नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती👇भाग👇२५.👇
जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तू चि शोधून पाहे..
जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तू चि शोधून पाहे..
समर्थांनी विचारी मनालाच जगातील सर्वसुखी प्राणी कोण हे शोध असे सांगीतले, आणि त्या प्रमाणे हे मन संपूर्ण सारासार विचार करून सुखी जीवाच्या शोधात निघाले असता वरपांगी सुखी दिसणारे सर्वच जीव मुळात कुठल्याश्या सुखाच्या शोधात आहेत आणि त्या सुखाच्या अभावामुळे त्यांना संपूर्ण पणे सुखी असे म्हणता येणे शक्य नाही असा मनाचा विचार झाला.
सुखाची परिभाषा वगैरे करणं तसं फ़ारच कठीण, कारण ज्याच्या त्याच्या दृष्टीने ज्याचं त्याचं सुख हे वेगळं असणार हे निश्चित, आणि म्हणून तो त्या सुखाच्या शोधात कायम फ़िरतीवर असणार हे ही निश्चित.. मग कसं ठरवायचं, की कोण सुखी आहे ते?
समर्थांच्या पुढच्या ओळी मात्र सुख किंवा दु:ख कसं वाट्याला येतं ते सांगतात..
“मना त्वाचि रे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले”
म्हणजे ज्याचे जसे काही कर्म असतील त्याप्रमाणे त्याच्या वाट्याला सुख किंवा दु:ख येतील हे निश्चित… मात्र तुकाराम महाराज म्हणतात.
“सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वता येवढे..”
म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यात सुखाचं प्रमाण कमी आणि दु:खाचं च प्रमाण जास्त आहे असे समजायला हरकत नाही… मग आता करायचं काय? काराण सुख काय ते नक्की माहित नाही, ते कमी आहे, आणि प्रत्येकासाठी वेगळं देखिल आहे…आणि ते मिळवण्यसाठी काय करावं हेच समजत नाहीये.. मग मात्र समर्थांनी यावर सुचवलेला उपाय आठवला… ते म्हणतात…
“देहे दु:ख ते सूख मानीत जावे”
;म्हणजे सुख आणि दु:ख हे मानण्यावर आहे असे समजावे का?
“मना मानसी दु:ख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे”
म्हणजेच मनालाच सुखी होणं शिकवलं पाहिजे असं म्हणायला हरकत नाही… अर्थात ते कसं हे समर्थांनी सांगितलच आहे… पण प्रश्न इथे असा आहे की हे असं करणं सर्व सामान्य माणसाला कसं शक्य होईल? कारण हा उपाय जालिम असला तरी अत्यंत कठीण आहे.
सुखी होण्याचा असा काही कोर्स असेल का, किंवा मनाला शिकवण्याची काही शिकवणी असेल का? हो पण त्याची पूर्ण खात्री असली पाहिजे..की अमुक एक कोर्स केल्यानंतर दु:ख नावाचा प्रकार संपेल आणि सुख नावाचा प्रकार सुरु होईल.. तेही प्रत्येकाचं आपापलं बरं का… कारण याच्या त्याच्या सुखाने मी सुखी होणार नाहीये, मला माझं पर्सनल सुख हवं असणार आहे. मग अशी पर्सनल शिकवणी पण लागेल!
मला वाटतं कदाचित असाच काहिसा शोध माझा ही सुरू असणार, प्रत्येका सारखा.. आणि या सुखाच्या शोधात मला काही वेडी लोक सापडलीत. वेडात सुख असेल कदाचित… हो असेलच… आणि ह्या वेड्या मंडळींच्या वेडाचा ध्यास लागला… लागता लागता असं काही घडलं की माझं आयुष्य संपूर्ण पणे बदललं असं म्हण्टलं तरी चालेल. सुख मिळालं की नाही, मन शिकलं की नाही, ते मला सांगता येणार नाही मात्र एक नक्की समजलं.
सुख आणी दु:ख हे परस्पर विरोधी आहेत आणि एकाचा अभाव हाच दुस-याच्या अस्तित्वाचं मूळ आहे. मात्र असं असलं तरी ही याही पलीकडे काहीतरी आहे हे नक्की… म्हणजे.. जसं दिवस आणी रात्र यामधे संधि काल असतो तसं असेल कदाचित… तो दिवस ही नसतो आणि रात्र ही नसते…. ते जे काही असतं ते परिपूर्ण असतं मात्र दिवस आणि रात्र या दोन्ही पेक्षा वेगळं असतं… सुख आणि दु:ख दोन्ही नाही अशी आयुष्यातली जागा सापडली तर किती छान नं.. म्हणजे मग न सुखाची पर्वा न दु:खाचं दु:ख! अशा ज्या काही अवस्था आहेत त्याला विषेश अशी नावं आहेत, पण सध्या तो आपला विषय नाही… कारण मला आता त्या अभ्यासाबद्दल नाही तर त्या अनुभवा बद्दल लिहायला जास्त आवडेल..
तर मंडळी,माझ्याच मते मी दु:खी नाही
गेल्या एक वर्षात म्हणजे १ नोव्हेंबर २०१७ पासून २२ मार्च २०१८ पर्यंत चा कालावधी माझ्या अयुष्यात असा काही आला की त्यानंतर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला , किंवा संपलाच असं मी म्हणेन… आई नर्मदेच्या सान्निध्यात आणि त्याही नंतर आज जे काही आहे ते,ते आहे इतकच मी सांगू शकेन ..
एखादी गोष्ट आहे आणि म्हणून तिचा स्वीकार करायचा, म्हणजे त्या गोष्टीच्या असण्याचा स्वीकार करायचा तर एखादी गोष्ट नाही तर म्हणून ती नाही हे ही मान्य करायचं ..म्हणजे ठरवून नव्हे हं.. आपोआप, अगदी कुठल्याही प्रयत्ना शिवाय.. अशी काहीशी सवय लागली… चांगली की वाईट ते माहित नाही…पण लागली. त्याचे फ़ायदे तोटे माहित नाही आणि माहित करून घेण्याची इच्छा देखील नाही…आणि हे नेमकं कसं घडलं ते ही माहित नाही..
नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा योग आला, समर्थांच्या सांगण्याप्रमाणे ते पूर्वसंचित च,पण त्यामुळे आणि त्या नंतर माझ्यामधे जो काही बदल झाला त्याचा हा परिणाम… बदल कोणता, किंवा परिणाम काय असा विचार करायचा झाला तर ते मला शब्दात मांडता येणार नाही.. अनुभवता मात्र येतय…आता नेमकं कसं सांगू? प्रयत्न करून बघते….
समोर येणा-या प्रत्येक गोष्टीकडे साक्षीदाराच्या भुमिकेतून बघितल्या जातं.
म्हणजे कसं तर एखाद्या कोर्ट केस मधला साक्षीदार नजरेसमोर आणू… जी काही घटना घडली ती या सक्षीदाराने पाहिली.. मात्र झालेल्या घटनेत त्याचा सकर्म सहभाग नाही, तो केवळ साक्षीदार आहे आणि जे झालं ते सांगण हेच त्याचं काम आहे.. आणि ते ही गरज पडली तर.. गरज पडली नाही तर फ़क्त तो अनुभव गाठीशी कुठेतरी असतो, इतकच! जेव्हा प्रत्येकच गोष्टींकडे असं पाहिल्या जातं तेव्हा त्याचा न आनंद होतो न दु:ख कारण मुळात आनंद किंवा दु:ख हे त्या त्या अपेक्षेवर अवलंभून असते…इथे या साक्षीदाराला घडलेल्या घटने कडून कुठलीही अपेक्षा नसते.. त्यातून त्याला काहीही नको असतं… आणि म्हणूनच तो त्यावर विचार देखिल करत नाही, साक्ष देतो आणि मोकळा होतो…
“मोकळा होतो” हा शब्द च किती सूचक आहे नं…. म्हणजे तो बांधल्या जात नाही किंवा अडकून पडत नाही.. म्हणजे समोर कहिही असो… तो तिथे असतो, पण त्यात गुंतत नाही… ते जे काही आहे ते ते आहे तोवर बघायचं, आणि ते संपलं की संपलं…ते संपण्याचा आनंदही नाही आणि दु:ख तर अजिबात नाही.. मग दुसरं कहीतरी समोर येणारच.. आणि ते ही कधीतरी जाणारच.. हे माहितच आहे… या “काहीतरी” च्या मागे जाण्याची इच्छाच न होणं ही मोकळीक….मला सियाराम बाबांचे शब्द आठवले…. ते म्हणतात.. “ मै तो सिर्फ़ तमाशा देखता हू”… तसं फ़क्त मोकळेपणानी तमाशा बघायलाच आवडू लागलय… मग समोर काहिही असो… पुन्हा तसाच तमाशा असावा अशी इच्छा नाही, तसा नसावाच असं ही मत नाही…. कारण काय समोर येतय हे आपल्या हातात नसतं आणि ते आपल्याला महित ही नसतं.. आपण आपली फ़क्त गंमत बघायची….
ही गंमत बघायला मन आपोआप शिकलं ते मैयाच्या कृपे मुळे… अंगवळणी पडल्यासारखं झालं.. कुठला निर्णय घ्यायला लागला नाही का कुठलं नियंत्रण ठेवावं लागलं नाही… खरं सांगू का.. सुखरूप आनंद काय असतो ते उमगू लागलं… जी अवस्था इतर कुठल्याही अवस्थेवर किंवा घटनांवर किंवा अपेक्षांवर, व्यक्तीं वर अवलंबून नाही त्या अवस्थेला सुखरूप असं म्हणता येईल कदाचित…आणि दु:ख नाही म्ह्णून आनंद म्हणूयात…. आणि हे असं हसत खेळत, आईच्या पदराशी जसं लहान मूल घुटमळतं तसं त्या माईच्या किना-याशी घुटमळत, तिने दिलेल्या अनुभवाच्या शिक्षणातून असं काही साध्य झालं की आता दुसरं काही शिल्लक राहिलेलं नाही. आयुशःयात जे काही मिळायचं होतं ते मिळून झालेलं आहे.. जे काही समोर येतय ते पानात वाढलेलं आहे, आणि जोवर ह्या जड देहाच्या पिंजर-यात हा जीव आहे तोवर ते जे काही समोर येणार आहे बघा वेच लागणार आहे.. मात्र ते बघताना एखादी फ़िल्म बघावी अशी त्रयस्थाची भूमिकाच मनाकडून आपोआप आणि कायम घेतली जाऊ शकणं हे केवढं मोठं भाग्य!
आता ह्यात दु:ख नक्कीच नाहीये.. सुख आहे का ते माहित नाही, कारण ते कसं असतं नक्की याची जाणीव च नाहीये….आणि आता ते जाणून घेण्याची इच्छा ही नाहीये,मात्र हे जे काही आहे त्याला,म्हणजे या अवस्थेला जर सुख म्हणत असतील तर माझ्या ह्या विचारी मनाला समर्थांची क्षमा मागून असच म्हणावं लागेल..
जगी सर्व सुखी अशी मी च आहे…मना शोधिले तूच हे सत्य पाहे.!
सौ सुरुचि:देवा तुझा मी सोनार-9309926559*


Leave a Reply