पात्रते बाहेर, केवळ पूर्वजांच्या पुण्याईने ही संधी मला मिळाली होती आणि माझा प्रवास योग्य दिशेने वळावा यासाठीच हे घडते आहे असे मला वाटू लागले होते.

वडफ़ळी ला बालभोग आणि बाकी कामं आटोपून आम्ही माथासर साठी निघालो. माथासर पर्यंतचा प्रवास उत्तम झाला, गुजरात चं सौंदर्य बघून मन प्रसन्न झालं मात्र लांबच्या लांब पसरलेली खेडी संपता संपेनात. परिकथेतलं गाव असावं असं हे माथासर, डोंगर उतारावर वसलेलं आहे. मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्थित पोहचलो. आजपर्यंतच्या रात्री आम्ही बरेच दा उंदीर मांजरासोबत एकत्रपणे, त्यांना अंगाखांद्यावर घेऊन, आनंदाने घालवल्या होत्या. आता भैरवनाथांच्या श्वानांची वेळ होती. आम्हाला आसन लावायला सांगीतलं ते एक बांधकाम सुरु असलेलं घर होतं. भिंती उभारल्या होत्या, बाकी काम अजून बाकी होतं. तिथे फ़ारसा कुणाचा वावर नसावा आणि म्हणूनच ३-४ कुत्री तिथे येऊन बसत असावीत. आम्ही त्यांच्या जागेवर अतिक्रमण केलं असणार, मात्र ती कुत्री त्यांचं घर सोडायला काही तयार नव्हती… कितीदाही हाकललं तरी ती आपली आतमधे येतच.. शेवटी पर्याय नाही असं समजलं आणि आम्ही त्यांच्यासोबत रात्र घालवली. ती पण इमाने इतबारे आमच्या पायाशी लोळण घेत पडून राहिली..

तेव्हा विचार आला..”ठिक आहे, आजची एक रात्र च घालवायची आहे”… मग लक्षात आलं, गेले कित्येक दिवस आम्ही हाच विचार करत रात्री घालवत आहोत, आणि असं केल्याने ती रात्रही सुखाची गेली आहे आणि कसला आकसही उरलेला नाही. खरच आयुष्य असच आहे. इथे कसलाही आकस ठेवणं योग्यच नाहिये. दिवस आज चा असतो आणि तो संपतो ही आजच. तो संपणारच असतो त्याच्या स्वत:च्या गतीने. गती वाढत असते ती आपली. त्या दिवसात मावणारही नाही इतके अपेक्षांचे ओझे आपण त्या दिवसावर लादत असतो. ते ओझे वाहता वाहता तो दिवस दमलेल्या थकलेल्या अवस्थेतच येतो तसा निघून जातो, आपल्या अपेक्षांचे, आपले ओझे आपल्याला व्याजासकट परत देऊन!आणि आपण उद्या येणा-या दिवसावर पुन्हा ते ओझे लादायला तयार झालेलो असतो. आपल्याला फ़क्त हे समजत नसतं…. अरेच्या, हे असे विचार मी फ़रसे कधीच केले नाहीत, इतका वेळच कधी मिळाला नाही, आणि हो असे अनुभवही नाहीत..म्हणजे हे विचार मी केले म्हणायचेत का करवून घेतले म्हणायचेत?.. काहिही असो, मी काहितरी शिकतेय हे महत्त्वाचं आहे. आणि हे काहितरी माझ्या ह्या आणि कदाचित पुढच्या जन्मांचे मार्ग सुकर करणारं आहे असं वाटतय!

तर माथासर हून पुढे निघून आता झरवानी ला जायचं होतं. हा प्रवास साधारण वीस ते पंचवीस किमी चा असेल, पुस्तकात १६ दिलं आहे मात्र १६ नक्की नाहिये. आणि महत्त्वाचं म्हणजे या पट्ट्यात एकही गाव नाही. जंगल वाट आहे, मात्र सायकल, किंवा मोटरसायकल जात असतात अधुन मधून, पण निवा-याचं ठिकाण, पाण्यासाठी काही ठिकाण असं या भागात काहीही नाही, आणि ही वाट घनदाट जंगलातून जाते. झाडांची दाटी इतकी आहे की ब-याच ठिकाणी आकाश दिसत नाही, वर पाहिलं की फ़क्त झाडांच्या फ़ांद्यांचे लेयर दिसतात एकावर एक. आणि आजूबाजूला पाहिलं तर किर्र जंगल. हे जंगल आम्हाला एका दिवसात पूर्ण करायचं होतं. कारण रस्त्यात काहीही निवार्‍याची जागा आम्हाला मिळणार नव्हती आणि जमेची बाजू म्हणजे हे आम्हाला माहीत होतं. थोडी भीतीही होतीच कारण लेप्याला कळलेला प्रसंग थोडासा मनामध्ये होता. तरीही आता पुढे एकटं जायचं असं मी नाही तर माझ्या मनाने ठरवलं.आपण आपले आणि आपल्या मनाचे खूप लाड करतो आणि त्यामुळे ते फार लाडावलेलं आहे असा विचारही त्या वेळी माझ्या मनात आला.खरं पाहता ज्या वस्तूंना आपण माझी वस्तू असं म्हणतो त्या वस्तूंवर मालकी हक्क हा माझा असायला हवा. म्हणजे माझा मोबाईल किंवा माझी गाडी केव्हा माझी बॅग या सर्व माझ्या गोष्टी आहेत आणि यांची मालक मी आहे म्हणून त्या माझ्या मतानुसार किंवा माझ्या म्हणण्यानुसार त्यांनी वागायला हवं असा माझा समज आहे.आणि असाच विचार करायचा झाला तर ज्यावेळी मी माझं मन असं म्हणते त्यावेळी माझ्या मनाने माझ्या मर्जीनुसार वागायला हवं हेही खरं आहे. पण असं खरंच होतं का? मी मनाची मालक असून बहुतांशवेळी किंवा नेहमीच म्हणा माझं मनच माझ्यावर मालकी हक्क गाजवत असतं.माझं मन माझ्या म्हणण्यानुसार वागत नसतं तर मला त्याच्या मर्जीनुसार वागायला भाग पाडत असतं. अतिशय वेड मन असतं हे. लहान मुलासारखं फार हट्टी असतं. आणि आपणही या मनाचे लाड पुरवून त्याला हट्टी बनवत असतो. आईने जशी लहान बाळाला सवय लावावी तशी लागते तसंच या मनाचं आहे. एकदा का आपण त्याचे हट्ट पुरवत आलो की ते आपल्या हाताबाहेर जाऊन हट्ट करू लागतं. त्याच्यावर ताबा मिळवणे कठीण मात्र त्याच्यावर ताबा मिळाला तर सगळ सोपं. असे विचार माझ्या मनात येऊ लागलेत.

थोड्याशा घाबरलेल्या मनाला ताब्यात घेऊन त्याचा हट्ट न पुरवता या जंगल वाटेतून एकटच पुढे जायचं असं मी ठरवलं. कितीही रागावलं तरी मधून मधून आपलंच टुमणं लावलं नाही तर ते हट्टी मन कसं म्हणायचं?माझं मन उगाचच माझं लक्ष आजूबाजूच्या किर्र झाडी कडे ओढून ओढून नेत होतं आणि मी त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होते. कधी ते जिंकत तर कधी मी. मात्र ,शेवटी इतके वर्षांच लाडावलेलं मन जेव्हा जास्त वेळा जिंकू लागलं तेव्हा मी मैयाचा धावा सुरू केला. तिला म्हटलं आई माझं मन ऐकत नाहीये मात्र त्याच्याकडून ऐकून घ्यायचं आहे हे नक्की, तेव्हा आता तूच काय करशील ते कर मात्र माझ्या सोबत तू आहेस असे संकेत मला देत राहा.मी पुढे निघाली आणि चालू लागली माझ्या मनाकडे अजिबात लक्ष न देता.

एका ठिकाणी मात्र हे मन उडी मारून बाहेर आलंच. अतिशय घनदाट जंगल, किर्र झाडी खूप थंड वातावरण, एक प्रकारचा विचित्र वास तिथे येत होता. पुढचा रस्ता हा झाडांच्या बोगद्यातून गेल्यासारखा वाटत होता. माझं मन म्हणत होतं बघ इथून पुढे जायचं का? का मागून येणाऱ्या परिक्रमावासी ची वाट बघायची? त्या बोगद्यात जायच्या आधी इथे थोडावेळ बसायचं का? मन बर्‍यापैकी घाबरलं होतं आणि तिथे बसण्याचा निर्णय मी घेतला. निदान थोडा वेळ तरी का होईना या मनाने मला जिंकलं होतं. मी मैयाला विचारलं, “मैया काय करू थांबू की पुढे जाऊ?” आणि तितक्यात माझ्या डोक्यावर प्रेमाने टपली मारावी तसा मला भास झाला आणि ताबडतोब मनात विचार आलेत,”इथे थांबून तू सुरक्षित आहेस असं तुला वाटतंय का? तशीही जंगलात आहेस, तेव्हा जर काही होणे असेल तर ते इथेही होऊ शकतं,मग जे होणार आहे त्याचा विचार करू नकोस, इथे बसून फक्त आणि फक्त वेळ जाईल बाकी काहीही होणार नाही. त्यापेक्षा चटकन उठ आणि चालायला लाग, मैया तुझ्या सोबत आहेच”.

आता मात्र मी जिंकले आणि मन हरलं होतं. मी पुढे चालू लागले.त्या बोगद्या सारख्या दिसणाऱ्या रस्त्यावरून थोडे पुढे गेल्यानंतर समोरून तीन लहान मुलं माझ्या दिशेने येताना दिसली. त्यांना पाहून धीर आला, वाटलं ही लहान मुलं जर येत आहेत या रस्त्याने तर घाबरण्याचं काय कारण पुन्हा एकदा मी मनाला धीर दिला आणि मी जिंकले. मैया ने वचन दिल्याप्रमाणे ती मला दर दहा मिनिटांनी संकेत देत राहिली.पुढच्या प्रवासात मला अनेक वेगवेगळे अनुभव आलेत आणि मी या घनदाट जंगलात एकटी नाही, मैया माझ्या सोबत आहे याची खात्री पटली. आता माझं मन पूर्णपणे हरलं होतं आणि मी जिंकले होते. मला पहिल्यांदा ती तीन लहान मुलं दिसली आणि मी एकटी नाही हे समजलं. त्यानंतर आजूबाजूच्या जंगलातून कुठून तरी लाकूड तोडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला त्यामुळे माझ्या व्यतिरिक्त इथे कुणीतरी आहे असा आभास मला झाला.हा लाकूड तोडण्याचा आवाज बंद झाला आणि लगेच थोड्याच वेळात इतक्या घनदाट जंगलातून मला रेडिओवर जुनी गाणी ऐकू येऊ लागली. अभी ना जाओ छोडकर हे पूर्ण गाणं व्यवस्थित ऐकू आलं, मात्र आवाज कोणत्या दिशेने येतो आहे ते समजलं नाही.असं करत करत जवळ जवळ अर्धे अंतर मी येऊन पोहोचली असेल.म्हणजे आता झरवानी साधारणपणे 12 13 किलोमीटर शिल्लक असेल आणि माथासर सुद्धा साधारण तितकच मागे पडलं असेल. अशा ठिकाणी माथासर किंवा झरवानी होऊन आपली बरीच गुरं घेऊन या वेळी कुणी गुराखी बाई कशी काय थांबली असेल या घनदाट जंगलात? पण मी पुढे गेली तेव्हा ती बाई आपल्या गुरांसकट एका झाडाखाली बसलेली होती. मी तिच्याजवळ गेली तशी ती उठून उभी राहिली. तिने मला नर्मदे हर केलं आणि मी पण तिला नर्मदे हर केलं. ती म्हणाली,”झरवानी तक जाओगी? चलो मै भी उधर ही जा रही हू”.. आता तर मला खूपच छान वाटू लागलं. झरावानी च्या थोडं जवळ येईपर्यंत ही बाई माझ्या सोबतच चालत होती. झरवानी साधारण चार किलोमीटर बाकी असेल तिथपर्यंत ती माझ्यासोबत चालत होती, नंतर जंगलातल्या एका आडवाटेने ती निघून गेली.

खरं मैया सोबत आहे हे माहित असतनाही मला का भीती वाटली असा विचार मी केला असता मला त्यामागचं कारण उमगलं. भीती ही मृत्यूची वाटत नसते, कारण तो अटळ आहे हे आपल्या पैकी प्रत्येकाला जन्म झाला त्या क्षणापासून माहित असते. भीती असते ती एकतर एकटेपणाची किंवा उगाच अंगावर ओढवून घेतेलेल्या जबाबदारींची. हे एकटे चालणं कठीण असतं ते अडकणाऱ्या पायांमुळे. नाळ तुटता तुटत नाही. मग सैर भैर व्हायला लागतं. त्यासाठी काहीतरी उपाय शोधायला हवा. कदाचित आज मला तो उपाय मिळाला होता. अर्थात तो उपाय अमलात आणणं खूप कठीण आहे पण मनापासून मी प्रयत्न करणार आहे.

आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय काही फार मोठा असा नाही. किंवा मी काही जगावेगळं सांगणार आहे असंही नाही. किंबहुना मी जे सांगणार आहे ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. मलाही माहीतच होतं. फक्त या प्रवासात मला ते मनापासून पटलं इतकच! अर्थात ते अमलात आणणं जरी कठीण असलं तरी प्रयत्न करणं तितकं कठीण नाही,हे जेव्हा समजतं तेव्हा निदान प्रयत्न करून बघण्याची इच्छा होते..वेळ खूप लागणार आहे हे मला माहीत आहे. हे पूर्णपणे होईल की नाही हेही सांगता येत नाही कारण हे होणं फार फार कठीण आहे. म्हणून एक छोटासा मंत्र आहे, आणि हा मला मिळालेला मी तुम्हाला पण सांगणार आहे…मला बराच फायदा होतोय यांचा… तुम्हालाही होवो….होईलच… मात्र पुढच्या भागामधे सांगते हं.
©सुरूची नाईक-विदर्भ गट-देवा तुझा मी सोनार:9309926559
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*