महत्व दीप अमावस्येचे – प्रा. मिलिंद बडगुजर सर, जळगांव

दीप सुर्याग्निरुपस्व तेजस: तेज उत्तमम !!
गृहाणं मत्कृतां पुजा सर्व कामप्रदो भव:!!

अर्थात
हे दीप तू सूर्य रूप आणि अग्नीरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. अशी प्रार्थना करून ज्या दिवशी घरातील साफसफाई केलेल्या दिव्यांची हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून, आणि आघाडा दुर्वा पिवळी फुले वाहून तसेच कणकेची उकडीचे गोड दिवे बनवून नैवेद्य दाखवून मनोभावे पूजा केली जाते. तो दिवस म्हणजे आषाढ महिन्यातील दीप अमावस्या होय. घरातील इडा पिडा टाळून, अज्ञान, रोगराई, दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करण्याची परंपरा ही आपल्या संस्कृतीत सांगितलेली आहे.
कोणत्याही शुभ कार्याची कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने केली जाते. सत्कर्माचा साक्षीदार दिवा होत असतो. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाचा सात्विक काळ सुरू होत असतो त्यामुळे आषाढी अमावस्येला दीप अमावस्या म्हणत असतात.
भारतात आषाढ दीप अमावस्या विविध नावाने ओळखली जाते. उत्तर भारतात श्रावण अमावस्या किंवा हरियाली अमावस्या नावाने हा दिवस साजरा केला जातो. तर ओडिसा राज्यात चितलगी अमावस्या असे संबोधले जाते. तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यात चुक्कला अमावस्या म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
आपले अनेक सण, उत्सव, व्रत, वैकल्य, परंपरा या निसर्गाशी जोडलेल्या आहेत. भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे चातुर्मासाचा काळ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. या दिवशी शेतकरी नांगर, कुदळ, फावडे, कुऱ्हाड यासारख्या कृषी अवजारांचे पूजन करतो. देशभरात दीप अमावस्या हा आत्मिक शांतता, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव प्राप्त करण्यासाठी अत्यंत भक्तीभावाने, श्रद्धेने साजरा करण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.
चक्षुबोध निषदातील ऋषींनी……
ओम असतोमां सद्गमय! तमसो मा ज्योतिर्गमय !
मृत्युर्मा अमृतं गमय! ओम शांती शांती शांती !!

असे म्हणून दीपाची प्रार्थना केली आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची विनंती दिव्याला केली जात असे. अंधार म्हणजे अज्ञान. कारण अंधारात आपल्याला काही उमगत नाही. पण एक छोटी काडी पेटवली तरी सगळं लख्ख समजतं .ज्ञात होतं. असा त्याचा अर्थ होतो.

दीपज्योति: परब्रम्ह !
दीपज्योति जनार्दन !!
दीपोहस्तु मे पापं ! दीपज्योतिर्नमोस्तुते:!!
दीप म्हणजे अग्नीचे आणि तेजाचे रूप होय. तर त्या दिव्यातील दीपज्योत ही ज्ञानाचे आणि बुद्धीचे प्रतीक असते. प्रकाशाचे साधन या दृष्टीने दिव्याला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवसा प्रखर तेजाचा सूर्य हवा असतो. तसाच रात्री छोटासा दिवा सुद्धा हवाच ना…. ” दीपज्योतिर्नमोस्तुते “ असे म्हणतच घराघरात रोजची सांजवात प्रज्वलित केली जाते आणि लहान मुले दिव्यासमोर हात जोडून
दिव्या दिव्या दीपकार !!
कानी कुंडल मोतीहार !!
दिव्याला पाहून नमस्कार !!
असे म्हणून सायंकाळची प्रार्थना आणि दैवक संस्कार रुजवत असतात.
भारतीय संस्कृतीमधील एक सुंदर स्वप्न म्हणजे दिवा होय.ज्याच्या तेजोमय नयनांनी वसुंधरा आसमंतातील चंद्र चांदण्यांकडे डोळे मिचकवून पाहत प्रसन्नतेने हसत राहतो तो दिवाच असतो. तेजपुंज सूर्यदेवतेच्या चांदनी रथाखाली असंख्य तारांगणांचा चुरा होऊन त्याच्या चमचमणाऱ्या तेजस्वी कणांची उधळण पृथ्वीतलावर दिव्याच्या रुपयाने होत असते. दिव्यात मोतीयांचा रंग सामावलेला असतो. शामसुंदराचा शृंगार म्हणजेच दिवा होय. इंद्रधनुच्या सप्तरंगाचा आल्हाद म्हणजे दिवा होय. वर्षावृत्तीची सफलता म्हणजे दिवा होय. शरद ऋतूची मनमोहकता म्हणजे दिवा होय. दिव्याच्या सहवासात मानवी मने आनंदित होतात. दिव्यामुळेच अंतरंगातील चंदेरी स्मृती उजळून जातात.
तसे पहिले तर दिव्याचा जन्म हा अश्मयुगातील इ.स. पूर्व 70000 वर्षांपूर्वीचा. दगडात खोदलेल्या खोलगट भागात प्राणीजन्य चरबी घालून किंवा शेवाळे भिजवून पहिल्यांदा दिवा वापरला गेला एस्किमो लोक आणि अल्युशन बेटातील लोक अद्यापही याच प्रकारच्या दिव्याचा उपयोग करतात. तेल, तूप, चरबी, दगडी कोळशाचा अथवा अन्य वायू इत्यादी जळणारे पदार्थ साठवून ठेवून वा न साठविता वातीच्या साह्याने किंवा वातीशिवायही जळून प्रकाश किंवा उष्णता देणारे साधन म्हणजे दिवा होय.
जळत्या लाकडाचा ओंडका, चुड, मशाल, काकडा, पणती, दिवटी, हंडी, समई, लामन दिवा, ओळणी, निरांजन, टमरेल, चिमणी, हरिकेन, कंदील, टेबल दिवा,किटसन दिवा, पेट्रोमॅक्स विजेचा फुग्याचा बल्ब, विजेचा नळीचा दिवा, फ्लुरोसंट ट्यूब, तसेच हातात धरावयाची विजेरी, बॅटरी हे सर्व दिव्याचे प्रकार आहेत.
सूर्याचे लहानात लहान रूप म्हणजे दिवा होय .म्हणून प्राचीन काळापासून ते आजपर्यंत सर्व धर्मांमध्ये मानाचे स्थान दिव्याला देण्यात आलेले आहे. सूर्य व अग्नी यांचे प्रतीक म्हणूनच हिंदू धर्मात त्याला पवित्र शुभ मानलेले आहे. जर हातातून दिवा पडला विझला तर लोक त्याला अशुभ चिन्ह मानतात. देवपूजा कोणतेही दैनिक व पितृक धर्मकृत्य करताना दिव्याचे अस्तित्व हे असतेच. हिंदूंनी तर दिव्याला विविध प्रासंगिक नावे दिलेली आहेत. दीपावलीच्या दिवसात आकाशात उंच लटकवलेला आकाश दिवा असतो. त्यातून तो पितरांना प्रकाश देण्याचं काम करत असतो. लग्नकार्यात ओवाळणीसाठी रोवळीमध्ये दिवा ठेवलेला असतो. सांबसदाशिवा पुढे अखंड ठेवत राहणारा निरांजन. तर एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर सुद्धा दिवा लावून झाकून ठेवलेला असतो. कोणत्याही धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये द्वीप प्रजनन करूनच कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. दिवाळीमध्ये तर दिव्यांचीच आरास केली जात असते.
ज्यू आणि ख्रिस्ती धर्मामध्ये सुद्धा दिव्याला विशिष्ट स्थान आहे. रात्रीच्या प्रार्थनेच्या वेळी दिवा आवश्यक मानला जात असतो. इसवी सणाच्या चौथ्या शतकापासून बतिस्मा देतांना व दफन करताना सुद्धा दिवा प्रज्वलित केला जात असतो. मृत व्यक्तीच्या दफन विधी वेळेस मेणबत्ती नेण्याची सूचक प्रथा रोमन कॅथोलिक पंथात आजही आहे.
हिंदू धर्माप्रमाणेच मुस्लिम समाजामध्ये सुद्धा मुलांच्या जन्मानंतर करण्यात येणाऱ्या पट्टी या विधीत दिव्याचा उपयोग केला जातो. तर मुस्लिम धर्मगुरूला दक्षिणा म्हणून शुक्रवारी चिरागीसाठी द्रव्य दान करण्याची प्रथा अस्तित्वात आहे. मुस्लिम समाजात व्यक्तीच्या मृत्यूनंतर साजरा केल्या जाणाऱ्या (39 व्या दिवशी) चालीसा मध्ये सुद्धा दिव्याचाच उपयोग केला जातो. दर गुरुवारी आणि शुक्रवारी कबरी वरील कानोड्यात चिराग म्हणून दिव्याचाच वापर केला जात असतो. मोहरम नंतर येणाऱ्या बारहवफा या महिन्यात मशिदींमध्ये दिवे लावले जातात. रमजान मध्ये मशीद आणि दर्ग्यांमध्ये सुद्धा दिव्यांची रोषणाई केली जाते.
अशा रीतीने दिवा सर्व जाती-धर्मांमध्ये व्यापून उरला आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये विविध आकारांचे नक्षीकाम केलेले तसेच विविध धातूंचे स्वरूप दिव्यांना देण्यात आलेले आहे. विजेच्या दिव्याच्या शोधामुळे आज मानवाने मोठीं प्रगती साध्य केली आहे.
आज देशातील काही भागांमध्ये आषाढी दीप अमावस्याला वेगळ्या हटके पद्धतीने साजरी करण्याची अनिष्ट प्रथा रूढ झालेली दिसते. त्यात दीप अमावस्येला गटारी अमावस्या म्हणतात. खरंतर गटारी शब्दाची उत्पत्ती कशी झाली ? गटारी हा शब्द मूळ गत हारी या शब्दापासून तयार झाला आहे. गत म्हणजे मागे सोडलेला आणि हारी म्हणजे आहार. या शब्दापासून गतहारी हा शब्द तयार झाला. मात्र पुढे याच शब्दाला बोली भाषेत गटारी असे म्हणायला सुरुवात झाली. गटारी शब्दाचा खरा अर्थ काय ? गटारीला गतहारी असे का म्हणतात? हे जाणून घेतले असता, आषाढ अमावस्येपासून पुढे चातुर्मासात मांसाहार किंवा कांदा लसूण असे पदार्थ खाण्यातून वर्ज्य केले जातात. या मागचे शास्त्रीय कारण असं की पावसाळ्याच्या चार महिन्यात आपल्या वातावरणामध्ये होणाऱ्या विविध बदलांसाठी सामोरे जाण्यासाठी केलेली शरीराची तयारी होय. या काळात मासेमारी बंद असते कारण हा विविध प्राणी आणि पक्षांचा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे ही चार महिने सोडून एरवी मुबलक खाण्यात जाणाऱ्या पदार्थांची आवक या काळात कमी झालेली असते आणि म्हणूनच वर्षभर जेवताना घेतला जाणारा आहार मागे सोडून चातुर्मासात वेगळ्या पद्धतीचा आहार घेण्यास सुरुवात करण्याची ही नांदी असते. म्हणून दीप अमावस्याला गतहारी अमावस्या असे सुद्धा म्हणतात.
पुराणांमध्ये सुद्धा दिव्यांचे महत्त्व वर्णन केलेले आहे. त्यात दिव्यांचे विविध प्रकार आणि दिव्यांची वात कोणत्या दिशेस असल्यास कोणता फायदा होतो याचं सविस्तर वर्णन केलेले आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये दिव्यांचे महत्त्व जाणून तीस ओव्या लिहिल्या आहेत.
थोडक्यात सर्वांच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी एक दिवा दीप अमावस्येस अवश्य पुजावा. कारण अविवेकाची काजळी!फेडूनी विवेकदीप उजळी.!! हीच आपली संस्कृती आणि समृद्धी आहे. चला तिचे जतन करूया आणि सनातन धर्म वाढवूया…‌‌…. शुभम भवतु…!!!

शब्दांकन प्रा. मिलिंद बडगुजर( 9421184495 )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*